श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित अध्याय वा देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.

  “श्री गजानन विजय  ग्रंथ”

अध्याय वा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

         श्री संत कवी दासगणू महाराज नवव्या अध्यायाचे लेखन सुरू करण्याआधी परमेश्वराची स्तुती करतात व  म्हणतात, हे सगुणरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, श्रीसंतवरदा शारंगधरा तू पतितपावन दयानिधी आहेस. लहानावाचून मोठ्याचा मोठेपणा होत नाही तसं पतीता शिवाय परमेश्वराचा बोलबाला होत नाही. आम्ही पतित आहोत म्हणून तुला पतित पावन  रुक्मिणीवरा असं म्हणतात.  परिस हा लोखंडाचे सोने करतो म्हणून त्याला लोक महत्त्व देतात किंवा ओहोळांना गोदावरी पोटात घेते म्हणून तिला तीर्थ म्हणतात याचा विचार करून माधवा दासगणूला हात द्या व या भवसागरातून तारा व  कुठेही बुडू जाऊं देऊ नका. आताच्या श्रीमंत  लोकांना मंदिराचा कंटाळा येतो, पण मोटारी, क्लब, बायसिकल यांचे मात्र फार प्रेम आहे.श्रीमंत  मोटे सावकार मात्र याला अपवाद होते. ते श्रीमंत असूनही भाविक होते. शिवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनीच केला होता, म्हणून त्या देवळाला मोट्यांचे मंदिर असं म्हणत होते. आता त्या मंदिरासमोर गोविंदबुवा टाकळीकर नावाचे एक थोर कीर्तनकार कीर्तन करायला शेगावला आले होते. ते त्या मंदिरात उतरले होते. त्यांचा घोडा मंदिराच्या जवळच बांधला होता. हा घोडा अतिशय द्वाड होता. तो समोरून जो कोणी  येईल त्याला लाथा मारीत असे व  कुत्र्यासारखा चावत सुद्धा असे. त्याला बांधलेली चर्‍हाटे तो सहजा सहजी तोडून टाकत होता. कधी जंगलात तर कधी इतरत्र कोठेही वरचेवर पळून जात असे. रात्रंदिवस खिंकाळत असे. अनेक वाईट खोड्या त्याच्या अंगात होत्या. त्याचे हे गुण लक्षात घेऊन त्याला बांधून ठेवायला लोखंडाच्या सांखळ्या होत्या. पण त्यावेळी त्या साखळ्या टाकळीत विसरल्याने गोविंद बुवांनी काहीतरी करून, घोड्याला चर्‍हाटाने मंदिरासमोर बांधले आणि ते जाऊन अंथरुण टाकून झोपी गेलेत.. रात्रीचे दोन प्रहर संपले. सगळीकडं अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. वटवाघळाचे घुत्कार सगळीकडून ऐकू येत होते. टिटव्या ‘टी टी’ करत हिंडत होत्या. सगळ्या घरांची दारे बंद होती. जिकडेतिकडे सामसुम झाली होती. अशा रात्रीच्या घनदाट वेळेला श्री गजानन महाराज पुण्यपुरुष घोडा बांधलेल्या ठिकाणी आले. घोडा द्वाड आहे असं त्यांना काही माहीत नव्हतं.   पण जे जे कोणी द्वाड असतात त्यांना ठीक करण्यासाठीच साधुपुरुष  भूमीवर अवतार घेतात. ज्याप्रमाणे रोग निवारण करण्यासाठी औषध घेतात त्याप्रमाणे  साधुसंत द्वाडपणाचं निवारण करतात.

         घोड्याचं द्वाडपण निवारण्यासाठी गजानन महाराज रात्रीच्या वेळेस घोड्याजवळ आले व  घोड्याच्या चार पायामध्ये जाऊन झोपले. ‘गण गण गणांत बोते’ हे सांकेतिक भजन त्यांच्या मुखाने चालू होते. तसं पाहिलं तर, या भजनाचा अर्थ काय आहे व ते माहीत करण्याचं सामर्थ्य कोणातच नाही. तरी पण या मंत्राचा अर्थ असा वाटतो की, गणी म्हणजे  मोजी असा असावा. जीवात्मा म्हणजे गण. ब्रह्माहून भिन्न नसलेला जीवात्मा म्हणजे गण हे सुचवण्यासाठी गणांत हा शब्द आला असणार. बोते हा शब्द मात्र बाया शब्दाचा अपभ्रंश वाटतो. बाया शब्दाचा अर्थ मन असा असावा आणि या सगळ्याचा गूढ अर्थ असा असावा की,  जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाही हे सदैव  लक्षात ठेव. गिणगिण गिणांत बोते ‘ किंवा ‘गण गण गणांत बोते, अशा दोन्ही प्रकारे हे भजन शेगाव नगरीत म्हणतात. काहीही असो , वरील भजन आनंदाने म्हणत श्री गजानन महाराज त्या द्वाड घोड्याच्या चार पायात निजले होते. जणू त्या घोड्याला या भजनरूप सांखळीने त्यांनी बांधून टाकले होते.

         गोविंद बुवांच्या मनात घोड्याबद्दल खूप मोठी धास्ती होती. म्हणून ते कधीही  वरचेवर उठून घोडा जाग्यावर आहे किंवा  नाही ते पहात असे. अशाच प्रकारे त्या दिवशी त्यांना जेव्हा जाग आला तेव्हा ते जेव्हा आपला घोडा पहावयास निघाले तेव्हा त्यांना असे दिसले की एका जागी घोडा शांत उभा आहे. हे पाहून गोविंदबुवांना अति आश्चर्य वाटले. ते मनात म्हणाले, “हे असं कसं झालं?  हा काय आजारी तर पडला नाही ना? हा  शांत कसा दिसतो? काहीच कळत नाही. ह्याला आजपर्यंत कधी असा एका जागी उभा असलेला मी पाहिला नाही. मग असे कसे काय घडले ही शंका त्याच्या मनात आली असल्याने ते त्या घोड्याला जेव्हा पहायला गेले तर त्यांना एक माणूस त्या द्वाड घोड्याच्या चार पायात निजलेला आढळला. म्हणून त्यांनी अगदी जवळ जाऊन नीट निरखून पाहिलं तर तेथे  त्यांना कैवल्यदानी श्री गजानन स्वामी समर्थ निजलेले आढळले. ते म्हणाले, 

         “हा घोडा आता का शांत झाला त्याचं कारण कळलं आहे. समर्थांच्या सानिध्यात तो घोडा शांत झाला होता. जिथं कस्तुरी असते तिथं दुर्गन्ध कोठून येणार?” गोविंदबुवां गहिवरून आले व  अत्यंत आदराने त्यांनी समर्थांच्या पायावर डोके ठेवले. त्यांनी मुखानं महाराजांचं स्तवन करायला सुरुवात केली व म्हणाले ,

 “आपण खरेच गजानन आहात आणि गणेशाप्रमाणे आपण विघ्नांचे कंदन करता याचा आज मला प्रत्यय आला. माझा घोडा अती द्वाड आहे सर्वजण भितात पण आता तुम्ही गुरुमुर्ती त्याचा द्वाडपणा हरण करण्यासाठी धावून आले आहात. मी ह्या घोड्याच्या अचाट खोडी किती सांगू? चालताना मध्येच उड्या मारतो.  क्षणा क्षणाला मागल्या पायाने लाथा झाडतो म्हणून मी सुद्धा याला कंटाळून  विकायला बाजारात घेऊन गेलो होतो पण ह्या घोड्याला विकत घ्यायला किंवा फुकट घ्यायला  सुद्धा कोणी तयार होत नाही. अगदी फुकट घ्या म्हंटलं तरी नको म्हणतात लोकं. त्याच्यावर आपण दया केलीत हे फार चांगले झाले आहे. खरं म्हणजे कथेकऱ्याचं घोडं गरीब असायला पाहिजे. धनगराच्या घरात वाघाचा काय उपयोग?” असा प्रसंग घडला व आता घोडा एकदम गरीब झाला. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी तर स्वामीनी प्रकट झाले होते. ते घोड्यास म्हणाले, “आतां गड्या खोड्या करणं सोडून दे.तूं शिवाच्या समोर आहेस याचा काहीतरी विचार कर आणि जरा नंदीसारखा वाग. कुणाला त्रास देऊ नकोस.” असं  बोलून दयाघन निघून गेले. स्वामींचा महिमा असा झाला कि, त्यांच्या आपल्या प्रभावामुळे त्यांनी पशूला सुद्धा समज दिली.

         दुसऱ्या दिवशी पुण्यराशी मळ्यांत असताना गोविंदबुवा घोड्यावर बसून दर्शनाला आले. गोविंदबुवांच्या घोड्याची कीर्ती सगळ्या शेगावला ठाऊक असल्याने सगळेजण त्याला भीतच  होते. ते मळ्यांत आलेला पाहून  लोक म्हणाले, “गोविंदबुवा ही पीडा येथे घेऊन कशाला आलाय ? येथे मुलं बाळ, बाया आहेत. हा घोडा कुणाचाही सहज घात करेल.”

         त्यावर गोविंदबुवा त्याना म्हणाले, “तुमचं  म्हणणं मी ऐकलंय. पण काल रात्री समर्थांनी माझ्या घोड्यास शहाणं केलं आहे. आता त्याने खोड्या टाकून दिल्या असून तो गोगलगाई सारखा समान झालाय. आता भिण्याचे काही कारण नाही.”  गोविंदबुवांनी चिंचेखाली घोडा उभा केला. आश्चर्य म्हणजे घोडा चर्‍हाटाने न बांधताच एक प्रहर उभा राहिला होता. भाजीपाला होता,  कोवळं गवत मळ्यांत होतं पण कशालाही  घोड्याने तोंड लावलं नाही. संतांची शक्ती एवढी अगाध आहे की, पशूही त्यांच्या आज्ञेंत वागतात.” गोविंदबुवांनी पत्र्यांत येऊन समर्थांची स्तुती करायला सुरुवात केली. “अचिंत्य जगताप्रती कृति तुझी न कोणा कळे | असो खलहि केवढा तव-कृपे सुमार्गी वळे || उणे पुढति ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी | शिरी सतत माझिया वरदहस्त ठेवा झणी ||१ ||

         अशी स्तुती करून गोविंदबुवा  घोड्याला घेऊन टाकळीला निघून गेले. शेगावला प्रत्येक दिवशी काहीतरी मनोरथ मनात ठेवून यात्रेकरू येत असायचे. त्या यात्रेकरू मंडळीत बाळापूरचे दोन गृहस्थ कांही मनोरथ बाळगून  समर्थांच्या दर्शनाला आले. रस्त्यातच ते एकमेकांना म्हणाले की, “पुढल्या वेळेस शेगाव वारीला येऊ त्यावेळी आपण सुखा गांजा घेऊन येऊ. कारण या गांजावर समर्थांचे फार प्रेम आहे. तो आपण आणला तर त्यांची आपल्यावर  कृपा होईल. लोक बर्फी खवा आणतात, आपण गांजा आणू. लक्षात रहाण्यासाठी धोतराला गाठ  बांधून ठेऊ म्हणजे विसर पडणार नाही.” पण एवढं म्हणून सुद्धा जेव्हा पुढल्या वारीस दोघेजण शेगावला आले तेव्हा गांजा आणायचं विसरलेच ! श्री गजानन महाराजांच्या पायावर डोकं ठेवताना त्यांना गांजाची आठवण झाली व  तो आणायचं आपण विसरलो हे त्यांच्या लक्षात आलं. आता पुढच्या वेळेस येताना दुप्पट गांज्या घेऊन येऊ असं मनात आणून  ते दर्शन घेऊन परत गेले. पण ते जेव्हा पुढील वारीला शेगावला आले तेव्हा पण गांजा आणायचे  विसरले, तेव्हा स्वामी  भास्कराना म्हणाले, “जगाची रीत कशी आहे पहा, धोतराला गाठ मारून सुद्धा लोकं  जिन्नस आणायला विसरतात. जातीने ब्राह्मण असून सुद्धा खोटं बोलतात ते ब्राह्मण कसले यांना तर  चांडाळ म्हणा. सध्या ब्राह्मणांनी स्वधर्म सोडला, आचार विचार टाकला ह्या मुळेच त्यांनी स्वतःचं श्रेष्ठत्व संपवलं. मनात नवस करतात आणि हात हालवत येथे येतात. अशानं का त्यांचं मनोरथ पूर्ण होईल? बोलण्यात मेळ हवा. चित्त निर्मळ असावं. तरच भास्करा तो घननीळ कृपा करतो बरं !”

         हे शब्द त्या दोघांच्या मनाला फार लागले. त्याचबरोबर आपल्या मनातलं सगळं महाराजांना माहीत झालं याचं त्यांना फार नवल वाटलं व ते  म्हणाले, “पाहा यांचं ज्ञान केवढे अगाध आणि परिपूर्ण आहे. हे जगत्चक्षु गजानन महाराज सूर्याप्रमाणेच आहेत. आपण मनात नवस केला तो  समर्थांनी ओळखला. चला, आता गावातून गांजा घेऊन येऊ.” असा विचार करून ते उठले आणि गावात गांजा आणायाला निघाले. तेव्हा महाराज त्याना म्हणाले, “आतां शिळ्या कढीला ऊत आणू नका. त्यात काही अर्थ नाही. मी काही गांज्याला हापापलो नाही. गांजा आणायला बाजारात जाऊ नका. तुमच्या बोलण्यात नेहमी मेळ ठेवा म्हणजे झालं ! लबाडांचे हेतु कधी पूर्ण होत नाहीत, ही खूणगांठ कायम मनात बांधून ठेवा. तुमचे काम झाल्यावर तुमची मर्जी असल्यास गांजा आणा. पुढील आठवड्यांत तुमचे काम उत्तम रीतीने होईल. पण कधी नेम चुकवू नका. येथील पांच वार्‍या करा कारण येथे मृडानीपती कर्पूरगौर स्थिर झालेला आहे व  त्याच्या कृपेने कुबेर धनपती झाला. जा त्याला नमस्कार करा व  गांजा आणायला विसरू नका. कारण परमार्थात माणसाने कधीही खोटे बोलू नये.”

         त्यां दोघांनी महाराजांचं दर्शन घेतलं, व महाराजांनी केलेल्या उपदेशानुसार शिवाचे दर्शन घेऊन दोघेही बाळापुरास निघून गेले. पुढील आठवड्यात त्यांचे काम यशस्वी झाले. पुढच्या वारीला तेही गांजा घेऊन आले. बाळापुरात बाळकृष्ण नावाचे एक रामदासी होते. त्याच्या पत्नीचं नाव होतं पुतळाबाई ! दोघही परम भाविक असून दरवर्षी पायी सज्जनगडाची वारी करत असे. पति-पत्नी प्रत्येक वेळी  पौष महिन्यात संत रामदास स्वामी च्या दर्शनासाठी जात असे व  सोबत  ओझं वाहण्यासाठी एक घोडं सोबत ठेवत असे. इतर समानाबरोबर कुबडी कथा दासबोध हे समान बरोबर घेत असे. असं असलं तरी त्यांना साधुत्वाचा गर्व कधीही आला नाही. ते वाटेत चालत जाताना वाटेतल्या गावात झोळी फिरवून भिक्षा मागायची आणि रामाला नैवेद्य दाखवायचा असा त्यांचा नित्य  परिपाठ होता. पौष वद्य नवमीला पत्नी पुतळाबाई सोबत बाळापूर सोडायचं. बाळकृष्ण बुवांच्या हाती चंदनाच्या चिपळ्या होत्या व पुतळाबाई झांज हाती घेऊन साथ देत असत. वाटेने जाताना रघुपतीचा नामगजर चालू असायचा. शेगाव खामगाव मेहेकर देऊळगाव राजा मार्गे जालन्यामध्ये आनंद स्वामीस वंदन करून जांब गावी जात. हे समर्थांचे जन्मस्थान असल्याने तेथे तीन दिवस मुक्काम करत. पुढे जाऊन  गोदावरीचे दर्शन घेत. नंतर बीड,  आंबेजोगाई, बेलेश्वर स्वामींचे मोहरी, समर्थांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींचे डोमगाव, नरसिंगपूर, पंढरपूर, नातेपोते, शिंगणापूर, वाई आणि शेवटी गडाच्या पायथ्याशी असलेले सातारा येथपर्यंत येत असत. नवमीच्या उत्सवासाठी माघ वद्य प्रतिपदेला श्रीसज्जन गडावर पोहोचत असत. श्रीस्वामी समर्थांचं स्मरण करून यथाशक्ती ब्राह्मणभोजन देत असत. बाळकृष्ण बुवा खरेखरेच रामदासी होते. असे रामदासी आता होणे कठीणच ! दासनवमीचा उत्सव झाल्यावर उलट मार्गाने परत जात असत. असा क्रम खूप दिवस चालला होता. आता वय साठ वर्षाचे वर झालंय व त्यामुळें पुढील वर्षी आपल्याला पायी वारी करता येईल किंवा नाही असा त्यांचा स्वतःवर  भरवसा वाटत नव्हता.अशातच माघ वद्य द्वादशीला बाळापूरला परत जाण्यासाठी नेहमीप्रमाणे सज्जनगड सोडायची वेळ आली. मग अगोदरच्या  दिवशी म्हणजे एकादशीला ते समर्थ समाधीजवळ येऊन बसले. दुःखानं त्यांचे डोळे भरून आले. तोंडातून शब्द फुटेना. कसं बसं अश्रू आवरून म्हणाले, 

“हे रामदास स्वामी समर्था ! हे गुरुराया पुण्यवंता ! माझें शरीर आता थकले. त्यामुळे पायी वारी होईल असे वाटत नाही. वाहनात बसून सज्जनगडी येईन म्हंटलं तर दयाळा तेही कठीण दिसतं रे आजवर  नेम चालला पण आता यात अंतर पडेल असं वाटत आहे, कारण आता शरीर थकलय, शरीर स्वस्थ  असलं तरच परमार्थ घडतो. हे रामदासा माझे आई, खरं म्हणजे मी तुम्हाला हे सांगावं असं नाही. आपण सर्व जाणताच.” 

         अशी प्रार्थना करून बाळकृष्ण बुवा अंथरुणावर जाऊन झोपले तेव्हा पहाटे त्यांना एक स्वप्न पडलं. त्यांच्या स्वप्नात रामदास स्वामी आले आणि म्हणाले, “असा हताश होऊ नकोस. येथून  पुढे खास उत्सवासाठी सज्जनगडी  येऊ नकोस. माझी तुझ्यावर पूर्ण आहे कृपा आहे. यापुढे तू तुझ्याघरी बाळापुरात माझा उत्सव साजरा कर. मी नवमीला तुला दर्शन द्यायला येईन. हे माझं वचन समज व  आपली शक्ती पाहून परमार्थ कर. “हे स्वप्न पाहून बुवांना अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदातच ते पत्नी सोबत बाळापूरला परत आले. पुढील वर्षी माघ वद्य प्रतिपदेला बुवांनी बाळापुरात त्यांच्या  घरी समर्थांच्या उत्सवाला आरंभ केला. बाळकृष्णाच्या मनात हाच विचार घोळत होता की, “स्वामी समर्थ नवमीला येतो म्हणाले होते पण ते आता कसे येतात याचीच  फार उत्सुकता लागली आहे. बुवांच्या  सांगण्यावरून  गांवकर्‍यांनी उत्सवासाठी आपापसांत वर्गणीही गोळा केली. दासबोधाचे वाचन, रात्री हरी कीर्तन, दोन प्रहरी ब्राह्मणभोजन, संध्याकाळी धूपार्ती असा कार्यक्रम रोज होत होता. नऊ दिवस बाळापुरात थाटात उत्सव चालू होता. नवव्या दिवशी दुपारी एक नवल  घडले. ऐन दुपारी श्री गजानन महाराज  साक्षात्कारी बाळकृष्णाच्या दारांत येऊन उभे राहिले. आत रामाला अभिषेक सुरू होता. श्री गजानन महाराजांना पाहून गावकऱ्यांना आश्चर्य वाटले व ते बुवांना म्हणाले , “अहो आता उठा , तुमच्या दासनवमीच्या उत्सवासाठी श्रीगजानन महाराज स्वतःहून दारात आलेत.” त्यावर बुवा म्हणाले, “श्री  गजानन महाराज आले ते बरे झाले. त्या संतांचेही पाय माझ्या घराला लागले. पण आज मी सज्जनगड निवासी समर्थांची आतूरतेने वाट पहात आहे. मी नवमीला येईन असं त्यांनी मला वचन दिलं होतं व  ते सत्य होईल अशी मला खात्री पण आहे.”

         इकडे स्वामी गजानन दारात उभे राहून “जय जय रघुवीर  समर्थ” म्हणून श्लोक म्हणू लागले.

 श्लोक- “अहिल्या शिळा राघवें मुक्त केली | पदीं लागतां दिव्य होऊनि गेली ||”

        हे ऐकून बाळकृष्णाची स्वारी उठली. त्यांना वाटलं, श्री रामदास स्वामी समर्थच आपल्या घरी आले. म्हणून ते दारात येऊन पाहू लागले. तो गजाननाची अजानबहु नग्न स्वारी निजानंदामध्ये उभी असलेली त्यांना दिसली. त्यांना नमस्कार करायला गेले तर त्याना रामदास स्वामी दिसले. हातात कुबडी, पाठीवर रुळणारा जटाभार, कपाळावर गोपीचंदनाचा त्रिपुंड आणि हिरमुजी रंगाची लंगोटी असं त्यांचं रूप बघितल्यावर बाळकृष्णाना प्रेमाचे भरते आले. शब्द दिल्याप्रमाणे समर्थ आपल्याकडं आले आहेत हे पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. अश्रू पुसून ते पाहू लागले तो पुन्हा गजानन महाराज दिसू लागले. कुबडी, लंगोटी, त्रिपुंड, जटाभार सगळंच गुप्त झाल्यामुळं हताश झाले. तर परत रामदास स्वामी दिसू लागले. पुन्हा निरखून पहावं तर आपले गजानन महाराज पुढं उभे दिसावेत. अशी सिनेमातल्या दृष्या सारखी गती झाली. हे कोडं काही उमगेना. मनात सगळा घोटाळा व्हायला लागला तेव्हा मग श्री गजानन महाराज म्हणाले, “रामदासांच्या प्रेमापोटी विचलित होऊन जाऊ नकोस. तुझा समर्थ मीच आहे. अरे मागे गडावर माझीच वस्ती होती तीच माझी वस्ती आता शेगावात आहे व तेथे मी आता  मळ्यात येऊन राहिलो आहे. सज्जन गडावर तुला मी वचन दिलं होतं ना कि, मी दासनवमीला बाळापुरला येईल म्हणून? हे तुला आता आठवतंय ना? त्या वचनाची पूर्तता  करण्यासाठी मी आता  येथे आलो. तेव्हा आता सर्व चिंता सोड. मीच रामदास आहे याची खात्री मनाशी ठेव. तू शरीररूपी वस्त्राला किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणायचं? 

गीतेतील वासंसि जीर्णानि  श्लोक आठव आणि मुळीच भ्रमिष्ट होऊ नकोस. चल आता मला बसायला पाट दे.”

 बाळकृष्णाचा हात धरून गजानन महाराज घरांत येऊन एका मोठ्या पाटावर बसले.

         बाळापुरात गजानन महाराज आल्याची बातमी सर्वत्र पसरली. त्यांच्या चरणांचे  वंदन करण्यासाठी जनसमुदाय येऊ लागला.रामदासी दिवसभर विचार करत होते. शेवटी रात्रीच्या चौथ्या प्रहरात बाळकृष्णाना स्वप्न पडले. स्वप्नात रामदास स्वामी आले आणि म्हणाले, “अरे, गजानन हा मीच  असून सध्या मी तुमच्या वर्‍हाड प्रांतात रहातो. यात मुळीच संशय बाळगू नकोस. संशय धरलास तर तुझंच नुकसान होईल. मी तोच समजून गजाननाचे पूजन कर. गीतेचे संशयात्मा विनश्यति हे वचन माहीत आहे ना?

        “हे स्वप्न पाहून बाळकृष्ण बुवा अत्यंत आनंदीत झाले व त्यांनी अत्यादराने श्री  गजानन महाराजांच्या पायावर डोके ठेवले व  म्हणाले, “महाराज आपली लीला जाणण्याला मी असमर्थ होतो  त्यामुळे तुमची लीला व सामर्थ्य मी ओळखू शकलो नाही , पण स्वप्नात येऊन तुम्ही त्याच पण समाधान केलंय. माझ्या नवमीची सांगता झाली. आता काहीच कमी राहिली नाही. आता काही दिवस बाळपुरात रहा व  माझ्या मनात जी आस आहे ती पूर्ण करा.”

        त्यावर महाराज म्हणाले, “माझं ऐक कांहीं दिवस गेल्यावर मी बाळापुरला परत येईन.” असं म्हणून स्वामी जेवण घेवून ते शेगावला निघून गेले. विशेष म्हणजे ते  रस्त्याने जाताना कोणालाही दिसले नाही व  एका क्षणात शेगावला पोहोचले.

         असा हा श्री संत कवि दासगणू विरचित  श्री गजानन विजय ग्रंथाचा नववा अध्याय आता पूर्णत्वाला जात आहे.हा अध्याय वाचल्यावर  बाळाभाऊंना जसे श्री गजानन महाराज येऊन पावलेत व त्यांना दर्शन दिलंय त्याचप्रमाणे सर्व भाविकांना सुध्दा महाराज त्यांना दर्शन देवो व त्यांचे मनोरथ पूर्ण करो हीच प्रार्थना करतो.  शुभं भवतु ! श्रीहरिहरार्पणमस्तु !!

- अनुवादक: श्री वामन रुपरावजी वानरे.

मो.09826685695

Leave a Reply