१. || गण गण गणांत बोते ||
वक्रतुंड
महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं
कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ॥
शांताकारं
भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं
गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् ।। १ ।।
लक्ष्मीकांतं
कमल नयनं योगिभिर्ध्यान गम्यं ।
वंदे विष्णु
भवभयहरं सर्व लोकेकनाथम् ॥ २ ॥
गुरुर्ब्रह्मा
गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराः
२. एक मानसपूजा
-मेघना अभ्यंकर (मुंबई)
परब्रह्म सद्गुरू गजानन करिते तुज आवाहन
साद घालते अती प्रेमाने शुद्ध मांडले आसन
आसनस्थ होवूनी स्वीकारा माझे मानसपूजन
पंचामृती हे स्नान घालिते लाविते सुगंधी चंदन
वस्त्र रेशमी सुंदर केशरी करिते तुज परिधान
दुर्वा, मोगरा, गुलाब गावठी वाहते चरणी वेचून
मस्तक ठेवून चरणांवर तुज करिते मी वंदन
जेवू घालते भाकरी झुणका वरण भात कालवून
शीत मधुर हे ताक पिऊनी मग तांबूल करी सेवन
धूप दीप आरती ओवाळून करते तव हे स्तवन
कार्य तुझेच सिद्धीस जाया दे मज आशिर्वचन
३. “गण गण गणात बोते” (१ माळ)
४. “श्री गुरुपाठाचे अभंग”
|| श्रीशंकर ।।
संतकवि श्रीदासगणू विरचित “श्री गुरुपाठाचे अभंग”
संतचुडामणी स्वामी गजानन । तयाचे महिमान ऐका आतां ।। योगयोगेश्वर हाचि एक जाणा । शेगांवींचा राणा गजानन ॥ तयाचिया पायीं ठेवा आतां शिर । तरी व्हाल पार भवाब्धीच्या !। गणूदास म्हणे आली ही पर्वणी । घ्यावी ती साधुनी प्रयत्नानें ।।१।।
कोण हा कोठिचा कांहींच कळेना । ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे ।। साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती । आलीसे प्रचीती बहुतांना ।। जानराव देशमुख झालासे आजारी । मृत्युशय्यैवरी पडला होता ।। समर्थांचे तीर्थ तयासी पाजतां । दूर झाली व्यथा गणू म्हणे ॥२॥
बंकटलालाचे तें झाले असें घर । प्रती पंढरपूर स्वामीमुळे ।। लांबलांबुनिया दर्शनास येती । लोक ते पावती समाधान ।। भक्त भास्कराच्या –साठीं तें जीवन । केलें हो निर्माण खाचाडांत ।। गणूदास म्हणे एका प्रदोषकाळीं । दिसले चंद्रमौळी एक्या भक्ता ॥३॥
कावळे हाकिले पंक्तीच्यामधूनी । अकोलींच्या बनी समर्थाने । अजूनीपर्यंत चाललें तें व्रत । पहा अकोलींत जाऊनियां ॥ पितांबरा हस्तें आणविला पाला । वठलेल्या वृक्षाला कोंडोलींत ॥ गणू म्हणे शेगांवी विस्तवावांचून । दाविली पेटवून चिलीम ती ॥४॥
मुकिंदा भक्ताचे कान्होले ते दोन । केले कीं सेवन आवडीनें ॥ मोहळाच्या माशा डसतां अपार । राहिला तो स्थिर योगिराणा ॥ कुंभक करुनी काटे मधमाशांचे । टाकिले अंगाचे बाहेर की । गणूदास म्हणे योग ज्यासी आला । अजिंक्य तो झाला जगामध्यें ॥५॥
गीताशास्त्रामाजीं ब्रह्माचें लक्षण । सांगी नारायण अर्जुनातें ॥ जळेना तुटेना जे कां कशानेंही । तेंच तत्व पाही ब्रह्म असे ॥ याचें प्रत्यंतर गोसाव्या दाविलें । मळ्यामाजीं भले कृष्णाजीच्या ॥ गणूदास म्हणे ऐसा अधिकारी । एक या भूवरी गजानन ॥६॥
बाळापुरी होता एक रामदासी । नाम होते ज्यासी बाळकृष्ण ॥ माघ वद्य नवमी पर्वणी ती थोर । अवघे बाळापूर आनंदले ।। त्याच दिनी स्वामी गेले बाळापुरा । बाळकृष्णा घरा आवर्जून ॥ गणूदास म्हणे द्वारामाजीं ठेले । कौतुक दाविले अभिनव ॥७॥
जटेचे ते केस रुळती पाठीवरी । कुबडी तीही करी चंदनाची ।। ऊर्ध्व तो त्रिपुंड्र भालासी लाविला । कंठी शुध्द माळा तुळशीची ।। रामनामाची ती केलीसे गर्जना । वस्त्र अंगी जाणा हुरमुजीचें ॥ गणूदास म्हणे स्वामी रामदास । हाच असे खास पूर्वीचा कीं ॥८॥
बायजाबाई नामे माळ्याची कन्यका । एक होती देखा मुंडगांवांत ॥ आजन्म राहिली बायजा ब्रह्मचारी । जेवी पंढरपुरी जनाबाई॥ राजाराम कवराचा फोड बरा केला । देऊन अंगायला समर्थानीं ॥ गणूदास म्हणे बापुन्याकारण । करविले दर्शन विठ्ठलाचे ॥९॥
वासुदेवानंद योगयोगेश्वर । जयाचा अधिकार फार मोठा ॥ तेही आले स्वामी शेगांवीं भेटाया । कांही ती कराया ब्रह्मचर्चा || एक तो श्रीविष्णु एक विश्वेश्वर । दोघात अंतर मुळी नाही ।। रक्तपिती व्याधी गंगाभारतीची । निवटिली साची गणूं म्हणे ॥१०॥
खंडू पाटलाचे भाऊ अनावर । होते वतनदार शेगांवींचे ।। आपुल्या शक्तीचा अभिमान त्यां झाला । तोच निवटिला समर्थांनीं ।। ऊंसाची ती मोळी हातानें पिळून । दिधला काढून रस प्याया ॥ गणूदास म्हणे अशक्य तें कांहीं । उरलेंच नाहीं समर्थाला ॥११॥
सोमवती पर्व माघमासीं आलें । लोक ते चालले दर्शनाला ॥ नर्मदेच्या कांठी बैसला धूर्जटी । द्याया भक्ता भेटी ओंकारी तो ॥ ओंकारेश्वर हे क्षेत्र पुरातन । पातकाचें दहन जेथे होई ।। गणूदास म्हणे येथेची दीधला । शंकराचार्याला संन्यास तो ॥१२॥
येथे पुण्यश्लोक मांधाता भूपति । लोक अजुनि गाती कीर्ती ज्याची ॥ पूर्वपुण्य ज्याचें सबळ साचार । तोच येई नर क्षेत्रासी या नर्मदेचें स्नान ओंकारदर्शन । घेत तया पुण्य बहुत लाभे ॥ गणूं म्हणे ऐशी माय ती नर्मदा । नुपेंक्षी हो कदा भक्तालागीं ॥१३॥
गजानन आले ऐशा त्या क्षेत्रासी । हर्ष नर्मदेसी बहुत झाला ॥ पाप्यांची पातकें क्षेत्रें घालवीती । तींच पावन होती साधुस्पर्शे ॥ नाव फुटल्याचें करुनी आमीष । नर्मदा सेवेस प्रकटली ।। गणूदासम्हणे लावुनिया हात । पैल तटाप्रत नेली नौका ||१४||
धार कल्याणींचा साधु रंगनाथ । आला शेगांवांत भेटावया ॥ उभयतांमाजीं ब्रह्मचर्चा झाली । ती ज्यांनी ऐकिली तेचि धन्य ॥ साधूच्या मुखींचे शब्द हे अमृत । पडतां श्रवणांत तरुन जाय ।। गणूदास म्हणे साधूची महती । देवही वानिती स्वर्गामध्ये ॥१५॥
साधूचा वशीला जयासी लागला । तोच सरता केला पांडुरंगे ॥ संत हे हरीच्या गळ्याचे ताईत । संत हे साक्षात कल्पतरु ॥ संत हेचि जाणा मोक्षाचे वाटाडे । तेवि ज्ञानगाडे प्रत्यक्षची ॥ गणूदास म्हणे आतां बोलू किती । रुक्मिणीचा पती नमी त्यासी ॥१६॥
अर्जुनाचें घोडे धूतसे भगवान । करी बाळंतपण चोख्याघरीं ॥ दामाजीपंताची रशीद बेदरी । झालासे हरी पोहोचवीता ।। नाथाचे सदनीं पाणी तें वाहिले । शेत रक्षियलें सावत्याचें ॥ गणूदास म्हणे ऐसा संतप्रेमा । आहे पुरुषोत्तमा पहा तुम्ही ॥१७॥
आळंदी, पैठण, देहू, अष्टी, तेर । तैसां तो साचार सज्जनगड ।। अरण, मंगळवेढें संतांची ही गांवें । तैसैचि लेखावें शेगांवला || कोणत्याही अंशें फरक नाहीं यांत । शेगांव साक्षात संतभूमी ।। प्रभातीं या गांवा भावें आठवितां । गणूं म्हणे चिंता होते दूर ॥१८॥
नरजन्माचे या सार्थक करा रे । अहोरात्र ध्यारे पांडुरंगा ॥ गजाननापायीं द्दढ श्रध्दा ठेवा । द्वेष तो नसावा कोणाचाही ॥ प्रत्येक गाहाणे सांगा संतापाशीं । होईल तो त्यासी निवटिता ॥ गणूदास हेंची सांगे वारंवार । जोडा आतां कर गजानना ॥१९॥
गुरुराया आमुची उपेक्षा न करी । तुझ्या बळावरी आमुच्या उड्या ।। त्रिविध तापाचें निर्मूलन करा । आरोग्य शरीरा देऊनिया ।। हात पसरण्याचा प्रसंग ना आणी । कोणापुढे जनीं गजानना ।। गणूदास म्हणे आनंदीत वृत्ती । ठेवावी गुरुमूर्ति सर्वकाळ ॥२०॥
वारी शेगांवाची करी जो कां भक्त । तयासी अनंत सांभाळील ॥ गजाननापायीं शुद्ध ज्याची निष्ठा । तयालागी कष्टा दे ना हरी ॥ गजानन कीर्तिचे करी जो कां गान । तया नारायण दूर नाहीं॥ अनुभव याचा घ्या रे तुम्ही सारे । विनवी अत्यादरें दासगणूं ॥२१॥
५. ।। श्री गजानन महाराज अष्टक (पृथ्वीवृत्त) ।।
गजानना गुणागरा परम मंगला पावना ।
अशीच अवघें हरी, दुरीत तेंवि दुर्वासना ।।
नसे त्रिभुवनामधे तुजविणे आम्हां आसरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।
निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करीं ।
तुझी पतितपावना भटकलों वृथा भूवरी ।
विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वासरा ।
करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ।।२।।
अलास जगी लावण्या परतुनी सु-वाटे जन ।
समर्थ गुरुराज ज्या भुषवि नाम नारायण ।।
म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।३।।
क्षणांत जल आणिलें नसून थेंब त्या वापिला ।
क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थला ।
क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।४।।
अगाध करणी तुझी गुरुवरा ! न लोकां कळे।
तुला त्यजुनी व्यर्थ ते अचरितात नाना खुळे ।
कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।५।।
समर्थस्वरूपप्रती धरून साच बाळापुरी ।
तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरीं ।
हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।६।।
सछिद्र नौकेप्रती त्वदिय पाय हे लागतां ।
जलांत बुडता तरी तिजसी नर्मदा दे हाता ।
अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।७।।
अतां न बहु बोलतां तव पदांबुजा वंदितों ।
पडो विसर ना कदा मदिय हेंचि मी मागतों ।
तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।८।।
६. ॥ श्री गजानन बावन्नी ॥
जय जय सदगुरू गजानना | रक्षक तूची भक्तजना ||१||
निर्गुण तू परमात्मा तू | सगुण रुपात गजानन तू ||२||
सदेह तू परी विदेह तू | देह असून देहातीत तू ||३||
माघा वैद्य सप्तमी दिनी | शेगावात प्रगटोनी ||४||
उष्ट्या पत्रावाळी निमित्त | विदेह्त्व तव हो प्रगट ||५||
बंकट लालावारी तुझी | कृपा जाहली ती साची ||६||
गोसाव्याच्या नवसासाठी | गांजा घेसी लावून ओठी ||७||
तव पद तीर्थे वाचविला | जानराव तो भक्त भला ||८||
जानाकीरामा चिंचवणे | नासावोनी स्वरूपी आणणे ||९||
मुकीनु चंदूचे कानवले | खाउन कृतार्थ त्या केले ||१०||
विहिरी माजी जलविहीना | केले देवा जल भरणा ||११||
मध माश्यांचे डंख तुवा | सहन सुखे केले देवा ||१२||
त्यांचे काटे योगबले | काढुनी सहजी दाखविले ||१३||
कुस्ती हरीशी खेळोनि | शक्ती दर्शन घडवोनी ||१४||
वेद म्हणुनी दाखविला | चकित द्रविड ब्राह्मण झाला ||१५||
जळत्या पर्याकावरती | ब्रह्म्हगीरीला ये प्रचीती ||१६||
टाकळीकर हरिदासाचा | अश्व शांत केला साचा ||१७||
बाळकृष्ण बाळापुराचा | समर्थ भक्ताची जो होता ||१८||
रामदास रूपे त्याला | दर्शन देवोनी तोषविला ||१९||
सुकुलालाची गोमाता | द्वाड बहु होती ताता ||२०||
कृपा तुझी होताच क्षणी | शांत जाहली ती जननी ||२१||
घुडे लक्ष्मण शेगांवी | येता व्याधी तू निरवी ||२२||
दांभिकता परी ती त्याची | तू न चालवुनि घे साची ||२३||
भास्कर पाटील तव भक्त | उद्धरलासी तू त्वरित ||२४||
आज्ञा तव शिरसावंद्य | काकही मानती तुज वंद्य ||२५||
विहिरीमाजी रक्षियला | देवा तू गणू जवऱ्याला ||२६||
पितांबराकरवी लीला | वठला आंबा पल्लवीला ||२७||
सुबुद्धी देशी जोश्याला | माफ करी तो दंडाला ||२८||
सवडद येथील गंगाभारती | थुंकूनि वारिली रक्तपिती ||२९||
पुंडलिकाचे गंडांतर | निष्ठा जाणूनि केले दूर ||३०||
ओंकारेश्वरी फुटली नौका | तारी नर्मदा क्षणात एका ||३१||
माधवनाथा समवेत | केले भोजन अदृष्ट ||३२||
लोकमान्य त्या टिळकांना | प्रसाद तूची पाठविला ||३३||
कवर सुताची कांदा भाकर | भक्षिलीस त्वा प्रेमाखातर ||३४||
नग्न बैसोनी गाडीत | लीला दाविली विपरीत ||३५||
बायजे चित्ती तव भक्ती | पुंडलीकावरी विरक्त प्रीती ||३६||
बापुना मनी विठल भक्ती | स्वये होशी तू विठ्ठल मूर्ती ||३७||
कवठ्याच्या त्या वारकऱ्याला | मरीपासुनी वाचविला ||३८||
वासुदेव यती तुज भेटे | प्रेमाची ती खुण पटे ||३९||
उद्धट झाला हवालदार | भस्मीभूत झाले घरदार ||४०||
देहान्ताच्या नंतरही | कितीजणा अनुभव येई ||४१||
पडत्या मजूरा झेलियेले | बघती जन आश्चर्य भले ||४२||
अंगावरती खांब पडे | स्त्री वांचे आश्चर्य घडे ||४३||
गजाननाच्या अद्भुत लीला | अनुभव येती आज मितीला ||४४||
शरण जाऊनी गजानना | दु:ख तयाते करी कथना ||४५||
कृपा करी तो भक्तांसी | धावूनि येतो वेगेसी ||४६||
गजाननाची बावन्नी | नित्य असावी ध्यानी मनी ||४७||
बावन्न गुरुवारी नेमे | करा पाठ बहु भक्तीने ||४८||
विघ्ने सारी पळती दूर | सर्व सुखांचा येई पूर ||४९||
चिंता साऱ्या दूर करी | संकटातूनी पार करी ||५०||
सदाचार रत साद भक्ता | फळ लाभे बघता-बघता ||५१||
सुरेश बोले जय बोला | गजाननाची जय बोला ||
जय बोला हो जय बोला | गजाननाची जय बोला ||५२||
॥अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्रीगजानन महाराज की जय॥
७. ॥ गण
गण गणात बोते (भजन) ॥
गण
गण गणात बोते | हे भजन प्रिय सदगूरूते || धृ
||
या
श्रेष्ठ गजानन गुरुते | तुम्ही आठवीत राहा याते ||
हे स्तोत्र
नसे अमृत ते | मंत्राची योग्यता याते |
हे
संजीवन आहे नुसते | व्यावहारीक अर्थ न याते ||१||
मंत्राची
योग्यता कळते | जो खराच मांत्रिक त्याते |
या
पाठे दुःख ते हरते | पाठका अती सूख होते ||
हा
खचित अनुग्रह केला | श्री गाजानाने तुम्हाला |
घ्या साधूनि अवघे याला | मनी धरून भाव भक्तीला ||२ ||
कल्याण
निरंतर होई | दुःख ते मुळी नच
राही ||
असल्यास
रोग तो जाई | वासना सर्व पुरातीलहि |
आहे
याचा अनुभव आला | म्हणूनिया कथित
तुम्हाला ||
तुम्ही
बसून क्षेत्र शेगावी | स्तोत्राची प्रचिती पहावी |
ही
दंतकथा ना लवहि | या गजाननाची ग्वाही ||३ ||
|| इति समर्थ सदगुरु श्री गजानन महाराज की जय ||
८. श्लोक (वृत्त-पंचचामार)
नमो गुरु शुभांकरा नमो गुरु कृपा करा ।
नमो गुरू तमाहरा नमो गुरु परात्परा ॥
नमो मती प्रभाघना नमो गुरु निरंजना ।
नमो नमो नमो नमो नमो गुरु गजानना ||१||
नमो गुरु यतीश्वरा नमो गुरु मनोहरा ।
नमो गुरु भवाहरा नमो पदीं निरंतरा ।।
नमो गुरु कृपाघना नमो सुभाव दे मना।
नमो नमो नमो नमो नमो गुरु गजानना ||२||
नमो सुभक्ततारका नमो दुरितहारका।
नमो गुरु कृतांतका नमो रिपूं संहारका |
नमो गुरु त्रिलोक्यपाळणा नमो हरी ही कल्पना ।
नमो नमो नमो नमो नमो गुरु गजानना ||३||
नमो रुपें सुनिर्मळा नमो करी भवागळा ।
नमो जनास प्रेमळा नमो अतर्क्य ही कळा ||
नमो भ्रमास छेदना नमो कुभावदंडना ।
नमो नमो नमो नमो नमो गुरु गजानना ||४||
नमो गुरुस आठवा नमो हरी भवार्णवा ।
नमो गुरु कृपार्णवा नमो मतीस वाढावा ॥
द्दढीं सुभाव उत्तमा करी पदास वंदना ।
नमो नमो नमो नमो नमो गुरु गजानना ॥५॥
जयजयकार
॥अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्रीगजानन महाराज की जय॥
९. श्री गजानन महाराजांचे आवडते भजन
भोलानाथ हे दिगंबर, दुख मेरा हरो रे ।
चंदन चावल बेल की पतिया, शिवजी के माथे धरो रे ।
अगर चंदन का भस्म चढाऊ ते , शिवजी के पैया पडो रे ।
नंदी जो उपर स्वार भये रामा, मस्तकी गंगा धरो रे॥१॥
शिवशंकर को तीन नेत्र है, अद्भुत रुप धरो रे ।
अर्धांग गौरी, पुत्र गजानन, चंद्रमा माथे धरो रे ॥२॥
आसन डाल सिंहासन बैठे, शांती समाधी धरो रे ।
कांचन थाली कपुरे की बाती , शिवजी की आरती करो रे ।
मीरा के प्रभु गिरीधर नागर, चरणो में शीश धरो रे ॥३॥
भोला नाथ हे दिगंबर, दु:ख मेरा हरो रे ।
“श्रीराम जय राम जय जय राम”
१०. ॥ आरती श्री गजाननाची ॥
जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया ।
अवतरलासी भूवर जडमुढ ताराया ।
।। जय देव ।।धृ।।
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।
स्थिरचर व्यापून उरलें जे या जगताशी ।
तें तूं तत्त्व खरोखर निःसंशय अससी ।
लीलामात्रें धरिलें मानवदेहासी ।। जय देव ।।१।।
होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा ।
करूनी ‘गणि गण गणांत बोते‘ या भजना ।
धाता हरिहर गुरुवर तूंचि सुखसदना ।
जिकडें पहावे तिकडे तूं दिससी नयना ।। जय देव ।।२।।
लीला अनंत केल्या बंकट सदनास ।
पेटविलें त्या अग्नीवांचूनी चिलमेस ।
क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस ।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ।। जय देव ।।३।।
व्याधी वारूनि केलें कैका संपन्न ।
करविले भक्तालागी विठ्ठलदर्शन ।
भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण ।
स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ।। जय देव ।।४।।
११. || कर्पूरार्ती ||
जय जय कर्पूरगौरा । तारी जयजय कर्पूरगौरा ।।धृ।।
भस्म हे चर्चित निल गलांबर झल्लालती रूंडमाळा ।।
इंदु लल्लाटी शोभतसे कटी । गजचर्म व्याघ्रांबरा ।
शंभो जय जय कर्पूरगौरा ।।१ ।।
श्वेतासनी महाराज विराजित । अंकी बसे सुंदरा ।
भक्त दयाघन वंदिती चरण । धन्य तु लीलावतारा ।
शंभो जय जय कर्पूरगौरा ।। २ ।।
मतिमंद दीन झालो पदी लीन । पार करी संसारा । काशीसूतात्मज मागतसे तुज । द्या चरणी मज थारा ।।
शंभो जय जय कर्पूरगौरा ।।३।।
कर्पूरगौरं करूणावतारं । संसारसारं भुजगेंद्रहारं ।
सदा वसंतं हृदयारविंदे । भवं भवान्यासाहित नमामि ।। मंदारमाला कपाल काय । दिगंबराय दिगंबराय ।।
१२. मंत्रपुष्पांजली
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवः।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।। स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु । कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।। ॐ स्वस्ति । साम्राज्यं, भौज्यं, स्वाराज्यं, वैराज्यं, पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्त पर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात पृथिव्यै समुद्रपर्यान्ताया एकराळिति । तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्याऽवसन् गृहे ।। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।। तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।।
ॐ पूर्ण ब्रह्माय धीमहि, तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।।
१३. प्रसाद (अभंग)
पाहे प्रसादाची वाट । द्यावें धुवोनिया ताट ॥१॥
शेष घेऊनी जाईन ।तुमचें झालिया भोजन ॥२॥
झालों एक-सेवा । तुम्हां आळवूनी देवा ॥३॥
तुका म्हणे चित्त । करुनी राहिलों निवांत ॥४॥
१४. पसायदान
प्रभू थोर शेगावचा तूच आहेस । “अनन्यास रक्षी” तुझे ब्रीद आहे ।
‘करुणाकरा” या, ब्रीदा सार्थ व्हावे । महाराज, माझ्या जवळी रहावे ।। १ ।।
असे मागणे ते तुझ्या पायी आता । तुझ्याविण कोणी मला नाही त्राता ।
प्रभो सर्व या, संकटा निरवावे । महाराज, माझ्या जवळी रहावे ||२||
प्रभो ! जन्मी या मी, किती पाप केले । तया जाणिवेने, मन हे जळाले ।
आता मात्र देवा, मला आवरावे । महाराज, माझ्या जवळी रहावे || ३ ||
अपराध माते ! पदरात घ्यावे । आता बालक या जवळी करावे ।
तुझ्या “प्रकृतीला” गडे आवरावे । महाराज माझ्या जवळी रहावे ||४||
प्रभातीस अस्पष्टसी जाग यावी । तुझिया कृपेने, कुडी ही उठावी ।
शुचिर्भूत प्राची “स्मृती” दान द्यावे । महाराज, माझ्या जवळी रहावे ।।५।।
कदा क्रोध, दोषा, मना ना शिवावे । शुचिर्भूत आचार वृत्तीत यावे ।
तै शुद्ध बुद्धी मला दान द्यावे । महाराज माझ्या जवळी रहावे ||६||
आम्हा अन्न देतो, तया आधी देणे । तयावीण आम्ही, कदा नाही खाणे |
इये वृत्तिने “शक्ति” दानास द्यावे । महाराज माझ्या जवळी रहावे ।।७।।
नीतीयुक्त सात्वीक, लक्ष्मी मिळावी । प्रपंचात सत्कर्मी, ती वापरावी ।
अशा दृष्टीने, “लक्ष्मी” दानास द्यावे । महाराज माझ्या जवळी रहावे ।।८।।
सुखे झोपता जाण काढोनी घ्यावी । बरे, वाईटाची स्मृती ना रहावी ।।
“शांति” दानास द्यावे । महाराज, माझे जवळी रहावे ।।९।।
कृपाळूपणे ‘ प्रपंचात कर्मे, असता करीत । तयामाजी राहो, सदा सावचित्त ।
अनैतिक कृत्ये, कदा ना घडावी । महाराज माझे जवळी रहावे ।।१०।।
भवांमाजि कर्मे, नियमित व्हावी । कुटूंबा, मुलांची प्रीती सार्थ व्हावी ।
व्यवहार चित्ते, असक्ते रहावे । महाराज माझे जवळी रहावे ।।११।।
नको काम, क्रोध नको दुष्ट बुद्धी । सुविचार शांती, समाधान वृद्धी ।
असे भाव माझ्या, मनी नित्य यावे । महाराज माझे जवळी रहावे ।।१२।।
प्रति मासी वा वर्षी हा योग यावा । तुझ्या मंदिरी दर्शन लाभ व्हावा ।
अखंडित वारी, मला गुंतवावे । महाराज माझे जवळी रहावे ||१३||
धन, मन, कीर्ती, प्रपंची मिळाले । कधी दुःख भोग पदरांत आले ।
इये दोन्ही काळी, समत्वे तरावे । महाराज माझे जवळी रहावे ।।१४।।
तुम्हा वर्णिता, वर्णिता, मी रमावे । समस्तांचिया अंतरी एक व्हावे ।
माझे तुझे तई, अभिन्नत्व व्हावे । महाराज माझे जवळी रहावे ।।१५।।
तुझ्या चिंतनी चित्त एकत्र व्हावे | तुझ्या दर्शने नेत्र तृप्तीस व्हावे ।
तुला पाहता पाहता, भान जावे । महाराज माझे जवळी रहावे ।।१६।।
तुझी मूर्त दृष्टी समोरी असावी । प्रभो माझी देहस्थिती विसरावी ।
तुझे विण आता, कुणी ना दिसावे । महाराज माझे जवळी रहावे ।।१७।।
यमुना जलाने, शुचि स्नान व्हावे । मुखी शुद्ध गंगोदके या पडावे ।
ओठांत तुलसी दलाने रहावे । महाराज माझे जवळी रहावे ।।१८।।
त्रिगुणात्मके, भाव वृत्ती नसावा । प्रसादे तुझ्या, भोग माझा सरावा ।
पुढे जन्म-मृत्यु कदाना मिळावे । महाराज माझे जवळी रहावे ।।१९।।
दिला मोक्ष तू, भास्करा बा जसा रे । दिला मोक्ष तू भक्त बाळा जसा रे ।
मला ही प्रभो, त्या स्थळा पोचवावे । महाराज माझे जवळी रहावे ||२०||
क्षणी शांत ऐसा, प्रभो प्राण जावा । जिवा आसरा त्या शिवाचा मिळावा |
मिसळून ज्योतीस तेजात घ्यावे । महाराज माझे जवळी रहावे ||२१||
