“श्री गजानन विजय ग्रंथ”
अध्याय अकरावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥
श्री दासगणू महाराज शंकराची स्तुती करतात व म्हणतात कि, “हे ओंकारस्वरूपा पशुपतीनाथा, हे भवानीवरा दक्षिणामूर्ति, ब्रह्मांडांत जेवढ्या विभूती आहेत तेवढी तुझी रुपे आहेत. जेथे विद्येचा अभाव आहे तेथे ही माया पूर्णपणे तुझ्यावर आश्रित असल्याने तुझ्या निराकार, निर्विकार रूपात हे सर्व जग व्यापलेलं आहे. हे दयाघना तुझे निराकार रूप ओळखणे अशक्य आहे तेव्हा हे नारायणा तू हे सर्व ओळखून घेऊन तूं आता भक्तांचे हित साधण्यासाठी सगुण रुपे घेतली आहेस. ज्याला जसं वाटतं तसं तो तुला नाव देतो. पण तुझी नावे जरी वेगवेगळी असली तरी तुला भिन्नत्व कधीच येत नाही. शैव तुला शिव म्हणतात, वेदांती तुला ब्रह्म म्हणतात. रामानुजांचा तू सीतापती तर वैष्णवांचा तू विष्णू आहेस. तुझी वैष्णव जशी भक्ती करतात व त्या भक्तीतूनच त्यांना जशी तुझी रूप दिसतात तशीच तुला नावे ठेवतात पण तू यातून कोठेही वेगळा नाही.तुझी जी रूप दिसतात तसेच तुझी नावं ठेवतात. कोणी तुम्हाला सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार, क्षिप्रा तटाकी ओंकार तर कोणी तुला महाकालही म्हणून संबोधतात. तूंच काशी विश्वेश्वर, तूच नागनाथ, परळी वैजनाथ व वेरुळातील घृष्णेश्वर तर गोदावरीच्या तटावरील त्र्यंबक तुलाच म्हणतात. तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन, रामेश्वर आणि गोकर्णरुपी शंकरही तूच आहेस. तू शिंगणापुरचा महादेवसुद्धा आहेस. तु माझें साष्टांग वंदन स्विकार कर.हे दिनबधो माझ्या अंगातील त्रिताप नष्ट करा. हे देवा तुम्ही कुबेराला क्षणांत धनपती करता मग हे गिरिजापते माझ्याविषयीं तुम्हाला कां हो हा प्रश्न पडला?”
श्री गजानन महाराज दुसऱ्या वर्षीही बाळकृष्णाच्या घरी आलेत. सुकलाल आणि बाळकृष्ण हे दोन निःसीम भक्त बाळापुरात होते. त्यांची सर कुणालाही येणार नाही. यावेळी “श्री” च्या बरोबर भास्कर पाटील, बाळाभाऊ, पितांबर, गणू, जगदेव, दिंडोकार इत्यादी भक्त होते. दासनवमीचा उत्सव पूर्णपणे पार पडल्यानंतर तेथेच भास्करांवर एक वाईट घटना घडली. एक पिसाळलेले कुत्रे भास्कराला येऊन चावले. त्यामुळे इतर लोक घाबरून म्हणाले, “आतां हा पिसाळल्याशिवाय राहणार नाही” म्हणून त्यांनी त्यांचेवर सर्वच घरगुती उपाय केले. त्यातील कोणी म्हणाले, “यापेक्षा डॉक्टरना बोलवा.” तर त्यावर भास्कर म्हणाले, “आता मला वैद्याची आवश्यकता नाही. माझे डाँक्टर तर आसनावर बसलेले माझे सर्व काही श्री गजानन महाराज आहेत. मला त्यांच्याकडे घेऊन चला. त्यांना सगळी हकीकत सांगून टाका व ते सांगतील ते ऐका. आपले तर्क वितर्क अजिबात चालवू नका. त्याप्रमाणे गजानन महाराजांच्या समोर भास्कर पाटलाला आणलं व बाळाभाऊने झालेला हा सगळा वृतांत महाराजाना सांगितला. ते ऐकून गजानन महाराज म्हणाले, “हत्या, वैर आणि ऋण हे कोणालाही चुकत नाही. सुकलालच्या गाईपायी जो द्वाडपणा होता, तो या भास्कराच्या कपाळी लागला व ते तिचे द्वाडपण कुत्रे म्हणून येथे येऊन या भास्कर पाटलाला चावले. भास्कर पाटील मोठा मतलबी आहे. त्या गाईचं दूध प्यायला मिळावं म्हणून भास्कर डोळा लावून बसला होता व द्वाडपणाचं मी हरण करावे अशी माझ्याकडे प्रार्थना केली होती. दूध पिताना त्याला गोड वाटले. मग आता का घाबरतोस? कोणताही आड पडदा मनात न ठेवता भास्करा आता तूच सांग कि “मी तुला वाचवू का?”
तसं पाहाल तर कुत्रं चावलं हे एक निमित्त आहे. त्या भास्कर पाटलांचं आयुष्य आता संपलं. तेव्हा या मृत्यलोकास सोडून तू वैकुंठ गमन केले पाहिजेस. तरी पण तुझी अजून जगायची इच्छा असेल तर तू तसे मला सांग. वेड्या तुझे मी ह्या संकटातून रक्षण करीन. पण ती जन्ममृत्यूची उसनवारी होईल हे लक्षात ठेव. बाळा, या अशाश्वताच्या बाजारात असं देणंघेणं चालतं असतं. तेव्हा तुझा काय विचार आहे ते लवकर सांग . पण एक लक्षात ठेव कि, तुझ्या वाट्याला अशी पर्वणी कधी येणार नाही.” त्यावर भास्कर म्हणाले, “मी सर्वतोपरी अज्ञानी आहे. तुमच्या मनात माझं जे करायचं असेल ते करा.
लेकुराचे अवघे हित ।
माता एक ते जाणत ।
ऐसें एका अभंगांत श्रीतुकोबाराय सांगतात. मी आपलें लेकरु आहे. तेव्हा आयुष्य वाढवायची विनंती कशाला करु? तूम्ही अवघ्या ज्ञानाचा सागर आहात. तुम्हाला सर्व काही कळते.” भास्करांचे बोलणे ऐकून महाराज आनंदले. जे सत्य आहे त्यावर पुढील व्यक्ती खरं बोलला की, समाधान होते. कोणी म्हणाले, “गुरुराया भास्कर आपला भक्त आहे. त्याच्यावर दया करून त्याला वाचवा.”
त्यावर महाराज त्यांना म्हणाले कि, “हेच तुझे अज्ञान आहे. अरे वेड्या जन्ममरण हीच मुळात खुळी कल्पना आहे. जन्मे न कोणी व मरे न कोणी हे समजून घेण्यासाठीच शास्त्रकारांनी परमार्थाचा उपाय करायला सांगितला आहे. त्याचा उपयोग कर. लोभ व माया सोड व निमूटपणे प्रारब्धभोग हेच ठीक आहे. संचित-प्रारब्ध-क्रियमाण हे भोगल्याशिवाय ह्या बद्ध जीवाची सुटका होत नाही. पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगण्यासाठीच हा आपला जन्म असतो व हाच जीवनाचा सिद्धान्त आहे. या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास भोगावे असे जन्ममृत्यूचे किती फेरे घेणार?
भास्कराचे आता पूर्व जन्माचे काहीही उरले नाही हे पारमार्थिक सत्य आहे. तो मोक्षास जाण्यासाठी या सर्वातून मुक्त झाला आहे. म्हणून आग्रह करुन त्याचा मार्ग रोखू नका. भास्करासारखा भक्तराणा पुन्हा जन्माला येईल का? ते कुत्रे याचे पूर्वजन्मीचे वैरी होते म्हणून ते या बाळापुरात येऊन याला चावले. त्याने त्याचा डाव येथे साधला. आता त्या कुत्र्याबद्दल थोडासा जरी द्वेष भास्कराच्या मनात राहिला तर तो त्याच्या पुढील जन्मास कारण होईल. पूर्वजन्मीचे वैर आता संपुष्टात आले आता या भास्करच्या सर्व उपाधि निरसल्या. आतां मी याला कुत्र्याच्या विषापासून पिसाळू न देता दोन महिने वांचवितो. ते जर मी केलं नाही तर दोन महिने उरलेले आयुष्य भोगायला हा पुन्हा जन्मास येईल. हे सर्व ज्ञान लोकांनी ऐकले. ते कित्येकांना पटले नाही. मात्र बाळाभाऊना तो बोध ऐकुन आनंद झाला. ते भास्कराना म्हणाले, “बाबा, तू धन्य झाला आहे. तुझ्या हाताने संतसेवा घडली आहे. तुझे जन्ममरण चुकले. तुझ्या ह्या योग्यतेचं काय वर्णन करू?”
हे सगळं बाळापुरात घडलं नंतर सर्व मंडळी शेगांवला आली.महाराजांच्या शेगावातल्या प्रत्येक भक्ताला भास्कर बाळापूरची हकीकत सांगत होते व गोड बोलून, हात जोडून प्रार्थना करीत होते कि, “महाराज हा कीर्तीचा अमोल ठेवा शेगावला लाभला. तो स्मारक करुन सांभाळा. महाराजांना त्यांच्या स्मारकाची आवश्यकता नाही. ते पुढल्या पिढ्यांसाठी करायचं आहे. त्यांचं जर स्मारक बांधलं तर हे स्मारक त्यांच्या या अमूल्य संतत्वाची साक्ष देईल. पाहा आळंदीला ज्ञानेश्वर, सज्जनगडावर समर्थ, तर देहूचे तुकोबाराय या सर्वांची स्मारके त्या त्या ठिकाणी भव्य प्रमाणात करून ठेवली आहेत. तोच पथ अनुसरून तुम्हीही मनापासून झटावे.” असं प्रत्येकाला भास्कर सांगत होते. पण ह्या गोष्टी करीता भास्कराचे मन ग्वाही देत नव्हते. भास्कर त्यांना म्हणाला कि माझी विनंती ऐकून सर्वजण तुम्ही मला हो हो म्हणता पण मला तुमच्या सर्वांच्या म्हणण्याची शंका वाटते.
म्हणून त्यांनी महाराजांना नकळत, सर्वांना मठात एकत्र बोलावले. बंकटलाल, हरि पाटील, मारुती चंद्रभान, श्रीपतराव वावीकर, ताराचंद साहुकार अशी प्रसिद्ध मंडळी हजर होती. सर्वांच्या समोर भास्करानी पदर पसरला आणि म्हणाले, “माझा आता तुमच्याबरोबर दोन महिने संबंध उरला. माझ्या मनात अशी इच्छा आहे की, वऱ्हाडात शेगावमध्ये “श्री” चे भव्य स्मारक व्हावे. तुम्ही हे सर्व कराल अशी मला ग्वाही द्या. त्यानं मला फार आनंद वाटेल व मी सुखानं वैकुंठ गमन करीन. संतसेवा कधीही अनाठाई जात नाही. ज्याची जी जी इच्छा होईल ती ती संत पुरवतात. सर्वजण स्तुती करतील असं स्मारक करा. ते ऐकून सर्वांनी मान डोलावली. असे स्मारक करण्याची तुम्ही सर्वांनी “श्री” ची शपथ घ्यावी एवढी माझी अखेरची विनंती आहे ते, ती मान्य करा.”
ते अवघ्यांनी कबूल केल्यावर भास्करांचे चित्त स्थिर झाले जशी लहान मुलं पुढील सणाच्या आशेनं आनंदित होतात तशी भास्करांची आनंदी वृत्ती दिवसें दिवस वाढत होती. माघ वद्य त्रयोदशीला महाराज भास्करांना म्हणाले, “चल, आता आपण शिवरात्रीला त्र्यंबकेश्वरला जाऊं. तिथं गोदातटावर, तो त्र्यंबकराजा कर्पूरगौर, भवभवांतक भवानीवर स्थिर झाला आहे. ते मनोहर ज्योतिर्लिंग पापी जणांचा संहार करते. आता उशीर करु नकोस.आपण गंगा स्नानाला जाऊ या. भास्करा, तेथे त्र्यंबकेश्वरी ब्रह्मगिरी पर्वत आहे. तेथे नानापरी अनेक औषधी आहेत ज्या अनेक वर्षांपासून उगवलेल्या आहेत. त्या ब्रह्मगिरीवर गहनीनाथ आहेत. त्यांना औषधीचे सर्व गुणधर्म माहीत आहेत. वेडया कुत्र्याच्या विषावर तेथे औषधी आहे. तिचा उपयोग सत्वर करुन पाहूं.”
त्यावर भास्कर म्हणाले, “गुरुनाथा, आतां औषध कशाकरतां? तुमची अगाध सत्ता औषधीहून काय वेगळी आहे ? आपुल्या कृपेने विष बाळापुरीच उतरले आहे आता आयुष्याचे दोन महिने शिल्लक आहेत. मला वाटते गुरुमुर्ती आपण शेगावीच राहू. आमच्यासाठी तुम्हीच साक्षात् त्र्यंबकेश्वर आहात. तुमचे चरण म्हणजेच गोदावरी. तिथं बसूनच मी स्नान करीन. मला अन्य तीर्थक्षेत्री जायचं काय कारण ?”समर्थानी हे बोलणं ऐकलं आणि हसून म्हणाले, “हे जरी खरं असलं, तरी तीर्थ महिमा मान्य करावा. चल उशीर नको करु. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊ. बाळाभाऊ पितांबर यानाही बरोबर घे. मग मंडळी शेगावाहून निघाली आणि शिवरात्रीस त्र्यंबकेश्वला पोहोचली. कुशावर्ती स्नान करून हरीचे दर्शन घेतले. गंगाद्वारी जाऊन गौतमीचे पूजन केले. मग आई निलांबिकेला नमस्कार केला. तेथेच गहनीनाथ, निवृत्तिनाथ यांचंही दर्शन घेतलं. तेथून ते नाशिकला गोपाळदासाना भेटायला आले. हे गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात पंचवटीच्या दारात धुनी लावूनी बसले होते.
रामाच्या मंदिरा समोर एक पिंपळाचा पार होता. त्यावर आपल्या शिष्यांसह महाराज जाऊन बसले. ते पाहून गोपाळदासाना आनंद झाला. ते जवळच्या मंडळीना म्हणाले, “आज माझा बंधु गजानन वर्हाडांतून आला आहे तेथे जा, त्यांचे अनन्य भावे दर्शन घ्या. माझी भेट म्हणून नारळ, साखर त्यांना द्या. हा हार त्यांच्या गळ्यात घाला. तो आणि मी खरं म्हणजे एक आहोत. पण देह भिन्न म्हणून दोन म्हणायचं का?” शिष्यांनी तसेच मानून दर्शनाला गर्दी केली. गुरूंनी दिलेला हार त्यांनी श्री गजानन महाराजांच्या गळ्यात टाकला. नारळ आणि खडीसाखर आणून स्वामीं समोर ठेवली. ती पाहून महाराज भास्कराना म्हणाले, “हा प्रसाद सगळ्यांना वाट पण गर्दी होऊन देऊ नकोस. माझ्या बंधूची आज पंचवटीत भेट झाली. माझं येथील काम झालं. आतां नाशकाचे काम करायला धुमाळ वकिलाच्या घरी जायला पाहिजे. महाराज नाशिकला आले त्यामुळे तेथे खूप लोक दर्शनाला जमले. बारीक सारीक अनेक गोष्टी तेथे झाल्या.तेथे काही दिवस राहून महाराज शेगांवला आले न आले तो पर्यंत त्यांना अडगांवी घेऊन जाण्यास झ्यामसिंग आले. त्यानी महाराजांना अडगावला येण्याचा फार आग्रह केला पण समर्थानी त्यांना रामनवमी झाल्यावर येतो असे सांगितले. ते पुढे म्हणाले, “आता आग्रह न करता परत जा.” झ्यामसिंग समर्थांचे निःसीम भक्त होते. त्यामुळे महाराजांच ऐकून घेऊन झाल्यावर ते परत आले व रामनवमीला पुन्हा शेगावला आले. उत्सव करुन समर्थांना शिष्यांसहित हनुमान जयंतीसाठी अडगांवाला घेऊन आले.समर्थस्वारी अडगांवी असताना अनेक चमत्कार झाले. एके दिवशी दुपारी समर्थांनी भास्कराना फुपाट्यात लोळवले. त्यांच्या छातीवर बसून खूप मारले. लोक दुरुन पहात होते पण जवळ जायचं धाडस कुणीच करेना. बाळाभाऊ जवळ होते ते म्हणाले, “सद्गुरुनाथा आता भास्कराना सोडा. उन्हाने ते बेजार झाले आहेत.”
त्यावर भास्कर म्हणाले, “बाळाभाऊ हात जोडू नका. हे माझे साक्षात् ईश्वर आहेत. त्यांना काय करायचंय ते करु द्या. लोकांना वाटतंय की, त्यांनी मला चापट्या दिल्या पण मला मात्र गुदगुल्या होत आहेत. या अनुभवाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अनुभवणानेच समजतील. पुढे भास्कराना घेऊन महाराज मुक्कामाच्या ठिकाणी आले. महाराज बाळाभाऊना म्हणाले,
“भास्कराचे अवघे दोन दिवस उरले आहेत. पंचमीला तो वैकुंठाला जाईल. आज मी त्याला मारायचे कृत्य का केले हे तुम्हाला लक्षात आले असेलच. याच भास्कराने शेगावला असताना भास्कराने मला तुला छत्रीनं मारायला लावलं होत ते आहे ना तुला ध्यानांत? तो जुना प्रसंग सर्वांसमोर ध्यानी आणावयाचे होते म्हणून मी मारलं. ह्या शिवाय अन्य कोणताही हेतू माझ्या मनात नव्हता.”
वद्य पंचमीचा दिवस आला. सकाळी समर्थ भास्कराना म्हणाले, “भास्करा तुझे आज वैकुंठगमन आहे तेव्हा आता पद्मासन घालून पूर्वेकडं तोंड करून स्थिर हो. आपलं मन शांत करून त्यात देवाचं रूप आठव. आता वेळ जवळ आली. सावध रहा!”
इतर सर्व लोकांना महाराज म्हणाले, तुम्ही “विठ्ठल विठ्ठल नारायण हरी” असं उच्च स्वराने गर्जना करा. हा तुमचा श्रेष्ठ बंधू आज वैकुंठाला जात आहे तेव्हा तुम्ही त्याचं माळ बुक्का वाहून पूजन करा.”
भास्करानी पद्मासन घातलं. नासाग्री दृष्टि ठेवली व आपलं मन महाराजांच्या चरणी लीन केलं व ते अंतर्मुख झाले. श्री गजानन महाराजांचे सर्व भक्त भास्कराचे पूजन करण्यात लीन झाले होते. माळा बुक्का वाहात होते.महाराज अंतरावर बसून सर्व काही कौतुक पहात होते. असे एक प्रहर भजन झाले. माध्यानीची वेळ झाली. महाराजांनी ’हरहर’ शब्द जोऱ्याने उच्चारला व अगदी त्याचसरशी भास्करांचा प्राण वैकुंठाला गेला. संतांनी आतापर्यंत ज्याचा ज्यांचा हात धरलेला असतो , तो हरीचा पाहुणा होतो.आता भास्कराची समाधी कोठे करावी ? असे लोक महाराजाना विचारू लागले.
त्यावर समर्थानी सांगितले की, “द्वारकेश्वर पशुपतीच्या सान्निध्यात सती आहे, तेथे भास्कर पाटलांची समाधी करा.” अशी आज्ञा झाली व चोहीकडे केळीचे खांब लोकांनी पालखीला बांधले. आंत कलेवर ठेऊन पुढे भजनाचा गजर चालू होता. अशा थाटात द्वारकेश्वराजवळ मिरवणूक करून भास्करांना आणले. समाधीचे पुण्य संस्कार तेथे झालेत. अवघा जन समुदाय तेथे ओरडत होता व म्हणत होता कि, “महाराजांचा परम भक्त आज आपल्यातून निघून गेला.” दुसऱ्या दिवसापासून तेथे गोरगरीबांसाठी अन्नदान होऊं लागले. हे द्वारकेश्वराचे स्थान अडगावाच्या जवळ असून, गावापासून उत्तरेला मैलभर अंतरावर आहे. द्वारकेश्वराची जागा खूप रमणीय होती. तेथे चिंचेची मोठं मोठे वृक्ष होते. निंब, अश्वत्थ, मांदार, आम्र, औदुंबर असे इतर अनेक वृक्ष ही तिथं होते. शिवाय कांहीं फुलझाडे पण होती. भास्करांचे समाधीस्थळ अडगांव आणि अकोलीच्या मध्ये होते. दहा दिवस संत भंडारा म्हणून भरपूर अन्नदान झाले. चिंच वृक्षांच्या सावलीत जनसमुदायांची जेवण्याची पंगत बसत असे पण कावळे मात्र खूप त्रास देऊ होते. ते काव काव करत व पात्रातले द्रोण ते उचलून नेत व जेवणाऱ्यांच्या अंगावर मलोत्सर्ग करून जात. त्यामुळे लोक त्रासून त्यांना हाकलू लागले. भिल्लांनी त्यांना मारायला तीर कमटे तयार केले.ते पाहून गजानन महाराज त्यांना म्हणाले, “यामध्ये त्यांचा काहीच अपराध नाही. त्यांना मारू नका. इतरांप्रमाणे आपल्यालाही भास्कराचा प्रसाद मिळावा एवढाच त्यांचा या भंडार्यांत येण्याचा हेतु दिसतो. कारण भास्कर पितृलोकात न राहता सरळ वैकुंठी गेला आहे. दहा दिवस प्राण अंतरिक्षांत परिभ्रमण करत असतो आणि मग सपिंडी होऊन पुढं जातो. त्याला अकराव्या दिवशी काक बली देतात. कावळा जेव्हा त्याला स्पर्श करतो तेव्हाच प्राण पुढे जातो. भास्कराचा आत्मा मुक्त झाल्यामुळे सरळ वैकुंठी गेल्यामुळे तो आता वैकुंठीचा पाहुणा झाला.त्यामुळे त्याच्या साठी काकबळीचे कारण उरले नाही. आपल्याला बळी मिळणार नाही म्हणून कावळ्यांचे पित्त खवळून गेले. ज्याला अशी गती मिळत नसते त्याच्यासाठी त्यांना पिंडदानाची व पिंडाला काकस्पर्श होण्याची गरज असते. म्हणून लोक कावळ्यांची वाट बघत असतात पण येथे भास्कराचा प्रसाद मिळावा म्हणून कावळे वाट पहात आहेत. तुम्ही त्यांना मारुं नका. मी त्यांना सांगतो.
“असं म्हणून महाराज कावळ्यांना म्हणाले, “अरे जिवांनो! बैसा आता घटकाभर व तुम्ही माझे ऐका, उद्यापासून हे ठिकाण वर्ज्य करा नाही तर माझ्या भास्कराला कमीपणा येईल. आज प्रसाद घेऊन तुम्ही सर्वजण तृप्त व्हा. मात्र उद्यांपासून या स्थळी येऊ नका.” हे महाराजांचं बोलणं भाविकांना पूर्ण पटले. पण काही कुत्सित होते ते एकमेकांना हसून म्हणाले, “हे गजानन महाराज अयोग्य व निरर्थक बोलले असे वाटते. पक्षी का कोठे मानवाच्या आज्ञेत राहतात ? याची प्रचिती आता उद्या पाहू या. हे वेड्यासारखं काहीही बोलतात. भाविकाना नादी लावतात आणि संतत्वाचे निरर्थक स्तोम माजवतात. अहो मनुष्याने साजेल तसे बोलावे आणि पचेल ते खावे. उसनं अवसान कधी आणू नये.”
दुसरे दिवशी ती कुत्सित लोकं तेथे आलीत, तेव्हा काय आश्चर्य! त्यांच्या दृष्टीला एकही कावळा पडला नाही. आता मात्र ते सर्व जण चकित झाले व त्यांनी समर्थांचे पाय पकडले. पुढे बारा वर्षें तेथे कावळे आलेच नाहीत. चौदा दिवस झाल्यावर आपल्या बाकी शिष्यांसह श्री गजानन महाराज शेगावी परतले.
एकदा शेगावात एक अघटित गोष्ट घडली ती आता सांगतो. दुष्काळाचं साल होतं म्हणून सुरुंग लावून एक विहिर खोदण्याचं काम चालू होतं. विहीर दोन पुरुषाच्यावर खोल गेल्यावर मोठा काळा खडक लागला. त्याबरोबर पहारीची गती बंद झाली. मग खडकाच्या आत भोकं पाडून त्यात सुरूंगाची दारु ठासून खडक फोडण्याचे काम सुरु झाले. चारी बाजूंस चार भोके पाडलीत व पहारीने तयार करून त्यात दोऱ्या घातल्यावर त्यात दारू ठासून भरली. एरंडाच्या पुंगळ्या पेटवून चारी दोर्यांतून सोडण्यात आल्या. पण दोरीच्या गाठींमुळे त्या मध्येच अडकल्या. पुंगळ्या खोलवर न गेल्यानं दारुपर्यंत पोहोचत नव्हत्या. त्यामुळे दारू पर्यंत विस्तव जात नव्हता. इकडे सुरूंगाच्या जवळ पोहोचलेलं पाणी दारूपर्यंत येऊ लागलं. तेव्हा कामावरच्या मिस्तरीनं विचार केला की, दारूला पाणी लागलं तर सुरुंग वायां जाईल. म्हणून तो गणू जवऱ्या नावाच्या मजुराला म्हणाला कि, “तूं विहिरीत उतरुन पुंगळ्या थोडया पुढे सरकव व त्वरित वर ये. तू वर येईपर्यंत पुंगळ्या बारापर्यंत जाऊन आपले काम होईल.” वास्तविक पाहाता हे काम अत्यंत धोकादाय असल्याने ते कोणी करण्यास पुढे येत नव्हते. पण मिस्त्रीने गणु वर दबाव टाकला. गणू अतिशय गरीब व दरिद्री होता त्यामुळे तो बिचारा नाही म्हणू शकत नव्हता. तो तरी काय करणार? जसा यज्ञात बोकडाचा बळी देतात तशीच गणू जवऱ्याची गत झाली. आज्ञा होताच गणू विहिरीत उतरला. त्यानं एक पुंगळी खाली सरकवताच ती तात्काळ दारुला जाऊन मिळाली व गणू आत सांपडला. आता तो दुसरी पुंगळी सरकवणार तेवढ्यात पहिला सुरंग उडाला. मग काय विचारतां? तो सुरुंग फुटल्याने गणू एका खापरीच्या धोंड्यात दडला. त्याची श्री गजानन महाराजांवर अतिशय निष्ठा होती. गणूने विहिरींतून समर्थाना विनंती केली की, “महाराज आता धावून या. आता माझे रक्षण तुम्हाच्या शिवाय कोण करणार?” विहिरीत धुराचा डोंब उडाला. दुसरा सुरुंग पेटायला आता अगदी थोडा वेळ उरला होता त्याच वेळेला गणू त्या कपारीत जाऊन बसला. एकामागून एक तिन्ही सुरूंगानी पेट घेतला. अपार दगड निघाले. लोकांना वाटलं की गणुचं शरीर छिन्न भिन्न झाले असेल म्हणून ते विहिरीत डोकावून पाहात राहिले. पण गणू कोठे दिसेना. मिस्त्री म्हणत होता कि, “दगडाप्रमाणे गणू हवेत उडाला असेल. बाहेर कोठें तरी आसमंतात त्याचे प्रेत पडलेले असेल. त्याला शोधण्यासाठी माणूस पाठवून द्या.” मिस्त्रीचे हे बोलणे ऐकून विहिरीतून गणू म्हणाला, “अहो मी विहिरीतच आहे हो! मी मेलेलो नाही. गजाननाच्या कृपेनं मी वांचलो आहे. सध्या मी कपारीत दडून बसलो आहे पण कपारीच्या तोंडाला एक मोठा धोंडा अडकला असल्यामुळे मला बाहेर येता येत नाही. गणूचे बोलणे ऐकून लोक आनंदाने धोंडा काढायला विहिरीत खाली उतरले. दहापांच जणांनी पहारीने धोंडा सरकविला व गणूला त्यातून बाहेर काढले. विहिरीतून वर येतांच गणू पळत पळत समर्थांच्या मठात त्यांचे दर्शन घ्यायला गेला. गणू दर्शनाला येतांक्षणी कैवल्यदानी महाराज म्हणाले कि, “गण्या अरे, कपारीत बसून किती धोंडे उडविलेस? त्यांतला मोठा धोंडा तुझ्या रक्षणासाठी कपारीच्या तोंडावर येऊन बसला म्हणून तू वांचलास. पुन्हा असले साहस करू नकोस. पुंगळीला मधेच जाऊन कशाही प्रसंगी पूगळी फसवू नकोस. जा तुझे गंडांतर आज टळले.”
गणू म्हणत होता, “सद्गुरुनाथा चारही बाजूस सुरुंग पेटल्यावर तुम्ही मला हात देऊन कपारीत बसवलेत म्हणून मी वाचलो आणि तुमच्या दर्शनाला आलो. तुम्ही जर हात दिला नसता ना, तर मी विहिरीतच मेलो असतो.” गणुवर सद्गुरूंची कृपा होऊन तो वाचला म्हंटल्यावर त्याला पहायला आजूबाजूच्या गावातील लोक येऊ लागले. गजानन कृपेचं महात्म्य हे असं थोर आहे. संतकवी श्री दासगणू महाराज म्हणतात, की महाराजांची थोरवी वर्णन करण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही.” श्री संतकवी दासगणू महाराजांनी विशद केलेला हा दहावा अध्याय गजानन महाराजांच्या सर्वच भक्तांचे संकट दूर करो व त्यांचे गंडांतर टळो व हा अध्याय सर्वांना आल्हाददायक होवो अशी मी “श्री” विनवणी करून सुफळ समाप्त करतो.
शुभं भवतु !
श्री हरिहरार्पणमस्तु.