श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित एकोणिसावा अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.

  “श्री गजानन विजय ग्रंथ”

अध्याय एकोणिसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

श्री गजानन विजय ग्रंथाचा एकोणविसावा अध्याय प्रारंभ करण्यापूर्वी श्री दासगणू महाराज भगवान श्री श्रीरामाची प्रार्थना करतात व म्हणतात ” हे आनंदकंदा , अभेदा मी सर्वदा अनन्यभावे तुझे चरण वंदन करतो. हे रामा, राघूत्तमा, राघवा आता माझा किती अंत पाहशील हे काही कळत नाही. हे अनंता, तुम्ही माझ्यावर कठोर होवू नका. हे जगदीशा जगन्नायका मी अत्यंत दीनवाणेपणाने तुमची आळवणी करतो तुला हाका मारतो, आता मला दगा देऊ नका.” श्री गजानन महाराज शेगावला  असताना काशिनाथ खंडेराव गर्दे नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ दर्शनाला आले. त्यांनी  “श्री” चे चरण वंदून व त्यांचे विलक्षण रूप बघून त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांच्या मनात विचार आला की, “माझ्या सन्माननीय वडिलांनी जी जीवन्मुक्‍ताची लक्षणे अनुभवाने लिहिली आहेत त्याची प्रत्यक्ष ही मूर्ति मला आता साक्षात पहायला मिळाली. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून मी हे चरण बघायला खामगावाहून आलो त्याचं आता सार्थक झालं.” तेवढ्यात महाराजांनी आपली एक  लीला केली आणि काशीनाथांच्या पाठीवर परमकृपेने कोपरखळी मारली व म्हणाले, “जा, आता तुझा हेतू पुरला आहे. तारवाला तुझी वाट पहात आहे.” ते ऐकून काशिनाथ घोटाळून मनात म्हणाले, “माझं काही काम नाही, मी काही मागायलाही आलो नाही. मग तारवाला शिपाई वाट पहातोय असं म्हणाले त्याचा अर्थ काय समजायचा? काय गूढ आहे ते काही कळलं नाही.” पण आता काही विचारण्याच पण धाडस उरल नाही. मग ते चुपचाप  पाया पडून खामगावला निघून गेले. तो तेथे जाऊन पाहतो तो तारवाला शिपाई खरंच दारात उभा होता. आतला मजकूर पाहण्यासाठी घाईघाईने तार घेवून उघडली तर त्या तारेत  मोर्शी तालुक्यात मुन्सफ म्हणून त्यांची नेमणूक केल्याचा मजकूर  होता. ते पाहून त्यांना आनंद झाला व  त्यांना महाराजांनी मारलेल्या कोपरखळीचा अर्थ कळला.  पहा संतांचं ज्ञान किती अगाध असतं ?  एकदा श्रीमंत गोपाळ बुटीनी अति आग्रह केला म्हणून  गजानन समर्थ स्वारी गोपाळ बुटीच्या घरी नागपूरला गेली. एके काळी नागपूर ही भोसल्यांची राजधानी होती, त्या शहराची आज  काय दैना झाली? याला एकच कारण असे की स्वातंत्र्यरुपी प्राण गेला व खरा धनी याचक ठरला व   परक्यांचा मात्र या शहरात  बोलबाला झाला. एकवेळी अपार असणारे असंख्य  गज, घोडे, पालख्या आता दिसत नाही व त्याऐवजी आता  रस्त्याने मोटारी फिरू लागल्या. असो हा तर काळाचा महिमा असून त्यात कोणाचाही दोष नाही.  सिताबर्डीवर गोपाळ बुटींचा भव्य मोठा वाडा होता. जसा वाघ किल्ल्यात कोंडून टाकतात तसं त्यांनी सद्‌गुरु गजानन महाराजांना त्या वाड्यात कोंडून ठेवलं होतं. बुटीना अस वाटलं की, महाराजांना शेगावला कधीही जाऊ न देता सिताबर्डीवर कायम ठेवावं. अक्रूर जसा श्रीकृष्णाला घेवून मथुरेला गेला तसाच काही असा प्रकार येथे झाला. श्री गजानन महाराज जसे बुटींच्या घरी नागपूरला गेले तसे इकडे शेगांव भणभणीत दिसू लागलं. अवघे लोक दुःखी झाले. लोकांनी हरी पाटलांना महाराजाना परत आणण्याची विनंती केली. ते म्हणाले, “कुडीमधून  प्राण गेल्यावर तिला कोण विचारतंय? तसं येथे शेगावला झालंय. श्री गजानन स्वामी येथे नाहीत तेव्हा आता शेगाव हे प्रेतवत झालं. तुम्ही गांवचे मोठे जमीनदार आहात याचा विचार करा. बुटी मोठा सावकार आहे. त्याच्यापुढे आमचं काही चालणार नाही. हत्ती हत्तींची टक्कर होणेच योग्य आहे. आमच्या सारख्या कोल्ह्याना तेथे कोण विचारणार? जंबुमाळीसी लढायला मारुतीच योग्य होता. कर्णाला जिंकायसाठी अर्जुनाची योजना झाली. तुम्ही नागपुरला जाऊन महाराजांना घेऊन या व आपल्या शेगांवला वैकुंठ बनवा.आम्हाला सुखी करा ही विनंती.” इकडे बुटीच्या घरांत संत गजानन महाराज नाईलाजाने राहात होते. जसं हस्तिनापुरांत कृष्णाला आनंद वाटत नव्हता तसेच “श्री” ना पण असेच वाटत होते. महाराजांना तेथे तुरुंगासारखे वाटत होते व अजिबात करमत नव्हते. श्री गजानन महाराज बुटीला म्हणायचे, “अरे मला शेगावला जाऊ दे. या तुझ्या भव्य सदनात मला ठेवून घेऊ नकोस.”  पण बुटी मुळीच ऐकत नव्हते. ते समर्थाना जाऊं देत नव्हते. बुटी निःसंशय अनागोंदीचा रामराणा व तेवढेच भाविक पण होते पण त्यांचा अहंकार गेला नव्हता. त्याना श्रीमंतीचा फार गर्व होता. त्यांच्या घरी दररोज ब्राह्मणभोजन चालत होते व  समर्थांपुढे भजन सुद्धा दररोज होत होते, मात्र शेगांवहून येणाऱ्या लोकांना मात्र ते बंदी करत होते.एकालाही महाराजांची भेट होवू देत नव्हते.परवानगी शिवाय कोणिही बुटींच्या घरी कोणी जावू शकत नव्हते. शेगावचे सज्जन लोक त्यांना आणायला गेले तरी त्यांचा कांही उपाय चालत नसल्याने ते तसेच परत वापस जात बिचारे!                    काही दिवसांनी महाराजांची काही भक्त मंडळी हरी पाटलांसोबत नागपूरला गोपाळ बुटींच्या सदनाशी  नागपुरला जाण्यासाठी आगगाडीच्या बसले तेव्हा श्री गजानन महाराज  गोपाळ बुटीना म्हणाले, “अरे गोपाळ, हरी पाटील आता इकडे तुझ्या घरी येऊन राहिला आहे तेव्हा तो यायच्या आत मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता राहणार नाही. तो जमीनदार आहे याचा जरा विचार कर. धनाच्या जोरावर तू उड्या मारतोयस मात्र तो मनगटाच्या बळावर मला येथून घेऊन जाईल.” जसे हरी पाटील नागपुरात श्रीमंत बुटींच्या घरी आलेत तसेच त्याना बुटींच्या शिपायांनी अडवले. पण त्यांना न जुमानता हरी पाटलांनी सदनात प्रवेश केला. त्यावेळी गोपाळ बुटीच्या घरी ब्राम्हणांची मोठी पंगत बसली होती. महाराजांच्यासाठी मध्यभागी आसन मांडले होते. सगळ्यांना जेवायला चांदीची ताटे , बसायला पाट व पातळ पदार्थांना चांदीच्या वाट्या ठेवल्या होत्या. भोजनासाठी नानाविध पक्वान्ने केली होती. अशी बुटीची श्रीमंती होती. तिचे वर्णन किती करू? त्याना लोक नागपूर प्रांतीचा कुबेर म्हणत असत. श्री गजानन महाराजांना शेगावला नेण्यासाठी  हरी पाटील गोपाळ बुटींच्या सदनात आले. वासराला पाहून गाय जशी धावत येते तसे त्यांना पाहून दारातच त्यांना भेटायसाठी महाराज धांवत निघाले व  त्यांना म्हणाले, “चल हरी, आपण शेगावला जाऊ. मला येथे मुळीच रहायचे नाही. तू मला न्यायला आलास हे फार बरे झाले. श्री गजानन महाराज जात आहेत असे जेव्हा गोपाळ बुटींनी पाहिले तेव्हा ते अनन्य भावाने महाराजांचे चरण धरून त्यांची विनवणी करू लागले व  म्हणाले, “गुरुराया, मला असा झटका देऊ नका. दोन घास तरी आपल्या मुखात घ्या व मग आपण हवं तिकडे जा.” तशीच विनवणी त्याने हरी पाटलांना पण केली व  म्हणाले,  “पाटील तुम्ही प्रसाद घेऊन जा. नाही म्हणू नका हो? महाराज येथे थांबणार नाहीत हे मला माहीत आहे पण पाटील, आता  पंक्तीत तुम्ही माझी लाज राखा. आताच जर  महाराज गेले तर लोक उपाशी उठतील आणि अवघ्या नागपुरात माझ्यावर टीका होईल. भोजने होई पर्यंत महाराज तिथच राहिले. शेगांवची समस्त मंडळी गोपाळ बुटीच्या घरी पंक्तीस जेवलीत. गोपाळ बुटीच्या पत्नीचे नाव जानकाबाई होते. त्या खूप परम भाविक असून गृहलक्ष्मीच होत्या. त्यांनी महाराजांच्या चरणी विनंती केली व म्हणाली कि, “माझा हेतू मनातल्या मनातच राहीला”   तेव्हा महाराज म्हणाले, “तुझ्या मनातलं मी ओळखलं. “असं म्हणून त्यांनी तिला कुंकू लावले. मग म्हणाले, “तुला परम सद्गुणी आणखी एक पुत्र होईल व अंती सौभाग्यासह वैकुंठाला जाशील बाळे तू” असा तिला आशीर्वाद देऊन दयाघन सिताबर्डीहून निघून रघूजी भोसले यांच्या घरी आले. हे रघूजी राजे भोसले उदार मनाचे भक्त होते. त्यांनी आपल्या शुद्ध वर्तनाने रामराज्य ठेवलं होतं. त्यांचं अशाश्वत असं लौकीकी राज्य जरी गेलं असलं तरी शाश्वत स्वरुपाचे सद्‌गुरुभक्तीचे राज्य त्यांच्या घरात होते. राजांनी महाराजांचा उत्तम प्रकारे आदरसत्कार केला. त्यांचा पाहुणचार घेऊन नंतर महाराज पुढे रामटेकला गेले. तेथे रामाचे दर्शन घेऊन श्री गजानन महाराज हरी पाटला समवेत शेगांवच्या मठात वापस आले. मोगलाईत धार-कल्याणचा रंगनाथ म्हणून एक भला मोठा थोर साधु होता.ते गजानन महाराजांना भेटण्यासाठी शेगावला आले तेव्हा त्या दोघांची अध्यात्माची व  सांकेतिक बोलणी झाली पण त्याचा भावार्थ जाणण्याचे सामर्थ्य कोणातच नव्हतं. माणगावी जन्म घेतलेले व  कृष्णातटावर प्रसिध्द झालेले कर्ममार्गी श्रीवासुदेवानंद सरस्वती भेटीला येण्याच्या अगोदर गुरुवर श्री गजानन सिद्धयोगी, बाळाभाऊंना म्हणाले, “अरे उद्या माझा एक भाऊ मला भेटायला येणार आहे. त्याचा आदर करावा. पण तो मोठा कर्मठ आहे. म्हणून उद्या वाटेत चिंध्या पडू देऊ नका. अंगण स्वच्छ ठेवा. चिंधी कोठे पडलेली असेल तर तो कोपेल. तो म्हणजे जमदग्नीची दुसरी प्रतिमा आहे. तो एक  शुचिर्भूत ज्ञानसंपन्न कऱ्हाडे ब्राम्हण असून, त्याचे कर्मठपण कवचापरी आहे असे समजा. दुसरे दिवशी एक प्रहर झाल्यावर स्वामी वासुदेवानंद सरस्वती तेथे आले. ते एकमेकांना पाहून दोघे हंसले. उभयतांच्या मनाला अतोनात आनंद झाला. एक कर्माचा सागर एक तर दुसरा योग योगेश्वर, एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा, एक गंगाभागीरथी, एक गोदावरी, एक साक्षात् पशुपती एक शेषशायी नारायण असं त्यांचं वर्णन करता येईल. स्वामी मठात आले तेव्हां गजानन महाराज पलंगावर हाताने चिटक्या वाजवत बसले होते. स्वामी येताच चिटकी थांबली. दोघांची दृष्टादृष्ट झाली. तो स्वामींनी परत जाण्यासाठी आज्ञा मागितली , त्यावर बरे म्हणून गजानन महाराजांनी मान खाली वाकवल्या बरोबर स्वामी  तेथून निघून गेले. बाळाभाऊंना याचं फार नवल वाटलं. ते म्हणाले, “गुरुराया, हे दृश्य पाहून माझ्या मनात शंका आली आहे, त्याचं उत्तर द्याल का?  स्वामींचा मार्ग तुमच्या मार्गाहून अगदी भिन्न आहे तरी ते तुमचे  बंधु कसे?” महाराजांनी प्रश्न ऐकला आणि म्हणाले, “बाळा आज तू आम्हाला चांगला प्रश्न विचारलास. ईश्वराकडे जाण्याचे तीन मार्ग असतात. हे तिन्ही मार्ग आत्मज्ञानाचे गावाला जाऊन मिळतात. पण त्यांची स्वरूपे भिन्न भिन्न  आहेत. त्यामुळे पहाणाऱ्याचे मन विवंचनेत पडते.  सोवळे ओवळे, संध्या स्नान, व्रत उपोषणे व अनुष्ठाने ही सर्व अंगे आपल्या  कर्माची आहेत. ही अंगे जो निरालसपणे आचरेल त्यालाच  ब्रह्मवेत्ता कर्मठ असे म्हणता येईल. यात जर काही अधिक न्यून झालं तर कर्ममार्ग हाती येत नाही म्हणून आचरणात विशेष तत्परता ठेवली पाहिजे. आणखी एक सावधगिरी अंगी घ्यावी ती म्हणजे समोरच्या व्यक्तीला दूर करून  त्यांना उणे लेखू नये. आतां भक्तिमार्गाचं लक्षण म्हणजे मन अतिशुद्ध हवं. अंशभर जरी मलीनता मनात राहीली तरी भक्तिरहस्य हातात येत नाही. अंगात दयाधर्म, प्रेम, नम्रता व  भक्तिमार्गाची विशेष आस्था असावी लागते. श्रीहरीची सदा आठवण आणि मुखात कायम नामस्मरण अशी भक्तिमार्गाची अंगे आहेत. या अंगासह जो भक्ती करेल त्यालाच श्रीहरी मिळेल. भक्तिमार्गाचा विधी सोपा असून सुद्धा  त्याची सर कोणालाच येत नाही. पण आचरण करायला तो कर्ममार्गाहून कठीण आहे. ज्या प्रमाणे आकाश डोळ्यांनी बघितलं तर जवळ वाटतं पण प्रत्यक्षात खूप दूर असतं त्याप्रमाणे भक्तिमार्ग दिसायला सोपा दिसतो पण आचरण करण्यास कठीण असतो.  आता तिसऱ्या योगमार्गाबद्दल सांगतो. योगमार्गाचा पसारा पहिल्या दोन मार्गापेक्षा जास्त असला तरी त्यासाठी बाहेरचे आवश्यक नसल्याने तो ज्याचा त्याच्या पुरता मर्यादित असतो. जेवढे ब्रह्मांडात आहे तेवढें पिंडांत असते. त्या पिंडांतील साहित्य घेऊन योग साधावा लागतो. आसने रेचक कुंभक इडापिंगलेचे भेद, धौती मुद्रा त्राटक हे कळलं पाहिजे. कुंडली आणि सुषुम्ना यांचें ज्ञान योग करणारांना असेल तरच तो योगी होवू शकतो अन्यथा नाही. या तिन्ही मार्गांचे अंतिम फळ आत्मज्ञान हेच आहे. पण ते ज्ञान प्रेमाशिवाय असता कामा नये. कारण जे जे कृत्य प्रेमावीण आहे ते सर्व व्यर्थ असते म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गांत महत्वाचे आहे. काळा, गोरा, खुजा, थोर, कुरुप आणि सुंदर  हे सर्व शरीराचे प्रकार आहेत. त्याची आत्म्याला काहीही बाधा होत नाही. तिन्ही मार्गांची बाह्य स्वरुपे जरी भिन्न असली तरी मूळ उद्दिष्ट एकच आहे. मुक्कामास गेल्यावर मार्ग कोणता याला  काही महत्त्व रहात नाही. पण जो ज्या मार्गाने जाईल त्याला त्याचे महत्व वाटते. भक्तीपंथ चालविण्यास आरंभ करून जे त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचत नाहीत अशांचा पंथाभिमानाने तंटा होतो. या तिन्ही मार्गांचे पांथस्थ मुक्कामी पोचल्यावर संत होतात. मग त्यांच्यात अजिबात द्वैत रहात नाही. वसिष्ठ, वामदेव, जमदग्नि, अत्री, पाराशर, शांडिल्य मुनी हे कर्ममार्गाने मुक्कामाला पोहोचले. व्यास, नारद, कयाधू-कुमर, मारुती, शबरी, अक्रूर, उद्धव, सुदामा, पार्थ, विदूर हे सर्व भक्तिमार्गाने गेले. श्रीशंकराचार्य गुरुवर, मच्छिंद्र, गोरख, जालंदर हे योगमार्गाच्या थोर पायरीने वर चढलेत. जो लाभ वसिष्ठाना झाला तोच विदुराच्या पदरीं पडला तोच मच्छिंद्राने भोगला. फळामाजी काहीच फरक नाही. तिच प्रथा पुढे चालली यात काही शंका नाही. कर्ममार्गाची बूज श्रीपादवल्लभ स्वामींनी राखली. वाडी, औदुंबर, गाणगापूर अशा ठिकाणचे यतीवर नरसिंह सरस्वती हे जगप्रसिद्ध आहेत. तसेच नामा, सावता, ज्ञानेश्वर, सेना, कान्हु, चोखामहार, ठाणेदार दामाजीपंत हे सर्व  भक्तिमार्गाने गेले. श्रीगोंद्यातील शेख महंमद, जालन्यातील आनंदी स्वामी, सुर्जी-अंजनगांवांतील देवनाथ हे सर्व योगाचे चाहते होते. तसं वासुदेव कर्ममार्गानं चाललाय आणि मी भक्तिपंथ धरलाय. पळुसचे धोंडीबुवा, सोनगीरचा नाना बरवा,  जालन्याचे यशवंतराव, हेही भक्तिपंथानं चाललेत. विदेही खाल्लाअम्मा, शिर्डीचे साईबाबा, गुलाबराव, चांदूर तालुक्यातील वरखेडे गावचे संत आडकोजी हे ज्ञानदृष्टीने परिपूर्ण आहेत. मुर्‍हा गांवचे संतरत्‍न झिंगाजी, नागपूरचे ताजुद्दीन बाबा हे भक्तिमार्गाचे चाहते आहेत. या सर्व संतांचे आचरण भिन्न असले तरी ते सर्व कैवल्याचे स्वामी आहेत. आपण कोणताही मार्ग अनुसरा पण तो मार्ग कोणता आहे याला महत्त्व नसून जो त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचतो त्याचं कौतुक करायला हवं. आम्ही ही सर्व भावंडे, भाविकांना कैवल्याच्या मार्गावर आणून सोडावयासाठी पृथ्वीवर जन्म घेतो. जो ज्याला आवडेल त्याप्रमाणे तो पंथ आचरेल. पण फळ सर्वाना एकच मिळेल. आता पुढे काही विचारू नकोस. वेडेपणाचे पांघरूण घेऊन मला इथं निवांत बसु दे. जशी ज्याची निष्ठा बसेल वा, जो माझा होवून जाईल त्याचेच कार्य होईल. इतरांची मला आवश्यकता नाही. ज्याला अनुताप झाला त्यालाच ब्रह्मज्ञान सांगावं.  उगीच तर्कटी वात्रटाला हे सांगण्यात काय अर्थ आहे? कोणी कांहीं म्हणो आपण निवांत असावं, तरच जगद्‌गुरु परमात्मा हा  जगन्नाथ भेटेल. हा सर्व उपदेश ऐकून बाळाभाऊच्या डोळ्यांना प्रेमाश्रूंचा पूर लोटला. मनात अष्टभाव दाटून आले. शरीरावर रोमांच उमटले. वैखरीचे काम सहज संपले आणि त्यांनी काहीही न बोलता महाराजांना नमस्कार केला. थोर साधू श्री गजानन महाराज वर्‍हाड प्रांताचा उद्धार करण्यासाठीच अवतरले होते.   साळुबाई नांवाची एक  कण्व शाखेची स्त्री महाराजांची मनापासून असीम भक्ती करीत असे. एके दिवशी स्वप्नात येऊन महाराज तिला म्हणाले, “साळू, डाळपीठ घेऊन अहोरात्र स्वैंपाक करून येथे येतील तेव्हा त्यांना जेवायला घाल. यामुळे तू निःसंशय नारायणाला प्रिय होशील.” शेवटपर्यंत तिनं ही सेवा मठात केली.  प्रल्हाद बुवा जोशीना कृपेचा योग आला होता. पण दुर्दैवाने त्यांना तो फलप्रद झाला नाही.  खामगांवच्या जवळ असलेल्या जलंब गावात  रहात असलेल्या तुलसीरामला आत्माराम नावाचा मुलगा होता. तो तैलबुद्धीचा होता. त्याला वेदाध्यायनी प्रेम वाटत असे. ते शिकण्यासाठी तो गंगा नदीच्या काठावरील धर्मपीठ वाराणसी येथे गेला. रोज भागीरथीचे स्नान करून माधुकरीचे सेवन करून गुरुगृही जाऊन तो श्रुतीचे अध्ययन करत असे. बरेचशे विद्यार्थी अध्ययनासाठी जातात पण तेथे जाऊन शिकण्याऐवजी परोपरीची मजा मस्ती करून वापस येतात. चैनीत मन गुंतल्यावर त्यांना अध्यात्मिक ज्ञान कोठून येणार?  पण आत्माराम असा नव्हता. तो विवेकसंपन्न सदाचारी असल्याने विद्याभ्यास पूर्ण करून गावी परत आला. गावी आल्यावर अत्यंत आनंदाने तो शेगावला श्री गजानन महाराजांच्याकडे आला.  तो वेद विद्येचा जाणता आणि गजानन महाराज केवळ ज्ञानसविता! त्यांनी आत्मारामाला वेद पठण करण्यास सांगितले. आत्माराम वेद म्हणताना कुठं कुठं चुकत होता. त्या चुकीची दुरुस्ती करत करत सदगुरुमूर्ती गजानन महाराज आत्मारामाचे बरोबर वेद म्हणत होते. त्यांचे वेदाध्यायन ऐकताना विद्वान तन्मय होवून जात असत.  सराफावांचून हिऱ्याची किमत कोण करणार? सद्गुरूंच्या ज्ञानाचा आदर करून आत्माराम त्यांच्यापाशी राहिला. मधु टाकून जाणं माशीला कसं आवडेल? रोज सेवा करण्यासाठी तो जलंबाहून न विसरता येत असे. असा तो एकनिष्ठ भक्त होता. समर्थांच्या पश्चात सद्गुरूंच्या समाधीची पूजा अर्चा करण्यास तोच आत मठात होता. मोबदला न घेता त्याने एकनिष्ठ सेवा केली आणि शेवटी आपली सर्व इस्टेट महाराजाना अर्पण केली. इस्टेट फार नव्हती एक जमीन व  एक घर. येथे किमतीला महत्त्व नाही तर तुमची देण्याची मनस्थिती कशी आहे  हे महत्वाचं आहे. शबरीने आपली उष्टी बोर देऊन रामाला जस आपल करून घेतलं तसाच हा प्रकार  आहे.                            पहिले स्वामी दत्तात्रय , दुसरे केदार व  तिसरे निव्वळ दूध हाच आहार असलेले दुधाहारी नारायण जामकर असे तिघेजण स्वामींचे भक्त होते. त्यानी आपले तन मन धन महाराजांच्या चरणी अर्पण केले.बाळापूर तालुक्यातील मोरगाव भाकरे गावातील  मारुतीपंत पटवार्‍याच्या  शेतात पिकाचे रक्षण करण्यासाठी तिमाजी नावाचा माळी होता. त्या माळ्याला रात्रीच्या वेळी खळ्यात गाढ झोप  लागली होती. रात्रीचे दोन प्रहर उलटल्यावर कुंभाराची दहावीस गाढवं खळ्यात येऊन दाण्यावर तुटून पडली. तिमाजी झोपलेला असल्याने गाढवे मस्त आरामात  जोंधळे खाऊ लागली. पण त्याचा मालक, मारुतीपंत महाराजांचे निस्सीम भक्त होते म्हणून सद्‌गुरुरायाना लीला करणे भाग पडले. त्यांनी क्षणांत मोरगावला जाऊन तिमाजीला हांक मारिली.  “अरे  उठ! लवकर जागा हो. गाढवं धान्याची रास खात आहेत” असं मोठयानं बोलून महाराजांनी तिमाजीला जागे केले आणि ते अंतर्धान पावले. तिमाजीनं उठून पाहिलं  तर गाढवं त्याच्या दृष्टीस पडली. ती पाहून तो मनात म्हणाला, “आता काय करू? मालक नक्कीच रागावणार! पिकाचे रक्षण करण्यासाठी त्यानं मला येथे ठेवलं पण माझ्या हातून विश्वासघात झाला. मी निवांत झोपल्यामुळे निम्यावर धान्याची रास गाढवांनी खाऊन टाकली. आता मालकाची समजूत कशी घालू?” त्यावेळी लोकांना इमानाची फार किंमत होती. नाहीतर हल्लीचे नोकर नमकहराम आणि शिरजोर असतात. त्यांना मालकाच्या नफ्यातोट्याची काही काळजी नसते. पण तिमाजी तसा नव्हता. त्यामुळे त्याने मनात विचार केला की, “आता मालकास भेटून चुकीची माफी मागितली पाहिजे. मारुती उदार बुद्धिचा आहे तो नक्की क्षमा करेल.” असं मनात म्हणून सूर्योदयाच्या वेळी  तिमाजीने गावात येऊन पंतांचे पाय धरले आणि म्हणाला, “महाराज, माझ्या झोपेने तुम्हाला बुडवून टाकले. दहावीस गाढवांनी येऊन धान्याची रास खाल्ली. ते नुकसान किती झालं ते खळ्यात येऊन पहा म्हणजे मला बरं वाटेल.”   मारुतीपंत त्यावर म्हणाले, “मला खळ्यांत यायला  तिळभर सुद्धा वेळ नाही. कारण मी सद्गुरू श्रीगजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालो आहे. उद्या सकाळी येऊन धान्याचे काय झालं ते पाहीन.” असं बोलून मारुतीपंत शेगावला आले आणि दहा अकराचे सुमारास श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मठात गेले. त्यावेळी महाराज आसनावर बसले होते. जगू पाटील समोर बसले होते. बाळाभाऊ हात बांधून पाटलांच्या जवळ बसले होते. मारुती दर्शन घेत असताना हसतमुखाने महाराज म्हणाले,  “तुझ्यासाठी मला रात्री त्रास सोसावा लागला. तुम्ही माझे भक्त होता. मला राबवून घेण्यासाठी झोपाळू नोकर ठेवता व  खुशाल घरी झोपी जाता. काल रात्री खळ्यात तिमाजी झोपला असताना गाढवांचा सुळसुळाट झाला. ते रास भक्षू लागले म्हणून मी तिमाजीला जाऊन जागे केले. त्याला रास सांभाळण्यास सांगून निघून आलो.” ही खूण पटताक्षणी मारुतीने आपले मस्तक महाराजांच्या चरणी ठेवले व म्हणाले की, “आम्हांला सर्वस्वी आपलाच आधार आहे देवा ! लेकराचा अवघा भार आईच्याच डोक्यावर असतो. माझे म्हणून जे जे आहे ते सर्व आपलेच आहे. आई, तुमच्याशिवाय त्यावर कुणाचीच सत्ता नाही. खळे आणि जोंधळा सर्व आपलंच आहे. व्यवहारदृष्ट्या नावाला तिमाजी नोकर म्हणून ठेवला आहे पण आपण तर अवघ्या ब्रह्मांडाचे संरक्षण करता व  लेकरांसाठी त्रास सोसता. मी आपले लेकरु असल्याने आपण मोरगावी जाऊन खळ्याचे  संरक्षण केले. अशीच स्वामी माझ्यावर निरंतर कृपा असावी. मी आत्ताच जाऊन तिमाजीला नोकरीवरुन  दूर करतो.” मारुतीचं बोलणं ऐकून समर्थांना फार नवल वाटलं. ते म्हणाले, “छे ! छे ! वेडया ! तिमाजीस  मुळीच नोकरीवरून काढू नकोस. कारण तिमाजी इमानदार नोकर आहे. खळ्यात गाढवे पाहून तो दुःखी झाला. रात्रीची हकीकत  तुला सांगायला तो भीत भीत सकाळी तुझ्याकडे आला होता. तेव्हा तू त्याला म्हणालास ना की, मी शेगांवाला जातोय. उद्या सकाळी खळ्यात येऊन पाहीन म्हणून. असे गुरुवचन ऐकले व  मारुतीला खूण पटली. पहा संतांचें कर्तृत्व किती थोर आणि अगाध आहे ! खळ्यात गाढवं आलेली महाराजांना कुणी सांगितली नव्हती. त्यांनी ती अंतर्ज्ञानाने जाणली हेच महाराजांचं थोरपण व संतत्व होय.शके अठराशें सोळामध्ये  महाराज बाळापूरला  असताना एक घटना घडली. तेथे हमरस्त्यावर बाजारपेठेत सुखलाल बन्सीलालाची एक बैठक होती. त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी दिगंबर अवस्थेत आनंदांत बसली होती. रस्त्यावरून जाणारे भाविक त्यांना पाहून नमन करुन जात होते. त्या रस्त्यावरून नारायण असराजी नावाचा एक पोलिस हवालदार जात होता.  महाराजांना पाहून त्याचे तात्काळ डोके फिरले व म्हणू लागला कि, “हा मुद्दाम वाटेत बसलेला  नंगाधोत, साधू नसून भोंदू असल्याने याची उपेक्षा करून उपयोग नाही.” असं म्हणून महाराजांच्या जवळ जाऊन त्यांना  अद्वातद्वा बोलू लागला व  म्हणाला, “तुला लाज कशी वाटत नाही. रस्त्यावर नंगा बसतोस त्याचे प्रायश्चित्त तुला मी आताच  देतो.” असं बोलून तो छडीने महाराजांना मारु लागला.  छडीचे वळ त्यांच्या पाठीवर व पोटावर उठले पण हवालदार मारता आपला हात काही आवरता घेईना. हा प्रसंग पाहून एक हूंडीवाला नावाचे एक गृहस्थ त्यांच्या दुकानामधून धावून आले. ते म्हणाले, “अरे हवालदार तू काही तरी विचार कर. उगीच  सत्पुरुषावर हात टाकणे बरे नाही. कारण श्रीहरी हा संतांचा कैवारी आहे तू त्यांना मारल्याने त्यांच्या पाठीवर उठलेले वळ तुला दिसत नाहीत का? तुझ्या या कृत्याने तुझा अंत अतिशय जवळ आला आहे. कारण आजारीच मरण्यासाठी पथ्य मोडत असतो. तेच तू आज केले हे मला आता स्पष्ट दिसत आहे पण हे काही बरे झाले नाही. आता तरी डोळे उघड आणि आपल्या  गुन्ह्याची माफी माग.” त्यावर हवालदार म्हणाला, “मला कुणाची माफी मागायचं काहीच कारण नाही. कावळ्याच्या शापाने कधी गाय मरेल का? हा नंगा धोत हलकट बाजार पेठेत बसून तोंडाने चावट व  अचाट गोष्टी करत असतो. अशा ढोंग्याला मारणे जर ईश्वर गुन्हा मानू लागला तर न्याय मागायला जागाच राहणार नाही.”  पण हुंडीवाला म्हणाले तेच पुढे खरं झालं. त्याच बाळापूर गावात हवालदार पंचत्व पावले. एका पंधरवडयांत हवालदाराचे सर्वआप्त भस्मीभूत झाले. हा सगळा प्रकार  एका साधूस मारल्याने झाला. म्हणूनच सर्वांनी ह्या गोष्टींचा जरूर विचार करावा. जो पर्यंत खरे खोटे कळत नाही तो पर्यंत कोणीही अस अघटित कृत्य करू नये व आपल्या घरावर तसेच आपल्या कर्माच्या पायी कुटुंबावर संकट आणू नये व सगळ्यांनी साधूसमोर जपून वागावे. नगर जिल्ह्यांत प्रवरा नदीचे कांठावर संगमनेर नावाचे अवर्णनीय असे अति टुमदार गाव आहे. अनंतफंदी नांवाचे एक कवि तेथे होऊन गेले तेथील हरी जाखडया हा  माध्यंदिन यजुर्वेदी ब्राह्मण होता. तो गावोगाव फिरुन त्याचे  पोट  भरत असे. एकदा तो फिरत फिरत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शेगांवला आला व   महाराजांच्या  पायापाशी बसला. त्यावेळी हजारो लोक दर्शन घेत होते. कुणी ब्राह्मणभोजन घालत होते तर कोणी खडीसाखर वांटून केलेला नवस फेडत होते. तेव्हा हरी मनात म्हणू लागला, “हा केवढा ज्ञानराशी आहे पण याच्या पायापाशी येऊन मला मात्र विन्मुख होऊन आता जाणं भाग आहे. कारण माझं दैव खडतर आहे. खडकावर कधी हरळी उगवेल का? आज आपल्याला अन्न मिळालं उद्यांचं कुणी पाहिलं? असं करत माझ्या आयुष्यातले दिवस संपले. माझ्याकडं पैसा नाही की जमीन जुमला, मळा पण नाही. मी  मुळीच विद्वान नाही.अशा परिस्थितीत मला कन्या कोण देईल?” असा विचार करून हरीने महाराजांची प्रार्थना केली व म्हणाले कि, “हे स्वामी गजानना! सच्चिदानंदा दयाघना!  माझ्या मनात संसारसुखाची वासना बलवत्तर  झाली आहे. ती तूम्ही पूर्ण करा. प्रथम कुलीन आज्ञाधारक बायको मिळावी. नंतर मुलेबाळे व्हावीत.” अशी इच्छा त्याच्या मनात आल्याबरोबर महाराजांनी ते ओळखून घेतलं व त्याच्या अंगावर सद्‌गुरुनाथ थुंकले व मनात म्हणाले, “या हरि जाखडयाने माझ्याकडे संसार  मागितला म्हणून मला या मूर्खाच्या अंगावर थुंकावं लागलं. या संसारातून सुटण्यासाठी लोक माझ्या पायापाशी येतात आणि याने येथे येऊन संसार सुख मागितले. पहा आता ह्या जगाची रीत कशी आहे? सर्वानाच संसाराची इच्छा आहे. सच्चिदानंद श्रीहरीला पहायला कुणी तयार नाहीत.”  असं मनात म्हणून त्यांनी जाखड्याकडं पहिलं आणि म्हणाले, “जे जे तूझ्या आत्ता मनात आलं ते ते सर्व पूर्ण होईल. तुला पुत्रपौत्र होतील. थोडा फार पैसाही गाठीला राहील. आता घरी परत जा. सुखानं संसार कर आणि वेड्या परमेश्वराची आठवण ठेव. त्याला विसरू नकोस.” असं त्याला सांगून, लग्न करण्यासाठी प्रसाद स्वरूपात थोडे धन दिले. संगमनेरमध्ये हरी जाखडया संसारात सुखी झाला. महाराजांची वाणी  खोटी कशी होईल?   रामचंद्र गोविंद निमोणकर हे ओव्हरसियरच्या हुद्यावर काम करत होते. वासुदेव बेंद्रे हे सर्व्हेअर त्यांच्या बरोबर होते. ते व निमोणकर मुकना नदीवर आले. ही मुकना नदी सह्याद्री पर्वतांत नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यांत आहे. तेथील वनश्री अतिशय रमणीय आणि अवर्णनीय आहे. तिथं हरीणपाडसं निर्भयपणे खेळत असतात. अति फळे येतात व त्यांच्या भाराने तरु झुकलेले असतात. बिब्टया लांडगे असे वन्य पशू तिथे फिरत असतात. मुकना नदीच्या जवळ कपीलधारा नावाचा एक जलप्रवाह आहे. तेथे प्रत्येक पर्वणीला भाविक स्नानाला येतात. म्हणून त्याला तिर्थस्थानाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. असो अशा एका पर्वणीला निमोणकर तेथे स्नान करण्यासाठी गेले होते. त्यांना थोडाफार योगाभ्यास येत होता. तो पूर्ण व्हावा अशी त्यांची इच्छा होती. म्हणून तिथल्या गोसावी बैराग्याना ते त्याबद्दल विचारू लागले. पण तेथील प्रत्येक जण माहीत नाही असे म्हणू लागला. त्यामुळे निमोणकर हताश होऊन म्हणू लागले, “देवा, आता मी  काय करुं? मला योगाभ्यास शिकवणारा कोठे मिळेल ते कृपा करुन सांगा.” ते असं म्हणतात तेवढ्यात  कपील धारेवर त्यांना एक अजानबाहू अधिकारी पुरुष दिसला. त्यांचा बांधा उंच असून मुद्रा शांत होती. ते ध्यानस्थ बसले होते. निमोणकरांनी त्याना साष्टांग दंडवत घातला. बराच वेळ झाला पण योगी कांही बोलायला तयार नव्हते. शेवटी संध्याकाळ व्हायची वेळ जवळ आली. निमोणकरांच्या पोटात  तिळभर अन्न नव्हते. त्यांच्या मुक्कामाचं ठिकाणही  दूर होतं. काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं. तशातच कपिलधारेचे पाणी तुंब्यात भरून गोसावी निघाले. तेव्हा निमोणकर समर्थाना म्हणाले,  “आता माझा किती अंत पहाता ? तुम्हाला योगगाथा ठाऊक असल्यास मला कांही शिकवा.” शेवटी सूर्यास्ताच्या वेळेला कैवल्यदानी म्हणाले, “हा चित्रपट घेऊन जा आणि आपले काम कर. त्यावर थोर असा षोडाक्षरी मंत्र लिहिला आहे. त्याचा निरंतर जप  कर. त्या मंत्राच्या प्रभावाने तुला थोडा बहुत योग येईल. योगमार्ग हा अत्यंत कठीण आहे. गोगलगाय शेप किडा कधी  हिमालयाला वेढा देईल का? किंवा सागरीचा सिंप किडा कधी मेरु पर्वत चढून जाईल काय ? ब्रह्मचर्य संभाळून नेटाचा प्रयत्‍न केला तर धौती नौती व दहापाच आसनं येतील. आता पुढं काही विचारू नकोस. हा तु प्रसाद घे.” असं म्हणून एक तांबडा खडा उचलून त्यांनी निमोणकरना दिला. निमोणकराना प्रसाद म्हणून तांबडा खडा देऊन पुण्यराशी गुप्त झाले. पुढे तेच त्यांना नाशिकला गंगेवर दिसले. त्याना पाहून निमोणकर धांवत गेले. पायावर शिर ठेवून त्यांनी विचारले की,  “महाराज, आपण मला का कंटाळलात? तुमचं नाव गाव काही न सांगताच गुप्त झालात.”  त्यावर महाराज डोळे वटारून म्हणाले, “तांबडा खडा देऊन माझे नांव तुला सांगितले होते. नर्मदेचा गणपती तांबडा असतो. तूं मूळचा मूढमती असल्याने तुला त्याचे रहस्य कळले नाही. अरे मी शेगावला राहतो. माझं नाव गजानन आहे. धुमाळ सदनापर्यंत माझ्या बरोबर चल. तिथं मी तुला पुन्हा भेटीन.” असं म्हणून निघालेले महाराज रस्त्यांत गुप्त झाले. निमोणकर गोंधळून गेले व  चहूकडे भिरभिरीं पाहूं लागले. शेवटी कंटाळून धुमाळांच्या घरी आले. तिथं त्यांना गजानन महाराज ओसरीवर बसलेले दिसले. त्यांच्याशी काहीही न बोलता निमोणकरांनी त्यांना वंदन केले आणि कपिल धारेपासून काय काय घडले ते धुमाळांना सांगितले. ते ऐकून धुमाळाना अतिशय आनंद झाला. ते  योगीराजाना म्हणाले, “आता कशाची वाणआहे? अहो, निःसंशय महाराजांजवळ सामर्थ्याची खाण आहेत. यांच्यापुढे सार्वभौमपदाची सुद्धा किंमत नाही. तुम्हाला जो तांबडा खडा दिला तो पाटावर ठेऊन सद्भावें निरंतर पूजा अर्चा करा. त्या खड्यासमोर आदराने योगाभ्यासही करा. त्यांची कृपा होऊन तुम्हाला काहीतरी योगाभ्यास नक्की येईल.” तेच पुढे सत्य झाले. निमोणकरांना श्रीगजानन कृपेने थोडाबहुत योगाभ्यास येऊ लागला.                          शेगांवचे तुकाराम कोकाटे यांची संतती उपजताच यमसदनी जाऊं लागली म्हणून त्यानी समर्थाना नवस केला की, “गुरुराया मला जर दीर्घायुषी संतती द्याल तर एक मुलगा तुम्हाला अर्पण करीन. त्यांचे मनोरथ गजानन स्वामीनी पूर्ण केले. दोन तीन मुले झाली. पण संततीच्या मोहाने तुकारामांना नवसाची आठवण राहिली नाही. त्यांचा थोरला मुलगा नारायण आजारी पडला. खूप औषधोपचार केला पण गुण काही आला नाही. त्याची नाडी बंद होऊ लागली. डोळ्यांना दिसायचं बंद झालं. छातीत मात्र धुगधुगी उरली होती. ते पाहून तुकारामाना  नवसाची आठवण झाली. तेव्हा तुकाराम म्हणाले, “गुरुराया, हा माझा मुलगा वाचला तर तुमची सेवा करण्यासाठी तुम्हाला अर्पण करीन.” असं वचन जेव्हा दिलं तेव्हा दिल्या दिल्या त्याची नाडी ठिकाणावर आली. हळूहळू त्याने डोळेही उघडले. बरा झाल्यावर नारायणाला तुकारामांनी नवस फेडायचा म्हणून मठात आणून सोडले. तो नारायण अजून मठात आहे. महाराजांना बोललेला नवस कोणी चुकवूं नये हे सांगण्यासाठी नारायण जिवंत आहे संत-चरित्र ही कादंबरी नव्हे! पुढें आषाढ महिन्यात महाराज हरी पाटलांना घेऊन विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला गेले. विठ्ठल हा सर्व संतांचा ध्येयविषय, भक्तांचा कल्पतरु ,कमलनाभ सर्वेश्वर, जगदाधार जगत्पति, वेद ज्याचे गुण गातात, जो संतांच्या चित्तात वसून असतो अशा रुक्मिणीपती दयाघनाला भेटायला गजानन महाराज पंढरीला आले. चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घ्यायला देवळात गेले. दर्शन घेऊन देवाला म्हणाले,  “हे देवा पंढरीनाथा, हे अचिंत्या अद्वया समर्था, हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता, माझी विनवणी ऐक. तुझ्या आज्ञेने आजवर भूमिवर भ्रमण करून जे जे भाविक होते त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता माझे अवतार-कार्य संपले हे तुला माहीत आहेच. तेव्हा पुंडलीक वरदा विठ्ठले आता जाण्यासाठी आज्ञा द्यावी. देवा, मी भाद्रपद महिन्यात, तुझ्या चरणा जवळ कायम राहण्यासाठी वैकुंठी जाऊ इच्छितो. ऐसी विनवणी करून समर्थांनी हात जोडले. हरिचा होणारा विरह त्यांना सहन होईना म्हणून डोळ्यात पाणी आले. ते पाहून हरी पाटील हात जोडून पुण्यवंतांना विचारू लागले की, “सद्‌गुरुनाथा, यावेळेस डोळ्यात पाणी का आणलेस?  माझी काय काही चूक झाली का अस म्हणून दयाळा आपल्याला दुःख झालंय ?  “त्यावर हरीचा हात धरून महाराज म्हणाले,  “माझ्या डोळ्यात अश्रू का आले त्याचं वर्म जरी तुला सांगितलं तरी ते तुला काही कळणार नाही. तो विषय फार गहन आहे. तू त्यात पडू नकोस. एवढंच लक्षात घे की , माझी संगत आता थोडीच राहिली आहे. तेव्हा चल आता शेगावला जाऊ तुमच्या पाटील वंशाला काही कमी पडणार नाही.” शेगावात पंढरीचे मावंदे केले पण हरी पाटलाचे मन मात्र चिंतेने व्याप्त झाले होते. तो मंडळीना म्हणू लागला की,  “महाराज पंढरीत विठ्ठलाच्या मंदिरात म्हणाले की, आता संगत थोडी दिवस राहिली.” पुढें श्रावणमास गेला. महाराजांच्या शरीराला क्षीणता आली. पुढें भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज सर्वांना म्हणाले, “आता गणपती बोळवण्यासाठी तुम्ही मठात यावे. गणेश पुराणात अशी कथा आहे की, चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा. त्याची पूजा-अर्चा करुन नैवेद्य समर्पण करावा. दुसरे दिवशी विसर्जून तो पाण्यात बोळवावा. तो दिवस आज आहे. तो साजरा करा. माझ्या या पार्थिव देहाला तुम्ही आनंदाने बोळवा. यत्किंचितही दुःख करू नका. कारण तुम्हाला सांभाळण्यासाठी आम्ही येथेच स्थित आहोत. तुमचा विसर पडणे शक्य नाही. हे शरीर वस्त्राप्रमाणे बदलत असतं हा निर्धार गीतेत भगवंतांनी बोलून दाखवलेला आहे. जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी त्यांनी असंच केलंय हे विसरू नका.” चतुर्थीचा दिवस महाराजांनी आनंदात घालवला. बाळाभाऊंच्या हाताला धरून महाराजांनी त्यांना आपल्या आसनावर बसवले. मग म्हणाले, “मी गेलो ऐसे मानू नका. भक्तीत अंतर करु नका. मला कधी विसरू नका. मी येथेच आहे.”  असं म्हणून त्या महात्म्याने योगशक्तीने प्राण रोधला व  मस्तकी ठेवून दिला. शके अठराशे बत्तीस साधारण नाम संवत्सर, भाद्रपद शुद्ध पंचमी, गुरुवार, प्रहर दिवसाला महाराज म्हणाले, “जय गजानन” व  प्राण रोधून सच्चिदानंदी लीन झाले. देहाचे चलनवलन अगदी पार मावळून गेले. महाराज समाधीस्थ झालेले पाहून लोक हळूहळूं लागले. स्वामी समाधीस्थ झाल्याची बातमी गावात झाली. नारीनर छाती पिटुन लागले. शोक करीत म्हणू लागले की, “आपला साक्षात्कारी, चालता बोलता श्रीहरी गेला, आमचा दिनांचा कैवारी गेला आमुचा विसावा गेला, सौख्य ठेवा गेला. कालरुपी वार्‍याने हा ज्ञानदीप विझला. अहो गजानन स्वामी समर्था! आता आम्हास कोण त्राता? पुण्यवंता इतक्यात आम्हाला सोडून का गेलात?” मार्तंड पाटील, हरी पाटील, विष्णुसा, बंकटलाल, ताराचंद, श्रीपतराव कुळकर्णी असे सगळे मठात जमले व त्यांनी असा विचार केला की, आज पंचमीचा दिवस आहे. आज स्वामीना समाधी द्यायला नको. आजूबाजूच्या सर्व लोकांना दर्शनाला येऊ द्या. आता पुढें ही मूर्ति  लोपणार आहे. तेव्हा अस्तमानापर्यंत लोकांची वाट पाहू. ज्यांच्या नशिबी असेल त्याना दर्शन घडेल. आता उशीर न करता चोहीकडे जासूद धाडा. गोविंदशास्त्री म्हणून डोणगांवचे एक विद्वान् होते. ते म्हणाले, “महाराज त्यांच्या आवडत्या भक्तांना नक्कीच दर्शन देतील. तो पर्यंत ते प्राण मस्तकी धारण करतील. त्याची प्रचीति पहायची असेल तर त्यांच्या डोक्यावर लोणी ठेऊन पहा. “त्यानुसार डोक्यावर लोणी ठेवल्यावर ते स्वामींच्या योगशास्त्राच्या अभ्यासामुळे विरघळू लागले. हे पाहून जो तो कौतुक करू लागला. पुढं  गोविंदशास्त्री म्हणाले, “अहो एक दिवसाची काय कथा? हे निःसंशय वर्षभर अशा स्थितीत राहतील. पण असं करणे अनुचित आहे. त्यामुळे आवडते सर्व भक्त आल्यावर स्वामींना समाधि द्या.” ते अवघ्यास मानवले आणि त्यांनी महाराजांपुढे मोठ्या आदराने  भजन सुरू केले. हजारो लोकांचा टाळ जमला.  दुरदूरच्या भक्तांच्या स्वप्नांत जाऊन स्वामींनी त्यांच्या समाधीबद्दल कळविले. ऋषिपंचमीला शेगावला महाराजांचे दर्शन घ्यायला अपार मेळा मिळाला. रथ तयार केला. अपार दिंड्या आल्या. रस्त्यावर स्त्रियांनी शेणाचे सडे घातले. त्यावर अनेक प्रकारच्या रांगोळ्या काढल्या. मोठा दीपोत्सव केला. मूर्ति रथात ठेवली. रात्रभर आनंदात मिरवणूक निघाली. तिचा थाट अवर्णनीय होता. नाना प्रकारची वाध्ये वाजत होती. खूप दिंड्या आल्या होत्या. विठ्ठलाच्या नावाचा भजनगजर होऊ लागला. भक्त तुळशी बुक्का गुलाल फुले उधळू लागले. महाराज फुलांखाली झाकून गेले. बर्फी पेढ्यास काही मोजदाद नव्हती. लोक खिरापती वाटत होते. कित्येकांनी रथावरती रूपये पैसे उधळले. रात्रभर अशी मिरवणूक निघून अखेर सूर्योदयाला मठात परत आली. समाधीच्या जागेवर  मूर्ती नेऊनी ठेवली. देहाला अखेरचा रूद्राभिषेक केला. पंचोपचार पूजा केली आणि अखेर आरती उजळली. भक्तांनी महाराजांच्या नावाचा नामगजर केला. जय जय अवलीया गजानना! हे नरदेहधारी नारायणा, अविनाशरूपा, आनंदघना, परात्परा, जगत्पते असं भजन करत करत मूर्ति आसनावर शास्त्रमार्गाप्रमाणे उत्तराभिमुख करून ठेवली. “जय जय  स्वामी गजानन” असे मुखाने बोलून  सर्वांनी अखेरचे दर्शन घेतले. भक्तांनी मीठ अर्गजा अबीर यांनी ती गार भरली आणि शिळा लावून दार बंद केले. दहा दिवसापर्यंत समाराधना चालली होती. त्यात असंख्य लोक स्वामींचा प्रसाद घेऊन गेले. खरोखरच संतांचा अधिकार इतका थोर असतो की, त्यापुढे सार्वभौम राजाचा सुद्धा पाड लागणार नाही. स्वस्ति श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचा हा एकोविसावा अध्याय वाचून “श्री” चे  अविरत दर्शन मिळेल व भक्तांचे मनोरथ पूर्ण करेल तसेच कृपादृष्टी लाभेल व भक्तिरसात मन लागून राहील. येथे हा अध्याय सुफळ संपूर्ण होत आहे.

- अनुवादक: श्री वामन रुपरावजी वानरे.

मो.09826685695