श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित चौथा अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.
“श्री गजानन विजय ग्रंथ”
अध्याय चौथा
॥ श्रीगणेशाय नमः ॥
श्री संत कवि श्री दासगणु महाराज ईश्वराची प्रार्थना करताना म्हणतात, “हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीळकंठा, गंगाधरा, महांकाल त्र्यंबकेश्वरा श्रीओंकारा मला आता पाव. बंकटलालांच्या घरी श्री गजानन महाराज राहात असताना एक अघटित घटना घडली. अक्षय तृतीयेच्या दिवशी वऱ्हाड प्रातांत फार मोठया सणाचं महत्व आहे. त्यादिवशी पितरांच्या स्मरणार्थ उदक कुंभाचं श्राद्ध करतात.
एके दिवशी महाराज मुलांच्या बरोबर खेळत बसले होते. अचानक त्यांच्या मनात काय आले कुणास ठाऊक ? काहीतरी लीला दाखवावी म्हणून ते मुलांना म्हणाले, “अरे, मुलांनो मला चिलमीत तंबाकू भरून द्या आणि त्याच्यावर एक विस्तावाचा निखारा ठेवा. आज सकाळपासून चिलीम ओढली नाही त्यामुळे बेचैन झालो आहे “
महाराजांनी आपल्याला काही काम सांगितलंय हे लक्षात आल्यावर मुलांना अतिशय आनंद झाला व ती सर्व मुले चिलीम भरण्याच्या कामास लागली.मुलांनी चिलीम तर भरली, पण विस्तव नव्हता. त्यानी घरात चौकशी केल्यावर असं कळलं की , आज सणाचा दिवस असल्याने चूल पेटायला वेळ आहे. झालं! आता काय करायचं? मुलांच्यात आपापसात चालू असलेली चर्चा बंकटलालनी ऐकली आणि ते अत्यंत गोड आवाजात म्हणाले, “अरे आपल्या गल्लीत जानकीराम सोनार आहे ना, तेथे जा. त्याच्याकडे तुम्हाला विस्तव मिळेल. बागेसरी पेटवल्याशिवाय सोनाराचं दुकान चालूच होत नाही.ते मुलांनी ऐकलं आणि जानकीरामाकडं जाऊन त्यांनी महाराजांची चिलीम पेटविण्यासाठी विस्तवाची मागणी केली. त्यांनी जानकीराम सोनारांकडे विस्तवाची मागणी केली तेव्हा जानकीराम सोनारास खूप राग आला. ते म्हणाले, “अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मी कुणाला विस्तव देणार नाही.” त्यावर त्या सर्व मुलांनी त्यांना विस्तव देण्यासाठी विनंती केली, मुलं म्हणाली, “असा अविचार करू नका. विस्तव आम्ही महाराजांसाठी मागत आहोत. ते तर देवांचे देव आहेत आणि साधुसंताना काही दिलं तर तुमचं भलंच होईल. असा अशुभ विचार करू नका. तसं पहायला तर तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात. मग तुम्हाला हे कसं कळत नाही ? अहो तुम्ही विस्तव दिलात तर महाराज चिलीम पिऊन तृप्त होतील आणि भाग्य तुमच्या घरी चालत येईल.”
पण सोनार काही ऐकायच्या मनःस्थितीत नव्हता. त्यांनी वेडंवाकडं बोलायला सुरुवात केली. बुडत्याचा पाय खोलातच जाणार ना? ते म्हणाले . ” त्या गजाननाचं मला काही एक सांगू नका. तो कसला आला पुण्यराशी? दिवसभर गांजा तंबाखू पितो तो. चिलीम पिणारा वेडा आहे. तो गावात नग्न हिंडतो, वेड्यासारखे चाळे करतो, गटाराचे पाणी पितो त्याची जातगोत तरी माहीत का तुम्हाला? अशाला मी काही साधू मानत नाही. त्याच्या नादी लागून बंकटलाल वेडा झाला, पण मी त्याच्यासाठी विस्तवबिस्तव काही देणार नाही. तो स्वतः आहे ना साक्षात्कारी? मग त्याला विस्तवाची काय गरज? हवं असेल तर स्वतःच्या कर्तृत्वावर विस्तव तयार कर म्हणा? साधू नाथ जालंदर खूप चिलीम प्यायचे पण विस्तवासाठी कधी दारोदार फिरले नाहीत. तुम्हाला विस्तवबिस्तव काहीही मिळणार नाही, तेव्हा तुम्ही आता येथून लवकर निघा बरं. मी त्या पिशाला काडीचीही किंमत देत नाही.”
विन्मुख परत आलेल्या मुलांनी सोनाराच्या दुकानात घडलेली सर्व हकीकत महाराजांना सांगितली. त्यावर महाराज हसून म्हणाले , “आपल्याला त्याच्या विस्तवाची गरज नाही.” एवढं म्हणून त्यांनी चिलीम हातात घेतली आणि बंकटलालना सांगितलं की, “वर एक नुसती काडी धर. त्यावर बंकटलाल म्हणाले, “काडी घासल्याशिवाय विस्तव कसा तयार होणार? थोडं थांबता का? म्हणजे मी तुम्हाला काडी घासून विस्तव तयार करून देतो.” महाराज म्हणाले, “उगीच काहीतरी बडबडू नकोस, सांगितलं तेवढं कर ! तू नुसती काडी चिलमीवर धर, अजिबात घासायची नाही. बंकटलालनी तसेच केले आणि काय चमत्कार झाला तो पहा, चिलमीच्या टोकावर अग्नी प्रकट झाला. गंमत म्हणजे काडीवर विस्तवाचा अंशही नव्हता. केवळ महाराजांच्या लोकोत्तर प्रभावामुळे हे घडले होते. काडी तशीच राहिली आणि चिलीमही पेटली. खऱ्या साधूला कशाचीच गरज नसते. याचंच नाव तर साधुत्व !
आता त्यानंतर सोनाराच्या घरात काय घडलं ती घटना पहा. जेवढा मान गुढीपाडव्याच्या दिवशी निंबफुलांना असतो तेवढाच मान अक्षय्य तृतीयेला चिंचवण्याला असतो. सोनाराच्या घरी जेवणाची पंगत बसली. सर्वांना द्रोणात चिंचवणे वाढण्यात आले. तोच एक चमत्कार झाला. लोकांनी द्रोणात पाहिले तर द्रोणातल्या चिंचवण्यात नुसत्या अळ्यांचा बुजबुजाट झाला होता. लोकांना ते पाहून अत्यंत किळस वाटली आणि ते भराभरा पानावरुन उठले. जानकीरामांची मान शरमेने खाली गेली. असं का झालं असावं, याचं कोडं, त्याना काही केल्या उमगेना. चिंचवण्यासोबत सर्वच अन्न वाया गेले. अचानक जानकीरामांच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे, असे व्हावयास मीच कारणीभूत आहे. मी साधूला विस्तव दिला नाही , त्याचे लगेच प्रत्यंतर आलं. त्यांची अगाध लीला खरोखरच माझ्या लक्षात आली नाही!
ते चिंतामणी आहेत आणि मी त्यांना गारगोटीची किंमत दिली. दुर्दैवाने माझ्या हातून संतसेवा घडू शकली नाही. माझा धिक्कार असो ! सुयोग आलेला असताना मी तो धुडकावून लावला. असो ! झालं ते झालं ! आता जाऊन त्यांची क्षमा मागितली पाहिजे असा विचार करून जानकीराम सोनार ते चिंचवणे घेऊन बंकटलालांच्या घरी हजर झाला तो बँकटलाला म्हणाला
“अहो शेटजी, माझा घात झाला ! बघा बघा या माझ्या चिंचवण्यात किड्यांचा बुजबुजाट झालाय ! त्यामुळं सगळे पानावरुन उपाशी उठले आणि हे सगळं माझ्यामुळंच झालं. आज सकाळी समर्थांच्या चिलमीसाठी मुलं विस्तव मागायला आली होती पण मी त्यांना धुडकावून लावलं. त्याचं फळ मला लगेच मिळालं. सगळं चिंचवणं नासलं बघा!”
बंकटलालनी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले, “अहो, तुमचे चिंचोके बहुधा किडलेले असतील, त्यामुळं चिंचवणं नासलं असेल !
त्यावर सोनार म्हणाले, “शेटजी, उगीच काहीतरी शंका काढू नका. मी स्वतः चिंच फोडली अजून त्या चिंचेची टरफले येथे पडली आहेत. त्या चिंचा अगदी ताज्या होत्या. आता तुम्हीच पहा ती चिंचोक्यांची रास पडली आहे हवं असलं तर पहायला चला.” एवढं बोलून पुढं म्हणाले, “आता एकच विनंती आहे, मला हाताशी धरून समर्थांच्या पायावर घाला, म्हणजे मी त्यांना माझ्या अपराधाची मनापासून क्षमा मागतो. साधू मुळचेच दयेचे सागर असल्याने ते मला क्षमा करतील.”
जानकीराम सोनार भीतभीतच महाराजांच्या पुढे गेला. महाराजांना साष्टांग नमस्कार करून म्हणाला , ” महाराज, माझ्यावर दया करा. मी तुमचे नाना अपराध केलेत. आपण साक्षात उमानाथ आहात. मी उगीच शंका घेतली. तेव्हा कृपा करा व मला ह्या संकटातून वाचवा.यापुढे मी आपली कधीही चेष्टा करणार नाही. मला एवढी जी शिक्षा झाली ती पुरे झाली. तुम्ही अनाथांचे वाली आहात तेव्हा मला माफ करा.” त्यावर महाराज म्हणाले, “उगीच खोटे बोलू नकोस ! तुझे चिंचवणे मधुर आहे. सगळ्यांनी चिंचवण्याच्या पातेल्यात बघितले तर सगळे किडे नाहीसे झाले होते. गावात सगळीकडं समर्थांच्या प्रभावाची गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. ज्याच्या त्याच्या तोंडी हीच गोष्ट होती. अहो केशर झाकून ठेवले तरी वास लपून राहतो का? चंदू मुकीन नावाचा समर्थांचा एक निस्सीम भक्त होता आता त्याची कथा ऐका , जेष्ठ महिना सुरू होता. समर्थांच्या भोवती भक्तांची गर्दी।जमली होती. सर्वांची नजर समर्थांच्या पायावर होती. आंबे कापणे , समर्थाना फोडी देणे , पंख्यानं वारा घालणे , खडीसाखर वाटणे , समर्थाना चंदन लावणे याप्रमाणं , जशी सुचेल तशी समर्थांची सेवा भक्त करत होते. तेवढ्यात समर्थ चंदूला म्हणाले , ” हे आंबे मला नकोत. जा तुझ्या उतरंडीला दोन कान्होले आहेत ते घेऊन ये.” चंदू महाराजांचे बोलणे ऐकून चकित झाला. म्हणाला , ” गुरुराया आत्ता कान्होले कुठून आणणार ? पाहिजे असतील तर नवे तळून आणतो.”
त्यावर महाराज म्हणाले , ” नवे आणायचं कारण नाही. मला तुझ्या उतरंडीचेच कान्होले हवेत. अरे आता कारणं सांगत बसून माझ्याशी खोटे बोलू नकोस!”
त्यावर लोक चंदूला म्हणाले, “अरे महाराज म्हणतायत तर जाऊन बघून तरी ये. त्यांचा शब्द कधी खोटा होणार नाही.”
चंदू घरी गेला आणि बायकोला विचारू लागला, “आपल्या उतरंडीला कान्होले आहेत का गं? बायको म्हणाली, “अहो, मी अक्षय्य तृतीयेला कान्हवले केले होते. त्याला आता महिना होऊन गेला आणि त्याच दिवशी ते संपले. आता कुठून येणार ? तुम्हाला हवेच असतील तर नवे करून देते. ही पहा, मी कढई चुलीवर ठेवते ! थोडं थांबा बघू. कान्होल्या साठी लागणारं सर्व सामान घरात तयार आहे. त्यासाठी बाजारात जायची आवश्यकता नाही.”चंदू म्हणाला, “अगं, नवे कान्होले नकोत उतरंडीला दोन ठेवले असतील तेच दे ! महाराजांनी जे सांगितलंय तेच मी तुला सांगतो ना?”
हे ऐकून चंदूची बायको गोंधळून गेली. कान्होल्या बद्दल परत परत आठवण करू लागली. अचानक तिला आठवण आली आणि म्हणाली, “होय हो, समर्थ सांगत आहेत तेच खरे आहे. दोन कान्होले उरले होते ते मी उतरंडीला ठेवले होते असं मला आठवतंय. पूर्ण महिन्याभरापासून मला त्याची आठवणच राहिली नव्हती. पण शक्यतो आता ते खाण्याच्या योग्यतेचे राहिले नसतील. कारण महिनाभर झाल्याने त्यांना आता बुरशी आली असेल.”
असं म्हणून ती लगेच उठली आणि उतरंडी हुडकू लागली. तिनं खापराच्या आत कान्होले ठेवले होते. त्यात पाहता तिला तळाशी असलेले , थोडेसे सुकलेले दोन कान्होले दिसले. पण त्याला बुरशी वगैरे काही आलेली नव्हती, संतवाणी कधी खोटी होईल काय? समर्थांच्या बोलण्याचे उभय पती पत्नीना मोठे आश्चर्य वाटले. चंदू कान्होले घेऊन महाराज बसले होते तिथ आला. लोकांनी ते पाहून तोंडात बोटे घातली. ते म्हणाले महाराज त्रिकालज्ञ असून महासमर्थ, सिद्धयोगी पण आहेत. रामाने शबरीची बोरे ज्या प्रेमाने खाल्ली असतील त्याच प्रेमाने महाराजांनी चंदूने आणलेले कान्होले खाल्ले. शेगावच्या दक्षिणेला चिंचोली गावामध्ये माधव नावाचा एक ब्राह्मण रहात होता. सर्व अवयव क्षीण झालेल्या माधवाचे वय साठाच्या पुढे होते. तरुणपणी त्याचे संसार हेच परब्रह्म होते, पण प्रारब्धाच्यापुढं कुणाचा जोर चालतोय? जे ब्रह्मदेवानं नशिबात लिहिलं तेच घडणार! माधवाची पत्नी, मुलं मरून गेली. साहाजिकच तो संसाराला विटला होता, जी काही संपत्ती होती ती त्यानं विकून खाल्ली. आता आपलं कसं होणार, या चितेनं त्याला ग्रासलं होतं. कारण संसार करताना आपल्याच मस्तीत असल्याने त्याला कधी देव आठवला नाही. मग आता माझा वाली कोण ? हे दीनदयाळा, दिनबंधु आता तुझ्याशिवाय माझं कोण ऐकणार? असं मनात धरून अनुताप झालेला माधव महाराजांच्या दाराशी हट्ट धरून बसला.
तोंडाने अखंड नारायणाचा जप करत, अन्नपाण्याचा त्याग करून त्यानं उपोषण आरंभलं. असाच एक दिवस गेला तेव्हा महाराज म्हणाले , ” अरे हे काही बरोबर नाही. करायचं तेव्हा नामस्मरण केलं नाहीस. प्राण जायची वेळ आली म्हंटल्यावर वैद्य बोलावल्यासारखं झालं हे ! तरुणपणी ब्रह्मचारी राहून म्हातारपणी लग्न करून काय उपयोग ? साधन सुध्दा वेळच्या वेळी करावं लागतं. आग लागल्यावर कुणी विहीर खणतं का ? ज्या कन्या पुत्रांसाठी तू एवढी धडपड केलीस ते शेवटी सोडूनच गेले ना तुला !
जे कायम टिकणारे नाही त्याच्या मागं लागून जे नित्य टिकणारे आहे त्याच्याकडं तू दुर्लक्ष केलंस. आता तुला त्याची फळं भोगावी लागेलं. माधवांनं निमूटपणे सर्व ऐकून घेतलं. पण आपला हट्ट काही सोडला नाही. त्याला जेवायला घालण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी शेगावचे कुलकर्णी येऊन, उपाशी राहू नका अशी विनंती करू लागले. पण त्यांचेही म्हणणे त्याला पटले नाही. तो तसाच उपाशी राहून समर्थांच्या जवळ नामस्मरण करत बसला. दोन प्रहर रात्र झाली. सगळीकडं अंधार दाटून आला. रातकिड्यांची किरकिर ऐकू येऊ लागली. जवळपास कोणी नाही हे पाहून समर्थांनी काय कौतुक केले ते पहा !
यमराजासारखे भयानक रूप धारण करून ते माधवाला खाऊन टाकायच्या निमित्ताने त्याच्या अंगावर धावून गेले. त्यांचा तो भयानक अवतार पाहून माधव घाबरला आणि जीव घेऊन पळून गेला. त्याच्या चित्तात धडकी भरून छाती धडधडू लागली ! त्याचा हा अवतार पाहून समर्थांनी सौम्य रूप धारण केले आणि गर्जून म्हणाले, “अरे! हाच का तुझा धीटपणा? लक्षात ठेव, काळ असाच एक दिवस तुला खाऊन टाकेल कारण कधी ना कधी तू काळाचे भक्ष्य होणार आहेस ! आत्ता तुला फक्त त्याची चुणूक दाखवली. त्यावेळेस तुला यमलोकात पळायला जागा सुद्धा राहणार नाही हे लक्षात ठेव !”
माधवाने ते ऐकले आणि नम्रपणे म्हणाला, “महाराज यमलोकीची गोष्ट तेवढी काढू नका. आता हे जीवन पुरे झाले. मला वैकुंठीच पाठवा अशी माझी शेवटची विनंती आहे. यमलोकात काय घडणार होतं ते तुम्ही इथं दाखवलं आहे, तेव्हा आता या लेकराला यमलोकात धाडू नका. माझ्या पापाची फळे खूप आहेत हे मला माहीत आहे पण त्याला नष्ट करणे तुम्हाला अवघड आहे का ? माझी काही पूर्वपूण्याई असेल , त्यामुळे तुमचे चरण दृष्टीस पडले आणि ज्याने संत चरण बघितले त्याला यमलोक कसा मिळेल?”
महापतिताना पावन साधूंच करतात. माधवाचे बोलणे ऐकून महाराज हसले आणि म्हणाले , ” असंच नारायणाचं नाव घेत भजन कर ! तुझा अंतकाळ आता जवळ आला आहे , तेव्हा गाफील राहू नकोस. आता तुला अजून जगायची इच्छा आहे का ? तसं असेल तर मग तुझ्या आयुष्यात मी वाढ करीन.”
माधव म्हणाला, “नको नको ! ही प्रपंचमाया खोटी आहे. आता मला पुन्हा त्यात गोवू नका.”त्यावर महाराज म्हणाले, “तथास्तु ! तू मागतोस ते मी तुला दिलं. आता तुला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही.”
महाराज आणि माधव यांच्यात वरील आशयाचा गुप्त संवाद झाला. माधवाचे देहभान सुटत चालले. लोकांना वाटले उपासाने याचे डोके फिरले असावे म्हणून हा वेड्यासारखा वागतोय. असो. माधवाचे देहावसान समर्थांचे समोर झाले. अशा रीतीने समर्थ कृपेनं त्याचं जन्ममरण चुकलं एक दिवशी असंच शिष्यांच्या समवेत बसले असताना समर्थांनी एक इच्छा व्यक्त केली ते म्हणाले, “वैदिक ब्राह्मण बोलवा. त्यांनी म्हंटलेले मंत्र ऐकून देव अतिशय आनंदित होतील. पन्हे, पेढे, खव्याची बर्फी आणा. डाळ भिजवून थोडंसं मीठ लावा. घनपाठी ब्राह्मणांना एक एक रुपया दक्षिणा द्या.” शिष्यांनी महाराजांची इच्छा ओळखली, पण एक मोठी अडचण त्यांच्या लक्षात आली आणि ते विनयाने महाराजांना म्हणाले, “आपल्या शेगावात असे ब्राह्मण आता उरले नाहीत. खर्चाची काही अडचण नाही. तुम्ही सांगता ते सर्व करू. पण ब्राह्मण कुठून आणायचा हीच खरी अडचण आहे.”
त्यावर महाराज म्हणाले, “तुम्ही तयारी तर सुरु करा, श्रीहरी तुमच्या पूजेसाठी ब्राह्मण पाठवेल” महाराजांनी असं म्हंटल्यावर सगळ्यांच्यात उत्साह संचारला. हा हा म्हणता तयारी सुरू झाली. लोकांनी वर्गणी काढली. बघता बघता शंभर रुपये जमा झाले. सर्व सामान आणलं. केशर मिश्रित चंदनाच उटणं कालवलं, कापूरही आणला. अशातच दुपार झाली आणि अचानक पदक्रम जटेला जाणणारे ब्राम्हण गावात आले. थाटात वसंतपूजा झाली. ब्राह्मणांना आनंद झाला. दक्षिणा घेऊन ते दुसऱ्या गावाला रवाना झाले. बंकटलाल पुढे अतिशय आनंदाने हे व्रत दरवर्षी करत असत. आज त्यांचे वंशज हे व्रत करतात.
संत कवि दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचा हा चौथा अध्याय येथे सुफळ संपूर्ण झाला.
ह्या अध्यायाच्या श्रवणाने आपल्या मानसिक व्यथा व चिंता दूर होईल व “श्री” ची कृपा आपणास अवश्य होईल.