श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित प्रथम अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.

“श्री गजानन विजय  ग्रंथ”

अध्याय पहिला

॥ श्रीगणेशाय नमः ॥

                श्री दासगणु महाराज ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी अनेक देवी देवतांचे स्तवन करत आहेत. ते म्हणतात, ” हे उदारकीर्ती, प्रतापज्योती, गौरीपुत्रा मयूरेश्वरा, गणपती महाराज तुमचा विजय असो. मोठमोठे विद्वान, साधुसंत, सत्पुरुष कार्यारंभी तुमचे स्मरण करतात. कारण तुमच्या कृपेच्या अगाध शक्तिने सर्व विघ्ने भस्म होतात. सहाजिकच आहे, अग्निपुढे कापसाचा काय पाड लागणार ? म्हणून मी आदराने तुमच्या पाया पडतो. माझ्याकडून सुरस पद्यरचना करून घ्या. मी अज्ञानी आणि मंदमती असून काव्यरचना कशी करावी ते मला माहीत नाही. परंतु तुम्ही माझ्या चित्तात वास केलात तर माझ्या हातून हे कार्य सहजच सुगम होईल.”

                ते पुढे सरस्वतीमातेला वंदन करताना दासगणु महाराज म्हणतात , ” हे ब्रह्मकुमारी शारदे तू आदिमाया सरस्वती ब्रह्माची प्रकृती असून कविवरांची ध्येयमूर्ती आहेस. तुला माझा साष्टांग नमस्कार असो. मी अजाण लेकरु आहे म्हणून माझा अभिमान तुझ्या पायाशी धर. तुझ्या कृपेची थोरी अगाध व अनंत आहे , त्यामुळे लुळा पांगळाही पर्वत चढू शकतो व मुकाही सभेत व्याख्यान देऊ शकतो. तेव्हा तुझ्या कीर्तीला कमीपणा न येण्यासाठी दासगणूला ग्रंथरचनेस सहाय्य कर.”

                श्री दासगणु महाराज पांडुरंगाला विनंती करत आहेत की, ” हे पुराणपुरुषा, पांडुरंगा पंढरीशा, सच्चिदानंदा रमेशा दिनबंधो माझ्यावर कृपा कर. तूं सर्वसाक्षी जगदाधार असून सर्व व्यापक आणि कर्ता करविता सर्वेश्वर आहेस. जग, जन आणि जनार्दन असा तूंच एक परिपूर्ण आहेस. मायबापा सगुण आणि निर्गुण तूंच आहेस. पुरूषोत्तमा तुझा असा हा अगाध महिमा निगमागमाला कळत नाही तेथे या गणूचा काय पाड लागणार ?

रामकृपा झाल्यावरच माकडांना शक्ति आली किवा यमुनातीरी गोपही कृष्णकृपेनं बलवान झाले. तुझी कृपा व्हायला धनाची गरज नाही. तुला अनन्य शरण गेलं की, तू साह्य करतोसच असा संतांनी तुझा डांगोरा पिटलाय म्हणून तुझ्या दारी आलोय. तेव्हा आता विन्मुख माघारी लावू नकोस. हे संतचरित्र रचायला पंढरीराया मला सहाय्य कर. माझ्या चित्तात वास करून ग्रंथ कळसाला पोचव.
                महादेवांचं स्मरण करून दासगणुमहाराज म्हणतात, ” हे भवभवान्तक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा, ओंकाररुपा त्र्यंबकेश्वरा, तुमचा वरदहस्त माझ्या डोक्यावर ठेवा. तुमचे साह्य असल्यावर काळाचीही भीती नाही. लोखंडाला सोनं करणाऱ्या परिसासारखी तुमची कृपा होय. तेव्हा तुमच्या कृपेने माझं सोनं करून टाका. आता मला परत लोटू नका. तुम्हाला काय अशक्य आहे ? सगळंच तर तुमच्या हातात आहे, तेव्हा या लेकरासाठी धाव घ्या आणि माझ्याकडून सुगम ग्रंथ रचना करून घ्या.” कुलदेवतेचं स्मरण करताना दासगणुमहाराज म्हणतात , “कोल्हापुरवासिनी जगन्माता ही माझ्या कुळाची कुलदेवता आहे. सर्वमंगल होण्यासाठी मी तिच्या पायावर डोकं ठेवतो.” असं म्हणून ते देवीची प्रार्थना करताना म्हणतात , ” हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी, तुझा वरदहस्त या दासगणूच्या शिरावर ठेव.”

आता इतर देवतांचे स्तवन करताना दासगणुमहाराज म्हणतात, ” हे दत्तात्रया मी तुला वंदन करतो. माझ्यावर लवकर प्रसन्न व्हा आणि गजानन चरित्र गायला स्फूर्तिरूपी प्रसाद द्या.”
                सर्व ऋषीवराना नमन करताना ते म्हणतात, ” शांडिल्यादि ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पराशर, ज्ञाननभी जो दिनकर त्या शंकराचार्यांना नमन असो.”

                अवघ्या संतमहंताना नमन करून अतिशय भक्तिभावाने सर्व संतांची आठवण ते काढतात व म्हणतात, “दासगणूचा हात धरुन ग्रंथ लेखन करून घ्या. गहिनी निवृत्ति ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर, श्री रामदासा तुम्हाला नमन असो. हे शिर्डिकर साई समर्था, वामनशास्त्री पुण्यवंता, दासगणूला अभय असो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे बोलणे करीन. मी तुमचे तान्हे मूल असल्याने मज विषयी कठोर होऊ नका. तुमची माझ्यावरील मायाच मला बोलायला शिकवते. तुमचे माझे नाते मायलेकासारखे आहे. माझ्या लेखणीतून अक्षरे उमटतात खरी पण तिच्यात जोर नसल्याने ती केवळ निमित्त होय. तेव्हा या दासगणुला लेखणी म्हणून हाताशी धरा आणि रसभरीत ग्रंथरचना करवून घ्या अशी माझी तुमच्या पायाशी प्रार्थना आहे.”

                आता श्रोत्यांची विनवणी करताना म्हणतात , ” स्वकल्याण होण्यासाठी सावध होऊन , एकाग्र चित्तानं संतकथेचं श्रवण करा. संत हेच भूमीवरील चालते बोलते परमेश्वर असून , वैराग्याचे सागर व मोक्षपदाचे दाते आहेत. संत हेच सन्नीतीची प्रत्यक्ष मुर्ती असून कल्याणाची भव्य पेठ आहेत. तेव्हा हे संतचरित्र सावकाश श्रवण करा. आजवर या संतांनी कुणालाही दगा दिलेला नाही. ते ईश्वरी तत्त्वांचे वाटाडे असून, अमोघ ज्ञानाचे गाडे आहेत. अशा संतांच्या चरणी ज्यांची नजर असेल त्यांचा प्रत्यक्ष रुक्मिणीकांत ऋणी असतो. म्हणून चित्त शुद्ध करून श्री गजाननचरित्र ऐका.”

                आता ते गजानन महाराजांचे महात्म्य सांगणार आहेत. ते म्हणतात , ” भरत खंडात आजवर खूप संत झाले. इतर देशात अशी पर्वणी आलेली दिसत नाही. जंबुद्वीप हे धन्यच म्हणायला पाहिजे. इथं संत चरणांची धूळ अनादि काळापासून लागत आली असल्याने इथं कोणत्याच सुखाची वाण नाही.

                नारद, ध्रुव, कयाधूकुमर , उद्धव, सुदामा, सुभद्रावर , महाबली अंजनीकुमर , अजातशत्रू धर्मराजा , शंकराचार्य जगद्गुरु असे शरण आलेल्याला कल्पतरु असणारे अध्यात्म विद्येचे महामेरू याच देशात झाले आहेत. मध्व-वल्लभ-रामानुज , नरसी मेहता तुलसीदास , कबीर कमाल सुरदास गौरंग-प्रभू , भक्तीस तोड नसलेली राजकन्या मिराबाई , गोरख-मच्छेंद्र जालंदर , ज्यांनीं नुसती हरिभक्ति करुन श्रीपती मिळवला ते नामा नरहरी सन्मति , जनी कान्हो संतसखू , चोखा , सावता कूर्मदास , दामाजीपंत पुण्यपुरुष , मुकुंदराज जनार्दन , बोधला निपट निरंजन , अशा अनेक सतांची चरित्रे पूर्वी महिपतींनी सांगितली आहेत म्हणून त्या सर्वांची नावे मी येथे देत नाही. नुसते सांगतो की , भक्तिविजय आणि भक्तमाला हे ग्रंथ वाचा. त्यानंतर जे जे झाले त्या सर्व संतांचे चरित्र मी तीन ग्रंथात मांडले आहे ते पहा म्हणजे कळेल. त्यांच्या तोडीचे असलेले अवतारी पुरुष संत श्रीगजानन यांचा प्रभाव खचित लोकोत्तर आहे. वरील तीन ग्रंथातून सांगितलेली संत चरित्रे श्रोतेहो मी सारांश रूपाने सांगितली आहेत. आता हे सांगोपांग चरित्र सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका.

                माझ्या सुदैवाने हे चरित्र रचण्याचा योग आलेला आहे अकोटाजवळ जे प्रथम संत मी बघितले होते तेच मागे राहिले. त्याचं कारण असं की , आधी माळ ओवतात आणि मग मेरुमणी जोडतात तशीच काहीशी स्थिती हे चरित्र रचताना झाली आहे. वऱ्हाडातील खामगाव तालुक्यातील शेगाव हे व्यापारी पेठेचे गाव होते. गाव जरी लहान असले , तरी गजानन महाराजांच्यामुळे त्याची कीर्ती जगभर पसरली आहे.

                श्री गजानन महाराजाना श्री रामदास स्वामींचा अवतार मानतात. ऐन तारुण्यात शके अठराशे मध्ये माघ वद्य सप्तमीला ते शेगावात प्रकट झाले. त्यादिवशी मठाधिपती देवीदासांच्या घरी त्यांच्या मुलाची ऋतुशांती होती. त्यानिमित्ताने मोठी जेवणावळ चालू होती. पंक्तीमागून पंक्ती उठत होत्या. एक पंगत संपली की , लगेच उष्ट्या पत्रावळी उकिरड्यावर टाकल्या जात होत्या. अशा उष्ट्या पत्रावळींचा मोठा ढिगच तिथं जमला होता !

                बंकटलाल अग्रवाल दामोदरपंत कुलकर्णी या मित्रासोबत तेथून निघाले होते. त्यांनी पाहिले की , एक साधू त्या उष्ट्या पत्रावळींच्या ढिगाजवळ बसून एक एक शीत वेचून खात आहे. जणू काही त्यांना सुचवायचे आहे की , ” अन्न हे परब्रह्म असून त्याची नासाडी करू नका.”

                हे साधू दुसरे तिसरे कोणी नसून गजानन समर्थ सिद्धयोगी होते. त्यांची ही कृती पाहून दोघे मित्र चकित झाले व बारकाईने त्यांचे निरीक्षण करू लागले. अंगात एक जुन्या पुराण्या कापडाची बंडी , पाणी प्यायला एक भोपळा आणि हातात कच्च्या मातीची चिलीम असा त्यांचा वेष होता. वेष अगदी साधा असला , तरी चेहरा मात्र नुकत्याच उगवणाऱ्या सुर्यासारखा तेज्जपुंज होता. सरळ नाक, शांत मुद्रा अंगावर तपाचे सामर्थ्य असं त्याचं वर्णन करता येईल. कोणताही अपपर भाव नसलेली , कसलीही आवड निवड नसलेली दिगंबर मूर्ती होती ती !

                घडलेला प्रकार पाहून बंकटलाल व दामोदरपंत दोघेही आश्चर्यचकीत झाले. एकमेकाला म्हणाले , ” याची करणी अगदी विपरितच दिसतीये. याला भूक लागलीये म्हणावं तर यानं स्वतः पात्र मागून घेतलं असतं. बरं , सज्जन देविदास ही याला नाही म्हणणं शक्य नाही , कारण दारी आलेल्या याचकाला तो कशाला परत पाठवेल ? पण शीतं वेचण्याच्या याच्या कृतीवरून काहीच तर्क चालत नाहीये.”

                आता गंमत बघा , रस्त्याने अनेक लोक जात येत होते , पण त्या योगिराजांकडे लक्ष या दोघांचेच गेले. जसे पारखी माणूस गारांच्या ढिगातून बरोब्बर हिरा उचलून घेतो ! बंकटलाल पुढे आले. त्यांनी विनयाने विचारले, “महाराज , आपण या पत्रावळीत काय हुडकत आहात ? भूक लागली आहे का ? तसे असेल तर पान वाढून आणतो.” हे ऐकून महाराजांनी मान वर करून बघितले. तो त्यांना महाराजांची सतेज कांती, पिळदार शरीर, सरळ नाक, स्थिर दृष्टी असलेली आणि निजानंदी रंगलेली मूर्ती दृष्टीस पडली. अतिशय संतोषाने बंकटलालांनी त्यांना मनोमन नमस्कार केला.

                तेवढ्यात देवीदासांनी पक्वानांनी भरलेले पात्र स्वामींच्या पुढे आणून ठेवले. स्वामी जेवायला बसले खरे पण त्यांना चविढवीचे काहीच कौतुक नव्हते. खरंच आहे, अनुपम अशा ब्रह्मरसाला ज्यानं चाखलंय त्याला गुळवण्याची कसली चव ? सम्राटाला जहागिरीचं काय कौतुक? महाराजांनी काय केलं ? तर ताटातले सर्व पदार्थ एकत्र केले आणि ते खाऊन त्यांची भूक भागवली. बंकटलाल हे सगळं पहात होते. ते त्यांच्या मित्राला म्हणाले , ” आपण याला वेडा समजलो पण ती आपली चूकच झाली. सुभद्रेसाठी अर्जुन असाच वेडा होऊन भलतंसलतं करत होता. तसंच मुक्तीरुप सुभद्रेसाठी हा असं वागतोय ! निरिच्छा हे वरदान लाभलेल्या योग्याचं आपल्या गावात आगमन झालंंय.शेगाव धन्य झालंय ! कडक ऊन पडल्याने चांगल्याच तापलेल्या जमीनिवर हा योगिराणा अतिशय आनंदात बसलाय. ब्रम्ह ब्रम्ह म्हणतात ते हेच ! हा यथेच्छ जेवलाय. आता याला पाण्याची गरज असणार आणि याचा तुंबा तर मोकळा दिसतोय. आपण यांना पाणी आणून देऊ.”

                दामोदरांनी पुढे होऊन विचारले, “तुंब्यात पाणी दिसत नाही. आणून देऊ का ?” त्यावर समर्थ त्यांच्याकडं पाहून हसले आणि म्हणाले,” तुला वाटत असेल तर घेऊन ये. पण एक लक्षात ठेव ! जगात एकच ब्रह्म सर्वत्र भरलेलं आहे , पण व्यवहार तर पाळला पाहिजे. खाल्लेलं अन्न पचवायला पाणी प्यायलं पाहिजे. जे चतुर असतात ते व्यवहार बरोबर पाळतात. तेव्हा व्यवहाराचा भाग म्हणून पाणी घेऊन ये , म्हणजे विषय संपला !”

                महाराजांचे बोल ऐकून बंकटलाल व दामोदरपंत अतिशय आनंदी झाले. बंकटलाल दामोदरपंताना म्हणाले , ” पंत आपण फार भाग्यवान आहोत.”

मग पंत पाणी आणण्यासाठी शेजारच्या घरी गेले. तेवढ्यात काय झालं , तिथं जवळच असलेल्या एक ओहोळावर जनावरे पाणी पीत होती. महाराज तिथं गेले आणि तिथलं पाणी पिऊन आले.
        पाणी घेऊन येणाऱ्या पंतांनी ते बघितले आणि म्हणाले, ” महाराज, थांबा. ते गढूळ पाणी जनावरं पितात. तुम्ही पिऊ नका. तुमच्यासाठी मी निर्मळ, गोड, थंड, वाळा घातलेले सुवासिक पाणी आणले आहे.”
        पंतांचे बोलणे ऐकून महाराज म्हणाले, ” अरे ते गढूळ, शुद्ध असलं व्यवहारिक मला काही सांगू नकोस. कारण हे सगळं चराचर ब्रह्मव्याप्त असल्याने मला तर सगळं सारखंच वाटतं !” श्रीमहाराजांची ब्रह्मावस्था अत्यंत उच्च कोटीची असल्याने ते पुढं म्हणाले , “अरे, निर्मळ, गढूळ, सुवासिक, कुवासिक हे पाण्याचे प्रकार आणि ते पिणारा, ही सगळी त्याचीच रूपे आहेत. ही त्याची लीला माणसाचा जन्म मिळाल्याशिवाय कळत नाही. पण काय आहे, माणसाला या कशात स्वारस्य नाही. त्यामुळे हे सगळं टाकून तो आपला व्यवहार संभाळत बसलेला असतो. पण तुम्ही तसं न करता जग कुणापासून निर्माण झाले याचं मनन करा !”

        महाराजांचे बोल ऐकून बंकटलाल व दामोदरपंत अतिशय आनंदी झाले. बंकटलाल दामोदरपंताना म्हणाले , ” पंत आपण फार भाग्यवान आहोत.”
        मग पंत पाणी आणण्यासाठी शेजारच्या घरी गेले. तेवढ्यात काय झालं , तिथं जवळच असलेल्या एक ओहोळावर जनावरे पाणी पीत होती. महाराज तिथं गेले आणि तिथलं पाणी पिऊन आले.
        पाणी घेऊन येणाऱ्या पंतांनी ते बघितले आणि म्हणाले , ” महाराज , थांबा. ते गढूळ पाणी जनावरं पितात. तुम्ही पिऊ नका . तुमच्यासाठी मी निर्मळ , गोड , थंड , वाळा घातलेले सुवासिक पाणी आणले आहे.”
        पंतांचे बोलणे ऐकून महाराज म्हणाले , ” अरे ते गढूळ , शुद्ध असलं व्यवहारिक मला काही सांगू नकोस. कारण हे सगळं चराचर ब्रह्मव्याप्त असल्याने मला तर सगळं सारखंच वाटतं ! ” श्रीमहाराजांची ब्रह्मावस्था अत्यंत उच्च कोटीची असल्याने ते पुढं म्हणाले , “अरे , निर्मळ , गढूळ , सुवासिक , कुवासिक हे पाण्याचे प्रकार आणि ते पिणारा , ही सगळी त्याचीच रूपे आहेत. ही त्याची लीला माणसाचा जन्म मिळाल्याशिवाय कळत नाही. पण काय आहे , माणसाला या कशात स्वारस्य नाही. त्यामुळे हे सगळं टाकून तो आपला व्यवहार संभाळत बसलेला असतो. पण तुम्ही तसं न करता जग कुणापासून निर्माण झाले याचं मनन करा ! “
        महाराजांचे हे विचार ऐकून आणि त्यातलं मर्म समजून दोघं गहिवरली. आता समर्थांना शरण जावं आणि त्यांच्या पायावर लोळण घ्यावी असं त्यांनी ठरवलं !
        त्यांचा हा विचार महाराजांच्या लगेच लक्षात आला आणि त्यांनी तेथून वायूवेगाने पळ काढला. या दोघांनी त्यांचा पाठलाग करायचा खूप प्रयत्न केला पण महाराज काही त्यांना सापडले नाहीत !
        श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचा हा प्रथम अध्याय येथे सुफळ संपूर्ण होत असून ह्या अध्यायाच्या श्रवणाने सर्वच भक्तांचे मनोरथ पूर्ण होतील व त्यांच्या घरात सुख , समृद्धी व आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

- अनुवादक: श्री वामन रुपरावजी वानरे.

मो.09826685695