श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित सहावा अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.
“श्री गजानन विजय ग्रंथ”
अध्याय सहावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥
सहाव्या अध्यायाची सुरवात करताना दासगणु महाराज म्हणतात, “हे परम मंगल कृपाळा, दयाघना, श्रीहरि, तुमची कृपा झाल्यावर सगळ्या अशुभ गोष्टी दूर होतात असा संतांचा अनुभव आहे. संतांच्या त्या बोलावर विश्वास ठेवून परममंगलाची आशा करून मी तुमच्या द्वारी आलो आहे व आता जर तूम्ही मला विन्मुख पाठवून दिलं तर तुमचाच कमीपणा होईल व संतवाणीलाही बट्टा लागेल. म्हणून मला कायम जवळ करावे. आपल्या लेकराचा कधीही राग करू नका. आणखी एक म्हणायचं आहे कि आपल्या बाळात जे काही कमी आहे ते आपण आई समजून दुर्लक्ष करा.
अशी श्री हरिची प्रार्थना करून दासगणु महाराज पुढील गजानन महाराजांच्या लीलांचं वर्णन करीत आहेत.
बंकटलालांच्या घरी श्री समर्थ असताना एक नवीन गोष्ट घडली. गावच्या दक्षिणेला असलेल्या बंकटलालांच्या मळ्यात श्री बँकटलालानी महाराजाना मक्याची कणसे खाण्याचे निमंत्रण दिले. ते श्री गजानन महाराजाना मक्याची कणसे खायला सोबत आपल्या मळ्यात घेऊन गेले. बरोबर पुष्कळ मंडळी सोबत होती. विहिरीजवळ कणसे भाजण्याची तयारी केली होती. विहिरीच्या सभोवताल दाट सावली देणारी, चिंचेची मोठमोठी झाडं होती. विहिरीला अपरंपार पाणी होते. कणसे भाजण्यासाठी अंदाजे दहा बारा शेकोट्या पेटवल्या होत्या. धुराचा डोंब उसळून आकाशाला भिडला होता. त्या धुरामुळे चिंचेच्या झाडावर मधमाशांचे जाळे होते. धुरांच्या त्रासामुळे ते आग्यामोहोळ अचानक उठलं. त्या माशांना बघून तेथील मक्याची कणसं तिथंच सोडून , सगळी माणसे पळून गेलीत. त्या आग्या मोहोळाच्या माशा मळ्यात सर्वदूर पसरल्या. त्यांचा अंदाज घेऊन काहीजण घोंगडं बुरख्यासारखं पांघरून पळून गेले. माणसाला प्राणाएवढं प्रिय काहीच नाही पण समर्थ मात्र पळून न जाता तेथेच बसून मनात माशांचा विचार करत राहिले. ते स्वतः परमेश्वराचा अवतार असल्याने माशा , मोहोळ आणि कणसं ही सर्व त्यांचीच रूपं आहेत हे ते जाणून होते. ह्या सर्वांबद्दल विचार करत असताना त्या आनंदात महाराज निमग्न होऊन डोलू लागले. तोपर्यंत त्यांच्या अंगावर असंख्य माशा जमा झाल्यात. जणू काही त्यांनी माशांच पांघरूणच घातलं होत असं वाटत होतं. अशा ब्रह्मनिष्ठाची योग्यता काय वर्णावी ? समर्थांना माशा एकसारख्या चावतच होत्या. त्यांचे असंख्य काटे त्यांच्या शरीरात रुतून बसले होते पण महाराजांनी त्याची अजिबात पर्वा केली नाही. असाच एक प्रहर निघून गेला सगळे भक्त चिंताग्रस्त झाले बंकटलालांचं अंतःकरण मात्र दुःखानं व्याकुळ झालं होतं, ते मनात म्हणाले की, ” मला कुठून बुद्धी झाली ही ! मक्याची कणसं खायला इतर मंडळीसह समर्थांना येथे घेऊन आलो. समर्थांना इजा व्हायला मीच कारणीभुत झालो. हे काय माझं शिष्यपण ? काय हे माझं दुर्दैव !” असे मनात आल्याबरोबर बंकटलालनी पुढे येण्याची तयारी केलीय हे जाणून समर्थांनी कौतुक केले. ते माशांना म्हणाले,
“हे जीवांनो ! येथून निघून तुमच्या मोहोळात जाऊन बसा. माझ्या बंकटासाठी तुम्ही कुणाला चावू नका.
इथं जमलेल्या मंडळीत माझ्यासाठी धावून येणारा बंकट हाच माझा निःसीम भक्त आहे.” महाराजांनी असं म्हणताच माशा मोहोळात जाऊन बसल्या. ही गोष्ट बंकटलालनी स्वतः पाहिली. बंकटलालांच्याकडे पाहून श्री गजानन महाराज हसून म्हणाले, “वा , आम्हाला माशांची खूप छान मेजवानी केली ?अरे ते विषारी जीव माझ्या अंगावर बसलेले पाहून लड्डूभक्त पळून गेले बघ. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव ती अशी की, संकट आल्यावर एक ईश्वर सोडून कुणीही मदत करत नाही. जिलबी पेढे बरफी खाऊन माशा आल्यावर पळून जाणारे सगळे निःसंशय स्वार्थी असतात बघ!” बंकटलाल महाराजांना काय म्हणायचंय ते समजले आणि त्यांनी आवाजात माधुर्य आणून विचारले, “महाराज माशांचे काटे काढायला सोनाराला बोलवू का? गुरुराया मी महापापी आहे. तुम्हाला त्रास द्यायला म्हणून मी इथं आणलं. तुम्हाला खूप माशा चावल्यात, अंगावर खूप गाठी उठल्यात, आता यावर काय उपाय करायचा ते तुम्हीच सांगा.”
बंकटलालाचे बोलणे ऐकून महाराज म्हणाले, ” अरे, यात काही विशेष नाही. चावणे हा तर माशांचा स्वभावच आहे. त्या माशीरुप सच्चिदानंदाला मी वेळीच ओळखल्यानं, मला मुळींच त्यांची बाधा होणार नाही. माशीही तोच आणि मी ही तोच मग पाण्यानेच पाण्याला दुखवितां येईल काय ?”
हे ब्रह्मज्ञान ऐकल्यावर बंकटलाल गप्प झाले आणि काटे काढण्यासाठी त्यांनी सोनाराना बोलवले. त्यानुसार सोनार चिमटे घेऊन आले आणि महाराजांच्या शरीरात माशांचे काटे कुठं आहेत ते शोधू लागले.
महाराज त्यांना म्हणाले, “ही कशाला नसती उठाठेव करता? तुमच्या डोळ्यांना काटे मुळीच दिसणार नाहीत. त्यामुळे ते काढण्यासाठी चिमट्याची काहीच गरज सुद्धा नाही. हे मी आत्ताच सिद्ध करून दाखवतो.”
असं म्हणून महाराजांनी शरीरात कुंभक केला व श्वास आतून रोखून धरला त्यामुळे आतून हवेचा दाब पडला व शरीरात रुतलेले काटे एकदम वर आलेत. हा चमत्कार पाहिल्यावर तेथील लोकं आश्चर्यचकित झाले. त्यांना स्वामींचा अधिकार कळून आला. नंतर भाजलेली कणसं खाल्ल्यावर सर्वच मंडळी सायंकाळी आपापल्या घरी गेली.
पुढें महाराज त्यांचे बंधूं श्रीनरसिंगजींना भेटायला अकोटाला गेले. हे नरसिंगजी कोतशाअल्लीचे शिष्य होते आणि आपल्या भक्तीच्या बळावर विठ्ठलाचा कंठमणी झाले होते. त्यांचे चरित्र दासगणु महाराजांनी भक्तलीलामृतात वर्णिले आहे.
हे आकोट गाव शेगांव पासून ईशान्येला अठरा कोसांवर आहे. शरण आलेल्याला कल्पतरुच असलेले श्रीगजानन महाराज आपल्या योग सामर्थ्याने प्रवासास निघाले. अकोटाजवळ एका निबिडशा अरण्यात नरसिंगजी कायम एकटेच रहात असत. ह्या आरण्यात निंब अश्वत्थ रातांजन असे मोठमोठे वृक्ष होते. त्यांना लतावेली वेढून बसल्या होत्या. जमिनीवर गवत वाढलेले होते तर वारुळात असंख्य सर्प रहात होते. अशा हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या अरण्यात नरसिंगजी रहात असत.
त्यांना भेटण्यासाठी गजानन महाराज तेथे आले. दोन सारख्या योग्यतेची माणसेच एकमेकांना भेटायला आतुर होत असतात. श्री गजानन महाराजांना पाहताक्षणीच नरसिंगजींचा आनंद गगनात मावेनासा झाला.तसं पाहिलं तर दोघेही देवाचेच अवतार ! एक हरि तर एक हर, एक राम तर दुसरा कृष्ण, एक वसिष्ठ तर एक पराशर, एक जान्हवीचा काठ तर एक गोदावरीचा, एक कोहिनुर तर दुसरा कौस्तुभ, एक वैनतेय तर दुसरा अंजनी कुवर असे ते दोघे एकमेकांना भेटले. दोघानाही सारखाच आनंद झाला. आपापले अनुभव एकमेकांना सांगत दोघेही एकाच आसनावर हितगुज करत बसलेे. श्री गजानन महाराज म्हणाले, “नरसिंगा, तू प्रपंचांत राहिलास ते चांगले केलेस. मी त्याचा त्याग करून योगाचा स्वीकार केला आणि सच्चिदानंद तत्त्वाचा विचार करत बसलेला असतो. या योगाच्या क्रियेत सामान्यांना अंत न लागणाऱ्या अनेक अघटित गोष्टी घडत असतात. त्या गोष्टी लपवायसाठी मी मुद्दामच वेड्याचे सोंग घेत असतो. तत्त्व जाणण्याकरता कर्म, भक्ति, योग असे तीन मार्ग शास्त्रकारांनी सांगितले आहेत. जरी यांचे बाह्य स्वरूप भिन्न भिन्न असले तरी तिन्ही मार्गांचे शेवटचे फळ एकच असते.
योगी जर त्याच्या योगक्रियेचा अभिमान बाळगू लागला तर त्याला तत्वाचे खरे महत्व कळणार नाही. योगक्रिया केल्यावर कमळाचे पान जसे पाण्यापासून वेगळे राहते तसा योगी अलिप्त राहिला तरच त्याला त्यामागचं तत्व कळेल. नरसिंगा प्रपंचाची स्थिती अशीच आहे बरं ! कर्तव्य पार पाडल्यावर कन्यापुत्रांच्यामध्ये जीव गुंतवणे बरे नाही. असं बघ गार पाण्यांत राहते पण ती पाण्याला तिच्यात शिरून देत नाही. तेव्हा मनात सतत ईश्वराचं स्मरण ठेऊन गारेसारखंच संसारात रहायला हवं. मनाला ईश्वरापासून कधीही वेगळं करू नका. मन नेहमी अपेक्षारहित असावं म्हणजे कांहीच अशक्य नाही. तूं , मी आणि शेषशायी एकरुप आहोत. जन आणि जनार्दन कधीच वेगळे नसतात.
यावर नरसिंगजी म्हणाले , ” बंधुराया तू स्वतःहून मला भेटायला आलास ही तुझी केवढी दया ! याला उपमा नाही. प्रपंच मुळातच अशाश्वत असल्याने त्याची काय किंमत ? दुपारच्या सावलीला कोण खरं मानेल का ? तू जसं सांगितलंस तसंच मी वागेन. पण तू मात्र वरचेवर मला भेटत जा. देह-प्रारब्ध ज्याचं जसं असेल तसंच घडत जाणार आहे. ज्या कारणाने भगवंताने आपल्याला पाठवले आहे तेच निरालसपणे आपल्याला करायचं आहे. आतां एवढीच विनंती आहे की , मी तुझा धाकटा भाऊ आहे , तेव्हा मला वरच्यावर भेटायला यावे. भरत जसा नंदीग्रामात रघुपतीची वाट पहात होता तसाच मी या आकोटात तुझी वाट पहात राहीन. तुला इथं यायला अशक्य कांहीच नाही, कारण अवघ्या योगक्रिया तुला पहिल्यापासून अवगत आहेत. पाण्याला पाय न लावता योगी त्यावरून धावत जाऊन एका क्षणात अवघ्या त्रिभुवनात फिरून येतात, मग तुला इथं येणं काय कठीण ? असं दोघांचं हितगुज रात्रभर चालू होतं आणि मधून मधून दोघांना प्रेमाचं भरतं येत होतं. खऱ्या संतांच्या बाबतीत असंच घडतं. दांभिकांची मात्र एकमेकांसमोर आले की, भांडणंच होतात. ते नुसतेच पोटभरू असतात व म्हणूनच त्यांची गुरू होण्याची लायकी नसते. पुरात फुटक्या होडीचा काय उपयोग ? दांभिकाचा जरी जगात बोलबाला होत असला तरी त्याला खड्यासारखा बाजूला ठेवलं पाहिजे. संतत्व कधी मठांत, विद्वत्तेत, कवित्वांत नसतं तिथं स्वानुभवाची गरज असते. दांभिक हा मुलाम्याच्या सोन्यासारखा असतो. त्याचा काय उपयोग ? गृहिणी म्हणून कुणी वेश्या / कसबिन घरात ठेवतं का ? सन्निती आणि सदाचार ज्यांच्या घरी सदैव वास करतात अशी ही, दांभिकतेची वैरी असलेली साक्षात्कारी संतजोडी होती.
नरसिंगजी रहात असलेल्या अरण्यात त्यांना भेटायला गजानन महाराज आलेत ही बातमी गुरख्यांच्याकडून आकोटात सगळ्यांना समजली. ती कळल्यावर, गोदा आणि भागीरथी यांचा जणू संगमच अरण्यात झाला असं एकमेकांना सांगत, हातात नारळ घेऊन, दोघांच्याही दर्शनासाठी लोक धावले. अशा या प्रयागक्षेत्री स्नान करून ही महोदय पर्वणी साधावी हा एकच विचार प्रत्येकाच्या मनात होता. तिथं जाऊन पहातात तो काय, गजानन महाराज नरसिंगजींचा निरोप घेऊन आधीच निघून गेले होते.
असंच एकदां गजानन महाराज फिरत फिरत शिष्यांना घेऊन दर्यापुर जवळ आले. दर्यापूराच्या शेजारी , चंद्रभागेच्या तीरावर शिवरगाव होते. तेथे हे व्रजभूषण रहात असत. ही चंद्रभागा म्हणजे पंढरीची नव्हे तर पयोष्णी नदीला मिळणारी एक छोटीशी नदी होती. व्रजभूषणाना चार भाषा अवगत होत्या. त्यांच्या विद्वत्तेची कीर्ति सगळ्या वऱ्हाडात पसरली होती. असे हे व्रजभूषण भास्कराचे मोठे भक्त होते. रोज सकाळी चंद्रभागेवर स्नान करून सूर्य उगवल्याबरोबर त्याला ते अर्घ्य देत असत. भल्या पहाटे उठून थंड पाण्याने स्नान करीत असे. कर्मठ पण ज्ञानी असलेल्या व्रजभूषणांना विद्वतजनात मोठीच मान्यता होती. असं वाटतं की , त्यांच्या तपाचं फळ द्यायला म्हणूनच योगीराज फिरत फिरत शिवरगावला आले असणार. पहाटेच्यावेळी चंद्रभागेच्या वाळवंटात हे ज्ञानजेठी बसले होते. समोरच्या काठावर व्रजभूषण स्नानाला आले. ती सकाळची वेळ होती. दाही दिशा प्रकाशल्या होत्या. अधून मधून कोंबडयांचा कुहू कुहू आवाज येत होता. चातक भारद्वाज इत्यादी पक्षी जसे अत्यंत आदराने पूर्व दिशेकडे सूर्याला सामोरे जात असतात व सभेत पंडित आले की , मूर्ख जसे निघून जातात तसं सुर्योदय झाल्या झाल्या अंधार कोठे पळून जातो ते कळत नाही अशा या सुप्रभाती वाळवंटात गुरुमूर्ति निश्चिन्तपणे ब्रह्मानंदात डोलत बसली होती. त्यांच्याभोवती गोलाकार करून मोठा शिष्य समुदाय बसला होता. जणू गजानन व सूर्य देवाची किरणेच वाटत होती ती.
व्रजभूषण स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देऊन समोर पहातात तो पुढ्यात प्रत्यक्ष ज्ञानसविता बसलेला त्यांनी पहिला. सूर्याप्रमाणे सतेज कांति , अजानुबाहू , दृष्टि नाकासमोर स्थिर झालेली असा पुरुष समोर पाहिल्याक्षणी व्रजभूषणांना आनंद झाला. संध्येचं सामान घेऊनच ते त्यांच्याकडे धावले. पायावर अर्घ्य देऊन प्रदक्षिणा घातली. मित्राय नमः सूर्याय नमः भानवे नमः खगाय नमः विषणवे नमः अशी नावं घेऊन , बारा नमस्कार घातले. आदरानं आरती ओवाळली. काहीही कमी ठेवलं नाही. शेवटी प्रार्थनापूर्वक साष्टांग नमस्कार केला. मुखानं महाराजांचं स्तवन चालूच होते व म्हणाले, “आपल्या दिव्य चरणांचं दर्शन झालं, माझ्या तपाचरणाचं फळ आज मिळालं. मी धन्य झालो. आजवर नभोदरीच्या भास्कराला अर्घ्य देत होतो. आज ज्ञाननिधी योगेश्वर प्रत्यक्ष पाहिला. असं म्हणून त्यांनी त्यांची प्रार्थना केली,
हे पूर्णब्रह्म जगचालक ज्ञानराशी ।
ऐसे युगायुगीं किती अवतार घेसी ?
झाल्यास दर्शन तुझे भवरोगचिंता ।
नासे गजाननगुरो, मज पाव आता।
प्रार्थना संपल्यावर योगेश्वरांनी त्यांना दृढ आलिंगन दिले. आई जशी लेकराला प्रेमानं पोटाशी धरते तसं व्रजभूषणांना महाराजांनी पोटाशी धरलं. डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. म्हणाले, “बाळा व्रजभूषणा , सर्वदा तुझा जयजयकार होईल. कर्ममार्ग कधी सोडू नको. विधी निरर्थक मानूं नको. पण त्यात कधी अडकून पडू नको. जो कर्म करून फळाचा त्याग करतो त्यालाच घननीळ भेटतो गड्या. त्याला कधी कर्माची बाधा होत नाही. तू आता जेव्हा जेव्हा माझी आठवण काढशील तेव्हा तेव्हा तुला माझं दर्शन होईल. हे माझे बोल ध्यानात ठेव. असंं म्हणून श्रीफलाचा प्रसाद महाराजांनी व्रजभूषणांना दिला.
ह्या शेगांवाचे पूर्वी शिवगांव असे नाव होते. हळूहळू अपभ्रंश होऊन शेगाव झाले. सध्या तेच प्रचलित आहे. या गावाला सतरा पाटील होते. महाराज शेगांवला आले , पण एकाच ठिकाणी स्थिर न राहता मनाला येईल तसं सतत भटकत होते. आकोट अकोले मलकापूर अशी किती म्हणून गावांची नावे सांगावीत ? चांदण्यांची कधी गणना करता येते का ?
असाच ज्येष्ठ आषाढ महिना जाऊन श्रावण आला. मारुतीच्या देवळात उत्सव सुरू होता. शेगावातलं हे मारुतीचें मंदिर भव्य आहे. त्यातच थोर पाटील मंडळी मारुतीची भक्त होती. पेंडीतल्या गवताला आळा जसा एकत्र बांधून ठेवतो तसंच पाटलांनी गाव एकत्र बांधून ठेवलं होतं. साहाजिकच पाटलांना जे जे आवडायचं तेच गावातील मंडळी करायची. मारुतीच्या देवळातला उत्सव चांगला महिनाभर चालायचा. अभिषेक पोथी कीर्तन गजर सतत चालायचं. अन्नदानाला तर पूर येई. सगळे लोक अगदी तृप्त होत. या उत्सवाचे नेतेपण गावाचा कारभारी असलेल्या उदार खंडू पाटलाकडे होतं. अहो हे पाटीलकी म्हणजे वाघाचं पांघरुण ! जो घेईल त्याला सहजच लोक घाबरू लागतात.
पुण्यराशी गजानन महाराज श्रावण महिन्याच्या सुरवातीला “श्रीं” चा उत्सव पहायला म्हणून मारुतीच्या देवळात येऊन राहिले. येताना बंकटलालाना म्हणाले , ” मी येथून पुढे कायमचाच देवळात राहीन. ते ऐकून , ते तसे काहीच होणार नाही. तुम्ही कायम माझ्या घरीच राहीलं पाहिजे.” असा हट्ट बंकटलालनी सुरू केला. त्यांची समजूत काढताना महाराज म्हणाले, ” तू वाईट वाटून घेऊ नकोस. कारण गोसावी संन्यासी फकीर यांना प्रापंचिक घर कायमचं राहायला योग्य नसतं. मी परमहंस संन्यासी असल्याने मंदिरात राहील व तू जेव्हा बोलावशील तेव्हा येईन. हे अगदी माझ्या मनातलं तुला सांगतोय. स्वामी शंकराचार्य , गोसावी मच्छिंद्र आणि जालंदर हे सर्व कायमच प्रापंचिकाचे घर वगळून अरण्यात झाडाखाली रहात असत. दुष्ट यवनांना शासन करून हिंदूंचं रक्षण करणाऱ्या रणबहादूर छत्रपती शिवाजी महाराजांचं रामदास स्वामींवर फार प्रेम होतं. तरीसुद्धा स्वामी सज्जनगडावर राहिले होते. याचा विचार कर आणि मुळीच हट्ट करू नकोस. माझं ऐकण्यातच तुझं कल्याण आहे.” शेवटी कसाबसा बंकटलालनी महाराजांच्या म्हणण्याला रुकार दिला.
महाराज देवळात रहायला आले या गोष्टीचा सर्वांना आनंद झाला. भास्कर पाटील शुश्रूषेकरिता कायम जवळ असायचा.
हा गजानन विजय ग्रंथ मुमुक्षूजणांना संतचरण सेवेचा मार्ग कायम दाखवत राहील व लोकांना संताची महती आपल्या हृदयात आणून देईल हेच या अध्यायात सांगितले गेले आहे , तेव्हा आपण सर्वजण संतांचे चरणी दृढ होवून भक्ती मार्गाकडे वळू या. येथे श्री संत कवि दासगणू विरचित “श्री गजानन विजय” ग्रंथाचा सहावा अध्याय सुफळ संपूर्ण होत असून श्री गजानन महाराज स्वतः आपल्या भक्तांकरीता तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्वांकरीता स्वतः दुःख सोसून त्यांना सुख कसे मिळेल ह्या गोष्टींची अनुभूती करून देतात.ह्या अध्यायांच्या श्रवणाने तुमच्या आंतरिक यातना व कष्ट दूर होतील व तुमच्या जीवनाचा सुगमतेचा मार्ग मोकळा होईल.