श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित सोळावा अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.

“श्री गजानन विजय ग्रंथ”

अध्याय सोळावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

श्री गजानन विजय ग्रंथाचा सोळावा अध्यायामध्ये श्री संतकवी दासगणू महाराज श्री परशुराम ऋषीची  प्रार्थना करताना व म्हणतात, “हे जयजयाजी परशुधरा,  हे जमदग्नीच्या कुमारा, परशुरामा परमेश्वरा, माझी उपेक्षा करूं नका. तुम्ही सहस्त्रार्जुनाला दंडून द्विजांचें संरक्षण केलेत. तुम्हाला कधीही  ब्राह्मणांचा अपमान सहन झाला नाही. मग आता मात्र माझ्याविषयी का बरं डोळे मिटून बसलात? तुम्हाला एवढी गाढ निद्रा कशी काय लागली? आता माझ्यावर कृपा करा व डोळे मिटून स्वस्थ बसू नका. हे

 परमेश्वरा हा आणीबाणीची वेळ दिसते व काळ मोठा कठीण दिसतो आहे आहे. तेव्हा तुमच्या वशिल्यावांचून सर्व माझी सर्व कर्मे अधुरी राहतील व वाया जातील. तुमच्याशिवाय आर्यसंस्कृतीचे    रक्षण होणार नाही. श्री गजानन महाराजांची माया अघटित असल्याने ती कोण जाणणार?  महाराजांचे पुंडलिक नावाचे एक भक्त मुंडगावी राहत  होते. हे नेहमी शेगावची वारी करीत असे.त्यांची श्री गजानन महाराजावर खूप भक्ती व प्रेम होते. ते नेहमीच एकाग्र चित्ताने त्यांचे चिंतन करीत असत. त्याच गावी भागाबाई नावाची एक ठाकरीण होती. तिची कोठेही एका ठिकाणी निष्ठा बसत नव्हती. ती फार दांभिक स्वरूपाची होती.ती नेहमी दांभिक कृत्य करून लोकांना भ्रमित करीत असे. स्त्री, पुरुष ह्या दोघांचीही फसवणूक करण्यात तिला आनंद वाटत असे.

एक दिवस ती पुंडलिकाना म्हणाली, ” अरे पुंडलिका तू आतापर्यंत सदगुरु केला नाहीस तेव्हा काय उपयोग? तू गुरू केला नसल्याने तुझा जन्म वाया गेला. आता तू गजाननाच्या वार्‍या करून त्याला सद्गुरु मानतोस पण त्याने तुझ्या कानात कधी मंत्र फुकला का? अरे विधीवांचून कधी गुरु होत नाही. तू ज्याच्या माग फिरतोस तो शेगांवचा गजानन अगदी वेडा आहे. एक दिवस तुझा ताप काय बरा झाला म्हणून तू त्याला गुरू मानतोस?  पुंडलिका, या अशा वेडेपणास तू बळी पडू नकोस. ‘गण गण गणात बोते’ हे भजन म्हणणे, पिशापरी आचरण करणे, कोणाच्याही घरचे खाणे व कोठेही राहणे असा हा भ्रष्ट माणूस! म्हणून मी तुला सांगते, ” तू आता माझ्याबरोबर अंजनगावाला चल बरं ? तिथं केजाजीचा शिष्य आहे. त्याला आपण दोघे गुरु करू. उद्या त्यांचे अंजनगावंला  कीर्तन आहे ते ऐकायला आपण जावू. उद्या सकाळी लवकर उठ, आपण सकाळी अंजनगावला जाऊ. तुला अजून सांगते की गुरु असावा महाज्ञानी, चातुर्यशास्त्र जाणणारा, चिंतामणी, परमगुणी, भक्तीपथ  दाखविणारा  गुरु असावा. पण यातील एकही लक्षण गजाननाच्या अंगी नाही. म्हणून उशीर न करता अंजनगांवला चल.”  पुंडलिक भोकरे मनाचा उदार व भाविक होता पण भागीच्या भाषणाने त्याचे मन  अस्थिर झाले. त्याने विचार केला की, उद्या अंजनगावाला कीर्तन ऐकायला जाऊ किंवा नाही ते पुढे पाहू व विचार करू. असा विचार करून ते भागीला म्हणाले, “ठीक आहे मी उद्या येईल तुझ्याबरोबर अंजनगावला!”  असं त्या भागीबाईला सांगून त्या रात्री पुंडलिक आरामात झोपी गेला. तो रात्रीच्या तिसऱ्या प्रहरला त्यांना स्वप्न पडले. स्वप्नात पुंडलिकाच्या समोर एक आजानुबाहु मनुष्य उभा राहून म्हणाला, “पुंडलिका, अंजनगावला त्या भागीच्या सल्ल्याने गुरू करायला जातोस का? जातोस तर जा. त्याचे नाव काशीनाथ आहे. तिथे  गेल्यावर तुझा संशय नक्कीच दूर होईल. कोणी काही कानात बोलला म्हणून काय  तो गुरु होईल का? लोक अशा कितीतरी कानगोष्टी व गुजगोष्टी करतात म्हणून काय एकमेकांचे गुरु होतात का? पुंडलिका तू त्या  दंभाचाराच्या नादी लागू नकोस. तू इकडे कान कर तुला मंत्र देतो. ‘गण गण’ असं बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखीन तुझी काय आस आहे ते सांग. ती पण आज मी नक्की पुरवीन.” हे ऐकून पुंडलिकाना अत्यानंद झाला. त्यांनी स्वप्नात त्या पुरुषाला निरखून पाहिले. ते शेगावचे गजानन महाराज स्वामी होते. पुंडलिक म्हणाले, “गुरुराया मला तुमच्या ह्या पादुका नित्य पूजा करायला द्या एवढीच माझी आस आहे.”

त्यावर महाराज म्हणाले, “बरं, ठीक आहे, मी तुला या पादुका देतो. उद्या दुपारी दिलेल्या पादुकांची पूजा कर.” पादुका घ्यायला म्हणून गजानन महाराज जेव्हा स्वप्नात पुंडलिकाला दिसले तेव्हाच पुंडलिक उठून बसले व जागे होऊन इकडे तिकडे  पाहू लागले. पण कोणीच काही दिसेना व  पादुकांचाही काही पत्ता लागला नाही. त्यांना काहीच उलगडा झाला नाही. मनातला काही विचारही जाईना. कारण महाराजांचं  भाषण कधीही खोटं झालेलं नव्हतं. स्वप्नात येऊन “श्री”  नी मला दर्शन दिलंय व भागी ठाकरीण कशी आहे तेही सांगितलं आणि म्हणाले, उद्यां दुपारी  पादुकांची पूजा कर एवढं सगळं सांगून  साक्षात्कारी गजानन महाराज  स्वप्नात येऊन निघून गेले त्याचा अर्थ  काय समजू? नवीन पादुका करून मी त्यांचे पूजन करावे का अजून  त्यांच्या मनात काही आहे का हे काहीच कळत नाही. मी त्यांनी पायात घातलेल्या पादुका मागितल्यावर त्याच त्यांनी मला वापस दिल्या. मग मी नव्या का घेऊ? “ऐसे नाना तर्क पुंडलिक मनातल्या मनात करत होते. एवढ्यात भागी ठाकरीण बोलवायला आली व म्हणाली, “दिवस उजाडला रे पुंडलिका,  गुरू करण्यासाठी आता  अंजनगावी चल. ” पुंडलिक म्हणाले, “भागाबाई  मी येत नाही. मर्जी असल्यास तू जा. मी एकदा श्री गजानन महाराजाना गुरू केला आहे. आता त्यांना मी कधीही सोडणार नाही. असा  माझा पक्का निश्चय आहे.” ते ऐकून भागाबाई अंजनगावला एकटीच निघून गेली.

                     दोन दिवसा अगोदर जेव्हा झ्यामसिंग राजपूत गजानन महाराजांच्या दर्शनाला गेला होता तेव्हा परत मुंडगावला जेव्हा निघाला तेव्हा बाळाभाऊना महाराज म्हणाले, “या पादुका पुंडलिकाला  देण्यासाठी झ्यामसिंगाकडे दे.” बाळभाऊंनी महाराजांच्या आज्ञेने त्या पादुका  झामसिंगाना दिल्यात व त्याला म्हणाले कि,  तुमच्या गावचा पुंडलिक भोकरे यांना ह्या पादुका पूजन करण्यासाठी द्या.” त्याप्रमाणे झ्यामसिंग त्या पादुका घेऊन मुंडगावात आले. दुसऱ्या दिवशी जेव्हा झ्यामसिंग पुंडलिकाला भेटायला निघाला तेव्हा पुंडलिक त्यांना वेशीतच भेटले व श्री गजानन महाराजांविषयी हालचाल   विचारू लागले व त्यात हे ही  विचारले कि,  “गजानन महाराजांनी माझ्यासाठी प्रसाद म्हणून  काही  तुमच्याकडे दिलंय का?” ते ऐकून  झ्यामसिंगाना महदाश्चर्य वाटले. पुंडलिकाना झ्यामसिंग स्वतःच्या घरी घेऊन गेले आणि खोदून खोदून  विचारू लागले कि, ” तुम्ही मला असं का विचारलंत?” त्यावर झ्यामसिंगांना पुंडलिकानी स्वप्नाची गोष्ट सांगितली. ती ऐकून झ्यामसिंगांची मतीच  नष्ट झाली हो! त्यांनी लगेच त्या पादुका काढुन पुंडलिकाच्या हाती दिल्या. अजूनही त्या पादुका मुंडगांवांत त्यांच्या घरी आहेत. दोन प्रहरी उठून त्या प्रसादी पादुकांचे पूजन पुंडलिकानी अत्यंत मनोभावे केले. खरे संत आपल्या भक्तांना किंचितही आडमार्गाने जाऊ देत नसतात व त्यांची काळजी स्वतः वाहून त्यांना सांभाळतात व त्यांचे मनोरथ पण पूर्ण करतात हे या प्रसंगाने लक्षात येईल. 

राजाराम कवर म्हणून एक सराफीचा धंदा करणारे माध्यांदिन ब्राह्मण अकोल्यांत राहात होते. सोने,  चांदी, भुसार घेणे देणे अशी मध्यम प्रतीची सावकारी हे राजाराम कवर करत असे. भाऊ राजाराम कँवर गजानन महाराजांचे भक्त होते. म्हणून त्याची संतती पण महाराजांचा आदर सत्कार करीत असे.  या कवराना गोपाळ व त्र्यंबक असे दोन पुत्र होते. कनिष्ठ पुत्र  त्र्यंबकना भाऊ असे म्हणत. ते  डॉक्टरी शिकायला हैद्राबादला गेले होते. लहानपणापासून भाऊना देवाचं ध्यान , पूजा पाठ  करायची आवड होती. हैद्राबादला असताना काही संकट आलं की, ते महाराजांची आठवण करत असे. लहानपणापासून शेगावचे गजानन महाराज  त्यांचे दैवत होते. एकदा सुट्टीत ते घरी आले असता श्री गजानन महाराजांना त्यांच्या आवडीचे सर्व पदार्थ करून, शेगावला जाऊन जेऊ घालावं अशी त्यांना इच्छा झाली. पण हे कसं घडणार अशी त्यांच्या मनात चिंता वाटू लागली.  भाऊ महाराजांना म्हणाले, “गुरुनाथा काय करू दयाळा? माझी आई लहानपणीच मला सोडून गेली. माझं असं घरी कोणी नाही. नानी म्हणून तापट स्वभावाची भावाची पत्नी आहे. माझ्या मनात तर आपल्या आवडीच्या पदार्थांची म्हणजे ज्वारीची भाकरी, कांदा, आंबाड्याची भाजी, चुन पिठले, हिरवी मिर्ची इत्यादींची आपल्याला मेजवानी द्यावी असे वाटत आहे. पण तुमच्या आवडीचे हे पदार्थ करायला मी वहिनीला कसे सांगू? हट्ट करायचं एकच स्थान असतं ते म्हणजे आई! असा विचार करीत भाऊ बसले होते. तो काही कामानिमित्त नानी तिथं येऊन गेली व  भाऊंना म्हणाली, “कशाची चिंता करताय  तुम्ही? तुमचं तोंड म्लान का बरं झालंय?”

 भाऊ अत्यंत दिनवाणीने आपल्या वहिनींना  म्हणाले, “काय तुला सांगू वहिनी? सत्तेशीवाय मनात आलेले मनोरथ कधी पूर्ण होतात का? तुला सांगून काय उपयोग?” त्यावर नानी म्हणाली, “एकवेळ सांगून तर पहा, तूं माझा धाकटा दीर आहेस. माझ्याशी पडदा ठेऊ नकोस. ज्येष्ठ भ्राता पित्यापरी असतो. मग त्याची कांता आई प्रमाणे मानली पाहिजे हे तुला माहीत आहे ना ? तें ऐकून भाऊ हंसला आणि म्हणाला,  “नानी, माझ्या मनात असं आलं की, श्री गजानन महाराजांच्या आवडीचे सर्व पदार्थ करून ते त्यांना द्यायला शेगावला घेवून जावे. ते जर तू करशील तर तुलाही पुण्य लाभेल व माझंही काम होईल.”  तें ऐकल्यावर नानी दिराला हसून म्हणाली, “एवढ्यासाठीच तुम्ही सचिंत बसला होता का ? सांगा काय काय करायचंय. श्री गजाननाच्या कृपेनं आपल्या घरी कसलीही उणीव  नाही. त्यानंतर भाऊने त्यांच्या मनातील सर्व काही तिला सांगितले. ते ऐकून तिलाही बरे वाटले व ती ही आनंदाने स्वयंपाक करायला लागली. भाजी पिठलं, भाकरी आणि ओंजळभर हिरव्या मिरच्या तिनं दिराच्या समोर ठेवल्या. लोणी माखलेल्या तीन भाकरी, तीन कांदे, हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचे पिठले अशी सर्व शिदोरी बांधली. नानी दिराला म्हणाली, “जा आता शेगावला. गाडीला वेळ थोडा बाकी आहे. जर गाडी चुकली तर आपलं सर्व काही वाया जाईल. कारण भोजनाच्या वेळेला नाही गेलात तर काय उपयोग होईल.?”

नानीचे बोलणे ऐकून भाऊने वडिलांची परवानगी घेतली आणि स्टेशनवर आला. तो तेथे पाहिलं तर बाराची गाडी निघून गेली होती हे कळल्यावर भाऊ अत्यंत दुःखी झालेत. महाराजांविषयी त्यांची सेवा खंडित झाल्याने त्याच्या डोळ्यात पाणी आले.तो म्हणू लागला की, “महाराज असा माझा अव्हेर का बरं केला? मी हीन दीन आहे व आता जेव्हा मला तुमचं पुण्य पडण्याचं सौभाग्य लागलं तर तेही हिरावून घेतलंस? आमच्यासारख्या हीन दिनांना कधी मानस सरोवराचा लाभ होईल का? गुरु मुर्ती माझ्याकडून अशी एक अक्षम्य चूक झालीस कशी? आज गाडी चुकली? हाय हाय हे दुर्दैवा! तू बरोबर माझ्यावर बरोबर डाव साधलास यावेळी. माझ्या हातून गुरुसेवा घडू दिली नाही. जर ही माझी शिदोरी आज अशीच राहिली तर मी जेवणार नाही हे त्रिवार सत्य. गुरुराया कृपाराशी लेकराला उपेक्षू नका. ही शिदोरी सेवण्यासाठी सत्वर धांवून या. आपला अधिकार थोर आहे. क्षणांत केदारनाथला पोहोचता. मग येथे यायला का बरं असा अव्हेर  करता? मी काही तुम्हाला आज्ञा करीत नाही. प्रेमाने हांका मारतो तुम्हाला.त्यामुळे तुमचा त्यात यत्किंचितही अपमान होणार नाही . पुढच्या गाडीला अजून तीन तास वेळ आहे, तोपर्यंत तुमचं जेवण होऊन जाईल. असं वाटत आहे.असा विचार करत भाऊ तेथेच उपाशी बसून राहीले व ज्यावेळी दुसरी गाडी जेव्हा आली तेव्हा अंदाजे चार वाजता शेगावला पोहोचले. जेव्हा भाऊ “श्री” च्या  दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी पाहिले की, योगीराज भोजन न करता तसेच आसनी बसून होते. नैवेद्याची अनेक पक्वान्नांनी परिप्लुत्त अशी  ताटे मठात आली होती.त्या पक्वनाची किती असे नावे सांगू? कोणाच्या जिलब्या घीवर, कोणाचा मोतीचूर, कोणाची खीर, कोणाच्या श्रीखंड पुर्‍या पण त्यावेळी महाराजांनी त्यातल्या एकाही नैवेद्याला स्पर्श केला नव्हता. बाळाभाऊ  वरच्यावर ताट पुढं आणून ठेवायचे व  म्हणायचे, “महाराज आपण जेवून घ्या. एक वाजून गेला. आपण जेवल्याशिवाय  भक्ताना प्रसाद कसा मिळेल? ते वाट पाहात बसले आहेत. त्यांचं तुम्हाला विनंती करायचं धाडस होत नाही,  म्हणून मी बोललो.

त्यावर महाराज म्हणाले, “थांब जरा! आग्रह करू नकोस. आज माझे भोजन चौथे प्रहरी होणार आहे. लोकांची मर्जी असल्यास त्यांनी थांबावे अन्यथा  खुशाल जेवण करावे किवा नैवेद्य घेऊन घरी जावेत मला त्याची पर्वा अजिबात नाही. एवढ्यात भाऊ कँवर तेथे  आले. महाराजाना पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. दूर गेलेली आई पुन्हा परत जवळ यावी व प्रेमानं आलिंगन द्यावं  तसं भाऊंचं झालं. त्यांनी समर्थाना साष्टांग नमस्कार केला व हात जोडून पुढील आज्ञेची वाट पहात उभे राहिले. भाऊना पाहून श्री गजानन महाराज  हसलेत व म्हणाले,  “आमंत्रण तर दिलंस! पण ही काय आमची जेवायची वेळ आहे?  तुझ्या भाकेत गुंतल्याने मी उपोषित आहे. आण तुझी शिदोर!”

असं महाराजांचं बोलणं ऐकून भाऊंना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, “काय करू गुरुनाथा? बाराची गाडी चुकली.” बाळाभाऊ कवराना म्हणाले, “आता दुःखी होऊं नको. मला बघू दे तू महाराजांसाठी जेवायला काय काय आणलयस?”

हे ऐकून भाऊंनी लगेच कांदे भाजी भाकरी महाराजांच्या समोर ठेवली. त्यांतील दोन भाकरी समर्थानी खाल्ल्या आणि तिसरी प्रसाद म्हणून सर्व भक्तांना वाटली. तो प्रकार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले की महाराज खरोखरच भक्तवत्सल आहेत.

भक्त म्हणाले, “ज्याप्रमाणे हस्तिनापुरांत पक्वान्ने सोडून भगवान श्रीकृष्णांनी विदुराच्या हुलग्यांवर, कण्यावर  प्रेम केलं, तसंच आज येथे झालं. आमची पक्वान्ने महाराजांना रुचली नाहीत. कारण त्यांचं मन कवरांच्या भाकरीत गुंतलं होतं.” मग भाऊंनीही “श्री” चा प्रसाद घेतला. जिथं सद्भाव, प्रेम व भक्ती असते तेथे नेमकं असंच होत असते.

श्री गजानन महाराज भाऊंना म्हणाले, “आतां तू अकोल्याला परत जा. पुढल्या वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत पास होशील”

भाऊ म्हणाले, “गुरुराया, आपली कृपा व दया असावी. यापेक्षा मला वेगळं काही नको. मी येथे आपणास काहीच मागायला आलो नाही. आपले दिव्य चरण हेच माझे धन आहे. सर्वदा आपल्या दिव्य मूर्तीचे चिंतन घडावे.”

अशी विनंती करून भाऊ अकोल्याला निघून गेले. समर्थ आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाहीत हेच खरे. 

शेगांवचे तुकाराम शेगोकार हे शेती करणारे एक अनन्य भक्त  होते. घरची गरीबी होती. शेतात काम करून अस्तमानाच्या वेळी ते दर्शनाला मठांत येत. ते मठात आल्यावर महाराजांची  चिलीम भरून देत, त्यांच्या पायांचे दर्शन घेत मग काही वेळ बसून परत फिरत. असा त्यांचा नित्यक्रम खूप  दिवस चालला होता. पण दैवात  काय लिहिलं असते ते कोणालाही माहीत नसते व  चुकवता पण येत नाही. जे जे दैवात असेल ते तेे घडतं. तुकारामांच्या बाबतीत असंच झालं. एके दिवशी  छऱ्याच्या बंदुकीने ससे मारत फिरणारा एक शिकारी बंदुक घेऊन सकाळच्या वेळी शेतात सस्याची शिकारी करण्यासाठी गेला होता, त्यावेळी तुकाराम आपल्या शेतीत शेकत बसले होते. त्यांच्या मागे कुंपणाला एक ससा बसलेला होता. तो शिकार्‍याच्या दृष्टीला पडला. त्याची शिकार करण्यासाठी शिकार्‍याने त्याची बंदूक नेम धरून झाडली. ती गोळी लागून ससा मेला पण त्यातला एक छरा तुकारामाना अचानक कानामागे लागला. छरा मोठ्या जोराने डोक्यात शिरला. डॉक्टरांनी खूप उपचार केले पण कांहीं केल्या छरा निघत नव्हता. तुकारामाना अतिशय यातना होऊ लागल्या. त्यांचं डोकं अहोरात्र दुखू लागलं. क्षणभर ही झोप येत नव्हती. नवस सायासही खूप करण्यात आले पण कसाही  गुण  आला नाही. अशाही अवस्थेत ते रोज मठात येत. एके दिवशी श्री गजानन महाराजांचे एक भक्त त्यांना म्हणाले, “आता डाँक्टर वैद्यांचा नाद सोडा. संतांच्या सेवेपेक्षा उत्तम उपाय या जगामध्ये कोणताही  नाही. त्यांची कृपा झाल्यास तुझा हा त्रास चुकेल. तेव्हा या मठाचा परिसर नित्य झाडत जा. या सेवेतून तुला पुण्य़ लाभेल व  महाराजांची कृपा तुझ्यावर झाल्याशिवाय राहाणार नाही.तू ह्या त्रासापासून मुक्त होशील. मात्र तुझ्या वडिलांप्रमाणे तू येथे दांभिकपणा करू नकोस. मनात कायम शुध्द भाव ठेव “ते तुकारामाना पटले. त्यांनी मठाचा परिसर झाडून आरशासारखा स्वच्छ ठेवायला सुरुवात केली. अशी चौदा वर्षें सेवा त्याने सतत सेवा केली. तुकारामाला आपल्या सेवेचं फळ मिळालं. एकदा असेच ते मठ झाडत असताना जशी पिकलेल्या बोराची आठोळी पिचकून बाहेर पडते तसा कानांतून छरा गळून पडला. छरा पडताच डोके दुखायचे थांबले. हा सर्व सेवेचाच प्रभाव होता. ही मठ झाडण्याची सेवा त्यांनी अखेरपर्यंत केली. प्रचीतिविना कोणाची परमार्थात निष्ठा बसत नाही. एकदा बसली की, मात्र स्थिर होते. संत सेवा महा थोर असते हे भाविकांना माहीत आहेच.

श्री संत कवी दासगणू महाराजांनी रचियेला हा गजानन विजय ग्रंथाचा १६ वा अध्याय सर्वच भाविकांना भवसिंधु सारखा तारणहार होवो व त्यांचे दुःख हरो ! हा अध्याय आता येथेच सुफळ संपूर्ण !

शुभं भवतु !

|| श्रीहरिहरार्पणमस्तु ||

- अनुवादक: श्री वामन रुपरावजी वानरे.

मो.09826685695