You are currently viewing दिवसभरात केवळ दोन मिनिटांसाठी बंद केलं जाणारं श्रीकृष्ण मंदिर…

दिवसभरात केवळ दोन मिनिटांसाठी बंद केलं जाणारं श्रीकृष्ण मंदिर…

-संग्राहक,

विजय दत्तात्रय सुवर्णकार

                 केरळमधील कोट्टायम जिल्ह्यामध्ये असणारं तिरुवरप्पू (स्थानिक मल्याळम् उच्चार ‘थिरुवरप्पू’, पिनकोड ६८६०२०) या गावी असलेलं आणि दिवसभरात केवळ दोन मिनिटांसाठी बंद केलं जाणारं हे श्रीकृष्ण मंदिर… 

              सुमारे १५०० वर्षं जुन्या असलेल्या या मंदिराचा क्रम चमत्कृतीपूर्ण (‘novelty’ या अर्थानं चमत्कृती हा शब्द योजलेला आहे) मंदिरांमधे कदाचित् फार वरचा असेल. १५०० वर्षांचा कालावधी हा मंदिर स्थापत्याचा आहे, परंतु घटनेचा संबंध थेट महाभारत काळापर्यंत पाठीमागे जातो. या मंदिरात असलेली प्रधान देवता श्रीकृष्णांची कधीही शमन न होणारी भूक भागवण्यासाठी हे मंदिर वर्षभर २३.५८ तासांसाठी चालू असतं. म्हणजेच रोज रात्री ११.५८ ते ००.०० अशी केवळ २ मिनिटं श्रीकृष्णांच्या निद्रेचा काळ वगळता वर्षभर हे मंदिर उघडं असतं.

                या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य असं की हातातल्या किल्लीनं गर्भगृहाचं कुलुप उघडताना मंदिराचा पुजारी हातामधे एक कुर्‍हाडही (किंवा हातोडा) ठेवतो. भक्तांच्या श्रद्धेनुसार, कंसवधानंतर भगवान श्रीकृष्ण भुकेनं व्याकुळ झाले होते आणि या मंदिरात श्रीकृष्णांच्या त्याच रुपाचं पूजन केलं जात असल्यानं ती मूर्तीही भूक सहन करु शकत नाही. याच कारणासाठी गर्भगृहाचं कुलुप किल्लीनं उघडताना काही विलंब होतो आहे असं दिसल्यास पुजारी त्या कुऱ्हाडीनं कुलुप तोडतो. 

                नैवेद्यार्पणामधे विलंब होऊ नये यासाठी मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतरदेखील आधी मस्तक पुसलं जाऊन लगेचच नैवेद्य अर्पण केला जातो आणि नंतरच उर्वरित शरीर कोरडं केलं जातं. अश्याप्रकारे दिवसभरात १० वेळा नैवेद्य अर्पण केला जातो. एवढंच काय तर प्रभू श्रीकृष्ण उपाशी राहू नयेत यासाठी अगदी ग्रहणकाळातही मंदिर बंद ठेवलं जात नाही.

                आद्य श्रीशंकराचार्यांच्या कालावधीत एकदा ग्रहणकाळात मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. मंदिर उघडल्यानंतर असं लक्षात आलं की मूर्तीचा कंबरपट्टा गळून पडलेला आहे. आदि श्रीशंकराचार्यांना त्याबद्दल विचारलं असता, “भगवान श्रीकृष्ण भुकेनं व्याकूळ झालेले होते आणि म्हणून रिकाम्यापोटी असल्यानं तो पट्टा गळून पडला आहे” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. त्या दिवसापासून आद्य श्रींच्या आदेशानुसार ग्रहणकाळातही मंदिर कधीही बंद ठेवलं गेलेलं नाही आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे दिवसभरात केवळ २ मिनिटंच ते बंद ठेवलं जातं. 

                भगवान श्रीकृष्णांच्या या मंदिराविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. वनवासादरम्यान भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीची पूजा करुन पांडव तिला नैवेद्यार्पण करत असत. वनवास समाप्तीनंतर थिरुवरप्पुमधील मच्छिमार समाजानं विनंती केल्यानं पांडवांनी ती मूर्ती तिथेच ठेवली. मच्छिमारांवर एकदा संकट आल्यानं त्यांना एका ज्योतिषानं सांगितलं की त्यांच्याकडून मूर्तीची पूजा योग्यप्रकारे होत नाहीये. त्यानंतर त्यांनी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती एका सरोवरामधे विसर्जित केली. पुढे केरळमधील ऋषि बिल्वमंगलम् स्वामीयार नावेतून यात्रा करत असताना त्यांची नाव एका जागी अडकली. अनेक प्रयत्न करुनही नाव पुढे जाईना. ऋषींनी पाण्यात डुबकी मारुन पाहिलं असता, त्यांना पाण्यात श्रीकृष्ण भगवानांची एक मूर्ती दिसली. त्यांनी ती सोबत घेतली आणि यात्रेदरम्यान एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबले असता त्यांनी ती मूर्ती तिथे ठेवली. निघताना जेंव्हा त्यांनी ती मूर्ती उचलून घेण्याचा प्रयत्न केला तेंव्हा काहीकेल्या मूर्ती तिथून काढता आलीच नाही. त्यानंतर तिथेच मूर्तीची स्थापना करण्यात आली. 

                मंदिरात आलेल्या कोणालाही प्रसादग्रहण केल्याशिवाय बाहेर जाऊ दिलं जात नाही. दररोज रात्री ठिक ११.५७ मिनिटांनी मंदिर बंद करण्यापूर्वी, प्रत्येक भक्तानं प्रसादग्रहण केल्याची खात्री करण्यासाठी “कोणी उपाशी आहे का?” असा प्रश्न पुजारी उच्च स्वरात विचारतात.

                भक्तांची श्रद्धा अशीही आहे की या मंदिरात प्रसादभक्षण केल्यास भगवान श्रीकृष्णच भक्ताची काळजी घेत असल्यानं आयुष्यात पुन्हा त्या व्यक्तीला कधी अन्नाची ददातही पडत नाही आणि तीव्र भुक लागल्याची जाणिवही होत नाही. आणि या जाणिवेचा ‘याचि देही याचि डोळा’ मी स्वतः अनुभव घेतलेला आहे…घेतो आहे… 

                   ।।चक्षुर्वैसत्यम्।।

Rohit

संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118

Leave a Reply