सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देहचर्या. लांब लांब पावले टाकीत सदानकदा घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती, पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व त्यास छापी (कपडा) गुंडाळलेली. महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी बालसुलभ वृत्ती.
महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्नभावाने त्याचेही सेवन करावे. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाही तर ओहोळातच ओंजळी-ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी. महाराजांच्या वागण्याला धरबंध नव्हता.
भक्तांकडून साग्रसंगीत षोडशोपचारे पूजा करून घ्यावी तर कधी आंघोळीशिवाय कित्येक दिवस राहावे, तर कधी गळ्यात पडणारे हारही भिरकावून द्यावे अशी बालोन्मतपिशाच्च वृत्ती. मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते. चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत.
महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस नव्हता. कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवत नाहीतर ती फेकून देत असत. पादुका, पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाहीत. बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत. मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या. इतकंच काय त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती. क्वाचितच ते चिलीम ओढीत असत. पण ३२ वर्षांच्या कालखंडात त्यांनी फार कमीवेळा चिलिमीला स्पर्श केला.
आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवमध्ये व्यतीत केला असला तरीही कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे.
महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. गोदावरीच्या तीरावर गोपाळदास महंत आणि माधवनाथ या त्यांच्या गुरूबंधूंशी त्यांची भेट होत असे. नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलंबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मागिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे. सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो. शे-सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराज मात्र हा संपूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तिथे काही क्षण घलवत. नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले आढळतात. त्याचे मूळ ब्रह्मागिरी पर्वतातच दडले असेल काय?
पुंडलिकबुवा भोकरे गजानन महाराजांची एक आठवण नेहमी सांगतात… शेगांवात एक वयस्कर स्त्री होती. शिधा मागून ती आपला उदरनिर्वाह करीत असे. गावकरी तिची भिकारीण म्हणून हेटाळणी करीत. ही स्त्री भिक्षेतून मिळालेल्या पिठाच्या भाकऱ्या करी व त्यातील एक महाराजांना देत असे. महाराजही ती भाकरी आवडीने खात. हा प्रकार काहीसा विचित्र आहे, असे मठातील अन्य भक्तांना वाटत असे. नैवेद्य म्हणून आलेले पंचपक्वान्नांची ताटे बाजूला सारून महाराज या वेडगळ भिकारणीच्या हातच्या भाकरीसाठी एवढे का तिष्ठत राहतात, याचे सर्वांना नवल वाटत असे. एकदा महाराजांच्या नकळत त्या स्त्रीने आणलेल्या भाकरीचा तुकडा पुंडलिक व अन्य भक्तांनी खाल्ला असता त्यांना तो अतिशय कडू लागला. महाराज इतक्या कडवट चवीची भाकरी आनंदाने खातात कसे, याचे त्यांना आश्चर्य वाटले.
एके दिवशी ही वेडगळ भिकारीण मेल्याचे वृत्त मठात आले. ते ऐकताच महाराजांच्या डोळ्यांना अश्रृधारा लागल्या. तीन दिवस महाराजांनी शोक केला. त्यांची ही कृती सर्वांना अगम्य वाटली. महाराजांनी जातीपातीचा, उच्चनीचतेचा, भेदभावाचा धर्म अंगीकारला नसल्याने प्रत्येकास त्यांच्या दर्शनास येण्याची मुभा होती. शेगांवातल्या एका वेश्येच्या ओसरीवर बसून महाराज तिच्या हातची भाकरी खात. तिला महाराज म्हणत, ‘तू महानंदा आहेस.’
१९१० साली महाराज समाधिस्थ झाले तेव्हा असे म्हणतात की, शिर्डी येथे श्रीसाईबाबांनी आकांत मांडला. दिवसभर मौन बाळगून असलेल्या साईबाबांनी ‘माझा भाऊ चालला’ असे कळवळून उद्गार काढले, असे दादासाहेब खापर्डे यांनी नमूद केले आहे. आज महाराजांचा प्रकटदिन सर्वत्र उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जात आहे. या अवलिया संताचा भक्तगण वाढत आहे. या अवलियाला त्रिवार वंदन.