श्री शंकर प्रसन्न
संतकवि श्रीदासगणू विरचित

श्रीसंत गजानन महाराज

यांचे
श्रीगुरूपाठाचे अभंग

"काव्य - कुंजासह"
संदर्भ:
श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव

२.
भूपाळी

दयाघना श्री स्वामीसमर्था गजानना गुरुवरा ।

कृपाकटाक्षे त्रिताप वारुन रक्षण शिशुचें करा ॥धृ।।

अज्ञानाची रात्र भयंकर चहूंकडे पसरली ।

विषयवासना सटवी टिटवी टी टी करु लागली ।।१ ।।

दिवाभीत हा मत्सर पिंगळा अहंकार साजिरा ।

मनवृक्षावर बसुन अशुभसा काढु लागला स्वरा ॥ २ ॥

नानाविध संकटें चांदण्या चमकाया लागल्या ।

त्यायोगानें सत्पथ वाटा लोपुनी गेल्या भल्या ॥३।।

अरुणोदय तो तुझ्या कृपेचा होऊं दे लवकर ।

चित्त प्राचिला उदय पावुं दे बोधाचा भास्कर ॥४।।

दशेंद्रिये हीं दहा दिशा त्या उजळतील त्यामुळें ।

सत्पथ वाटा दिसूं लागुनी हितानहित तें कळें ।।५ ।।

तुझ्या कृपेचा अगाध महिमा ज्ञाते जन सांगती ।

म्हणुन तुला मी दीनदयाळा येतो काकूळती ।।६ ।।

अंताचा ना मुळीच बघवे वरदकर धरि शिरीं ।

पापताप हें दुखयातना दासगणूच्या हरी:  ।।७ ।।

३.

काकडा

सद्गुरुराया गजानना तंव काकडा करितों ॥ आतां ॥

उद्धारास्तव बहू आदरानें चरणद्वया धरितों ॥ धृ ॥

अज्ञानाची निशा मावळो कृपाकटाक्षांनी ।

आशा सटवी टी टी करुनी नाचविते अवनी ॥१॥

त्या सटवीला आहे आसरा मायामोहाचा ।

त्याचा टिकाव कधीं न लागे तुज पुढती साचा ॥२॥

षड्रिपु बेटे खट्याळ मोठे करिती निर्माण ।

भ्रमभोंवरा जो त्यामध्यें देतो आम्हांस टाकुन ॥३॥

त्या भोंवऱ्याला तरुन जाया पाय तुझे नौका ।

त्या नावेमध्यें भक्त बैसती तयास टाकुं नका ॥४॥

दासगणूची हीच विनंती तुज वारंवार ।

सुखें करावें भक्ता आपुल्या लोटुं नका दूर ॥५॥

४.

॥ आरती श्री गजाननाची ॥

जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया

अवतरलासी भूवर जडमुढ ताराया ।

।। जय देव ।।धृ।।


निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । स्थिरचर व्यापून उरलें जे या जगताशी । तें तूं तत्त्व खरोखर निःसंशय अससी । लीलामात्रें धरिलें मानवदेहासी ।। जय देव ।।१।।


होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा । करूनी 'गणि गण गणांत बोते' या भजना । धाता हरिहर गुरुवर तूंचि सुखसदना । जिकडें पहावे तिकडे तूं दिससी नयना ।। जय देव ।।२।।


लीला अनंत केल्या बंकट सदनास । पेटविलें त्या अग्नीवांचूनी चिलमेस । क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस । केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ।। जय देव ।।३।।

व्याधी वारूनि केलें कैका संपन्न । करविले भक्तालागी विठ्ठलदर्शन । भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण । स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ।। जय देव ।।४।।

५.

श्लोक

(वृत्त-उपेंद्रवजा)


विदर्भ देर्शी शिवग्राम मोठें । विराजती सद्गुरुनाथ जेथें ॥

कृपासुधा शांत करी जिवाला । नमूं हृदीं नित्य गजाननाला ॥ १ ॥

मला असें छत्र तुझ्या कृपेचे । जगीं न कोणीहि असें जिवाचें ॥

पदीं तुझ्या आश्रय दे नताला। नमूं दयासिंधु गजाननाला ॥ २ ॥

सहा रिपू हे मज त्रास देती । गती न होई परमार्थ पंथीं ॥

सहाय्य दे दीन अजाण बाला । नमूं गुणाधीश गजाननाला ॥ ३ ॥

भवीं बुडालों दिन व्यर्थ गेले । बघून ऐसें मन दग्ध झालें ॥

करास देई शरणागताला । नमूं जगबंधू गजाननाला ॥ ४ ॥

गजानना मंगलधाम देवा ।  मदंतरी ज्ञानप्रदीप लावा ॥

कृतार्थ मूढास करा दयाळा । नमूं जगत्स्वामी गजाननाला ॥ ५ ॥

अघास गंगा, विधु ताप नाशी । दरिद्रता कल्पतरुहि ध्वंसी ॥

त्रयीं हि त्वदर्शनी ने लयाला । तुला तुळा केवि गजाननाला ॥ ६ ॥

तुलाच गाती श्रुती साम गानें । सहाही शास्त्रे, अठरा पुराणें ॥

त्रिमुर्ती येई जन तारण्याला । नमो महासाधु गजाननाला ॥ ७ ॥

मनांत नांदो तव ज्ञानमुर्ती । भजावया दे जन चित्ती स्फुर्ति ॥

पदाब्जि दे ठाव मला कृपाळा । नमुं जगदंद्य गजाननाला ॥ ८ ॥

यापुढे भाग पहिला यातील श्लोकप्रदक्षिणा, क्षमापण हे येथे म्हणण्यात यावे.

६.

|| श्रीशंकर ।।

संतकवि श्रीदासगणू विरचित

श्री गुरुपाठाचे अभंग

 संतचुडामणी स्वामी गजानन तयाचे महिमान ऐका आतां ।।

योगयोगेश्वर हाचि एक जाणा शेगांवींचा राणा गजानन ॥

तयाचिया पायीं ठेवा आतां शिर तरी व्हाल पार भवाब्धीच्या !

गणूदास म्हणे आली ही पर्वणी घ्यावी ती साधुनी प्रयत्नानें ।।१।।

कोण हा कोठिचा कांहींच कळेना ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे ।।

साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती आलीसे प्रचीती बहुतांना ।।

जानराव देशमुख झालासे आजारी मृत्युशय्यैवरी पडला होता ।।

समर्थांचे तीर्थ तयासी पाजतां दूर झाली व्यथा गणू म्हणे ॥२॥

बंकटलालाचे तें झाले असें घर प्रती पंढरपूर स्वामीमुळे ।।

लांबलांबुनिया दर्शनास येती लोक ते पावती समाधान ।।

भक्त भास्कराच्या -साठीं तें जीवन केलें हो निर्माण खाचाडांत ।।

गणूदास म्हणे एका प्रदोषकाळीं दिसले चंद्रमौळी एक्या भक्ता ॥३॥

कावळे हाकिले पंक्तीच्यामधूनी अकोलींच्या बनी समर्थाने ।

अजूनीपर्यंत चाललें तें व्रत पहा अकोलींत जाऊनियां ॥

पितांबरा हस्तें आणविला पाला वठलेल्या वृक्षाला कोंडोलींत ॥

गणू म्हणे शेगांवी विस्तवावांचून दाविली पेटवून चिलीम ती ॥४॥

मुकिंदा भक्ताचे कान्होले ते दोन केले कीं सेवन आवडीनें ॥

मोहळाच्या माशा डसतां अपार राहिला तो स्थिर योगिराणा ॥

कुंभक करुनी काटे मधमाशांचे टाकिले अंगाचे बाहेर की ।

गणूदास म्हणे योग ज्यासी आला अजिंक्य तो झाला जगामध्यें ॥५॥

गीताशास्त्रामाजीं ब्रह्माचें लक्षण सांगी नारायण अर्जुनातें ॥

जळेना तुटेना जे कां कशानेंही तेंच तत्व पाही ब्रह्म असे ॥

याचें प्रत्यंतर गोसाव्या दाविलें मळ्यामाजीं भले कृष्णाजीच्या ॥

गणूदास म्हणे ऐसा अधिकारी एक या भूवरी गजानन ॥६॥

बाळापुरी होता एक रामदासी नाम होते ज्यासी बाळकृष्ण ॥

माघ वद्य नवमी पर्वणी ती थोर अवघे बाळापूर आनंदले ।।

त्याच दिनी स्वामी गेले बाळापुरा बाळकृष्णा घरा आवर्जून ॥

गणूदास म्हणे द्वारामाजीं ठेले कौतुक दाविले अभिनव ॥७॥

जटेचे ते केस रुळती पाठीवरी कुबडी तीही करी चंदनाची ।।

ऊर्ध्व तो त्रिपुंड्र भालासी लाविला कंठी शुध्द माळा तुळशीची ।।

रामनामाची ती केलीसे गर्जना वस्त्र अंगी जाणा हुरमुजीचें ॥

गणूदास म्हणे स्वामी रामदास हाच असे खास पूर्वीचा कीं ॥८॥

बायजाबाई नामे माळ्याची कन्यका एक होती देखा मुंडगांवांत ॥

आजन्म राहिली बायजा ब्रह्मचारी जेवी पंढरपुरी जनाबाई॥

राजाराम कवराचा फोड बरा केला देऊन अंगायला समर्थानीं ॥

गणूदास म्हणे बापुन्याकारण करविले दर्शन विठ्ठलाचे ॥९॥

वासुदेवानंद योगयोगेश्वर जयाचा अधिकार फार मोठा ॥

तेही आले स्वामी शेगांवीं भेटाया कांही ती कराया ब्रह्मचर्चा ||

एक तो श्रीविष्णु एक विश्वेश्वर दोघात अंतर मुळी नाही ।।

रक्तपिती व्याधी गंगाभारतीची निवटिली साची गणूं म्हणे ॥१०॥

खंडू पाटलाचे भाऊ अनावर होते वतनदार शेगांवींचे ।।

आपुल्या शक्तीचा अभिमान त्यां झाला तोच निवटिला समर्थांनीं ।।

ऊंसाची ती मोळी हातानें पिळून दिधला काढून रस प्याया ॥

गणूदास म्हणे अशक्य तें कांहीं उरलेंच नाहीं समर्थाला ॥११॥

सोमवती पर्व माघमासीं आलें लोक ते चालले दर्शनाला ॥

नर्मदेच्या कांठी बैसला धूर्जटी द्याया भक्ता भेटी ओंकारी तो ॥

ओंकारेश्वर हे क्षेत्र पुरातन पातकाचें दहन जेथे होई ।।

गणूदास म्हणे येथेची दीधला शंकराचार्याला संन्यास तो ॥१२॥

येथे पुण्यश्लोक मांधाता भूपति लोक अजुनि गाती कीर्ती ज्याची ॥

पूर्वपुण्य ज्याचें सबळ साचार तोच येई नर क्षेत्रासी या

नर्मदेचें स्नान ओंकारदर्शन । घेत तया पुण्य बहुत लाभे ॥

गणूं म्हणे ऐशी माय ती नर्मदा नुपेंक्षी हो कदा भक्तालागीं ॥१३॥

गजानन आले ऐशा त्या क्षेत्रासी हर्ष नर्मदेसी बहुत झाला ॥

पाप्यांची पातकें क्षेत्रें घालवीती । तींच पावन होती साधुस्पर्शे ॥

नाव फुटल्याचें करुनी आमीष नर्मदा सेवेस प्रकटली ।।

गणूदासम्हणे लावुनिया हात पैल तटाप्रत नेली नौका ||१४||

धार कल्याणींचा साधु रंगनाथ आला शेगांवांत भेटावया ॥

उभयतांमाजीं ब्रह्मचर्चा झाली ती ज्यांनी ऐकिली तेचि धन्य ॥

साधूच्या मुखींचे शब्द हे अमृत पडतां श्रवणांत तरुन जाय ।।

गणूदास म्हणे साधूची महती देवही वानिती स्वर्गामध्ये ॥१५॥

साधूचा वशीला जयासी लागला तोच सरता केला पांडुरंगे ॥

संत हे हरीच्या गळ्याचे ताईत संत हे साक्षात कल्पतरु ॥

संत हेचि जाणा मोक्षाचे वाटाडे तेवि ज्ञानगाडे प्रत्यक्षची ॥

गणूदास म्हणे आतां बोलू किती रुक्मिणीचा पती नमी त्यासी ॥१६॥

अर्जुनाचें घोडे धूतसे भगवान करी बाळंतपण चोख्याघरीं ॥

दामाजीपंताची रशीद बेदरी झालासे हरी पोहोचवीता ।।

नाथाचे सदनीं पाणी तें वाहिले शेत रक्षियलें सावत्याचें ॥

गणूदास म्हणे ऐसा संतप्रेमा आहे पुरुषोत्तमा पहा तुम्ही ॥१७॥

आळंदी, पैठण, देहू, अष्टी, तेर तैसां तो साचार सज्जनगड ।।

अरण, मंगळवेढें संतांची ही गांवें तैसैचि लेखावें शेगांवला ||

कोणत्याही अंशें फरक नाहीं यांत शेगांव साक्षात संतभूमी ।।

प्रभातीं या गांवा भावें आठवितां गणूं म्हणे चिंता होते दूर ॥१८॥

नरजन्माचे या सार्थक करा रे अहोरात्र ध्यारे पांडुरंगा ॥

गजाननापायीं द्दढ श्रध्दा ठेवा द्वेष तो नसावा कोणाचाही ॥

प्रत्येक गाहाणे सांगा संतापाशीं होईल तो त्यासी निवटिता ॥

गणूदास हेंची सांगे वारंवार जोडा आतां कर गजानना ॥१९॥

गुरुराया आमुची उपेक्षा न करी तुझ्या बळावरी आमुच्या उड्या ।।

त्रिविध तापाचें निर्मूलन करा आरोग्य शरीरा देऊनिया ।।

हात पसरण्याचा प्रसंग ना आणी कोणापुढे जनीं गजानना ।।

गणूदास म्हणे आनंदीत वृत्ती ठेवावी गुरुमूर्ति सर्वकाळ ॥२०॥

वारी शेगांवाची करी जो कां भक्त तयासी अनंत सांभाळील ॥

गजाननापायीं शुद्ध ज्याची निष्ठा तयालागी कष्टा दे ना हरी ॥

गजानन कीर्तिचे करी जो कां गान तया नारायण दूर नाहीं॥

अनुभव याचा घ्या रे तुम्ही सारे विनवी अत्यादरें दासगणूं ॥२१॥

X