…श्री शंकर…
संतकवी श्री दासगणू विरचित
|| श्री गजानन प्रर्थना स्तोत्र ||
|| श्रीगणेशाय नमः ||
हे सर्वाद्या सर्वशक्ती | हे जगदोध्दारा जगत्पति |
साह्य व्हावें सत्वरगति | या लेकरांकारणें ||१||
जें जें कांही ब्रम्हांडात | तें तें तुझें रुप सत्य |
तुझ्यापुढें नाहीं खचित | कोणाचीही प्रतिष्ठा ||२||
तूं निरंजन निराकार | तूंच अवधूत दिगंबर |
साकाररुप सर्वेश्वर | विश्र्वनाथ तूंच की ||३||
जें जें काही म्हणावें | तें तें तुझे रुप बरवें |
दासगणूस आतां पावे | हीच आहे याचना ||४||
तूंच काशी विश्वेश्वर | सोमनाथ बद्रीकेदार |
महांकाल तेवि ओंकार | तूंच की रे त्र्यंबकेश्वरा ||५||
भीमाशंकर मल्लिकार्जून | नागनाथ पार्वतीरमण |
श्रीघृष्णेश्वर म्हणून | वेरुळगांवी तूंच की ||६||
तूंच परळी वैजनाथ | निधीतटाला तूंच स्थित |
रामेश्वर पार्वतीकांत | सर्व संकट निवारता ||७||
हे कृपार्णवा नारायणा| महाविष्णो आनंदघना |
हे शेषशायी परिपूर्णा | नरहरि वामना रघुपते ||८||
तूं वृंदावनीं श्रीहरी | तूं पांडुरंग पंढरपुरीं |
व्यंकटेश तूं गिरीवरीं | पुरीमाजीं जगन्नाथ ||९||
द्वारकेसी नंदनंदन | नाम देती तुजकारण |
जैसे भक्तांचें इच्छील मन | तैसे तुज ठरविती ||१०||
आता हे चंद्रभागातटविहारा | या गजाननस्तोत्रा साह्य करा |
हेंच मागें पसरुनि पदरा | तुज विठ्ठले दासगणू ||११||
गजानन जे स्वरुप कांही | तें तुझ्याविण वेगळे नाही |
दत्त भैरव मार्तंड तेही | रुपें तुझीच अधोक्षजा ||१२||
या सर्व स्वरुपांकारण | आदरे मी करी वंदन |
माझे त्रिताप करा हरण | हेंच आहे मागणे ||१३||
हें महालक्ष्मी कुलदेवतें | कृपाकटाक्षे लेकरातें |
पाही दासगणूतें | हीच तुजला प्रार्थना ||१४||
आतां शंकराचार्य गुरुवर | तेवी नाथ मच्छिंदर |
निवृत्तीदास ज्ञानेश्वर | समर्थ सज्जनगडीचे ||१५||
हे तुकारामा महासंता | तुजलागी दंडवता |
करिता, होई मला त्राता | नाहीं ऐसे म्हणूं नका ||१६||
हे शिर्डीकर बाबासाई | लेकरांसाठी धांव घेई |
वामनशास्त्री माझे आई | माझी उपेक्षा करुं नका ||१७||
हे शेगांवीच्या गजानना | महासंता आनंदघना |
तुला येऊं दे काही करुणा | या अजाण दासगणूची ||१८||
तुम्हां सर्वा प्रार्थून | स्तोत्र करितो हे लेखन |
माझ्या चित्तीं म्हणून | वास आपण करावा ||१९||
जे जे तुम्ही वदवाल कांही | तेंच लिहीन कागदीं पाहीं |
स्वतंत्रता मलजा नाही | मी पोषणा तुमचा असें ||२०||
माघमांसीं सप्तमीस | वद्यपक्षीं शेगावांत |
तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष | पंथाचिया माझारी ||२१||
उष्टया पत्रावळी शोधन | तुम्ही केल्या म्हणून |
मिळालें की नामाभिधान | पिसा पिसा ऐसें तुम्हा ||२२||
उगी न वाढावी महती | म्हणून ऐसी केली कृती |
तुम्ही साच गुरुमूर्ती | लपून बसाया कारणे ||२३||
परि विचारवंत जे ज्ञानी | तें तुम्हालागी पाहूनी |
भ्रमा हातफळी देऊनी | पाय तुमचे वंदितात ||२४||
बंकटलाल दामोदर | हे दोघे चतुर नर |
भ्रमातें सारुन दूर | शरण आले तुम्हांला ||२५||
बंकटलालाचें सदनास | तुम्ही राहिला कांही दिवस |
तेथे जानराव देशमुखास | मरत असतां वांचविले ||२६||
केवळ पाजुनियां तीर्था | आपुल्या पदींचे समर्था |
तुजलागी दंडवता | असो आमुचा वरचेवर ||२७||
तुझीया लिलानिधीचा | नच लागे पार साचा |
टिटवींने सागराचा | अंत कैसा घेववेल ? ||२८||
पितांबरा देऊनी भोपळा | नाल्यास तुम्ही पाठविला |
जल तें हो आणविण्यांला | तहान लागली म्हणून ||२९||
पितांबरासी बजाविलें | ओंजळीनें पाणी भले |
न पाहिजे तुंवा भरले | या माझिया भोपळयांत ||३०||
जलांत तुंबा बुडवावा | जलें पूर्ण भरुन घ्यावा |
आणि तोच मला आणून द्यावा | यांत अंतर करुं नको ||३१||
तुंबा बुडेल ऐंसे पाणी | नव्हतें नाल्यालागुनी |
विश्र्वास ठेवूनिया वचनीं | ऐसे केलें पितांबरे ||३२||
नाल्याचिया जलासी | तुंबा तो लावितां सरसी |
आपोआप त्या ठायासी | भव्य खांच पडली की ||३३||
तुंबा त्यांत भरत आला | ऐशी तुझी अगाध लिला |
ती साच वर्णण्याला | शेषही थकेल वाटते ||३४||
सोमवारी प्रदोषासी | बंकटलालच्या सदनासी |
भाविकां आपण व्योमकेशी | दिसतसां महाराजा ||३५||
यात नवल ना तिळभर | कां की तूंच शंकर रमावर |
हे जेवढे चराचर | तेवढे तुम्हींच आहात की ||३६||
तुझे स्वरुप यथातथ्य | मानवासी नाहीं कळत |
म्हणून पडती भ्रमांत | मायावश होऊनी ||३७||
प्रातः काळचे वेळीं | संपली होती दिवासळी |
जानकीराम देईना मुळीं | विस्तव तुमच्या चिलमीस ||३८||
जानकीराम सोनार | बागेसरीचा वैश्र्वानर |
द्यावयासी कुरकुर | करुं लागला असे की ||३९||
तें अंर्तज्ञानी जाणून | कौतुक दाविलें करुन |
चिलीम विस्तवांवाचून | पेटूनिया दाविली ||४०||
सोनार विस्तव देण्याला | नाहीं ऐसे वदला |
म्हणूनिया येता झाला | राग भगवंताकारणें ||४१||
चिंचवणे ते सोनाराचें | नासलें अक्षयतृतीयेचें |
प्राणघातक किड्यांचे | झालें त्यांत साम्राज्य ||४२||
अवघे टकामका पाहती | नाका पदर लाविती |
एकमेका सांगती | हें चिंचवणे खाऊ नका ||४३||
मग जानकीराम म्हणाला | साधूस विस्तव मी ना दिला |
त्याचा हा प्रत्यय आला | धन्य धन्य हा गजानन ||४४||
मग तात्काळ उठून वेगेंसी | आला बंकट सदनासी |
हकीकत बंकटलालासी | सर्व केली निवेदन ||४५||
बंकटलालाचे वशिल्यानें | चरण धरिलें सोनारानें |
अनन्य भाव भक्तींने | गजाननाचे तेधवां ||४६||
गुरुराया अंतर | मऊ आपले साचार |
तेंच कां हो केले कठोर | मजविषयी समर्था ||४७||
आतां या चिचवण्यासी | हात लावा पुण्यराशी |
त्याविण मी सदनासी | न जाय येथून ||४८||
ऐसी त्याची एकून गिरा | चिंचवण्यासी लाविले करा |
चिंचवणी तोच झारा झरा | अमृताचा विबुधहो ||४९||
यापरी जानकीराम शरण आला | अखेर आपुल्या पदाला |
मुकीनचंदु कृतार्थ केला | खाऊन दोन कान्हवले ||५०||
माधव नामें चिंचोलीचा | ब्राम्हाण एक होता साचा |
त्यास बोध अध्यात्माचा | तुम्हीच एक केलात ||५१||
भ्रांती त्याची उठविली | प्रपंच माया तोडिली |
मोक्ष पर्वणी लाधली | तया माधवाकारणें ||५२||
ऐसें आपुलें महिमान | श्रेष्ठ आहे सर्वाहून |
पदरी असल्या विपुल पुण्य | पाय तुझे सांपडती ||५३||
वसंत पूजेकारण | घनपाठी ब्राम्हाण |
आणविलेत आपण | ऐनवेळी तेधवां ||५४||
बंकटलालें आपणांसी | नेले खावया मक्यासी |
आपुलिया मळ्यासी | अति आग्रह करुनी ||५५||
मोहळें होती मळयांत | मधमाशांची भव्य सत्य |
तीं पेटविता आगटीप्रत | उठतीं झालीं निजलीलें ||५६||
मधमाशांशी पाहून | लोक करिती पलायन |
भय जिवाचें दारुण | आहे की प्रत्येकाला ||५७||
तुम्ही मात्र निर्धास्त | बैसता झाला मळयांत |
मधमाशा अतोनांत | बसल्या तुमच्या अंगावरी ||५८||
लोक दुरुन पाहती | परी न कोणाची होय छाती |
तुम्हां सोडवावया गुरुमूर्ती | मधमाशांच्या त्रासांतून ||५९||
बंकटलाल दु:खी झाला | पाहून त्या माशांला |
त्यांनी मात्र थोडा केला | प्रयत्न तुम्हां सोडविण्याचा ||६०||
कांही वेळ गेल्यावरी | तुम्हीच आज्ञा केली खरी |
मधमाशांस जाया दुरी | तें अवघ्यांनी पाहिलें ||६१||
आपुल्या आज्ञेनुसार | मधमाशा झाल्या दूर |
बंकट म्हणे सोनार| आणवितों कांटे काढावया ||६२||
कां की मधमाशांचे काटे | रुतले असतील मोठे |
ते लपून बसती बेटे | स्वामी अवघ्या शरीरांत ||६३||
म्हणून ते काढावया | सोनार आणवितो ये ठायां |
आपण म्हणालात वाया | हा त्रास घेऊं नका ||६४||
योगशास्त्र येतें मला | मी योगबलें कांटयाला |
बाहेर काढितो त्याजला | सोनार कशास पाहिजे ? ||६५||
ऐसें वदून कुंभक केला | तेधवा की आपण भला |
तेणें बाहेर काट्यांला | पडणें अवश्य झाले की ||६६||
हे कौतुक सर्वांनी | पाहिले त्या ठिकाणी |
जो तो मनुष्य जोडी पाणी | स्वामी आपणांकारणे ||६७||
आपण म्हणाला त्यावर | हे जीवांनो, घटकाभर |
बैसा या वृक्षावर | आतां कोणास चावूं नका ||६८||
संकल्प बंकटलालाचा | पूर्ण करणें आहे साचा |
सोहळा मका सेवण्याचा | निर्विघ्न त्याचा होऊं द्या ||६९||
पहा माशा उठतां क्षणी | तुम्ही गेलांत पळूनी |
संकट येतां नाही कोणही | तारिता हे ध्यांनी धरा ||७०||
लाडू, पेढे खावयास | लोक जमती विशेष |
परी साह्य संकटास | कोणीही करीना ||७१||
हे तत्व ध्यानी धरा | ईश्र्वरासी आपुला करा |
म्हणजे सफल होय खरा | तुमचा की संसार ||७२||
ऐसा उपदेश भक्तांप्रती | साच केलात गुरुमूर्ति |
एक्या मुखें करुं किंती | मी आपुलें वर्णन ||७३||
कृष्णाजीचें मळयांत | दांभिक गोसावी आले बहुत |
जे होते सांगत | शुष्क वेदांत जगाला ||७४||
त्या गोसाव्यांचा ब्रहागिरी | महंत आणिला वाटेकरी |
जो जळत्या पलंगावंरी | तुम्हांजवळ ना बैसला ||७५||
चहूंकडून होता पेटला | तो अग्नी आपण शांत केला |
तेणें त्या ब्रम्हागिरीला | कौतुक आति वाटले ||७६||
सर्व आभिमान सोडून | आपणां तो आला शरण |
अग्नीचें ते अग्नीपण | चांदण्यापरी केले तुम्ही ||७७||
टाकळीकर हरीदासाचा | घोडा अति द्वाड साचा |
तूम्ही हरविला तयाचा | द्वाडणा तो क्षणात ||७८||
घोडा आज्ञेंत वागला | तो सर्वांनी पाहिला |
अशक्य कांही आपणाला | नाही उरलें जगांत ||७९||
आडगांव आकोली गांवात | कावळे शिरता भंडा-यात |
आपण पळविले क्षणांत | आज्ञा त्यासी करुन ||८०||
अजूनपर्यत त्या ठायी | कावळा ये ना एकही |
संत जे वदतील कांही | खोटे होय कोठून ? ||८१||
प्रखर असुनी ऊन्हाळा | निर्जनशा काननाला |
ऐन दुपारचे समायाला | कौतुक केले अभिनव ||८२||
अकोलीच्या रानांत | सर्व्हे नंबर बावन्नात |
एका शुष्क गर्दाडाप्रत | बनविली तुम्ही पुष्करिणी ||८३||
भक्त आपुला पितांबर | कृपा होती त्याचेवर |
तयाचाही आधिकार | थोर आपण बनविला ||८४||
ज्योतीप्रत मिळाल्या ज्योत | भेद कांही न तेथे उरत |
खराच पितांबर पुण्यवंत | साक्षात्कारी जाहला ||८५||
वठलेल्या आंब्याला | त्यांनी आणविला पाला |
कोंडोली ग्रामाला | हे कृत्य झाले की ||८६||
भीमा अमरजा संगमासी | क्षेत्र गाणगापुरासी |
पर्णे फुटलीं टोणप्यासी | नरसिंह सरस्वती कृपेने ||८७||
तेंच कृत्य कोंडोलीतें | करविले पितांबरा हातें |
आपणची गुरुमुर्ते | हे स्वामी समर्था ||८८||
वद्य पक्षांत माघमासी | सोमवतीच्या पर्वासी |
क्षेत्र ओंकारेश्ररासी | गेले असतां भक्त तुमचे ||८९||
तेथें महानदी नर्मदेंत | नौका फुटली अकस्मात |
पाणी येऊं लागले आंत | नाव बुडूं लागली ||९०||
त्या नौकेंत आपण होतां | म्हणून नर्मदा लाबी हातां |
फुटलेल्या ठायी तत्वतां | ऐसा प्रभाव आपुला हो ||९१||
नौका कांठास लाविली | नर्मदेने आणून भली |
आपणां वदूंन गुप्त झाली | हें बहुतांनी पाहिलें ||९२||
त्र्यंबक पुत्र कवराचा | आपुला भक्त होता साचा |
जो अभ्यास वैद्यकीचा | हैद्राबादी करीत असे ||९३||
त्याची कांदा भाकर | आपण केली गोड फार |
पदार्थ सरूनिया दूर | इतरांनी आणलेले ||९४||
जैसा द्वादकाधीश भगवान | कौरवांचे पक्वान्न |
सांडूनिया भक्षण | करी विदुर कण्यांचे ||९५||
तैसेंच आपण केलें | कवराचें अन्न भक्षिलें |
ख-या भक्तीचें भुकेले | आपण आहा महाराजा ||९६||
सवडदचा गंगाभारती | तया फुटली रक्तपिती |
तो त्रासून जीवाप्रती | आला असतां आपणाकडे ||९७||
लोक अवघे तिटकारा | करुं लागलें त्याचा खरा |
कोणी न देती त्यास थारा | रोगभयें करुन ||९८||
त्या गंगाभारतीस | येऊं न देती दर्शनास |
कोणी आपल्या शेगांवास | ऐसी स्थिती जाहली ||९९||
लोक म्हणती तयाप्रत | मिसळू नकोस लोकांत |
त्रास न द्यावा यत्किंचित | तूं समर्थांकारणें ||१००||
तो गोसावी एकें दिवशी | आला आपुल्या दर्शनासी |
डोई ठेवतां पायांसी | मारिले आपण तयाला ||१||
थोबाड झोडिलें दोन्ही हातें | लाथ मारुन कमरेंते |
उलथून पाडिला रस्त्यातें | थुंकून त्याच्या अंगावरी ||२||
बेडका पडतां अंगावर | गंगाभारती हर्षला फार |
म्हणे आतां होईल दूर | व्याधी माझी नि:संशय ||३||
जो बेडका होता पडला | तोच त्याने मलम केला |
अवघ्या अंगास लाविला | चोळचोळूनीया निज हातें ||४||
ऐशा रीती सेवा करीत | राहिला गोसावी शेगांवांत |
तयाच्या महारोगाप्रत | आपण की हो निवटिलें ||५||
तुमच्या कृपेचिया पुढें | औषध काय बापुडे |
अमृत तेंही फिके पडे | ऐसा महिमा अगाध ||६||
कोणतेंही संकट जरी | येऊन पडलें भक्तांवरी |
ते निजकृपेने करीतां दुरी | आपण साच दयाळा ||७||
संकटीं खंडू पाटलाप्रत | आपण देऊन कृपेचा हात |
न्यायाधिशाचे कचेरींत | निर्दोष त्यासी सोडिलें ||८||
बाळकृष्ण रामदासी | होता बाळापूर ग्रामासी |
त्या माघ वद्य नवमिसी | समर्थदर्शन घडविलें ||९||
घटकेत दिसावा गजानन | घटकेंत सूर्याजीपंत नंदन |
घटकेत भजन ते गणगण | घटकेंत जयजय रघुवीर असे ||११०||
तेणें बाळकृष्ण घोटाळला | अखेर ओळखून आपणाला |
समर्थ म्हणूनी नमस्कार केला | काय लिला वानूं ती ||११||
संत आधकारें समान | मुळीं न तेथे आधिक न्यून |
जैसें भक्तांचे इच्छील मन | तैशी रुपें दिसती तया ||१२||
गणेशदादा खापर्डे | उमरावतीचे गुहस्थ बडे |
कुपादृष्टीने त्यांच्याकडे | पाहिले आपण सर्वदा ||१३||
या खापर्ड्याला वह्राड प्रांतीं | अनभिषिक्त राजा बोलती |
राष्ट्रोद्वाराची तळमळ ती | होती खापर्ड्यार्कारणे ||१४||
कोठे न आले अपयश त्याला | हा तुमच्या कृपेचा महिमा झाला |
बाळ गंगाधर टिळकाला | तुम्हीच कृपा केलीत ||१५||
भगवंताने अर्जुनाला | भगवद् गीतेचा उपेदश केला |
ज्य गीतेने जगाला | थक्क करुन सोडीले ||१६||
पार्थ देवाचा भक्त जरी | राहिला वनवासाभीतरी |
बारा वर्षे कांतारी | ऐसें भागवत सांगते ||१७||
भवंताचा वशिला | प्रत्यक्ष असून अर्जुनाला |
वनवास तो नाही चुकला | तैसेच झालें टिळकांचे ||१८||
संतकृपा असून | शिक्षा झाली दारुण |
ब्रम्हदेशीं नेऊन | मंडाल्याशीं ठेवीले त्या ||१९||
श्रोते त्याच मंडाल्यांत | गितारहस्य केला ग्रंथ |
जो आबालवृध्दांप्रत | मान्य झाला सारखा ||१२०||
कोल्हटकराहातें भला | आपण होता पाठविला |
भाकरीच्या प्रसादाला | मुंबईत टिळकांकारणें ||२१||
फळ हे त्या प्रसादाचें | गीतारहस्य होय साचें |
भाष्यकार गीतेचे हे | हे सहावे झाले की ||२२||
पहिले शंकराचार्य गुरुवर | दुसरे रामानुजाचार्य थोर |
मध्व, वल्लभ त्यानंतर | भाष्यकार जाहलें ||२३||
पांचवी ज्ञानेश्वर माऊली | भावार्थदीपिका टिका केली |
जी मस्तकी धारण केली | अवघ्या मुमुक्ष जनांनी ||२४||
ज्ञानेश्र्वरा नंतर | एक दोन टीकाकार |
झाले परी ना आली सर | त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची ||२५||
वामनाची यथार्थदीपिका | तैसाच गीतार्णव देखा |
हेहीं ग्रंथ भाविका | काही अंशे पटले की ||२६||
गीतेचा अर्थ कर्मपर | लावी बाळ गंगाधर |
त्या टिळकांचा अधिकार | वानाया मी समर्थ नसे ||२७||
मागील टिका समयानुसार | अवतरल्या या भूमीवर |
तैसाच आहे प्रकार | या गीतारहस्याचा ||२८||
त्या लोकमान्य टिळकांवरी | आपण कृपा केली खरी |
म्हणून तयाचा झाला करी | गीतारहस्य महाग्रंथ ||२९||
खामगांवी डॉक्टर कवरा | तीर्थ आणि अंगारा |
आपण नेऊन दिलांत खरा | ब्राम्हणाच्या वेषाने ||१३०||
ज्यायोगे व्याधी त्याची | समुळ हरण झाली साची |
तुम्ही काळजी भक्तांची | अहोरात्र वाहातसां ||३१||
कन्या हळदी माळयाची | बायजा नामे मुंडगांवची |
ही तुमच्या कृपे जनीची | समता पावती झालीसे ||३२||
वरदहस्त बायजाशिरीं | तुम्ही ठेवितां निर्धारी |
तीही झाली आधकारी | केवळ तुमच्या कृपेने ||३३||
मुंडगांवच्या पुंडलिकाला | होता जरी प्लेग झाला |
तो येता दर्शनाला | व्याधी दुर्धर हरिली तुम्ही ||३४||
सद्भक्त बापुन्याप्रती | तुम्ही भेटविला रुक्मिणीपती |
नाहीं अशक्य कोणती | गोष्ट आपणांकारणे ||३५||
एके वेळी आपणाला | गोपाळ बुटी घेऊन गेला |
भोसल्याच्या नागपूरला | अती आग्रह करुन ||३६||
गोपाळ बुटी श्रीमंत भारी | हजारों पंक्ती त्यांचे घरीं |
उठूं लागल्या वरचेवरी | केवळ आपल्या प्रीत्यर्थ ||३७||
इकडे शेगांव सुने पडले | प्रेतवत दिसूं लागले |
मुखी तेज नाही उरले | मुळींच पाटील मंडळीच्या ||३८||
शेगांवीचे पुष्कळ जन | आले नागपुरा जाऊन |
परी न झालें दर्शन | समर्थांचे कोणाला ||३९||
चौक्या पहारे सभोंवार | कडेकोट होते फार |
समर्थांच्या पायांवर | शीर ठेवणे मुष्कील झालें ||१४०||
नागपूराहून आपणाला | आणण्या हरी पाटील निघाला |
दहा पांच संगतीला | भक्त घेऊन शेगांवचे ||४१||
आला सिताबर्डीसी | गोपाळ बुटीच्या सदनासी |
तो तेथे दारापाशीं | शिपाई पाहिले दोन चार ||४२||
शिपायांनी पाटलाला | जरी होता अटकाव केला |
परी तो न त्यांनी जुमानिला | बळकट होता म्हणून ||४३||
हरी पाटील शिरला आंत | गडबड झाली तेथे बहुत |
तुम्ही धावून त्याचा हात | धरिलात की प्रेमाने ||४४||
जैसे वासरासी पाहाता | गाय धावे पुण्यवंता |
तैसेच तुम्ही समर्था | केलेंत घरी बुटीच्या ||४५||
गोपाळ बुटी धांवत आले | हरी पाटला विनविते झाले |
पाटील माझे ऐकले | पाहिजे तुम्ही थोडेसे ||४६||
भोजनोत्तर समर्थाला | जा घेऊन शेगांवाला |
तो आहे भक्तीस विकला | शेगांवकरांच्या नि:संशय ||४७||
सर्वांचे झाल्या भोजन | आपण निघाला तेथून |
आशीर्वाद तो देऊन | गोपाळ बुटीच्या कुटुंबाला ||४८||
त्या पाटील हरीवरी | कृपा आपुली अत्यंत खरी |
श्रीकल्याणस्वामीपरी | सेवेस आपुल्या तत्पर जो ||४९||
हरी पाटलाकारण | स्वामी तुमचे द्वयचरण |
हेच महानिधान | जोडले ऐसे वाटतसे ||१५०||
धार कल्याणचे रंगनाथ | आले तुम्हां भेटण्याप्रत |
गुरुराया या शेगांवांत | शेगांवाचे भाग्य मोठे ||५१||
श्रीवासुदेवानंद सरस्वती | जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती |
ऐशा जगमान्य विभूती | आल्या आपुल्या दर्शना ||५२||
जरी आपण देह ठेविला | तरी पावतसा भाविकाला |
याचा अनुभव रतनसाला | आला आहे दयानिधे ||५३||
रामचंद्र कृष्णाजी पाटील | भक्त तुमचा प्रेमळ |
त्याची तुम्ही पुरविली आळ | गोसाव्याच्या रुपाने ||५४||
तैसेच बोरीबंदरावरी | जांजळ जो कां लक्ष्मण हरी |
त्याला भेट दिली खरी | परमहंस रुपानें ||५५||
तुमच्या लिलेच्या तो पार | कोणा न लागे तिळभर |
मुंगी मेरुमांदार | आक्रमण कैशी करी ||५६||
टिटवीच्याने सागर | शोषवेल का साचार |
दासगणू हा लाचार | आहे सर्व बाजूने ||५७||
आपुली वर्णण्या लिला | महाकवीच पाहिजे झाला |
मजसारख्या घुंगुरट्याला | ते साधणे कठीण ||५८||
परी जो का असे परीस | तो सुवर्ण करी लोखंसास |
उरवी न त्याच्या ठायी दोष | लोहपणाचा येतुलाही ||५९||
आपूली लीला कस्तूरी | मम वाणी मृतिका खरी |
परी मान पावेल भूवरी | सहावासे या कस्तुरीच्या ||१६०||
माझें भाग्य धन्य धन्य | म्हणून तुमचे पाहिले चरण |
आतां न द्यावे लोटून | परत दासगणूला ||६१||
सर्वदा सांभाळ माझा करा | दैन्यदुःखातें निवारा |
भेटवा मशी शारंगधरा | भक्त बापुन्याच्यापरी ||६२||
आपल्या कृपेकरुन | सानंद राहो सदा मन |
सर्वदा घडो हरिस्मरण | तैसीच संगत सज्जनांची ||६३||
अव्याहत वारी पंढरीची | मम करे व्हावी साची |
आवड सगुण भक्तीची | चित्ता ठायी असू द्या ||६४||
अंत घडो गोदातीरीं | यावीण आशा नाही दुसरी |
स्मृती राहो जागृत खरी | भजन हरीचें करावया ||६५||
भजन करितां मोक्ष घडो | देह गोदातीरी पडो |
सद्भत्कांसी स्नेह जडो | दासगणूचा सर्वदा ||६६||
मागितले तें मला द्यावे | तैसेंच लोकांचेही पुरवावे |
आर्त गुरुवरा मनोभावे | जे या स्तोत्रा पठतील ||६७||
या स्तोत्राचा पाठ जेथ | भाव होईल तेथ तेथ |
तेथे न राहो कदा दुरित | इतुलेही दयाळा ||६८||
स्तोत्रपठाकां उत्तम गती | तैशी संतती संपत्ती |
धर्मवासना त्याच्या चित्तीं | ठेवा जागृत निरंतर ||६९||
भूतबाधा भानामती | व्हावी न स्तोत्रपठकांप्रती |
लौकिक त्याचा भूवरती | उत्तरोत्तर वाढवावा ||१७०||
हे स्तोत्र ना अमृत | होईल अवघ्या भाविकांप्रत |
येईल त्याची प्रचित | सद्भाव तो ठेवलिया ||७१||
मोठयानें करुन गर्जना | बहावें साधू गजानना |
शेगांविचा योगीराणा | सर्वदा पावो तुम्हातें ||७२||
सद्गुरुने चित्तास | पहा माझ्या करुन वास |
बोलविले या स्तोत्रास | तुमच्या हिताकारणे ||७३||
याते असत्य मानल्यास | सुखाचा तो होईल नाश |
भोगीत रहाल संकटास | वरचेवर अभक्तीने ||७४||
अभक्ती ती दूर करा | गजाननासी मुळीं न विसरा |
त्याच्या चरणी भाव धरा | म्हणजे जन्म सफल होई ||७५||
स्तोत्रपठकांची आपदा | निमेल की सर्वदा |
दृढ चित्तीं धरा पदां | गजानन साधूच्या ||७६||
वाचे म्हणता गजानन | व्याधी जातील पळून |
जैसे व्याघ्रा पाहून | कोल्हें लांडगे पळती की ||७७||
स्तोत्रपठका भूमीवरी | कोणी न राहील पहा वैरी |
अखेर मोक्ष त्याच्या करी | येईल की नि:संशय ||७८||
शके अठराशें अडुसष्टांत | श्रीक्षेत्र शेगावांत |
समाधीपुढे मंडपांत | रचियेलें स्तोत्र पहा ||७९||
फाल्गून वद्य एकादशी | मंगळवार होता त्या दिवशीं |
स्तोत्र गेले कळसासी | गजाननाच्या कृपेने ||१८०||
शांति शांति त्रिवार शांति | असो या स्तोत्राप्रती |
स्वामी गजानन गुरुमूर्ती | आठवा म्हणे दासगणू ||१८१||
|| श्रीहरिहरार्पणमस्तु || शुभं भवतु ||
|| इति श्री संतकवि दासगणू विरचित गजानन प्रर्थना स्तोत्र समाप्त ||
Ʊ Ʊ Ʊ Ʊ Ʊ