- संकलन: सदानंद पाटील, रत्गित्नागिरी.
पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात एकट्या विठोबाचीच मूर्ती आहे. तिच्या डोक्यावर साध्या मुकुटासारखी एक उंच आणि कडा असलेली टोपी आहे. भाविक ह्याच टोपीला वा साध्या मुकुटाला शिवलिंग समजतात. टोपीला जो कंगोरा आहे, त्यास पुजारी पाठीवर टाकलेल्या शिंक्याची दोरी, असे म्हणतात. हरिहरैक्याची उत्कट भावना त्यामागे दिसते. ह्या मूर्तीचा चेहरा उभट असून डोक्यावरील उंच टोपीमुळे तो अधिकच उभट वाटतो.
मूर्तीच्या कानांत मत्स्याकाराची कुंडले आहेत. तथापि ती फार मोठी असून खांद्यांवर आडवी पसरलेली असल्यामुळे ते खांद्यांचे अलंकार आहेत, असा समज होतो. विठोबाच्या गळ्यात कौस्तुभमण्यांचा हार आहे. छातीच्या डाव्या भागावर एक खळगी आणि उजव्या भागावर एक वर्तुळखंड आहे. त्यांना अनुक्रमे श्रीवत्सलांछन व श्रीनिकेतन ही नावे देण्यात आली आहेत. मूर्तीच्या दंडावर आणि मनगटावर दुहेरी बाजूबंद व मणिबंध आहेत.
दोन्ही हात कमरेवर आहेत. डाव्या हातात शंख असून उजव्या हातात कमलनाल (कमळाचा देठ) आहे. त्याचा टोकाशी असलेली कळी विठ्ठलाच्या मांजीवर लोळत आहे. हा हात उताणा आणि अंगठा खाली येईल, अशा प्रकारे कमरेवर ठेवला आहे. कमरेस तिहेरी मेखला आहे. दोन पायांना जोडणारा असा एक दगडी भाग पायांमध्ये आहे. त्यास ‘काठी’ असे म्हणतात.
कमरेवर वस्त्र असल्याच्या खुणा दिसत नाहीत असे मूर्तीकडे पाहता वाटते. संतांनीही विठोबाला अनेकदा ‘दिगंबर’ म्हटले आहे. तथापि-काहींच्या म्हणण्यानुसार-विठोबाच्या कमरेस वस्त्र आहे, असे मानल्यास काठीस विठ्ठलाच्या वस्त्राचा सोगा म्हणता येईल व हा सोगा मूर्तीच्या पावलांपर्यंत आलेला आहे, असेही म्हणता येईल.
ही पावले एका चौकोनावर असून त्यालाच ‘वीट’ म्हणतात. ह्या विटेखाली उलटे कमळ आहे. शिंक्याची दोरी व काठी अशा ज्या वस्तू दाखविल्या जातात, त्या खरोखरीच तशा आहेत, असे ग.ह. खऱ्यांसारख्या इतिहासज्ञाला वाटत नाही.
उपर्युक्त वर्णन हे पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात आज दिसत असलेल्या विठोबाच्या मूर्तीचे आणि ग.ह. खरे यांनी केलेले आहे. तथापि पंढरपूरचे मंदिर श्रीज्ञानदेवांच्याही पूर्वीचे असून तेथे जी मूळ वा आद्य मूर्ती होती, ती ही नसावी, असे मत व्यक्त केले जाते.
१६५९ साली झालेल्या अफजलखानाच्या स्वारीसारखे जेव्हा येत, तेव्हा सुरक्षित ठेण्यासाठी म्हणून विठोबाची मूर्ती मंदिरातून चिंचोली, गुळसरे, देगाव ह्यांसारख्या पंढरपूरच्या गावांत हलविण्यात येई, असे दिसते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी मूर्ती पंढरपूरजवळच असलेल्या माढे गावात नेऊन ठेविली होती आणि अफजलखानाचा वध झाल्यानंतर ती तेथून पुन्हा पंढरपूरात आणली, असे इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी म्हटले आहे. त्यानंतर ह्या संकटाचे स्मरण म्हणून माढे येथे विठोबाचे एक स्वतंत्र देऊळ आणि मूर्ती स्थापण्यात आली, असेही राजवाडे सांगतात.
विजयनगरचा राजा कृष्णराय वा कृष्णदेवराय (कार. १५०९-१५२९) हयास ठिकठिकाणच्या देवमूर्ती आणून त्यांचा विजयनगरात स्थापना करण्याचा हव्यास होता. पंढरपूची विठ्ठलमूर्तीही त्याने विजयनगरास नेली होती, आणि एकनाथांचे पणजे संत भानुदास ह्यांनी ती पुन्हा पंढरपूरास आणली अशी एक आख्यायिका आहे. ह्या आख्यायिकेला खुद्द एकनाथांनी भानुदासांच्या दिलेल्या माहितीत आधार सापडत नाही, परंतु पैठण येथील एकनाथांच्या वाड्यातील विठोबाच्या मूर्तीचे ‘विजयविठ्ठल’ असे नाव आहे. ही मूर्ती विजयानगर साम्राज्याच्या काळातील दक्षिणी विठ्ठलमूर्तीसारखीच दिसते परंतु ती आकाराने लहान वाटते.
भानुदासांच्या आख्यायिकेचा पक्का निर्णय करण्यासारखी साधने उपलब्ध नसली, तरी पंढरपूरच्या मंदिरातील विठोबाची मूर्ती वेळोवेळी हालविली जात होती व ह्या हालवाहालवीतच मूळ मूर्ती केव्हा तरी बदलली गेली असेल किंवा काय, असा प्रश्न निर्माण होतो.