श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित पाचवा अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.
“श्री गजानन विजय ग्रंथ”
अध्याय पाचवा
॥ श्रीगणेशाय नमः ॥
श्री गजानन महाराजांना प्रार्थना करताना श्री दासगणु महाराज म्हणतात, “हे अज, अजित, अद्वया, सच्चिदानंदा करुणाघणा मी तुमचे चरण वंदन करतो. मला अभय द्या. मी हीन दीन व पातकी असून, कोणताच अधिकार नसलेला एक लाचार माणूस आहे. पण जो अत्यंत हीन असतो त्याच्यावरच थोरामोठ्याची कृपा होते. आता पहा ना, शंकराने विभूती म्हणून राख धारण केली. तेव्हा हीनांचा हीनपणा मोठ्या लोकांना कमीपणा आणत नाही हे लक्षात घेऊन मला पदरात घ्या.”
आता पुढील कथा भाग श्रवण करा अशी श्रोत्यांना विनंती करून दासगणु महाराज पुढे सांगू लागले. गजानन महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरल्याने त्यांच्या दर्शनाला गर्दी होऊ लागली. महाराज गर्दीला कंटाळले व ती गर्दी टाळण्यासाठी ते महिने महिने अरण्यात भटकू लागले. कुठंही बसायचे, आपण कोण आहोत ? काय आहोत ? याचा कुणालाही पत्ता लागून देत नव्हते.त्यातच एकदा असे घडले की, एकदा महाराज पिंपळगावला गेले.तेथे पिंपळगावाच्या शिवारातील अरण्यात एक जुनेपुराणे हेमाडपंथी शिवमंदिर होते. त्या शिवाच्या मंदिरात महाराज आले आणि शिवाच्या गाभाऱ्यात पद्मासन घालून बसले. त्या मंदिराच्या परिसरात गावचे गुराखी गुरं चरायला घेऊन येत असत. त्या दिवशी गुराखी गुरांना पाणी पाजण्यासाठी मंदिरासमोरील ओढ्याकडे घेऊन आले होते. संध्याकाळ झाल्यामुळे आपापली गुरे घेऊन ते घराकडे परत निघाले. जाता जाता त्यांच्यापैकी काहीजण शंकराचं दर्शन घ्यावं , म्हणून देवळात गेले. तो तेथे त्यांना एक साधू दृष्टीस पडला. त्याला पाहून ते गुराखी आश्चर्यचकित झाले. आपापसात म्हणू लागले की, “इतक्या वेळा आम्ही देवळात येऊन गेलोय, पण इथं असं कुणी बसलेलं कधी दिसलेलं नाही!”
त्यांच्यापैकीच काही जणांनी इतरांना हाका मारून बोलवून घेतले. तर काहीजण तिथंच महाराजांच्यासमोर बसून राहिले. पण साधूने काही डोळे उघडले नाहीत व ते काही बोलले पण नाही! कोणी म्हणाले, “हा एवढा थकलेला दिसतोय की, बोलण्याचे त्राणसुद्धा याच्या अंगात उरलेले दिसत नाही.” दुसरा एक जण म्हणाला, “यांनी बरेच दिवसापासून काहीही खाल्लेलं दिसत नाही. याला आपण आपल्यातला भाकर तुकडा खायला देऊ या ”
असं म्हणून मुलांनी भाकरीचा तुकडा समर्थांच्या ग्रंथाचर धरला आणि त्यांनी तो खावा म्हणून त्यांना ते हलवू लागले. तरीही समर्थ हलेनात व आपले तोंडही उघडेनात , हे पाहून मुलं आश्चर्यचकित झाली. त्यांच्यात हा काय प्रकार असावा याबाबत चर्चा सुरू झाली. कुणी म्हंटले , ” ह्याला मृत्यू आला म्हणावं तर बसलेला आहे. शिवाय याचं अंगही गरम लागतंय. तेव्हा हा निश्चित जिवंत आहे.”
दुसरा म्हणाला , “हे भूत असेल! “त्यावर तिसऱ्याने सांगितले,” अरे शंकरापुढे भूत कधीच येत नाही.” तेवढ्यात दुसरा म्हणाला, “हा बहुतेक स्वर्गातील देव असावा. आपलं भाग्य म्हणून आपल्याला याचं दर्शन झालं ! चला, आपण याची पूजा करू. कुणीतरी जाऊन ओढ्याचं पाणी आणा बरं! “लगेच एकजण ओढ्यावर गेला. त्यानं छोट्या घागरीतनं ओढ्याचं पाणी आणलं आणि समर्थांच्या पायावर घातलं. कुणी रानफुलं आणून त्याचा हार केला आणि समर्थांच्या गळ्यात घातला. एकानं नैवेद्य म्हणून वडाच्या पानावर कांदा भाकर ठेऊन ती समर्थांच्या समोर ठेवली.
नंतर सगळ्या गुराख्यानी त्यांचा मानसन्मान करून मग स्वामींना नमस्कार केला व नंतर त्यांच्यापुढे बसून थोडावेळ भजन केलं. असा सगळा आनंदी आनंद चालू होता.
मग एक गुराखी म्हणाला, “अरे आता तर खूप उशीर झाला! आता आपल्याला घरी निघायला पाहिजे. अंधार पडू लागला. अजून गुरे रानातून कशी आली नाहीत असं लोक म्हणत असतील, कदाचीत आपल्याला पाहायला सुध्दा येतील व घरातील गोठ्यात असलेली तान्ही वासरं हंबरत असतील. चला गावात जाऊ आणि या साधूंची हकीकत गावातल्या शहाण्या वडील माणसांना सांगू या “असं म्हणून सर्व मुलं गावात निघून गेली आणि देवळातली सर्व हकीकत गावातील मंडळींना सांगितली.
ती ऐकून, अगदी सकाळी गावातली सर्व मंडळी शंकराच्या देवळात जमली. गुराख्यानी वर्णन केल्याप्रमाणे, योगीराज अजूनही तसेच बसलेले दिसले मुलांनी ठेवलेल्या भाकरीला त्यांनी हात सुद्धा लावला नव्हता. एवढ्यात कुणीतरी म्हणालं, “अरे आपल्याला दर्शन द्यायला आलेले पिंडीच्या बाहेर साक्षात शंकर आहेत. यांना आपण गावात घेऊन जाऊ. समाधी उतरली की, हे आपल्याला कोण, कुठले ते सांगतील. पण अजून समाधी उतरण्याला वेळ लागेल असं दिसतंय , तेव्हा त्यांना कोणी त्रास देऊ नका. बंगाल मध्ये जालंदर जसे गंगेच्या काठी समाधी अवस्थेत बारा वर्षे स्थिर झाले होते तसेच हे दिसतात.” अशी बरीच चर्चा झाली व शेवटी पिंपळगावच्या लोकांनी महाराजाना पालखीत बसवलं व गावातील सर्व स्त्री पुरुष पालखीमागून निघाले. पालखीच्यापुढे जोरजोरात वाद्ये वाजत होती. मधून मधून लोक महाराजांच्या वर तुळशी आणि फुले उधळत होते. महाराजांचे सगळे अंग गुलालाने माखले होते. लोक घंटा, झांजा वाजवत, योगीरायांचा जयजयकार करीत निघाले.
बघता बघता मिरवणूक गावात आली. लोकांनी महाराजांना खांद्यावर उचलून घेतले आणि मारुतीच्या मंदिरात एका मोठ्या पाटावर बसवले. तोही दिवस तसाच गेला. मग लोकांनी विचार केला की , आपणही आता उपाशी राहून त्यांचं स्तवन करू या.लोक असा विचार करत होते तेवढ्यात योग्यांचे मुकुटमणी श्री गजानन महाराज भानावर आले.
ते पाहून सगळ्यांनाच अतिशय आनंद झाला. जो तो महाराजांच्या पाया पडू लागला. सगळेजण नैवेद्य घेऊन धावले. मारुतीच्या देवळात ही गर्दी झाली! महाराजांनी प्रत्येकाच्या नैवेद्याचा थोडाफार स्वीकार केला. ही सर्व वार्ता पंचक्रोशीत पसरली. पुढच्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी जेव्हा शेगावच्या बाजाराला आले तेव्हा कौतुकाने शेगावच्या मंडळींना सांगू लागले की , ” आमच्याही गावात एक अवलिया आला आहे. तो प्रत्यक्ष परमेश्वर अवलिया आले असून थोर अधिकारी आहे. प्रत्यक्ष श्रीहरीचे पाय आमच्या पिंपळगावात पडले व आम्ही धन्य झालो. आता आम्ही त्याला कुठंही जाऊ देणार नाही. बसल्या ठिकाणी लक्ष्मी चालून आल्यावर कोण सोडणार ?”
हळूहळू शेगावच्या बाजारात जिकडे तिकडे ही वार्ता समजली. तशी ती बंकटलालनी पण ऐकली ! बंकटलाल सरळ उठले आणि पत्नीसह पिंपळगावला पोहोचले. तिथे जाऊन ते समर्थांना विनंती करू लागले व म्हणाले, “महाराज आत्ता येतो म्हणून निघून गेलात त्याला पंधरा दिवस झाले “तुम्ही गेल्यापासून अख्ख शेगांव भणभणीत दिसत आहे. गावातले सगळे लोक चिंतातुर झाले आहेत. मी तुमच्यासाठी गाडी घेऊन आलो आहे महाराज, तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर चला. माय लेकरांची ताटातूट होणे बरे नव्हे! नित्य दर्शन घेणारे तुमचे कित्येक भक्त, उपाशी राहिले आहेत. तुम्ही आला नाही तर मी देहत्याग करीन. गुरुराया आमची आस तुमच्याशिवाय कोण पुरवणार बरे?
शेवटी बंकटलालांचा हट्ट पाहून महाराज गाडीत बसून पिंपळगाव सोडून शेगावला जायला निघाले. मागे कृष्णाला न्यायला बरोबर अक्रूर गोकुळात आला होता त्याची आठवण पिंपळगावच्या लोकांना झाली. बंकटलाल त्यांना अक्रुरसारखेच दिसत होते! बंकटलाल पिंपळगावच्या लोकांना समजावित म्हणाले, “तुम्ही दुःखी होऊ नका. महाराज काही दूरवर नाहीत. तुमचे हेतू पुरवण्यासाठी तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही शेगावला दर्शनाला या , पण ही मूर्ती जिथल्या तिथं असू द्या.”
बंकटलाल पिंपळगावचे सावकार होते व त्यामुळे त्यांच्या विरोधात जाण्याची कोणाची हिम्मत नव्हती. सावकाराचं मन कोण मोडणार ? महाराज गाडीत बसून शेगावला निघाले आणि पिंपळगावकर बिचारे उदास होऊन बसलेत. जाताना महाराज बंकटलालना म्हणाले,
“दुसऱ्याचा माल बळजबरीनं न्यायचा ही तुझी पद्धत बरोबर नाही बँकटलाला? तुझ्या घरची रीत काही बरी नाही. मला तिथं राहण्याची भीती वाटते बघ! अरे, सगळ्या जगावर सत्ता चालवणाऱ्या विष्णुकांता लक्ष्मीला कोंडायला तुम्ही मागपुढं बघत नाही, तिथं मला कोण विचारणार? तिचे हाल बघून मी घाबरलो आणि पळून गेलो.”
महाराजांचे बोलणे ऐकून बंकटलाल हसून म्हणाले , ” महाराज माझ्या कुलपाला भिऊन माता लक्ष्मी थांबली म्हणता की काय ? अहो तुम्ही तिथं होतात म्हणून ती स्थिर झाली. अहो जिथं लेकरू तिथं आई , तिथं इतर कुणाचं काही चालत नाही आणि दुसरं म्हणजे आपल्या पायापुढं मला कशाचीच किंमत नाही. तुमचे पाय हेच माझं खरं धन आहे. त्यापुढे मला घरादाराची अजिबात किंमत नाही. आता यापुढे हे घर सर्वस्वी तुमचं आहे, तेव्हा घरधन्याला रखवालदार कसा अडवेल? तुम्हाला हवं तसं तुम्ही वागा. माझी फक्त एवढीच विनंती आहे की, गायी जसं बाहेर चरायला गेल्या तरी वासरासाठी संध्याकाळी गोठ्यात परततात तसं तुम्ही अवघ्या जगाचा उद्धार करा, पण मुक्काम मात्र शेगावला करा अशी समजूत घालून महाराजांना बंकटलालनी शेगावला परत आणलं. पण काही दिवस राहून महाराज पुन्हा निघून गेले.
वऱ्हाड प्रांतातच आडगाव नावाचं गाव आहे. शेगावकरांची नजर चुकवून महाराज तिथंच निघाले होते. महाराजांची चाल वायूसारखी जलद होती. त्यांना चालताना पाहणाऱ्यांना मारुतीच पुन्हा आलाय की काय असं वाटायचं ! वैशाख मासातलं रखरखीत ऊन पडलं होतं. उन्हाळा खूप प्रखर होता. आकाशात कुठं ढग म्हणून दिसत नव्हता. दुरदूरवर पाणी म्हणून नजरेला दिसत नव्हतं. अशा ऐन दुपारच्या वेळेला श्री गजानन महाराज अकोली गावाजवळ आले. ते तहानेनं अत्यंत व्याकुळ झाले होते, पण चहुकडं कुठंही पाण्याचा थेंब सुद्धा दिसत नव्हता. अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. पाण्यावाचून समर्थांचे ओठ सुकून गेले. या अशा वातावरणात दुपारच्या वेळेला भास्कर पाटील शेतात काम करीत होते. जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याची ओळख आहे. मोठेपण पदरात टाकतात पण स्थिती बघायला गेली तर त्या बिचाऱ्याला उन्हातान्हात काम करावं लागतं ही सत्य परिस्थिती आहे. त्यात अकोलीच्या रानात पाण्याचा अत्यंत दुष्काळ होता एक वेळ तूप मिळेल पण पाण्याचं नाव नको. भास्कर पाटील जेव्हा शेतात काम करण्यासाठी गेला तेव्हा त्यांनी स्वत:साठी घरातून येताना मातीच्या घागरीतून पाणी आणलं होतं. पाठीला भाकरीचे गाठोडे, डोक्यावर पाण्याची घागर घेऊनच ते शेतात आले होते. शेतात आल्यावर एका झुडपाखाली भास्कर पाटलांनी घागर ठेवली होती. तहानलेले महाराज, तेथे येऊन पाटलांकडे पाणी मागू लागले.
महाराज म्हणाले, “अरे, मला फार तहान लागली आहे, थोडं पाणी देतोस का प्यायला ? नाही म्हणू नकोस. प्यायला पाणी द्यायचं पुण्य फार मोठं असतं बाबा ! कारण पाण्यावाचून प्राणाचं रक्षण होणं अशक्य म्हणूनच धनिक लोक आम रस्त्यावर पाणपोया का उघडतात ते समजून घे.भास्करांनी हे ऐकले व महाराजाना म्हणाले “अरे, दांडग्या, तू वेडा नंगा धूत, तुला पाणी पाजण्यात कसलं रे आलं पुण्य? अनाथ, पंगू दुबळ्यांसाठी काही केलं तर ठीक आहे व असं शास्त्रवचन पण आहे. पण तुझ्यासारख्या रेड्याला जर पाणी पाजलं तर ते उलट पाप ठरेल. अरे, भूतदया करायची म्हणून कोणी सापाला पोसतो का? किंवा चोराला कुणी घरात ठेऊन घेईल काय? तू तर घरोघर भीक मागून शरीर पुष्ट केलंस. या तुझ्या कृतीने तू सगळ्यांना भार झालायस बघ! मी माझ्यासाठी डोक्यावरून पाण्याची घागर आणली आहे, तेव्हा तू आता इथ आयत्या पिठावर रेघोट्या ओढू नकोस. उगीच इथं पाण्यासाठी माझ्या विनवण्या करत बसू नको. चांडाळा, काहीही झालं तरी मी तुला पाणी देणार नाही हे नक्की! तुझ्यासारख्या जागोजागी असलेल्या निरुद्योग्यांमुळं चहूखंडात अभागी म्हणून आम्ही ओळखले जातो.”
भास्करांचे हे भाषण ऐकून महाराजांनी किंचित स्मित केले आणि ते तिथून थोड्या अंतरावर असलेल्या विहिरीकडे धावत गेले.
त्यांना तिकडे जाताना पाहून भास्कर मोठ्याने ओरडून म्हणाले, “अरे वेड्या वृथा, तिकडे कशाला जातोस? ती विहीर कोरडी ठणठणीत आहे. एवढंच नाही तर आसपास एक कोसभरात कुठेही पाणी नाही. समजलं का रे पिश्या तुला?
त्यावर समर्थ म्हणाले, “तू म्हणतोस ते खरं आहे तरी पण काही प्रयत्न करून बघतो. तुझ्यासारखे बुद्धिमान लोक पाण्यावाचून हैराण झालेले पाहून मी नुसताच स्वस्थ बसलो तर मी समाजासाठी काय केलं असं होईल आणि हे बघ जर हेतू शुद्ध असेल तर तो जगजेठी सुद्धा मदत करतो बरं का!”
असं म्हणून समर्थ विहिरीपाशी आले त्या विहिरीत महाराजांनी डोकावून पाहिलं तर तिच्यात एक थेंबही पाणी नव्हते. महाराज हताश होऊन तिथंच एका दगडावर बसले व त्यांनी आपल्या अंतःकरणात असलेल्या सच्चिदानंद दयाघन, दिनोध्दारक, जगद्गुरू अशा नारायणाचे स्मरण करायला सुरुवात केली.
ते म्हणाले, “हे देवदेवा, हे वामना, वासुदेवा, प्रद्युम्ना, राघवा, हे विठ्ठला, नरहरी अहो ही अकोली पाण्यावाचून त्रस्त झाली आहे. जमिनीत कोठेही ओल म्हणून राहिलेली नाही. पाण्यासाठी मानवी प्रयत्न करून झाले पण काही उपयोग झाला नाही म्हणून जगतमाऊंले तुमची प्रार्थना करतो या विहिरीला पाणी ये दे.उद्या ! जे घडणं शक्य नाही ते तुम्ही घडवून आणता याची किती म्हणून उदाहरणं द्यावीत, पांडुरंगा जळत्या अव्यातल्या मांजरांचं तुम्ही रक्षण केलंत, प्रल्हादाचे बोल खरे करण्यासाठी खांबात प्रकट होऊन जगाचा उद्धार केलात, करांगुलीने पर्वत उचललात अशा तुमच्या कृपेची जगात कुणाला सर येणार नाही. दामजीपंतासाठी महार झालात, चोखा मेळ्याची ढोरे ओढलीत, सावता मळ्यासाठी पाखरं हकललीत, उपमन्यूला क्षीरसागर दिलात, मारवाडात नामदेवाला तहान लागली म्हणून निर्जल प्रांतात पाणी आणलं. महाराजांनी ईश्वराला अशी विनंती केल्यावर विहिरीला एकदम झरा उफाळून आला व क्षणार्धात विहीर पाण्याने काठोकाठ भरून गेली. जगन्नाथानं सहाय्य करायचं ठरवल्यावर काय होऊ शकणार नाही? जे घडणे शक्य नसतं ते ईश्वराच्या अगाध सतेने सहजपणे घडून येतं. समर्थांनी ते पाणी पिल्याचे भास्करांनी पाहिले. तो प्रकार पाहून ते चकित झाले. अतिशय गडबडून गेले. त्यांचा काही तर्कच चालेना !
गेल्या बारा वर्षात ज्या विहिरीला पाणी म्हणून नव्हते तिला याने एका क्षणात जलमय केली ! नक्कीच हा कुणीतरी साक्षात्कारी पुरुष असून मुद्दामहून वेड्याचं सोंग घेऊन फिरतोय हे त्यांच्या लक्षात आलं. हातातलं शेतीचं काम सोडून ते धावतपळत आले. त्यांनी समर्थांचे चरण घट्ट धरले आणि मुखाने त्यांनी समर्थांची स्तुती करायला सुरुवात केली. म्हणाले, “हे दयेच्या सागरा, नरदेहधारी भगवंता, मी तुमचे अर्भक आहे, तेव्हा या लेकरावर कृपा करा. तुम्हाला न ओळखल्यानं मी तुम्हाला टाकून बोललो पण आता मात्र पूर्ण पश्चाताप झालाय, तेव्हा झाल्या अपराधाची क्षमा करा. गौळणी कृष्णाशी कशाही बोलायच्या पण चक्रपाणी त्यांच्यावर कधी रागावला नाही. हे दयाळा तुमच्या बाह्य वेशाने मला पुरते ठगवले, पण तुम्हीच चमत्कार दाखवून माझ्या शंकेचे निरसन केलेत. भगवंतांचे देवपण कृतीनेच कळते ना? आपण विहीर पाण्याने भरण्याच्या कृतीने हे दाखवून दिलेत. आता काहीही झालं तरी मी तुमचे पाय सोडणार नाही. एकदा आईची गाठ पडली की , लेकरू इतरत्र राहील का ? ही प्रपंच माया खोटी आहे हे आज कळलं. आता या दीन लेकराला परत पाठवू नका.”
त्यावर महाराज म्हणाले, “अरे, असा दुःखी होऊ नकोस. तुला आता डोक्यावरून पाण्याची घागर आणायची आवश्यकताच उरली नाही. तुझ्यासाठीच तर या विहिरीला पाणी आणलं. आता प्रपंच सोडायची भाषा करू नकोस केवळ तुझ्यासाठी पाणी आणलंय , आता बगीचा लाव !”
भास्कर म्हणाले, “महाराज, हे आमिष कशाला दाखवता? आत्तापर्यंत माझ्या मनाची विहीर कोरडी ठणठणीत होती. साक्षात्काराचा सुरुंग लावून तुम्ही हा खडक फोडलात. त्याला भक्तिभावनेचं पाणी लागलं, आता मी निःशंक मनानं भक्तीपंथाचा मळा लावीन. तुमच्या कृपेनं सन्नितीची फळझाडे मी माझ्या मनात लावीन तसेच सगळीकडे सत्कर्माची फुलझाडे लावीन. क्षणभर टिकणाऱ्या बैलवाड्यांचा आता संबंध नको.”
पहा क्षणभर झालेल्या संत संगतीचा भास्करांवर किती परिणाम झाला. केवढी उपरती झाली त्यांना! याचा आपण विचार करायला हवा. खऱ्या संताचे दर्शन हे एक आगळेच साधन आहे, त्यामुळे होणाऱ्या परिणामांचे तुकाराम बुवांनी संतचरणरजाचे अभंगात छान वर्णन केले आहे. तो अभंग पाहून मनात त्यावर विचार करावा आणि निजहितासाठी त्याची अनुभूतीही घ्यावी.
कोरड्या विहिरीस पाणी लागले हे कळल्यावर, मधाचा पत्ता लागल्यावर, मधमाशा किंवा साखर कुठं आहे कळल्यावर मुंग्या जशा धावून येतात तसे लोक स्वामींच्या दर्शनासाठी धावून आले. अपार जनसमुदाय तेथे जमला. सगळ्यांनी विहिरीचे पाणी पिऊन पाहिले. पाणी अतिशय स्वच्छ, थंड, मधुर आणि अमृताहून गोड होते. श्रीमहाराजांचा सर्वजण जयजयकार करू लागले.
नंतर श्री गजानन सिद्धयोगी, अडगावला न जाता भास्करासहीत शेगावला परत आले.
या ठिकाणी “श्री गजानन विजय ग्रंथाचा” पाचवा अध्याय सुफळ संपूर्ण होऊन जे भक्त या अध्यायाचे श्रवण, चिंतन व मनन करतील त्यांच्यावर महाराजांची अशीच कृपादृष्टी प्राप्त होईल व आपली मनोकामना पूर्ण होईल तसेच भास्करासारखे तुम्हालाही भरभरून मिळेल यात काही शंका नाही.