श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित बारावा अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.
“श्री गजानन विजय ग्रंथ”
अध्याय बारावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥
श्री गजानन विजय ग्रंथाचा बारावा अध्याय सुरू करण्यापूर्वी श्री संत कवी दासगणु महाराज श्री गणपतीची आराधना करतात. ते श्री गणेशाची स्तुती करताना म्हणतात, कि “हे गणाधीशा गणपती, मयुरेश्वरा विमल कीर्ति, माझ्या हृदयी तू आता वास कर व हा ग्रंथ कळसास ने. तू तुझ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. अवघी विघ्ने तुझे स्मरण केल्याने भस्म होतात. हे गणराया तू साक्षात् चिंतामणी असल्याने तुझ्या भक्तांनी चिंतलेल्या मनोकामना तू पूर्ण करतोस असं पुराणात सुद्धा सांगितलं आहे. तेव्हा एकदंता, लंबोदरा, पार्वतीसुता, भालचंद्रा, सिंदुरारे माझ्या मनोकामना पूर्ण कर व माझ्या चिंता पण मिटव.
अकोल्यात बच्चुलाल अग्रवाल म्हणून एक धनसंपन्न व उदार असा मारवाडी रहात होता. त्यांनी कारंज्याच्या लक्ष्मणपंत घुड्याची हकीकत आपल्या कानाने ऐकली होती. त्यामुळे ते महाराजां विषयी साशंक झाले होते.जन सामान्य महाराजांविषयी जे बोलतात ते खरं की खोटं हे त्याला पहावयाच होतं. एके दिवशी महाराज अकोल्याला आले आणि बच्चुलाल आपला भक्त आहे हे त्यांना माहीत होते म्हणून ते सरळ बच्चूलालांच्या घराच्या ओट्यावर येऊन बसले तेव्हा महाराजाना पाहून बच्चुलालाला आनंद झाला. ते श्री गजानन महाराजाना म्हणाले, “गुरुराया मला असे वाटते कि आज आपली पूजा करावी.” ते ऐकून महाराजांनी मान वाकवून दिली व तीच महाराजांनी परवानगी दिली असं बच्चूलालाला वाटलं. बच्चुलालनी वेळ न दडवता त्वरित तेथल्या तेथेच ओट्यावरच पूजेची तयारी केली व महाराजांची अत्यंत भावाने छोडशोपचार पूजा केली.प्रथम नानाप्रकारे उटणी वाटली व ती उटणी लावून “श्री” ची मनोभावे पूजा केली. त्यानंतर जरीचा पीतांबर नेसवला. अत्यंत उच्च दर्जाची महागडी काश्मीरी शालजोडी त्यांच्या अंगावर चढविली व अभ्रेस्मी म्हणून एक जरीचा रुमाल डोक्यावर फेट्यासारखा बांधला. गळ्यात सोन्याचा गोफ चढविला. हातात सलकडी व दहाही बोटांत नाना प्रकारच्या बहुमोल हिर्याच्या अंगठ्या घातल्या. महाराजांच्या गळ्यात रत्नजडित कंठ्याची माळ चढविली तेव्हा महाराज खूपच सुंदर दिसत होते. नैवेद्यासाठी जिलबी, राघवदास, पेढे पुढे ठेवले. तसेच त्रयोदश गुणी विडे आणून एका लहान तबकांत “श्री” च्या पुढ्यात आणून ठेवले. श्री गजानन महाराजांच्या सर्वांगावर सुवासिक अष्टगंध व अत्तर शिंपडल. मग गुलाब जल सुद्धा शिंपडलं. एका सुवर्णाच्या ताटात अनेक मोहोरांची फार मोठी दक्षिणा ठेवली. तिची बेरीज केली असती तर अंदाजे दहा हजार रुपये सहज होतील. पुढे श्रीफळ ठेवून बच्चूलाल अत्यंत आदराने नम्रपणे म्हणाले, “महाराज या माझ्या ओट्यावर राममंदिर बांधायची माझी इच्छा आहे कारण उत्सवाच्या वेळी मंडप घातला तरी जागा कमी असल्याने फार अडचण होते. म्हणून दयाधना माझे मनोरथ पूर्ण करा.” असं म्हणून श्री गजानन महाराजांच्या पायावर अनन्य भावानं डोकं टेकवलं. त्यावर श्री संत गजानन महाराजांनी त्याला आशीर्वाद देऊन म्हटलं कि, “श्री जानकी जीवन तुझा हेतू पूर्ण करील.” महाराज पुढं म्हणाले, “ठीक आहे, पण बच्चूलाला तू हे आज काय केलंस? हे अलंकार घालून मला पोळ्याचा बैल बनविलास काय ? मला या दागिन्यांचा काय उपयोग? मी काही पोळ्याचा बैल नाही की दसर्याचा घोडा ! मला या दाग दागिन्यांचा काय रे उपयोग? अरे हे अवघे विष आहे व मला त्याचा स्पर्श पण नको. तू ही उगाच उचापत का केली? ह्या असल्या नसत्या उपाधी तू माझ्या वर्णी लावू नकोस. बच्चूलाला तू मोठा श्रीमंत आहेस हे दाखवण्यासाठी हे प्रदर्शन मांडलस का ? अरे ज्याला जे आवडतंय तेच करावं व त्याला अर्पण करावं. मी वेडापिसा, गावभर नग्न फिरणारा संन्याशी! हे सगळं तुझं तुला लखलाभ असो बच्चूलाला! बच्चुलाला तुम्हा या प्रापंचिकाला अशा द्रव्याची आवश्यकता असते. माझा यजमान जगजेठी भीमातटी विटेवर उभा आहे. तो मला हे वैभव द्यायला नसेल का रे तयार?”
असे म्हणून महाराजांनी अंगावरचे दागिने काढून चोहीकडे फेकून दिले व अंगावरच्या वस्त्रांचीही तीच गत केली. दोन पेढे खाऊन गजानन महाराज निघून गेले. हा प्रकार पाहून अकोल्यातील पुष्कळ लोकांनी शोक केला. तेथे कारंज्याचे काही लोकं उपस्थित होते. ते म्हणू लागले “अभागी लक्ष्मण, त्यानं सुद्धा बच्चूलाला प्रमाणेच महाराजांचे पूजन केले पण धनाचा मोह मनात धरला होता व वर वर असत्य बोलून विनयानं गोड बोलून महाराजांपुढे कोरडया भक्तीचा देखावा करीत होता पण गजानन महाराजाना त्या दांभिकपणाचा गोडवा समजत नव्हता का? दांभिकांची पूजा नुसती वरचेवरच असते. “शर्कराखंडखाद्यानि” असं तोंडानं म्हणून, भुईमुगाचा कुजका दाणा देवाच्या पुढे आणून ठेवला तर त्याचे फळही त्याचप्रमाणे मिळते. लक्ष्मणाचं जे वाटोळं झालं होतं ते त्याच्या कर्मानेच झाले होते. मात्र हा बच्चुलाल आता धन्य झाला. जसं बोलला तसंच वागला. जवा एवढा सुध्दा फरक केला नाही. आता याच्या वैभवाला ओहोट हा शब्द उरला नाही. ज्याच्यावर संतकृपा झाली तो सुखीच राहतो.”
नंतर बच्चुलालांनीं संपूर्ण अकोल्यात महाराजाना शोधलं पण समर्थांचा कोठेंही थांग पता लागला नाही. याचाच अर्थ असा की, परमभक्त बच्चूलालांचा संशय दूर करण्यासाठी महाराज जाणून त्यांच्याकडे आले होते. पितांबर नावाचे गजानन महाराजांचे शिष्य शेगांवच्या मठामध्ये नेहमी महाराजांबरोबर राहात होते. त्यांनी महाराजांची खूप सेवा केली त्यामुळे त्यांची तपश्चर्या फळाला आली. एकदा भक्त पितांबर फाटके तुटके धोतर घालून महाराजांच्या समोर बसला होता. ते पाहून महाराज म्हणाले, “अरे, तुझे नांव पितांबर पण नेसायला एक धडकं धोतरही नाही तुझ्याकडं! त्यामुळं तुझं ढुंगण सगळ्यांना दिसते रे बाबा. ते तरी झांक वेड्या! नांव सोनुबाई पण हाती कथलाचाही वाळा नाही किंवा नांव गंगाबाई पण तहान भागविण्यासाठी तडफडावे लागते.मला तशातलाच हा प्रकार दिसते आहे तुझा. हे फाटके धोतर पोतरा करण्याच्या कामाचा आहे. हे आता यानंतर नेसू नकोस. हा घे माझा दुपट्टा व तो आताच नेस बरं. तुला माझा दुपट्टा देतो जरूर पण तुझा अपमान करण्यासाठी नाही हे लक्षात ठेव आणि, कोणी काहीही म्हंटलं तरी तो सोडू नकोस.”
महाराजांनी जसा तो दुपट्टा पितांबराना दिला व जेव्हा ते इतर मंडळींनी पाहिलं तेव्हा ते मत्सराने इतरांना सहन झालं नाही. स्वार्थीपणामुळे भाऊच भावाचा घात करतो हेच अगदी खरं आहे! त्या वेड्यावाकड्या प्रकाराबद्दल कशाला बोलायचं, कारण गटाराचं झाकण उघडलं तर घाण वास सुटणारच ना?
तसं पाहिलं तर श्री गजानन महाराजांचे अनेक शिष्य होते. पण खरे शिष्य हे हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच! जंगलात अनेक वृक्ष असतात त्यांतून क्वचित् कोठेतरी चंदनाचं झाड दृष्टीस पडतं तसं येथे घडलं. लोकांना चंदनासारखे असलेले पितांबर डोळ्यात खुपू लागले. ते त्याला टोचून बोलू लागले व म्हणाले, “तू महाराजांचा शिष्य आहेस ना, मग महाराजांचे वस्त्र कसे काय परिधान करतोस? आता कळली रे तुझी भक्ति! तूं नुसता खुशालचंद आहेस. तू इथं राहून सद्गुरूंचा अपमान करतोस तेव्हा तू आता येथे अजिबात राहू नकोस.”
त्यावर पितांबर म्हणाले, “मी काही गुरुंचा अपमान केलेला नाही. उलट त्यांची आज्ञा मानली. त्यानीच हे वस्त्र मला परिधान करायला सांगितलं व मी तेच तर केले व तेही महाराजांच्या आज्ञेवरूनच ना? मग ही काय अवज्ञा झाली?”
अशी बरीच भवती न भवती झाली. शिष्यांत तेढ माजली. व ती मिटवायला गजानन महाराजांनी एक युक्ती केली ते पितांबराना म्हणाले, “तू येथून दूर निघून जा. तुला माहीत आहे ना की मूल जाणते झाल्यावर आई त्याला दूर ठेवते. पितांबरा तुझ्यावर माझी खरी कृपा आहे. आता तू येथून जा व पर्यटन कर.समर्थांचे बोल ऐकून पितांबरांच्या डोळ्यांत पाणी आले. पण काय करणार बिचारा पितांबर? समर्थांची आज्ञा मोडायची असे त्याचे धाडस नव्हते .त्यांना साष्टांग नमस्कार करून मग पितांबर निघाले खरे पण मठ सोडून जाताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होते व ते एकटक मागे वळून बघत होते. मठातून निघालेले पितांबर कोंडोलीला आले आणि जवळच्या वनात आंब्याच्या झाडापाशी सतत निजगुरूंचे चिंतन करत रात्रभर बसून राहिले. सूर्य उगवल्यावर मात्र मुगळ्यांच्या त्रासाला कंटाळून ते झाडावर चढून बसले. पण सगळ्या झाडावरच मुंग्याच मुंग्या होत्या. मुंगळ्यानी थैमान घातले होते. सर्व लहान मोठ्या फांद्यांवर पितांबर जाऊन आले पण स्थिर बसायला कोठे जागा सापडेना. हे सर्व गुराखी पाहात होते. त्यांना मोठे कुतूहल वाटले.
ते आपसांत म्हणाले, “हा असा लहान सहान फांद्यावरून इकडे तिकडे माकडासारखा का बरं फिरत आहे? काही कळत नाही. बरं विचार केला तर, सगळ्या लहान सहान फांद्यावरून फिरून सुद्धा हा खाली पडला नाही.” ह्यावर दुसरा म्हणाला, “यांत आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. श्री गजानन महाराजांच्या शिष्यांठायी असे सामर्थ्य असते. यावरून असं वाटतं की, हा नक्कीच त्यांचा शिष्य असणार! चला, हा येथे आल्याचा वृतान्त गावाला सांगू.”
गुरख्यांच्या कडून बातमी कळल्यावर कोंडोलीचे अनेक लोक आम्रवृक्षापाशी कोण आलंय ते पहायला आले. पितांबरांना पाहून आपसात म्हणाले, “हा ढोंगी असावा. मुद्दामहून वेडे चाळे करून गजानन महाराजांचा शिष्य आहे असं भासवीत आहे भास्कर पाटील हे खरे गजानन महाराजांचे शिष्य होते, पण नुकताच त्यांचा अडगावात अंत झाला व समर्थांचा शिष्य मठात मिळणारे बर्फी पेढे खायचं सोडून उपाशी राहण्यासाठी येथे कशाला येतील? उगाच तर्क वितर्क करत बसण्यापेक्षा यालाच आपण स्पष्ट विचारु या . हा काय म्हणतो ते बघू, मग खरे खोटे करू.” त्यातलाच एक मनुष्य पुढे आला व पितांबराला विचारू लागला, “अरे तू कोण व कुठला? येथे कशाला आलास ? तुझा गुरू कोण? “ते आम्हाला साग? त्यावर पिंतांबर म्हणाले, “मी शेगांवचा रहाणारा असून माझं नाव पितांबर आहे. मी गजानन महाराजांचा शिष्य आहे. त्यांनी मला पर्यटन करण्याची आज्ञा दिली म्हणून येथे या झाडापाशी येऊन बसलो. मी येथे आलो मला येथे असे दिसले की आंब्याच्या मुळाशी खूप मुंगळे होते. म्हणून फांदीवर बसून वर वर चढत जाऊन मी एका फांदीवर बसलो.”
त्याचं असं बोलणं ऐकून ती आलेली माणसं खूप चिडले व म्हणाले, “श्री गजानन महाराजांचे हे असे नांव सांगून, तू आमची चेष्टा करतो काय? म्हणे मी राजाची आवडती राणी व पाहाले तर राणी असून पोटाची खळगी सुद्धा भरत नाही.” त्या गावचा एक शामराव देशमुख नावाचा एक मनुष्य होता तो म्हणाला, “अरे सोंगाड्या, काय बोलतो तू? श्री गजानन प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार आहेत व त्यांचे नांव सांगून तू त्यांना बट्टा लावू नको रे! अरे वेड्या, एके काळी त्यांनी ऋतु नसताना आंब्याच्या झाडाला फळे आणली होती. आता तू नुसती पानं तर आणून दाखव. नाही तर तुझी आता काही धडगत नाही हे लक्षात ठेव. बळीराम पाटलांचे हे सुखलेले आंब्याचे झाड आहे. त्याला तू आमच्या समोर पानं आणून दाखव. तू जर असं केलं नाहीस तर मार खाशील परंतु जर खरा असशील तर आम्हाला पूज्य होशील. कारण सद्गुरूंचे शिष्य हे बऱ्याच अंशी त्यांच्याच तोडीचे असतात, असा न्याय आहे. आता उशीर न करता हा आंबा हिरवागार करून दाखव.”
हे ऐकून पितांबर एकदम घाबरून गेला व म्हणाला, “अहो असं करू नका हो. माझी सारी कथा ऐका. एकाच खाणीत हिरे निघताना आणि गारा पण निघतात. माझंही तसंच आहे.मी इतर शिष्यांप्रमाणे गार आहे असं समजा पण माझ्यावर विश्वास ठेवा हो. या ठिकाणी मी काहीही खोटं बोललो नाही. गारेवरून खाणीला कधीच दोष येत नाही तद्वतच मी माझ्या गुरुंचं नांव चोरून का बरं ठेवावं?” त्यावर शामराव म्हणाला, “उगीच चरचर करू नकोस. शिष्य संकटात पडला की, तो सद्गुरुंचा धावा करतो. मग शिष्य जरी अधिकारी नसला तरी सद्गुरुंचा प्रभाव शिष्याला सहाय्य करतो. पितांबरची इकडे आड व तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली. बिचारा चिंताग्रस्त झाला त्यांला कांहीही सुचेनासे झाले. त्या वठलेल्या वृक्षाला पुढं काय होते ते पहायला बायका पोरांसह सर्व गावकरी मंडळी जमली. पितांबरांचा काहीही उपाय चालेना. त्यांनी दोन्ही हात जोडून सद्गुरूं श्री गजानन महाराजांचे अखंड स्तवन करायला सुरुवात केली म्हणाले, “हे स्वामी समर्थ गजानना! ज्ञानांबरीच्या नारायणा, या पदनता ताराया रक्षणासाठी आता सत्वर धावून ये. माझ्यामुळे तुमच्या भक्तीपोटी भक्त प्रेमींना दोष लागेल. तेव्हा तुमचं ब्रीद रक्षण करण्यासाठी या आंब्याच्या झाडाला पानं आणा. आता माझी सगळी भिस्त तुमच्यावर आहे. तुम्ही जर माझ्या साहाय्यासाठी आले नाही तर माझ्यावर मरण्याची वेळ येणार आहे. भक्त प्रल्हादाचे वचन सत्य करण्यासाठी खांबातून भगवान नृसिंह प्रगट झाले. जनीला सुळावर चढवत आहे असे म्हटल्यावर सुळाचे पाणी झाले. जनीचा भार देवावर होता. माझा तुझ्यावर आहे संत व देवात मुळीच फरक नाही. जेथे देव तेथेच संत असतात तर संत तेची देव साक्षात् !
मला लोकं गजाननाचा शिष्य म्हणतात. त्याला माझे काहीच महत्त्व नाही परंतु जे काही आहे ते तुझ्यामुळे. फुलांमुळे दोऱ्याला किंमत येते. तुम्ही पुष्प मी दोरा, तुम्ही कस्तुरी व मी माती हेच सत्य ! तुमच्यामुळंच माझ्यावर हे संकट आलं देवा. आता गुरुराया माझा अंत पाहू नका. येथे धावत या वठलेल्या / सुकलेल्या झाडाला कोवळी पानं आणा.” अशी प्रार्थना करून भक्त पितांबर लोकांना म्हणाले, ” सद्गुरूंच्या नामाचा गजर करा. म्हणा, जय जय गजानन ! गजानन साधुवर शेगावचा अवलिया !”
सर्व लोक पितांबराच्या म्हणण्यानुसार गजर करू लागले. तेवढ्यात वृक्षाला चीक येऊन पालवी फुटली. लोक स्वतःच्या डोळ्यांनी ते अगाध कौतुक पहात होते. पण त्यातही काही नमुनेदार लोक होतेच. ते म्हणत होते, “अहो, हे आपल्याला पडलेलं स्वप्न असेल. स्वतःलाच स्वतः चिमटा काढून पहा.” त्याप्रमाणे करून बघितल्यावर हे स्वप्न नाही हे लक्षात आले. त्यावर कोणी म्हणाले, “ही नजरबंदी असेल. गरुड्याच्या खेळात दोऱ्या सापासारख्या दिसतात, समोर खापऱ्या असल्या तरी रुपये पडलेत असे नजरेला दिसते.” पण जेव्हा लोकांनी पानं तोडून पाहिली तेव्हा तात्काळ फांदीवाटे शुभ्रसा चीक बाहेर आल्यावर त्यामुळे तोही भ्रम संपला. एवढं झाल्यावर मात्र खात्री पटली की, त्या वठलेल्या झाडाला पालवी फुटली असून श्री महाराजांच्या संतपणाची प्रचिती लोकांना पहावयास मिळाली.
श्री गजानन महाराजांचे शिष्य श्री पितांबरा विषयी कोणतीही शंका मनात न धरता ह्याला गावात घेऊन जाऊ. हा त्यांचाच शिष्य आहे. वासरासाठी गाय जशी धाऊन येते तसेच पितांबराच्या ओढीने का होईना श्री गजानन महाराज केव्हाही कोंडोलीत येतील. ते सर्वांना पटले आणि लोकांनी पितांबराची मिरवणूक काढून गावात नेले.
असा चमत्कार झाल्यावरच लोकांच्या मनात भक्तीभावना निर्माण झाली. ज्याप्रमाणे श्री गजानन महाराजांनी कल्याण नावाच्या त्यांच्या शिष्याला जगाचे कल्याण करण्यासाठी डोमगावी पाठवलं. तसेच हे कृत्य श्री गजानन महाराजांनी केलंय. त्यामुळे कोंडोली गावाचे भाग्य उदयाला आले. विशेष सांगायचं म्हणजे तो आंबा अजूनही कोंडोलीत असून त्याला इतर झाडांपेक्षा कित्तीतरी जास्त फळे येतात. मग पितांबराच्या भजनी कोंडोली गाव मार्गी लागला.जेथे हिरकणी जाईल तिथे तिला किंमत येणारच. पितांबरांचा मठ कोंडोलीत झाला आणि त्यांचा अंतही तेथेच झाला. एके दिवशी महाराज त्यांच्या मठात उद्विग्न होऊन बसले होते तेव्हा शिष्य हात जोडून विचारू लागले कि
“महाराज आपलं मन अस्थिर का बरं झालं?” त्यावर महाराज म्हणाले, “आम्हाला चिकण सुपारी आणून देणारा आमचा कृष्णा पाटील गेला. त्याची आठवण आली आहे. त्याचा मुलगा राम अजून लहान आहे आता चिकण सुपारी आम्हाला कोण देणार? राम मोठा झाल्यावर माझी चाकरी करेल म्हणून मी आता या मठात राहायला तयार नाही.”
महाराजांचे हे बोलणे ऐकून लोकांच्या लक्षात आले की, महाराजांचा आता येथून निघून जाण्याचा विचार दिसत आहे, त्यामुळे लोक चिंतेत पडले. त्यांनी असा विचार केला की, “महाराजाना आता कसेही करून येथून जाऊ देऊ नये व त्याकरीता त्यांचे चरण धरू.”
श्रीपतराव, बंकटलाल, ताराचंद मारुती इत्यादी मंडळीनी मठात येऊन महाराजांचे पाय धरले आणि म्हणाले, “महाराज आम्हाला सोडून तुम्ही इतरत्र कोठेही जाऊ नका. शेगावात जेथे तुमची इच्छा असेल तेथे राहा. पण आपण गाव सोडायचं मनात आणू नका.” त्यावर महाराज म्हणाले, “तुमच्या गावात दुफळी आहे त्यामुळे मला कोणाचीही जागा नको. जी जागा कोणाचीही नाही अशी जागा जर तुम्ही द्याल तरच मी येथे शेगावी राहीन.”
हे ऐकून मंडळीं चिंताग्रस्त झालीत. महाराजांनी आपल्याला मोठ्या संकटात टाकले आहे असें त्यांना वाटले. महाराज तर कोणाच्या जागेत राहाण्यास तयार नाहीत. सरकार यांच्यासाठी जागा कशी देईल ? आपल्याला साधूसंत गौरवास्पद आहेत पण यांचे सरकारला काय कौतुक होणार?”
बंकटलाल म्हणाले, “महाराज असं आम्हाला संकटात टाकू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल याचा भरवंसा आम्हांला वाटत नाही. त्यातून हे राज्य परक्याचे आहे. आम्हांपैकी कोणाचीही जागा मागून घ्या ती द्यायला आमची तयारी आहे.” महाराज म्हणाले, ” काय हे तुमचे अज्ञान? जमिनीची मालकी पूर्णपणे सच्चिदानंदाची आहे. भूमीवर आजवर कित्येक राजे झाले मग जागा सरकारची कशी होईल? हिचा मालक तर पांडुरंग. व्यवहारदृष्ट्या मालकी राजाकडे असते. पण तुम्ही प्रयत्न करा.
जा आता तुम्ही येथून व प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच यश येईल. आता पुढे काही बोलू नका. हरी पाटलाच्या हाताला निःसंशय यश येईल.”
ते ऐकून मंडळी हरी पाटलाकडे आली आणि त्याच्या सल्ल्याने अर्ज करून जागा मागितली. बुलढाण्याचा सर्वाधिकारी करी नावाचा एक साहेब होता. त्याने एक एकर जागा दिली व पुढे म्हणाला, कि ” तुम्ही दोन एकरासाठी जरी अर्ज केला तरीपण मी तुर्त तुम्हाला एक एकर जागा देतो. तुम्ही एक वर्षांत जागा जर व्यवस्थित केली तर तुम्हाला पुन्हा जागा देऊन तुमचा हेतू मी पूर्ण करेल.”
हा झालेला सरकारी ठराव सरकारी रेकॉर्ड मध्ये नमूद केला आहे. स्वामी गजानन समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचितच लोकोत्तर आहे. सत्पुरुषाचा हेतू पुरविण्यासाठी देव नेहमीच तत्पर असतो. सरकारने जागा दिल्यावर हरी पाटील, बंकटलाल हे वर्गणी गोळा करू लागले. डोंगरगावचा विठू पाटील, वाडेगावचा लक्ष्मण पाटील, शेगांवचा जगु आबा हेही वर्गणीचे पुढारी होते. द्रव्यनिधी क्षणांत जमा झाला व काम पण सुरू झाले.
संत कवी श्री दासगणूनी महाराजानी रचियेला श्री गजानन विजय ग्रंथाचा हा बारावा अध्याय सर्व भक्तांचे निजकल्याण करेल तेव्हा अगदी शांत चित्त ठेवून हा अध्याय श्रवण करावा.येथे बारावा अध्याय सुफळ संपूर्ण होत आहे.
शुभं भवतु !
|| श्रीहरिहरार्पणमस्तु ||