श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित पंधरावा अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.

“श्री गजानन विजय ग्रंथ”

अध्याय पंधरावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

श्री संतकवी दासगणू महाराज भगवान श्री विष्णूंचा पांचवा अवतार वामन रूपाची स्तुती करताना  म्हणतात, “हे कश्यपात्मजा वामना, हे बटुरुपधारी नारायणा,  तुम्ही बलीराजाकडून आपल्या शक्तीने दान घेऊन त्याला सुद्धा कृतार्थ केलं. तुम्ही एकीकडून वामन अवतार बटू जवळून त्यांचं मृत्यूलोकांच राज्य जरी घेतलं दुसरीकडे बळीला पाताळाच राज्य परत दिलं, त्या बळीकडून आवळा घेऊन, त्याला नारळ दिला व त्याच्या भक्तीपोटी तुम्ही त्याचे द्वारपाल झालेत. मन्वंतरानंतर बली हाच  देवांचा राजराजेश्वर होणार आहे. वामन अवतारात आपण एकाच घटकेत चारही वेदसंहिता पठण केल्यामूळे तुमची बुद्धिमत्ता केवढी मोठी विस्तिर्ण आहे हे समजायला आलं. श्रीहरीच्या एकूण अवतारात हा सोवळा अवतार म्हणता येईल. कारण या अवतारात तुम्ही कोणाचाही वध केला नाहीत. या अवतारात शत्रुमित्राच्या घरी  दिवा लावलात. देव आणि दानव या दोघांनाही हा अवतार सारखाच वंदनीय होता. देवही खुश  झाले व राक्षसांनाही सांभाळलं. तुमचे ईशरत्व जपलं. तुम्हाला वारंवार माझा नमस्कार असो. आता देवा वामना तुमचा वरदहस्त कायमचा माझ्या मस्तकी ठेवा हो.

महाराष्ट्राचे कोहिनूर असलेले व  सागरासारखी दूरदृष्टी असलेले व राजकारणात प्रभुत्व असलेले लोकमान्य श्री बाळ गंगाधर टिळकांनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत. त्या त्यांच्या कार्याचे वर्णन करण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही त्यामुळे त्यांच्या धडाडीचे मी  काय वर्णन करणार?  भीष्मा सारखे करारी व्यक्तिमत्त्व  असलेल्या टिळकांना देशाची वाईट दैन्यावस्था पाहणे कठीण झाले  कोठलाही भ्याडपणा न बाळगता सतीचे वाण घेतलं. त्यांचे वाक्‌चातुर्य बृहस्पतीसमान असल्याने त्यांचे लेख पाहून इंग्रजांचे धाबे दणाणून जात असे.  या बहादूर माणसाने स्वतःच्या कर्तृत्वाने ‘लोकमान्य’ ही पदवी मिळवली होती. एकदा अकोला येथे शिवजयंती कार्यक्रमाच्या साठी टिळकांना प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्यान देण्यासाठी यावे याकरीता लोकांनी आग्रह केला म्हणून श्री टिळकांनी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला येण्याचे मान्य केले होते. अकोल्यामध्ये उत्सवाची सर्व मोठ्या प्रमाणावर तयारी झाली. मोठमोठया विद्वान व पुढारी लोकांना निमंत्रण दिलें होते व त्यातल्या त्यात श्री टिळक येणार म्हणून गडबड उडून गेली होती. दामले, कोल्हटकर, खापर्डे इत्यादी मोठमोठे विद्वान पुढारी उत्सवानिमित्त अकोल्याला जमले होते. त्या उत्सवाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष पद  टिळकांकडेच होते व ते  नाव ऐकूनच साऱ्या वऱ्हाडातच आनंदाचे पर्व निर्माण झाले होते. खरं म्हणजे शिवजयंतीचा उत्सव याआधीच ह्या प्रांतात् व्हायला  पाहिजे होता,  कारण शिवाजीची जन्मदात्री आई वीरमाता जिजाबाई ही सिंदखेडची म्हणजे वर्‍हाडचीच होती. माता वर्‍हाडी व पिता शहाजी महाराष्ट्रीगडी अशी ही अनुपम जोडी होती. आधीच महाराष्ट्राचा काळीज असलेल्या शिवाजीचा महाराजांचा उत्सव व त्यातल्या त्यात  त्याचे अध्यक्ष बाळ गंगाधर टिळक होते हे लोकांना माहीत झाल्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. एक महिना आधीपासून उत्सवाची तयारी चालली होती. ज्याला त्याला मनातून आनंद होत होता. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले. स्वयंसेवक तयार झाले. पुष्कळांचे असे म्हणणे पडले की, या शिवजयंती उत्सवाला शेगांवच्या श्रीस्वामी समर्थ गजानन महाराजांना बोलवा म्हणजे दुधांत साखर पडेल! शिवाजीच्या राष्ट्रोद्धाराच्या कार्याला समर्थांचा साजेसा आशीर्वाद होता म्हणून कार्य तडीस गेले. टिळकांचे राजकारण हे ही जिजाई हृदयरत्‍न शिवाजी महाराजांसारखंच आहे. म्हणून त्याला श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद हवाच असा विचार आला व ही कल्पना सर्वानाच पसंत पडली. पण पुष्कळ जणांना पसंत पण पडला नाही.  नाही. ज्यांना हे आवडलं नाही ते उघडपणे म्हणाले, “त्या शेगांवाच्या अवलियाला  येथे  कशाला आणता? तो  काही तरी करुन सभेचा विक्षोभ करेल. “गण गण गणांत बोते” असं बदबडून सभेत नागवा फिरेल. हे ही पण होऊ शकेल कि तो कदाचित लोकमान्य टिळकांना मारेल सुद्धा! त्यावर काही मंडळी म्हणालीत कि, “असं बोलणं बरोबर नाही. गजानन महाराजांचे चरण वंदन सभेला लागली पाहिजेत कारण तुम्ही जे महाराजांना वेड्यासारखं बघता ती तुमची केवळ भ्रांती आहे. ते वेडे नाहीत परंतु जे वेड्यांसारखे वागतात तेव्हा त्यांना आपली प्रचिती दाखविण्यासाठी वेडेपणासारखे वागतात. पण जे कोणी विद्वान् सज्जन आहेत त्यांना ते त्वरीत आपलं खरं रूप दाखवून आपली ओळख पण करून देतात. टिळक जर खरेखुरे राष्ट्रोद्धारक असतील तर  महाराज निःसंशय त्यांच्या सभेला येतील. खऱ्या खोट्याची परीक्षा साधू संत घेत असतात. म्हणून त्यांना आमंत्रण देण्यास अजिबात घाबरू नका.” अशी बरीच भवति न भवति होऊन मंडळी महाराजांना आमंत्रण द्यायला शेगावला आली. त्यात उमरावतीचे श्रीमंत व विद्वान वकील श्री दादासाहेब खापर्डे पण होते.त्यांना पाहाताच समर्थ म्हणाले कि   म्हणाले कि, “तुमच्या शिवाजी उत्सवाच्या सभेला आम्ही नक्कीच येऊ व तेथे केवळ मौन साधून चुपचाप बसू बाबा.आम्ही तेथे  वेडयासारखं अजिबातच वागू नाही. श्री लोकमान्य टिळकांचा मनोभंग करणार नाही. राष्ट्रोद्धार करण्यासाठी बाळ गंगाधरच टिळकच  सर्वथा योग्य आहेत. यांच्यासारखा राष्ट्र प्रेमी माणूस पुढे होणार नाही. अण्णा पटवर्धन नांवाचे टिळकांचे स्नेही आहेत. ते नरसिंहसरस्वतींचे शिष्य असून आळंदीचे आहेत. या दोघांना पाहाण्यास आम्ही अकोल्यास येऊ.” तें ऐकून दादासाहेबांना फार  आनंद झाला व ते म्हणाले,

 “कोल्हटकर, पहा हो ! ह्या वर्‍हाडप्रांताच्या ज्ञानहिऱ्याने अकोल्यात झालेला सर्व वृत्तान्त जाणला. यावरुन संतांचे  ज्ञान किती अगाध आहे आणि  खर्‍या राष्ट्रपुरुषाचे यांना किती प्रेम आहे हे समजले. आपल्याला काही  बोलायची गरजच पडली नाही. तेच आपण होऊन येतो म्हणाले. चला उत्सवाला मुहूर्त तर अती उत्तम लागला. समर्थाना वंदून आपण अकोल्याला जाऊ.” असं म्हणून समर्थाना वंदन करून खापर्डे आणि कोल्हटकर अकोल्याला गेले.आता सभा आठ दिवसांवर राहिली तेव्हा वऱ्हाडातील सर्व जनसमुदाय आनंदीत झाला सर्वांना असे वाटले कि,  आम्ही टिळकांची पावले केव्हा केव्हा पाहू? शके अठराशे तीस वैशाख महिन्यात ही सभा वर्‍हाडप्रांती अकोल्यात उभारलेल्या मंडपांत झाली. त्या दिवशी वऱ्हाड प्रांतात अत्यंत महत्व असलेला अक्षय्य तृतीयेचा सण होता. तरी पण प्रचंड जनसमुदाय बाळ गंगाधर टिळकांना पहायला आला होता. लोकमान्यांना पहायाला लांब लांबून लोक आले होते व तसेच श्री गजानन महाराज सुद्धा सभेला येणार ही बातमी लोकाना अगोदरपासून माहीत असल्याने सभामंडप चिकार भरुन गेला परंतु श्री गजानन  महाराज आतापर्यंत आलेले नाही हे पाहून  जो तो मनुष्य विचारू लागला की, “अजून महाराज कसे काय आले नाहीत?” पण ते  तर सभा  सुरवात होण्यापूर्वीच सभा मंडपात येऊन बसले होते. साधु संतांची  वाणी खोटी कशी होणार?  सभेत उच्चस्थानी  कैवल्यदानी, जीवनमुक्त संत श्री गजानन महाराज गादीवर लोडाला टेकून बसले होते. सिंहासनाच्या अग्रस्थानी श्री बाळ गंगाधर टिळक,  बाजूला श्री अण्णासाहेब पटवर्धन तर दुसऱ्या बाजूला गणेश श्रीकृष्ण खापर्डे बसले होते. दामले, कोल्हटकर, भावे, व्यकंटराव देसाई हे सभेचे पुढारी उठून दिसत होते. 

                    सभेत असे कितीतरी अनेक विद्वान व्याख्याते  येवून बसले होते त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. सभेला सुरुवात झाली. ही सभा का बोलवल्या गेली व सभेची आवश्यकता का याबाबतीत अगोदर सांगितले गेले.  त्यानंतर प्रखर व्याख्याते श्री  बाळ गंगाधर टिळक हे सज्ज होऊन भाषण देण्यासाठी उभे राहिले. टिळक म्हणाले “सज्जन हो आजचा दिवस हा भाग्याचा धन्य दिवस आहे. यापूर्वी स्वातंत्र्यासाठी ज्याने आपले पूर्ण आयुष्य घालविले त्या धनुर्धर योध्याची वीरगाजी शिवाजीची महाराजांची जयंती आहे व या शुभ प्रसंगीच येथे आपण जमलो आहोत. त्या रणबहाद्दर  शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींनी आपल्या हाती धरलं होतं म्हणू त्याचा बोलबाला भरतखंडामध्ये झाला. तसंच आज येथे झाले आहे व मला  आशिर्वाद देण्यासाठी श्री गजानन महाराज  स्वतः येथे आपल्या सभेला आले आहेत. म्हणून जसे श्री शिवाजी महाराज आपल्या कार्यात यशस्वी झालेत त्याच प्रमाणे आजची आपली सभा यशस्वी होईल. सध्या आपल्या देशाला  अशाच सभेची जरुरी आहे. सध्या स्वातंत्र्य सूर्य मावळला असून दास्यत्वाचा काळोख पडला आहे. ज्या समाज स्वतंत्र नाही तो समाज प्रेतवत असतो.हे कार्य शिक्षणामुळेच पूर्ण होऊन त्यामुळे राष्ट्रप्रेम वाढेल. व  असे शिक्षण आता येणाऱ्या पिढीला देणे भाग आहे हे निश्चित. ते शिक्षण सध्याचे सरकार आपल्या मुलांना देत आहे का?”

 श्री गजानन महाराज आपल्या आसनावरून उठून बसले व त्रिवार गर्जून बोलले, “नाही नाही.”

 आवेशाच्या भरात गंगाधर सुत जे बोलले ते इंग्रज सरकारला सहन होणार नाही. त्या भाषणाचा रोख समर्थांनी जाणला आणि हसत हसत म्हणाले, “अरे तुझ्या अशा बोलण्यानेच दोन्ही हातात बेड्या पडतील.”  

असं बोलून गण गणात बोते असे भजन करु लागले. सभा निर्विघ्न पार पडली. टिळकांची वाहवा झाली.समर्थांचे भाकीत त्याच वर्षी सत्य झाले. भूपतीने टिळकाना एकशे चोवीस कलमा खाली पकडले. दंडाला दोर्‍या पडल्या. शिक्षेचा  दुर्धर प्रसंग आला. राजसत्तेच्या पुढे  कोणाचेही चालत नाही.मोठं मोठे वकील टिळकांच्या साठी झटूं लागले. टिळकांची जी जिव्हाळ्याची जवळची आवडती  मंडळी होती त्यांनी पारमार्थिक उपायाची एक योजना केली. दादासाहेब खापर्डे हे उमरावतीचे खूप मोठे गर्भ श्रीमंत व मोठे वकील होते. ते टिळकांची केस लढण्यासाठी साठी उमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले. अकोल्याच्या स्टेशनावर ते कोल्हटकराना म्हणाले, “तुम्ही शेगांवला जाऊन समर्थाना विनंती करा की, बाळ गंगाधर टिळकाना सोडवा.आता  प्रसंग मोठा दुर्धर आहे. मीच तेथे महाराजांकडे गेलो असतो पण मला मुंबईला जायला आवश्यक आहे म्हणून तुम्ही शेगांवला जाऊन महाराजाना विनंती करा. असे म्हणून ते लगेच गाडीत बसले. इकडे टिळक-भक्त कोल्हटकर शेगावला स्वामी गजाननाकडे आले. तेव्हा महाराज आपल्या मठात झोपले होते. तीन दिवस झाले पण ते यत्किंचितही हलले नाहीत. कोल्हटकरही टिळकांविषयी वाटणाऱ्या कळकळीमुळे कमालीच्या चिकाटीने मठातच तसेच बसून राहिले. जो बिगारी असेल तो कधीच असं वागणार नाही.

 “जाळावांचून  कढ नाही व, मायेवांचून रड  नाही” अशी  एक म्हण मराठीत  आहे, त्या उक्तीच येथे प्रत्यंतर आलं.चवथ्या दिवशी श्री गजानन महाराज उठले व कोल्हटकराना म्हणाले, “तुम्ही आटोकाट प्रयत्‍न केले तरी पण त्याचा आता काहीही लाभ होणार नाही. अरे छत्रपती शिवाजीला महाराजाना रामदास स्वामींचा वशिला होता पण बादशाही अमंलात तो कैद झाला. सज्जनास त्रास झाल्याशिवाय  राज्यक्रांती होत नाही. कंसाचा इतिहास पाहा  म्हणजे तुम्हाला हे सर्व कळेल. बरं आता मी ही भाकरी देतो ती टिळकांना खायला घाला. यात काहीही फरक करू नका. या भाकरीच्या बळावर तो मोठी कामगिरी  करेल. तो फार दूर जात आहे पण त्याला इलाज नाही. महाराजांचं उत्तर ऐकून कोल्हटकर साशंक झाले. पण काहीही न बोलता त्यांनी समर्थाना नमस्कार करून भाकरी हातात घेतली आणि मुंबईला नेऊन टिळकाना खायला घातली. त्यांना सर्व वृत्तान्त कथन केला. तो ऐकून लोकांना टिळक हसत हसत  म्हणाले, “स्वामींचे ज्ञान अगाध व सत्य आहे. तुम्ही प्रयत्न करत आहात ते  खरे आहे, पण तुमच्या प्रयत्‍नाना निश्चित यश येणार नाही असं मला सुद्धा दिसतंय. सरकार त्यांच्या बाजूचं रक्षण करण्यासाठी न्यायाची रक्षा करणार  नाही. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो. हा जगाचा सिद्धान्त आहे. तो खोटा कसा काय होईल? माझ्या हातून मोठी कामगिरी  होणार आहे असं महाराज म्हणतात हे एक गूढ रहस्य आहे. भूत भविष्य वर्तमान हे साधु संताना माहीत असतं. आपण  आहोत सामान्य माणसं! 

आता पुढे बघू काय होईल ते? प्रसाद म्हणून दिलेली भाकरी तोंडात दात नसल्याने त्यांनी कुसकरुन खाल्ली. कारण त्यांना प्रसाद वाया घालवायचा नव्हता.  टिळकांना शिक्षा होऊन सरकारने त्यांना ब्रह्मदेशी नेऊन मंडाल्याच्या तुरुंगात डांबून ठेवले. तेथे त्यांनी गीतेवर टीका लिहून “गीतारहस्य” नावाचा मोठा ग्रंथ लिहिला. हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली होती व हेच गूढ रहस्य श्री गजानन महाराज त्यावेळी अप्रत्यक्ष सांगत होते त्यामुळे  त्यांना जगतगुरूंसारखा मान मिळाला. या गीताशास्त्रावर अनेक टीका झाल्या आहेत. आत्तापर्यंत बऱ्याच आचार्यांनी जगाचा उद्धार करण्यासाठी वेळेनुसार  गीतेची मांडणी केली आहे. एकाच गीतेची कोणी अद्वैतपर  तर कोणी द्वैतपर मांडणी केली आहे. लोकमान्यांनी याच गीतेची मांडणी कर्मपर केली.जे  महाराजांनी भाकीत केलं होतं ती हीच मोठी कामगिरी  त्यांच्या हस्ते झाली होती. कारण या कामाची सर इतर कोणीही करू शकत नव्हते या कामामुळेच बाळ गंगाधर पूर्ण जगभर प्रसिद्ध झालेत.  त्यांची कीर्ति जिकडे तिकडे पसरली. टिळकांनी स्वातंत्र्य जरी मिळविले असते तरी त्यांची ही अशी किर्ती अजरामर झाली नसती. हेच येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य ही लौकिक बाब आहे हे जरी खरं असलं तरी गीता शास्त्राच मर्म समजणं हे  वेगळं आहे. गीता समाजाची घडी बसवते व परमार्थ मार्ग काय आहे ते सांगते व मोक्षपदी नेणारी आपली माता आहे व ह्याचमुळे बाळ गंगाधर टिळक हे किर्ती रूपे आजन्म चिरंजीवी राहतील.

करवीर कोल्हापुरचे चित्‌पावन ब्राह्मण श्रीधर गोविंद काळे गरिबीच्या परिस्थितीत शिकून मँट्रिकची परीक्षा पास झाले व पुढे कॉलेजमध्ये गेले पण इन्टरच्या परीक्षेत अनुत्तीर्ण  झाले म्हणून आता पुढे काय करावं ह्याच विवंचनेत  ते इकडे तिकडे फिरत होते. केसरी पत्रात आलेले ओयामा टोगो चरित्र त्यांच्या वाचनात आले होते व ते वाचून त्यांच्या मनात एक इच्छा झाली की, आपण यंत्र विद्या शिकायला विलायतेला जावं. येथे उगीच वेळ  नष्ट करण्यात काही अर्थ नाही पण टोगो, यामा या  दोघानीही ज्ञान संपादून जापानला अभ्युदयाला आणलं तसेच काही आपण येथे करून आपल्या  मातृभूमीचा उद्धार करावा. मनात अनेक विचार येत होते पण पैसे नसल्याने काहीच उपाय चालत नव्हता. कोणाकडून पैशाची मदत अशी आशा अजिबात नव्हती.  घरची अत्यंत गरिबीची परिस्थिती, काय करेल बिचारा? एकदा मनरो हायस्कुल मध्ये शिक्षक असलेल्या आपल्या मित्राला भेटण्यासाठी ते भंडार्‍याला गेले. मित्राला त्यांनी आपला विचार सांगितला तर त्यालाही त्याचा विचार पसंत पडला पण  पैशाची व्यवस्था कोठून होईल? धन द्रव्य जेथे नाही तेथे ह्या जगात काय किंमत आहे.  खर तर गरीबी मध्ये नुसते दिवास्वप्न बघावे यापेक्षा अधिक काय ? चला आता गावी करवीर कोल्हापुरला परत जाऊ. इकडे उन्हाळा फार आहे. असा विचार करून दोघे गाडीत बसले. जाता जाता त्यांनी श्री गजानन महाराजांची  कीर्ती ऐकली होती म्हणून ते शेगावातच  उतरले. पोस्टमास्तराच्या घरी आपले सामान ठेवले. मनात महाराजांना पाहण्याची फार मोठी आतुरता होती. दोघे मठात आले. श्री गजानन महाराजाना नमस्कार करून त्यांच्यासमोर हात जोडून बसले. श्रीधरांचा मनातील विचार व भावना श्री गजाननांनी मनोमनीच ओळखून ते म्हणाले, “वेड्या उगीच परदेशाचा विचार  करुं नकोस. सर्व काही येथेच आहे रे! भौतिकशास्त्रांत अर्थ नाही पण त्यापेक्षा अध्यात्म विद्या  ग्रहण करावी म्हणजे तू कृतार्थ होशील.” असं सांगितल्यावर श्रीधरांच्या मनाचे भाव बदलले व नविन विचारक्रांती जागी झाली. त्याचवेळी त्यांना कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली ती म्हणजे कुंभारगल्लीचे स्वामी. त्यांचे भक्तांशी बोलणे नेहमी असेच गूढ असायचे. हे ही तसंच कसं बोलतात ते काही कळत नाही असं श्रीधर मनात येते न येते तोच महाराज गर्जना  म्हणाले, “अरे आता आपला देश सोडण्याची काही आवश्यकता नाही. आपला देश सोडून उगाच कुठं जाऊ नकोस. ह्या भूमीत अगणित पुण्य केल्यावरच येथे जन्म होतो. तुमचे जे भौतिकशास्त्र आहे त्यापेक्षा हे योगशास्त्र बळकट आहे. ते योगशास्त्र ज्यांना येते तो या भौतिकशास्त्राला मानत नाही. योगशास्त्राहून अध्यात्म विचार श्रेष्ठ आहे. तो शक्य असल्यास तू आता कर. आता कुठंही जाऊ येऊ नकोस.”

 “श्री” नी असं म्हणताच श्रीधराना मन आतून सुखावले. श्रीधराना सुखी करण्यासाठी पश्चिमेला उगवलेला विचार सूर्य पूर्वेला उगवला. संतावाचून विचाराचे परिवर्तन अन्य कोणी करु शकत नाहीत. कारण सत्य फक्त त्यांनाच माहीत असते.

 महाराज म्हणाले, “आता येथेच तुझा अभ्युदय होईल. जा आता आपल्या घरी कोल्हापुरला ! तेथे तुझी कांता  घरी वाट पहात आहे.  जा. समर्थांचे बोल पुढे सत्य झाले. श्रीधरांनी मोठा लौकिक मिळवला व ते बी. ए. एम्‌. ए. झाले. त्यांची शिंद्यांच्या राज्यातल्या शिवपुरी येथील कॉलेजात प्रिन्सिपॉल म्हणून नेमणूक करण्यात आली. संत हे साक्षात भूमीवरचे चालते बोलते ईश्वर आहेत. त्यांच्या कृपेचा आधार ज्याला मिळेल तो मोठा होतो. आता तुम्हीच बघा श्रीधर काळेना दर्शनाचा योग आला म्हणून त्यांच्या वृत्तीत फरक पडला. हे संतांचे पीक याच देशी येते. नंदनवनीचे वृक्ष अन्य ठिकाणी येत नाहीत.

 श्री संत श्रीदासगणू महाराजांनी रचलेला  गजानन विजय ग्रंथाचा हा १५ वा अध्याय  सर्व परम भाविकांना सर्वदा सन्मार्ग दाखवो व त्यांचे कल्याण करो!  येथे हा भावभक्तीने परिपूर्ण १५ वा अध्याय सुफळ संपूर्ण!

- अनुवादक: श्री वामन रुपरावजी वानरे.

मो.09826685695