श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित अठरावा अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.

“श्री गजानन विजय ग्रंथ”

अध्याय अठरावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

श्री गजानन विजय ग्रंथाचा १८ वा अध्याय प्रारंभ करण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाची स्तुती करताना श्री दासगणु महाराज म्हणतात, “हे चिद्विलासा तुझा जयजयकार असो. हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंदकंदा, परेशा, मी कोठे कोठे दूर आहे हे तुला सर्व माहीत आहे माझ्या ह्या सर्व अडचणीच निवारण करून हे  देवा,  माझी अडचण दूर कर. हे केशवा केशीमर्दना, हे माधवा, मधूसुदना,  हे पूतनाप्राणशोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते,  चक्रपाणी, तुम्हाला हे सर्व माहीत असताना मला मग वेगळे बोलायचं काही कारण नाही.  भक्त जी जी इच्छा करतात ती ती तुम्ही श्रीहरी पूर्ण करता असं पुराणात खूप वर्णन केले आहे,  तेव्हा हे  पंढरीनाथा मनाची कठोरता सोडून माझं मनोरथ आता आपण  पूर्ण करा, कारण हा दासगणू तुमचा आहे.अकोटाचे शेजारी असलेल्या मुंडगांवात बायजा नावाची एक गजानन महाराजांची भक्तीण रहात होती. तिचा जन्म हळदी माळ्याच्या वंशांत झाला. तिच्या वडिलांचे नाव शिवराम आणि आईचे नाव भुलाबाई होते. बालपणीच बायजाचे लग्न झाले. पण भाग्यात जे विधात्यांनी लिहिले असेल तेच घडते. बायजा तारूण्यात आल्यानंतर तिला तिच्या वडिलांनी सासरी नेऊन दिले.बरेच दिवसापासून ती जेव्हा गरोदर झाली नाही तेव्हा कळले कि  जामाताच छंढ होता ते पाहून तिच्या आईवडिलांना अतिशय दुःख झाले. बायजेकडे पाहून आईला अत्यंत वाईट वाटत असे. भुलाबाई शिवरामाना म्हणत, “हिचं दुसरं लग्न करून द्यायला हवं !”  शिवराम तिला म्हणत असे कि, “असा धीर सोडू नको. काही दिवस वाट पाहू. बायजाला तेथेच सासरी ठेऊ. तिच्या नवऱ्यावर औषधोपचार करून पाहू. तिला काही उपयोग होतो का ते पाहू.” 

असा विचार करून बायजाला सासरी ठेऊन दोघे मुंडगावाला परतले. बायजा पंधरा सोळा वर्षांची होती. वयाने तरुण, काळी सावळी, दिसायला गोंडस होती त्यामुळे तिच्या थोरल्या दिराची नजर तिच्यावर पडली. तो अनेक मार्गांनी तिचे मन वळवायचा प्रयत्न करू होता. तिला म्हणत होता कि “अशी हताश होऊ नकोस. तू मला तुझ्या पतीच्या जागी समज. आयुष्यभर मी तुला सांभाळीन. तेव्हाआता झुरणे सोडून दे व आनंदित होऊन मलाच तुझा नवरा मान.” 

असं म्हणत तिच्याशी नाना प्रकारे चाळे करायचा, तिला भुलवायसाठी काहीतरी आमिष दाखवायचा. पण बायजेच्या अंतकरणाला हे बिलकुल पसंत नव्हते.

ती देवाला म्हणायची, “हे नारायणा का रे असे दैन्य मांडलंस? बाळपणापासून मी तुझ्या चरणांचं ध्यान करत आली. त्याचंच हे फळ तू मला देतोस का? ज्याचा मी हात धरला तो पुरुष नाही हे कळून आलय. माझ्या नशिबात संसार नाही. बरं झालं, आता तुझ्याठायी माझं चित्त रमेल. तेव्हा शेषशायी परिपूरणा एवढी कृपा करा की, मला कधीही परपुरुषाचा स्पर्श होऊ देऊ नको. एकदा रात्रीचे वेळी एक दिवस तिचा जेष्ठ दिर आपला हेतु सांगण्यासाठी बायजेजवळ आला. त्याची तिच्याबरोबर संभोग करण्याची इच्छा होती पण त्याला बायजाने नकार दिला आणि म्हणाली, “तुला तिळभर तरी लाज कशी काय नाही वाटत? तूं माझा ज्येष्ठ दीर म्हणजे वडिलांच्या ठिकाणी आहेस. तेव्हा हा अविचार सोड. स्वैर होऊं नकोस.”

पण ह्या तिच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. कारण तो कामांध होऊन गेला होता. कामाची वासना झाली की नीती सुद्धा नष्ट होवून जाते. तो आता बायजाच्या अंगावर हात टाकण्यास पुढं येणार तोच त्याचा थोरला मुलगा माडीवरून खाली पडला. त्याच्या डोक्याला खोक पडली तेव्हा त्याला बायजेनंच धरलं व आपल्या मांडीवर बसवून त्याला औषध लावू लागली. बायजा ज्येष्ठ दीराला म्हणाली, “या गोष्टीचा विचार करा. परस्त्रियेचा अभिलाष धरणं केव्हाही बरोबर नाही.” मुलगा पडलेला पाहून दीर घाबरला. त्याला केलेल्या कर्माचा अनुताप  झाला. त्याने बायजाचा नाद सोडला. पुढे शिवराम बायजेला घेऊन मुंडगांवी गेला. भुलाबाई आपल्या पतीला म्हणाली, “चला, आता आपण शेगावला जाऊ व बायजेबद्दल पुढील भविष्य महाराजांना विचारू.

“शिवरामाना ते पटले. त्याप्रमाणे ते, पत्नी व बायजा असे तिघेजण बायजेचे पुढील भविष्य विचारायला शेगावला आले. बायजेला महाराजांचे चरण वंदन करायला लावले आणि तिच्या आईवडीलांनी विनंती केली की,  “महाराज हिला संतान द्या, पुत्र पौत्र द्या.”  महाराजांनी ते ऐकले मात्र व  शिवरामांना हसत हसत म्हणाले की, “अरे विधात्याने हिच्या नशिबी पुत्र /पुत्री लिहिले नाहीत. जगात जेवढे म्हणून पुरुष आहेत ते हिचे तात लागतात. तेव्हा तिच्या पुन्हा लग्न करण्याच्या फ़ंदात  तुम्ही पडू नका.”

ते ऐकता शिवरामाना अनावर शोक झाला व बायजाला घेऊन ते घेऊन मुंडगांवी परतले. पण महाराजांच्या मधुर वचनांनी बायजा मनातून आनंदीत झाली. तेव्हापासून गजाननाच्या चरणी तिची निष्ठा जडली.मुंडगावातच समर्थांचा पुंडलिक नावाचा भक्त होता. त्याच्यासोबत ती शेगावला येऊ लागली. सुरवातीला तिला तिचे आईवडील काहीही बोलले नाहीत. कारण त्यांना असे वाटत होते की, बायजाने साधुचरण धरले की, तेच तिच्यावर कृपा करून तिचे कल्याण करतील. आपल्या जावयांंना पुरुषत्व देतील. संताना काय अशक्य आहे? असा विचार करून ते निश्चित होते. परंतु जेव्हा पुंडलिकाचे बरोबर बायजा जाऊं लागली तेव्हा त्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. लोक म्हणू लागले, “हे दोघे शेगावच्या वारीला जातात पण हें त्यांचे ढोंग मात्र आहे. तरुणपणी कोणाचे काय परमार्थात मन लागत असते काय? बायजा तरणीज्वान आहे. पुंडलिकही तरुण आहे. तेव्हा यांची वारी निःसंशय हीच विषय  वासनात्मक आहे. एकमेकांवर त्यांचं प्रेम जडलं आहे.

 त्यामुळे विषयसुख भोगण्यासाठी ही उभयतांची योजना आहे असे लोकांना वाटू लागले. पुंडलिक जर माळी असता तर हा संबंध ठीक झाला असता पण तो मराठा आहे व हिने माळ्याच्या पोटी जन्म घेतला आहे हे काही बरोबर दिसत नाही, म्हणून ह्या दोघांना एकमेकांपासून वेगळं केलं पाहिजे असं लोकांना वाटलं परंतू या दोघांचे मन शुध्द होते म्हणून त्यांच्या मनात कामाचा विकार नव्हता.

 भुलाई बायजाला म्हणत असे, “अरे कारटे तू अहोरात्र पुंडालिकाच्या घरी का बरं जातेस हे कांही कळत नाही. या तरुण वयांत तुम्हाला कशाचा आलाय परमार्थ? उसाच्या शेतातील कोल्हा कधी उपाशी राहील का? किंवा बाटुकाला पाहिल्यावर बैल कधी  पुढे जाईल का? कारटे आमच्या नांवाला तू उगीच काळे लावू नको.”

 भुलाई नवर्‍याला म्हणत असे “अहो  हिला अशी  ठेवू नका. माळ्याचा मुलगा पाहून हिचे लग्न लावून द्या. ही पुंडलिकाच्या घरी जाते. सदा त्याच्याशी हितगुज करते. एकमेकांना पाहून  दोघांना प्रेमाचे भरते येते. चला शेगांवला जाऊन या कारटीचे चाळे महाराजाना सांगू. संताना सगळं कळतं. ते सज्जनांचे  चाहते असतात. चंदनाच्या पोटात कधी दुर्गंधी निघेल का?”

भुलाबाई, शिवराम व बायजाबाई तसेच  पुंडलीक हे असे चौघेही पायी चालत शेगांवला आले. पुंडलिकाला पाहून महाराज म्हणाले, “पुंडलिका, बायजा ही तुझी पूर्व जन्मीची बहीण आहे. लोकानी जरी निंदा केली तरी तू हिला दूर करू नको. दोघे मिळून सच्चिदानंद श्रीहरीची पूजा व  भक्ती करा. भुले तू  आपुल्या पोरीस उगीच भलता दोष लाऊ नको. हे दोघेही पूर्वजन्मीचे बहीण भाऊ आहेत. शिवाय या बायजीला कोठेही नवरा मिळणार नाही. कारण ही संसार करायला या जगात आलीच नाही. जनाबाई जशी जन्मभर पंढरपूरला राहिली तशीच ही जन्मभर ब्रह्मचारी राहील. जनाबाईने नामदेवाला गुरू केला ही आम्हाला शरण आली आहे आता माझ्या जनाबाईला कोणीही छळू नये.” श्री गजानन महाराजांचे हे असे बोलणे ऐकल्यावर शिवराम गहिवरला व त्याच्याकडून एकही शब्द तोंडातून निघाला नाही.   मुलीला घेऊन शिवराम मुंडगांवाला आला. पुढे बायजाच्या वारीला कोणताही अडथळा आला नाही.महाराज आपल्या भक्तांचे नेहमीच रक्षण करीत असतात. भाऊ राजाराम कवर नावाचे एक डॉक्टर खामगावच्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होते. त्याना एकदा दुर्धर फोड झाला. त्यावर औषधोपचार करायला मोठमोठया डॉक्टरनी आपले उपचार चालू केले.काही डॉक्टर खामगावाला येऊन गेले पण त्यांचाही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांच्या फोडावर शस्त्रक्रिया करायला बुलढाणा, अकोला, अमरावती येथून डॉक्टर आणले. त्यांनी नाना औषधे दिली, शस्त्रक्रिया केली  पण कशाचाही उपयोग झाला नाही.त्यांचा फोड वाढू लागला. वडील बंधूही त्यांच्या दुखण्याला खूप घाबरले. व्याधि असह्य झाली त्यामुळे डॉ.भाऊ शय्येवर विव्हळत होते.  शेवटी त्यानी आपल्या मनात असा विचार केला की, आता आपले सद्गुरूं श्री गजानन महाराजांच्या चरणी शरण जावे त्याशिवाय दुसरा काही मार्ग दिसत नाही.  ते महाराजांना हात जोडून म्हणाले, “धाव धाव हे सद्गुरुनाथा,  आता लेकराचा वृथा अंत पाहूं नका.” अशी विनवणी ते वारंवार करू लागले. त्यांची पूर्ण रात्र त्यातच  जाऊ लागली. रात्रीचा सुमारे एक वाजला असेल, सर्वत्र अंधार दाटला होता. रातकिड्यांचा  किर्र किर्रर्र आवाज सुरू होता. कोल्हे कुई ने जंगल  दणाणून गेले. तेवढ्यात एक दमणी आली. ती तट्ट्याने आच्छादलेली होती व तिला खिलार्‍या बैलांची जोडी होती. बैलाच्या गळ्यातील घागर खळखळा वाजत होती. दमणीला मागे पुढे पडदा होता. ती दमणी अगदी   दरवाज्यासमोर येऊन उभी राहिली व डॉक्टरना ती दमणी आपल्या खाटेवर  पडल्या पडल्या  दिसत होती. तेवढ्यात एक ब्राह्मण दमणीतुन उतरून डॉक्टरांच्या बंगल्याचे दार ठोठावूं लागला. डॉक्टरांच्या भावांनी दरवाजा उघडला व विचारू लागला कि “आपण कोठून आलांत?” ब्राह्मण म्हणाला, “माझे नाव गजा आहे. मी शेगांव वरून तीर्थ व अंगारा घेवून आलो आहे. डॉक्टर भाऊ कवराला जो फोड झाला आहे त्या फोडावर  लावायला श्री गजानन  महाराजांनी अंगारा पाठविला आहे आणि प्यायला तीर्थ दिले आहे. हे तीर्थ आपल्या हातांत घ्या. मी आता लंगेच परत जातो कारण आता मला थांबायला अजिबात वेळ नाही.”  तीर्थ अंगारा देऊन तो ब्राह्मण निघून गेला. त्याला शोधायला भाऊने शिपाई पाठविला पण त्याचा शोध पत्ता लागला नाही. गाडी पण कोणालाच  दिसली नाही. भाऊ मनातल्या मनात  घोटाळले. त्यांचा काहीच तर्क चालत नव्हता. जसा तो अंगारा त्यांनी फोडावर लावला तसाच तो फोड  तात्काळ फुटला आणि त्या   त्या फोडातून भराभर पू बाहेर येऊ लागला. काही वेळाने त्यातील सगळा पू निघून गेला. पहा “श्री” च्या अंगार्‍याचा जोर किती विलक्षण होता ! डॉक्टर भाऊंची फोडाची अंगार आता कमी झाल्याने त्यांना झोप लागली. हळूहळू आजार बरा झाला. आजार बरा झाल्यावर व अंगात ताकद आल्यावर काही दिवसाने भाऊ  महाराजांच्या दर्शनाला शेगावला गेले.

तिथे  गेल्यावर महाराज त्यांना म्हणाले, “माझ्या गाडीच्या बैलाना चारासुध्दा दिला नाहीस ना?” हे समर्थांचे सांकेतिक भाषण भाऊना कळले आणि त्यांचे हृदय उचंबळून आले. त्यांना समजले की, त्या रात्री आलेला ब्राह्मण, माझे गजानन महाराजच होते. ते  अंतरज्ञानी अवलिया संत असल्याने  माझ्यासारख्या  लेकरासाठी खामगावला धाऊन आले. पुढं भाऊंनी व्याधी बरी झाली म्हणून अन्नदान केलं.

 एकदां गजानन स्वामी पंढरपुरला श्री चंद्रभागेच्या तिरी विठ्ठलाला भेटायला निघाले तेव्हा सोबत जगू, आबा, हरि पाटील, बापुना इत्यादी बरीच मंडळी त्यांच्यासोबत होती. वारीचे दिवस असल्याने स्पेशल गाड्या वरचेवर पंढरपूरला जात होत्या. शेगांव सोडून मंडळी नागझरीला आली. तेथील माळावरील भुयारात गोमाजी नावाचे साधू समाधिस्त झाले होते. नागझरीला जिवंत पाण्याचे झरे होते म्हणून त्या गावाचे नाव नागझरी पडले. तेथील गोमाजी बुवा साधू हे महादाजी पाटलांचे गुरू होते. शेगांवीच्या पाटील वंशाला त्यानीच प्रथम आशीर्वाद दिला होता. म्हणून शेगावची पाटील मंडळी गोमाजीला वंदून पंढरीच्या रस्त्याला लागत असत. असा त्यांचा परिपाठ होता. त्यानुसार नागझरीला येऊन हरी पाटीलांच्या सोबत महाराज आगगाडीत बसून पंढरीला आले. बापुना व  दुसरी पांचपन्नास माणसे सुद्धा सोबत  होती. तो आषाढ शुध्द नवमीचा दिवस होता. वारकर्‍यांचा समुदाय पंढरीला येऊ लागला.त्यावेळी आकाशात ढगच ढग दिसत होते. कदाचित कोठे पाऊसही पडत होता. भुवैकुंठ पंढरपुर  गजबजून गेले होते. प्रदक्षिणेच्या रस्त्यावर टाळांची फार गर्दी झाली होती. ‘जय जय रामकृष्ण हरी’ असा गजर उच्च स्वरात चालू होता त्यामुळे कोणाला कोणाचा शब्द कुणाला ऐकू येत नव्हता. असा सगळा आनंद सोहळा चालू होता. एकनाथ, निवृत्ति, ज्ञानेश्वर, सावता, गोरा कुंभार, श्री तुकोबा देहूकर, सोपान, मुक्ता, जनार्दन या संतांच्या पालख्या पंढरीला आल्या होत्या. भक्तांनी आदराने बुक्का उधळला. त्यामुळे आकाशांत जणू बुक्क्याचे  छतच तयार झाले होते. तुळशी व इतर फुलांचा घमघमित सुवास सूटला होता. त्यावेळेला शेगावची सर्व मंडळी येऊन कुकाजी पाटलाच्या वाड्यात उतरली. हा वाडा प्रदक्षिणेच्या वाटेवर चौफाळ्या शेजारी आहे. विठोबाच्या दर्शनाला राउळांत खूप गर्दी झाली होती. वारकरी भजन करत चालले होते. हाता हातावर पोलिस उभे होते. एकादशीच्या  दिवशी हरी पाटलाबरोबर बापुन्याला सोडून इतर मंडळी विठ्ठलाच्या दर्शनाला गेली होती. बापुना आंघोळीला गेला असल्याने त्याला उशीर झाला होता म्हणून इतर मंडळी दर्शनासाठी निघून गेली होती. ते निघून गेल्याचे बापुनाला स्नान करून आल्यावर कळले.  मग तोही दर्शनाचा हेतू मनात धरून पळत पळत निघाला. देवळा भोवती लोकांची अपार गर्दी झाली होती. मुंगीला सुद्धा वाट मिळेना. तिथे ह्या गरीब बापुनाला दर्शनाला कसं  मिळणार? बापुना मनात म्हणाला, “हे विठ्ठला हृषीकेशी का रे निष्ठुर झालास? मला दर्शन दे! तूं सावता माळ्यासाठी अरण्यात धाऊन गेलास. तेव्हा हे पांडुरंगा तू मला राऊळातून भेटायला ये. पण येथे तसं  दिसत नाही. मी मंदिराच्या समोर वाटेवर उभा आहे. लोक असं म्हणतात की, तूं अनाथांचा नाथ आहेस. मग देवा माझी उपेक्षा कशी केलीस?” असा पुष्कळ वेळा धांवा केला पण शेवटी हताश होऊन सूर्यास्ताच्या वेळी निराशेने आपल्या बिऱ्हाडी परतला तेव्हा त्याचे तोंड अगदी उतरून गेले होते. त्यात दिवसभराचा उपास होता. बापुनाचे मन पूर्णपणे विठ्ठलाकडे लागले होते. शरीर घरी होते पण मन मंदिराच्या आसपास भिरभिरत होते. याचे नाव म्हणतात ध्यास! त्यातच बापुनाला पाहून सगळेजण हसू लागले. म्हणाले, “हा पहा  कसा  अभागी आहे हे आता कळून आलं आहे. शेगांवाहून दर्शनासाठी म्हणून येथे पंढरीला आला. पण येथे येऊन नाना खेळ पहात फिरत बसला. याची अवघी दांभिक भक्ति! याला श्रीपती काय करणार? असे दुर्दैवी लोक ऐन वेळेला गैरहजर राहतात.” कोणी म्हणाले, “बापुनाला सगळा वेदान्त अवगत आहे. तो कशाला देवळात जाईल?”  त्याचा भगवंत त्याच्या हृदयांत आहे. वेदान्त्याचे असे मत असते की, दगडाच्या मूर्तीत काय ठेवलंय? आपण वेडे म्हणून दर्शन घ्यायला गेलो. बापुनाचा नारायण त्याच्या मनात येईल तिथं उभा असतो.”

त्यावर दुसरा म्हणाला, “हा येथे कशास आला? शेगावलाच त्याला ईश्वर भेटला नसता का? अहो हे वेदान्ती लोकांना ज्ञान सांगतात. वेडंवाकडं बोलतात. पण यांना अनुभवाचा लेश मात्र नसतो. सगुणोपासना पूर्ण झाल्यावरच ज्ञान होणार आहे ना? लहानपण आल्याशिवाय तरुणपणा कसा येईल? “असा अनेकांनी त्याचा उपहास  केला. एवढया लोकांपुढे एकट्याचा टिकाव कोठून लागणार? निराश झालेला बापुना उपाशीपोटी तसाच बसला होता. श्री गजानन स्वामी हे सर्व निद्रेतूनच आपल्या जागेवरून  पहात होते. गरीबाचे साकडे साधूलाच पडत असते. सत्संगती ज्याला घडते तेच खरे भाग्यवान! समर्थ बापुनाला म्हणाले, “दुःख नको करूस. ये तुला रुक्मिणीरमणावराला भेटवितो.” असं म्हणून महाराज कटीवर हात ठेऊन उभे राहिले. पायही समचरण ठेवून आता हरीचे दर्शन देण्यासाठी सज्ज झाले.  तुळशीफुलांच्या माळा गळ्यात होत्या. बापूनाच्या दृष्टीला सांवळी गोमटी मुर्ती पडली. त्यानं पायांवर डोके ठेवले. डोकं वर उचलुन पाहतो तर अगोदर सारखे श्री गजानन महाराज दिसले. विठोबाच्या दर्शनाने बापुनाच्या मनाला अत्यंत आनंद झाला. धोतर, पागोटे आणि शेला जो त्यानं बघितला तोच देवळातल्या विठोबाच्या मूर्तीच्या अंगावर होता. ही गोष्ट इतरांनीही बघितली. ते महाराजांना म्हणाले, “आम्हालाही तसंच दर्शन होऊ द्या. आम्हांलाही पुन्हा “श्रीं” च्या दर्शनाची आस आहे. “ते ऐकून महाराज म्हणाले, “बापुनासारखे तुमचं मन आधी  साफ व  निष्पाप करा. ते तसे जर  तुमच्याकडून  झाले तर मग मी दर्शन घडवीन. दर्शन ही काय बाजारात मिळणारी वस्तू आहे का? की गेलो बाजारात आणि विकत घेवून आलो? आधी आपलं मन निष्पाप करा, तरच तुम्हाला पण दर्शन घडेल.” 

 श्री गजानन महाराजांनी कुकाजीच्या वाड्यात बापुनाला साक्षात विठ्ठल दर्शन घडविले. संतत्व हा काही खेळ व मजाक नाही. संत, भगवन्त व भक्त हे तिघेही एकरूप असतात.  गुळाच्या गोडीला गुळापासून वेगळं कसं करता येईल? काला घेऊन मंडळी माघारी फिरली. बापुनाच्या मनात महाराजांनी दिलेले दर्शन मात्र डोक्यात तसच फिरत होतं. त्या पुण्याईमुळं त्याला  रसिक चतुर विद्वान असा पुत्र झाला. संतसेवा कधीही वाया जात नाही. पंढरीच्या प्रसादाने  पुत्र झाला म्हणून त्याने त्याचं नांव नामदेव ठेवले.

कवठे बहादूर गांवाचा एक माळकरी होता. तो वर्‍हाडप्रांतीचा असल्याने वाड्यात उतरला होता. पंढरपुर क्षेत्रात आषाढ द्वादशीला मरीचा प्रकोप वाढला.  मग काय विचारता? प्रेतामागे प्रेत स्मशानात जात होते. डॉक्टरच्या आदेशानुसार पोलीस घरात शिरून वारकर्‍याला ओढून काढून गाडीत बसवत आणि चंद्रभागेच्या पलीकडे कुर्डुवाडी रस्त्याला लावून देत. हा कवठे बहादूरचा वारकरी मरीने आजारी पडला. त्याला वरच्यावर पोटात कळ येऊ लागली. ज्या उलट्या होत होत्या त्याही थांबेनात.  

हातापायाना गोळे येऊ लागले. त्याची शुश्रुषा करायला कुणीही पुढं येईना. लोकांनी पोलिसांच्या भीतीने ही बातमी कोणालाही सांगितली नाही. शेगावचे सर्व लोक वापस जायला निघाले.कुकाजीचा वाडा घटकेत मोकळा झाला. हा वारकरी मात्र होता तिथंच पडला होता. कठीण समयाला कोणीच उपयोगी पडत नाही. लोक सुखाचे सोबती असतात मात्र संकटाचे वेळी उपेक्षा करतात. पण अशावेळी केवळ संत अथवा तो ईश्वरच  रक्षण करतात. वारकरी एकटाच मागं राहिलेला पाहून श्री गजानन महाराज म्हणाले, “हा ओसरीवर निजला आहे याला घेऊन चला.” 

                 लोक म्हणाले, “गुरुराया ! हा बहुतेक मेला असेल हो ! आपण याच्या नांदी लागलो तर आपल्यावर संकट येईल.  पन्नास माणसं बरोबर आहेत. मरीचा पंढरीत खूप जोर आहे. अशा स्थितीत आपण येथे थांबणे हे काही बरं नाही. चला आपण लवकर चंद्रभागेच्या पलीकडे जाऊ.”

ते ऐकून श्री गजानन महाराज  सर्वांना म्हणाले कि, “तुम्ही वेडे आहात का? आपल्या देशबंधूला सोडून जाता हे बरं नव्हे! “असं म्हणून महाराज त्या वारकऱ्याच्या  जवळ गेले. त्याच्या हाताला धरून त्यांनी त्याला उठविले व मधुर आवाजात त्याला म्हणाले, “चल रे बाबा, आपण आता आपल्या वऱ्हाड प्रांती जाऊ या.” त्यावर तो  वारकरी म्हणाला, “गुरुनाथा! आतां मी कसा काय वर्‍हाडात येवू शकतो? माझा अंत आता जवळ आला आहे व माझे कोणी नातेवाईक पण जवळ  नाही.” तेव्हा सद्गुरु श्री गजानन महाराज म्हणाले, “वेड्या! असा भिऊं नकोस. आता तुझे गंडांतर टळले बघ.”

असं म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला व त्याबरोबर त्याची उलटी बंद झाली. थोडी शक्ती आली व त्याला बरे वाटू लागले म्हणून तो लगेच उभा राहिला. संतानी ज्याला हात दिला तो दूर कसा ठेवेल? त्याला स्वतःच्या मर्जीने यम कसा नेईल हो? महाराजांचा फटका मिळाला व तो काही क्षणातच अगोदर सारखा झाला व  मंडळीच्या बरोबर, “श्री” च्या सानिध्यात चंद्रभागेच्या पैलतीरी आला. महाराजांच्या चरणी त्याने वंदन केले व तो म्हणाला, “दयाळा मला काळाच्या दाढेतून  आपण बाहेर काढलंत”. हा सर्व चमत्कार पाहून भक्तांनी महाराजांचा जयजयकार केला व  सर्वजण निर्धास्त होऊन कुर्डुवाडीला आले. पंढरीची वारी करून व नंतर  “श्री” च्या  बरोबर सर्वजण परत शेगावला वापस आलेत.

 अशाच एकदा प्रसंगी एक कर्मठ ब्राह्मण महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शेगावला आला. त्याने श्री गजानन महाराजांची फार  कीर्ति ऐकली  ऐकली होती म्हणून  त्यांचं दर्शन घेण्यासाठी मुद्दाम  शेगावला आला होता. त्याचे सोवळे ओवळे अती कडक असल्याने तो  ब्राह्मण गजानन महाराजांना पाहून  मनात सांशक झाला व  मनातच विचार करू लागला की, “व्यर्थ या वेड्याला नमस्कार करायला येथे आलो. हा नुसता भ्रष्ट नसून त्यांचा सार्वभौम शिरोमणी आहे. सोवळे ओवळे तर येथे काहीच उरले नाही तर  सर्वत्र अनाचाराचे राज्य भरले आहे. या पिशाला लोक साधू साधू कसे म्हणतात हेच मला समजत नाही. तो कर्मठ व सोवळ्या ओवळ्याचा ब्राम्हण जेव्हा तेथे रस्त्याने जात होता त्यावेळी त्याने त्या मठाच्या रस्त्यावरच एक मृत झालेले कुत्रे पाहिले तर त्यावेळी त्याचे मस्तक भणाणले कारण ते मरून आता एक प्रहर होवून गेला होता.  त्याला पाहून ब्राह्मण मनातल्या मनात  खिन्न झाला. त्याच्या मनात विचार आला, “हे कुत्रं येथे मरुन पडलं पण त्याची कोणाला पर्वा नाही व याला कोणी येथून उचलतही नाहीत. या वेड्याला महाराज महाराज म्हणतात व  सदैव गांजा फुकतात. आता एवढंच यांचं काम राहिलं आहे. जळो याचं साधुपण? मला उगीच कोठून ही बुद्धी आली देव जाणे! 

 मात्र महाराज अंतरज्ञानी असल्याने त्या ब्राम्हणाच्या मनात काय चालू आहे हे त्यांनी ओळखलं व त्यामुळे त्याचा संशय दूर करण्यासाठी  महाराज आसन सोडून उठले व  तो ब्राह्मण जिथे होता तिथे  आले व  म्हणाले, “आपण यथास्थितीत  पूजा करा. हे कुत्रे मेलेले नाही.आपण उगीच संशय घेऊं नका.” ते ऐकून तो  ब्राह्मण महाराजांवर रागावला व बोलू लागला आणि म्हणाला, “कि अरे मला तुझ्यासारखे मला वेड लागलेले नाही.येथे  कुत्रे मरून एक प्रहर झाला आहे  त्याचे प्रेत तसेच रस्त्यावर पडले आहे याचा विचार तुम्ही कोणीतरी केला काय?”

 हे ऐकून महाराज नम्रतेने म्हणाले, कि “आम्ही भ्रष्ट झाले आहोत. आम्हांला तुमच्यासम ज्ञान नाही. पण आपण तिळभरही खंत न करता पाणी आणायला घागर घेऊन माझ्यामागे सत्वर चला.”

असं म्हणून श्री गजानन महाराज कुत्र्यापाशी आले. त्यांनी जसा त्या कुत्र्याच्या  पायाला स्पर्श केला तेव्हा तसेच ते कुत्रे उठून बसले. महाराजांची ती लीला व चमत्कार बघून तो  ब्राह्मण अचभीत व निरुत्तर झाला व म्हणाला, “अरे याचा  अधिकार तर देवासारखा थोर आहे पण मी याची योग्यता न जाणता  उगीच अनाठायी  निंदा केली.”

त्याने गजानन महाराजांचे चरण वंदिले व मिठी घातली आणि म्हणाला, “गुरुवरा, माझ्या सगळ्या अजाण माणसाला क्षमा करा व माझ्या अपराधांची सुद्धा क्षमा करा व आपला वरदहस्त  माझ्या डोक्यावर ठेवा. मी अनंत अपराधी आहे. भूमीवर तुम्हीच एक थोर संत आहात व तुम्हाला त्या सोवळ्या ओवळ्याची काही गरज नाही. जगाचा उध्दार करण्यासाठीच तुम्हांला ईश्वराने येथे पाठवले आहे.”

त्याच दिवशी त्याने मोठी समाराधना केली. त्याच्या मनाची कुशंका पार मिटली व  तो अत्यंत लीन होवून प्रसाद घेऊन परत गेला.श्री गजानन महाराज साक्षात् थोर भगवंत आहेत अशी प्रचीति त्याला आली. 

 आता स्वस्ति श्री संतकवी दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचा अठरावा अध्याय येथे संपन्न होऊन ह्या अध्यायाच्या श्रवणाने आपली भक्ती महाराजांच्या चरणी दृढ होवो व आपणास सदगती मिळो व आपले सर्व मनोरथ व इच्छा पूर्ण होवोत ही प्रार्थना करून हा अध्याय सुफळ संपूर्ण!

शुभं भवतु !

श्रीहरिहरार्पणमस्तु !

- अनुवादक: श्री वामन रुपरावजी वानरे.

मो.09826685695