श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित एकविसावा अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.

  “श्री गजानन विजय  ग्रंथ”

अध्याय एकविसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

         संतकवी श्री दासगणू महाराज  “श्री गजानन विजय ग्रंथाचा”  अंतिम कळसाध्याय प्रारंभ करण्यापूर्वी परमपित्या परमेश्वराला वंदन करून त्यांची स्तुती करतात व म्हणतात, हे अनंतवेषा, अविनाशा, परेशा, ब्रह्मांडाधीशा तुमचा जयजयकार असो. तुम्हाला नमन करतो. देवा तुमचे नावच पतितपावन आहे याचा काहीतरी विचार करा. देवा आम्ही पापी जरी असलो तरी तुमचे पाप्यावर अतोनात प्रेम असते कारण तुम्ही सर्व पातक्यांचे पाप नष्ट करून त्यांचा उद्धार करता म्हणूनच तुम्ही सर्वांच्या ह्रदयात घर करून बसले आहात व त्यामुळेच तुमचे महत्त्व सर्वचजण जाणतात. हे हृषीकेशीश्वरा,  माझ्या पातकाकडे तुम्ही पाहू नका. धुणे पाण्यापाशी येते ते स्वच्छ होण्यासाठीच! म्हणून हे  घननीळा पतितांचा कंटाळा करु नका. काय भूमीने कधी सावरीला टाकून दिले आहे का? तूच पतितपावन, तूच पुण्यपावन या दोन्ही दोषांपासून तुम्ही सर्वदा अलग आहात. सूर्याला अंधाराचा नाश करायला काही कष्ट पडतात का? अंधाराचा नाश करायला त्याला काहीही करावे लागत नाही. जो जो अंधार त्याच्या समोर येईल तो तो त्याचा नाश होऊन तेथे प्रकाश होतो. हे देवा, नारायणा पापपुण्य व वासना सुद्धा तुझ्यापासूनच होतात. तुझ्याच कृपेने मोठेपणाचे रक्षण करण्यासाठी पाप्यांची निर्मिती तूच करतोस.  असो, मला आता तरी चिंतारहित करा व ह्या दासगणूला आता पदरात घ्या. हेच माझे मागणे आहे. हे पांडुरंगा, माझा तुझ्यावाचून जगात कोठेच  वशिला नाही, त्यामुळे आता सर्व काही तुझ्याच हातात आहे. श्रोतेहो आता सावध  व्हा. व आता हा  कळसाध्याय पूर्णपणे मन लावून ऐका. तुमचे भाग्य धन्य आहे व म्हणून तुम्ही संतकथा ऐकत आहात! ज्याची गजाननपदी एकनिष्ठा निष्ठा जडली आहे त्याच्या दुःखाची व संकटांची निःसंशय होळीच होते. मंदिराचं बांधकाम चालू असताना मंदिराच्या  शिखरावर एक मजूर  गवंड्याच्या हाताखाली काम करत होता. मिस्त्रीच्या हातात धोडा देत असताना त्याचा तोल गेला व वरून खाली पडला. तो एक घडीव दगडाच्या फरसबंदीवर पडला. एवढ्या उंचावरून पडल्याने तो वाचणे अशक्यच होते असं वाटून मेला मेला असे लोक ओरडू लागले. पण आश्चर्य असं की, त्याला कोठेच काही मार लागला नाही. जसा चेंडू झेलतात तसंच त्याचं झालं किंवा पायरीवरून लोक जसं सहजा सहजी उतरतात तसा  तो उतरला. नंतर तो लोकांना म्हणाला, “जसा माझा तोल गेला तसाच माझा हात कोणीतरी घट्ट धरला पण जसा माझा पाय जमिनीला येवून लागला त्याच क्षणी ती शक्ती म्हणा किंवा कोणी परमात्मा दिसेनासा झाला.” मजुराचं बोलणं ऐकून लोक अतिशय आनंदित झाले. म्हणाले, “श्री”  समर्थ कुणाचा शाप घेणार नाहीत. तुझ्यावर दैवानुसार जेव्हा तू  वरून खालील पडला होता  तेव्हा श्री गजानन स्वामी समर्थानी  स्पर्श करून तुला वाचवलं. तू केवढा भाग्याचा आहेस !”

         एक दुसऱ्या प्रसंगात जयपूरच्या एका राजपुतीन बाईला भुत प्रेताची बाधा झाली होती. तिला घरीच दत्तात्रेयांनी दृष्टान्त देऊन रामनवमीला शेगांवला जा असे सांगितले व  पुढे म्हणाले, “तिथे श्री गजानन महाराज सद्‌गुरुनाथ यांची जागती ज्योत असून ते तुझ्या अंगात असलेल्या पिशाच्याला निःसंशय मुक्ति देतील.”  असा दृष्टान्त झाल्यावर ती आपल्या दोन मुलांना घेऊन रामनवमीसाठी शेगांवला आली. प्रतिपदेपासून मोठ्या उत्सवाला आरंभ झाला होता व ठिक नवमीला अफाट जण समुदाय शेगावला जमला. 

शेगावात सभा मंडपाचे काम चालू होते. दगडाचे मोठमोठे खांब उभे केले होते. दीड फूट जाडीचा पांच फूट लांबीचा असे किती तरी दगडाचे खांब होते. रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्त काम जरी बंद होते तरी उभे केलेले खांब तसेच होते. श्रीरामजन्म  झाल्यावर प्रसादासाठी लोकांचा अपार समुदाय तेथे जमा झाला होता. तेथील गर्दीत थांगपत्ता न लागल्यामुळे ही  बाई एका खांबाच्या आश्रयाने उभी राहीली. अचानकच तोच खांब कोसळून तिच्या  शरीरावर पडला. ते पाहून लोकांना असे वाटले की, “ही बाई आता गेली, ही बाई कोण व कोठून आली हे कोणालाच माहीत नव्हतं व सोबत  दोन लहान मुलंही होती.” जशी ही घटना घडली तसेच दहावीस जणांनी त्या बाईंच्या अंगावरून खांब काढला. बाईंच्या मुखात पाणी घालून तिला लोबो डॉक्टर बाईंकडे पाठविले.ही बाई शस्त्रविद्येत अतिप्रवीण होती, जातीने ख्रिश्चन असल्याने ती येशू ख्रिस्ताची भक्त होती. तिने ह्या रजपूत बाईंना जेव्हा तपासले तेव्हा ती म्हणाली कि “यांना कुठंच काही मार लागलेला नाही.”

         हे खरोखर फार मोठी चमत्कारिक घटना होती. तो खांब दगडाचा व खूप मोठा असल्याने त्याच्याखाली शरीर सुरक्षित कसे राहीले? असंच सगळ्यांचा वाटत होतं. बाईंचे प्राण वाचले याचे लोकांना फार मोठे आश्चर्य वाटले. पण हा प्रकार एवढ्यासाठीच घडला की, खांब अंगावर पाडून गजानन महाराजांनी बाईंच्या शरीरातील भुताला मुक्ति दिली. त्यामुळे बाई बऱ्या होऊन जयपूरला जाऊन आनंदात नांदूं लागल्या. हा सगळा श्री गजानन स्वामींचा प्रभाव होता.

         एकदा एका उत्सवात नाईक नवऱ्यांच्या  मस्तकावर मंडप सोडत असताना लाकडी गोल पडला. तोही गोल मोठा होता. पण श्री गजानन महाराजांची सत्ता आगाध असल्याने कोठेही  आघात न होता नाईक नवरे वांचले. शेगावच्या कृष्णाजी पाटलांचे चिरंजीव रामचंद्र पाटील श्री गजानन महाराजांचे फार मोठे परमभक्त होते. एके दिवशी ऐन दुपारच्या वेळी   “महाराज” गोसाव्याच्या रुपाने घरी हजर झाले. “मला भूक लागली आहे व आता मला काही खायला देता का?” असं म्हणत त्यांनी रामचंद्र पाटलाना हाक मारली. पाटील मुळातच भाविक होते. त्यामुळे गोसाव्याची हाक ऐकून ते कुतुहलानं दारात आले. गोसाव्याना निरखून पाहाताच ते नक्कीच पुण्यराशी स्वामी गजानन महाराज असावेत असे त्यांना वाटले. श्री रामचंद्र पाटील गोसाव्यांचा हात धरुन त्याना घरात घेऊन आले. त्यांना बसायला पाट दिला व पाद्यपूजा केली. गोसावी पाटलाना म्हणाले, “मुला, आज मी मुद्दामहुन तुला काही सांगण्यासाठी आलो आहे, ते तू मनापासून ऐक. कर्जाची चिंता करू नकोस. ते निश्चितच फिटेल. अरे उन्हाळ्यांत गोदावरी थोडी कोरडी पडत असते तसंच हे समज. श्रीहरीचा कृपाघन वर्षल्यावर तुझ्यावर संपन्नतेला पूर येईल हे लक्षात ठेव. माझे उष्टे ज्या ठिकाणी पडेल तिथं काहीही कमी पडणार नाही. सुग्रास भोजनाचे ताट वाढून आण. मर्जीनुसार एखादे पांघरुण घाल.”

         याचक कोणीही असो तेव्हा याचकांची  पूजा करून त्यांना अन्न दक्षिणा दिल्यास ते नारायणाला पोचते याविषयीं शंका नाही पण त्यापूर्वी  आधी तो याचक शुद्ध आहे याची खात्री असावी. त्या वांचून हे कौतुक होणार नाही. पाटलांनी ताट वाढून आणले व गोसावी प्रेमाने जेवले. नंतर पाटलांनी पाच रुपये दक्षिणा त्यांच्या हातावर ठेवली तेव्हा गोसावी म्हणाले, “मला ही दक्षिणा नको. त्याऐवजी तू  गजाननाच्या मठातला कारभार संभाळला पाहिजेस. ही दक्षिणा मागण्यासाठी मी तुझ्याकडं आलो आहे, ती आनंदानं मला दे म्हणजे तुझे कल्याण होईल. श्री गजानन स्वामी समर्थ सेवेची दक्षिणा देऊन माझ्या मनाला तुष्टी दे. हे काम करायला तुझ्याशिवाय कोणी मनुष्य सध्या येथे दिसत नाही. तुझी कांता वरचेवर आजारी पडते. ही दक्षिणा दिल्याने तीही बरी होईल. तुझ्या मुलाला बोलाव. मी त्याच्या गळ्यात एक ताईत बांधतो. म्हणजे त्याला चेटूकभूत याची बाधा होणार नाही. कारण ही जमिनदारी  कठीण असते. पाण्याशीच पाणी वैरी असं येथे घडतं. पाटीलकीचे  वतन हे वाघाचे पांघरुण आहे. रामचंद्रा, त्याचा तू अति जपून उपयोग कर. कुठलं तरी भलतेच काम करायला जाऊन कुणाचा द्वेष करू घेवू नकोस. सन्नीतीला सोडू नकोस. राजाविरुद्ध जाऊ नको. साधु कोण, संत कोण?  हे शोधून पहा. दांभिकांच्या नादी कधीही लागू नको. ही व्रते पाळलीस तर श्रीनिवास तुझा ऋणी होईल. हे वचन कधी खोटे मानू नकोस. मिळकत पाहून खर्च कर. दंभाचार कधी करू नकोस. साधुसंत घरी आल्यावर त्याना विन्मुख करून कधी पाठवू नको. खर्‍या संतांचा अपमान झाला तर ईश्वराचा कोप होतो. आपल्या वंशज्यांच्यात काय कमी आहे हे पाहू नये. सोयर्‍याधायर्‍यांना समयानुसार मान द्यावा. राग असला तरी वरवर असावा पण अंतरी मात्र दया असावी.  जसे फणसावर काटे असले तरी त्यामध्ये आत गोड गरे असतात. मी रात्रंदिवस तुझ्या पाठीशी आहे हे जाणून रहा.” असं म्हणून गळ्यात ताईत बांधून गोसावी जाऊं लागला व  दाराबाहेर पडताच अंतर्धान पावला. पाटील दिवसभर मनात विचार करत होते की, “हा गोसावी  इतर कोणी नसून स्वतः श्री गजानन स्वामीच, गोसावी वेष घेऊन मला उपदेश करण्यासाठी आले होते हे मला आतां समजले.” रात्री स्वप्नात स्वामींनी त्यांच्या संशयाचे निरसन केले. असें श्री स्वामी गजानन खरे भक्तवत्सल आहेत.

         श्रीगजानन चरित्र तारक असून परम पवित्र आहे. मात्र त्याचा अनुभव येण्यास सबळ निष्ठा पाहिजे. आता वेळ न घालवता या ग्रंथाची अवतरणिका देतो. ती पूर्ण सावध होऊन वाचा. 

         प्रथम अध्यायात मंगलाचरण होवून  देव आणि गुरुना वंदन करून श्री गजाननाच्या पूर्व चरित्राबदल सांगण्यास सुरुवात केली. माघमासी सप्तमीस श्री गजानन महाराज शेगावला देवीदासाच्या सदनापाशी प्रथम दिसले. बंकटलाल आणि दामोदर ह्या दोन चतुर माणसांनी त्यांची परीक्षा केली. द्वितीय अध्यायात गोविंदबुवाच्या कीर्तनांत  महाराज येऊन बसले हा कथा भाग आला आहे. पुढे पितांबर शिंपी यांना रस्त्यात दाखवलेल्या चमत्काराचे वर्णन आले आहे. शेवटी महाराज बंकटलालांच्या घरी गेले. तृतीय अध्यायात एका गोसाव्याने श्री गजानन महाराजांना बुटी देऊन गांजा पाजण्याचा नवस केला. महाराजांनी त्याची इच्छा पुरविली. व तेव्हापासून तेथे गांजाची प्रथा पडली. नंतर महाराजांनी स्वतःच्या पायाचे तीर्थ देऊन जानराव देशमुखाचे गंडांतर टाळले व मृत्यूचे प्रकार पण तेथे सविस्तर सांगितले. तुकाराम ढोंग करतो म्हणून त्याला मार दिला.  चतुर्थाध्यायी जानकीरामाने चिलमीसाठी  विस्तव दिला नाही म्हणून चिंचवण्यांत किडे पडले व त्यामुळे ते अन्न वाया गेले. ते पाहिल्यावर सोनाराने हात जोडून त्यांची विनंती केली. श्री गजानन समर्थांनी त्याच्या अपराधाची क्षमा करून चिंचवणे पूर्ववत्‌ केले. तेव्हापासून जानकीराम भक्त झाला हा प्रसंग आलेला आहे. चंदू मुकुंदाच्या पत्नीने  उतरंडीला दोन कान्होले  ठेवले होते तेच समर्थांनी खायला मागितले. तसेच चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाखवून मुक्त केला. पुढे शिष्याहाते वसंतपूजेचा थाट करवला इत्यादी प्रसंग विशद केलेले आहेत.पंचम अध्यायांत महाराज पिंपळगांवांजवळील जंगलात  जेथे शंकराचे मंदिर होते तेथे जाऊन शंकराच्या मंदिरांत पद्मासन घालून बसले.तेथेच तेथे महाराज बसलेले दिसल्यावर गुराख्यांनीं त्यांची पूजा केली. नंतर गावातील मंडळी तेथे येऊन महाराजांना गावात घेऊन गेली. हे बंकटलालाना कळल्यावर ते पिंपळगांवास जाऊन समर्थांना परत शेगावला घेऊन आले. कांही दिवस तेथे राहून श्री गजानन महाराज भास्कराना तारण्यासाठी पुन्हा अकोलीला गेले. तेथे त्यांनी कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडून एका क्षणांत पाणी आणले. त्यामुळे भास्कराची भ्रांती नाहीशी झाली. महाराज त्यांना घेऊन शेगावला आले.

         षष्ठाध्यायी असा प्रसंग आहे कि, बंकटलालानी सद्‌गुरुनाथाना मक्याची कणसे खाण्याकरिता मळ्यात नेले. तेथे धुरामुळे गांधीलमाशा उठल्याने लोक जीव वाचवण्यासाठी भयभीत होऊन पळू लागले. पण महाराजांना गांधीलमाश्यांची बाधा झाली नाही. येथे महाराजांनी बकटलालालांच्या  शिष्यत्वाची  परीक्षा घेतली. नंतर नरसिंगजीना भेटण्याला स्वामी अकोटाला गेले. हे नरसिंगजी कोतशा अल्लीचे शिष्य होते. समर्थ काही दिवस अकोटात राहिले. तेथे त्यांनी नरसिंगजी बरोबर बंधू म्हणून हितगुज केले. पुढे चंद्रभागेच्या तीरी शिवरग्रामात व्रजभूषणावर त्यांनी कृपा केली. नंतर श्रावणमासाच्या उत्सवांत मारुतीच्या मंदिरात महाराज रहायला आले. 

         सातव्या अध्यायात समर्थानी पाटील मंडळींना कसे आपलेसे केले तो प्रसंग आला आहे. गांवची सर्व पाटील मंडळी आडदांड होती. ती नेहमी समर्थांना टाकून बोलत. हरी पाटलासमवेत महाराज कुस्ती खेळले. उसाचा चमत्कार दाखवून महाराजांनी मल्लविद्येचे प्रत्यंतर दाखवले व  पाटील मंडळींच्या अभिमानाचा परिहार केला. खंडू कडताजी पाटलांना भिक्या नावाचा मुलगा दिला. आमरस भोजनाचे व्रत चालविण्यास पाटलाना सांगितले. या सगळ्या गोष्टींमुळे पाटील मंडळींची निष्ठा समर्थांच्या ठायी जडली. 

         अष्टमांत असा प्रसंग आहे कि, पाटील देशमुखांत दुफळी माजल्याने पाटलांच्या विरुद्ध सरकारांत देशमुखांनी अर्ज दिला. त्यामुळे खंडूवर बालंट आले. ते समर्थांनी नष्ट केले. त्यामुळे ते निर्दोष सुटले. पुढे तेलंगी ब्राह्मणाना महाराजांनी वेद म्हणून दाखवले. आपण कोण आहोत ते सहज लीलेने लोकांना जाणवून दिले. नंतर कृष्णाजीच्या मळ्यातील छपरात महाराज शंकराच्या मंदिराच्या जवळ राहिले. तेथेच त्यांनी “नैनं छिन्दन्ति” श्र्लोकाचा त्याच्या रहस्यासह अर्थ सांगून ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान विरहित केला. त्यासाठी जळत्या पलंगावर महाराज स्थिर बसून राहिले पण त्यांच्यावर अग्नीचा काही फरक पडला नाही. खऱ्या संताला अग्नी कधीच जाळू शकत नाही. 

         नवव्या अध्यायात महाराजानी द्वाड घोडा शांत केला. नवस करणाराला गांजाची खूण दिली. दासनवमीचे उत्सवासाठी समर्थ त्यांच्या शिष्यांना घेऊन बाळकृष्णाच्या घरी बाळापूरला गेले. बाळकृष्ण बुवा रामदासीना, महाराजांनी रामदास स्वामींचे दर्शन देवून  त्यांचे मन संशयरहित केले.

         दशमाध्यायी उमरावतीचा प्रसंग विशद करून बाळाभाऊना उपरति झाली, गणेश आप्पा, चंद्राबाई यांनी समर्थांच्या पायी भावभक्तीने संसार अर्पण केला, तसेच गणेश दादा खापरड्यांना पण  शुभाशीर्वाद दिला. बाळाभाऊंना छत्रीने मारुन त्यांची परीक्षा घेतली, सुकलालाची द्वाड गाय अति गरीब केली, घुड्याची दांभिक भक्ति सर्वाना दाखवली. हे सर्व प्रसंग आले आहेत. एकादशाध्यायी भास्कराना कुत्रा चावला ती कथा आलेली आहे. त्र्यंबकेश्वरी जाऊन  गोपाळदासाना भेटले. पुढे झ्यामसिंगाच्या विनंतीला मान देऊन पुण्यराशी गजानन महाराज अडगांवाला आले. येथेच भास्कर निजधामाला गेले. त्यांचा देह द्वारकेश्वरासन्निध सतीबाईचे शेजारी ठेवला. कावळ्यांना तुम्ही या स्थळी येऊ नका म्हणून आज्ञा केली. पुढे गणु जवर्‍याला विहिरीत सुरुंग उडत असताना वाचवले.द्वादशाध्यायी शेठ बच्चूलालांची कथा विशद केली आहे. महाराज प्रत्यक्ष निरिच्छपणाची मूर्ती होते. श्री गजानन महाराजांचे वस्त्र नेसून पितांबर शिंपी कोंडोलीला गेले. तिथे त्यांनी बळिरामाच्या शेतातल्या वठलेल्या आंब्यावर पालवी निर्माण केली. पितांबर कोंडोलीतच राहिले. तेथे समर्थांच्या इच्छेने त्यांनी नविन मठ स्थापन केला. मनात काही एक विचार करुन महाराज रेतीच्या गाडीत बसले व ती गाडी स्वतःच चालून महाराज बसून जुन्या मठांतून नव्या मठात आले. नंतर झ्यामसिंगाने गजानन स्वामीना मुंडगावला नेले. तेथे पर्जन्याने भंडाऱ्याला धोका दिला. त्याचे निवारण महाराजांनी केले. झ्यामसिंगाने आपली इस्टेट समर्थाना अर्पण केली. श्रीकृपेने पुंडलिकाची प्लेगाची गाठ निमाली.तेराव्या अध्यायात महाराजांनी गंगाभारती गोसाव्याचा महारोग हरण केला असा कथाभाग आला आहे. तसेच समर्थ कृपेने बंडुतात्याचा भाग्योदय झाला. त्यांना भूमीत धन सांपडून ते कर्जमुक्त झाले. सोमवती अमावास्येला नर्मदेच्या स्नानास भक्तांसह गेले असता नौकेला छिद्र पडलं. पण नौकेत महाराज होते. त्यामुळे छिद्राला नर्मदेनं हात लावला आणि बोट तरंगत किनाऱ्यावर आली. माधवनाथाना शिष्याहाती विडा पाठविला. या कथा चवदाव्या अध्यायात वर्णिल्या आहेत.पंधराव्या अध्यायात शिवजयंतीचा उत्सवाचे वर्णन केले आहे. बाळ गंगाधर टिळक अकोल्यात आले होते. पुढे महाराजांनी त्यांना भाकरीचा प्रसाद कोल्हटकर यांच्या हस्ते मुंबईत लोकमान्य टिळकांसाठी पाठविला. श्रीधर गोविंद काळे यांना विलायतेला जाऊ नका. येथेंच सर्व आहे असा उपदेश केला.  सोळाव्या अध्यायात पुंडलीक अंजनगावला गुरू करण्यासाठी निघाले असता महाराजांनी त्यांना स्वप्नात जाऊन समजावले. त्यांना पादुकाचा प्रसाद झ्यामसिंगच्या हस्ते पाठविला. कवराच्या भाजी भाकरीचा महाराजांनी आनंदाने स्विकार केला. तुकारामाच्या  कानामधून छरा पडला इत्यादी कथा  भाग सुद्धा आलेला आहे.

         सतराव्या अध्यायात मलकापूरला विष्णूसाच्या घरी जाण्यासाठी महाराज गाडीतून निघाले असता नग्न फिरतात म्हणून केवळ अहंपणाने सत्पुरुषाला त्रास देण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर खटला भरला. महताबशा साईला महाराजांनी पंजाबला पाठवून दिले. हिंदुयवनांविषयी त्याला कळकळीचा बोध केला. बापुरावाच्या कांतेची भानामती संपवली. तसेच गंगाभागीरथीची भेट अकोटीच्या विहिरीत घेतली. अठराव्या अध्यायात बायजा माळणीची कथा आलेली आहे. तसेच कवर डाँक्‍टरांच्या फोडावर तीर्थ अंगाऱ्याचा उपचार केला. नंतर सर्व लोकांना घेऊन महाराज पंढरीला गेले. तेथे बापुना काळे यांना हरीचे दर्शन करवले. तेथेच कवठे बहादुरचा वारकरी मरीने आजारी पडला. त्यास क्षणभरात समर्थानी बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला मेलेला श्वान उठवून दाखवून त्याचा कर्माभिमान समाप्त केला. एकोणविसाव्या अध्यायात अतिहर्षाने दर्शनाला आले असताना काशिनाथ पंतांना महाराजांनी आशीर्वाद दिला. गोपाळ मुकिंद बुटी महाराजांना नागपुरला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याच्या मनात असा हेतू होता की, महाराजाना नागपुरांत ठेऊन घ्यावं. पण हरी पाटलांनी त्यांना परत शेगावला आणले. धार-कल्याणचे रंगनाथ साधु महाराजांना भेटायला शेगावात आले. कर्म मार्गाची प्रत्यक्ष मूर्ति असलेले श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांना भेटायला आले. नुसती दृष्टादृष्ट होताच उभयतांना खूप आनंद झाला. तेव्हां बाळाभाऊना जो संशय आला होता तो समर्थांनी उपदेश करून निवटला. पुढे महाराजांनी गाढवापासून खळ्याचे संरक्षण केले. समर्थाना मारल्यामुळे नारायणास बाळापुरी मरण आले. गजाननाच्या कृपेने जाखडयाचे लग्न झाले. कपीलधारेला निमोणकराना दर्शन दिले. तुकारामानी श्री गजानन महाराजाना त्यांचा नारायण नावाचा पुत्र सेवा करण्यासाठी अर्पण केला. नंतर पंढरीला जाऊन विठ्ठलाला विचारुन महाराज शेगावला परत आले. पुढे भाद्रपद महिन्यात ऋषि-पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालचे हे ऋषि समाधिस्थ झाले. विसाव्या अध्यायामाजी “श्रीं” ची समाधी झाल्यावर जे  चमत्कार झाले,  त्यांचे वर्णन केले आहे. जे  भाविक भक्त असतील त्यांना अजुनही कैवल्यदानी दर्शन देऊन त्यांच्या इच्छा पुरवतात. आतां हा एकविसावा अध्याय अवघ्या कथेचा कळस आहे. याला तुम्ही सगळ्याचं सार समजायला हरकत नाही. महाराज प्रत्यक्ष हजर असल्यावर जसे प्रकार घडत होते तसेच प्रकार श्री गजानन महाराजांनी समाधी घेतल्यावरही वरच्यावर केले होते. म्हणून या अध्यायाला सर्व अध्यायांचं सार म्हणाव लागेल. वर्गणीच्या जोरावर समाधीचे भव्य काम झाले. वर्गणी गोळा करायला भक्त मनापासून झटले. इतकं सूंदर आणि भव्य काम भूमीवर कोठंही झालं नाही. चौफेर धर्मशाळा चहूंबाजूंनी बांधल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लावला. त्यांची नांवे सांगत बसलो तर ग्रंथ वाढेल. त्यातून जे मुख्य होते त्यांचीं नांवे कथन करतो. कुकाजीचा हरी पाटील, सांगवीचा बनाजी, उमरीचा गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भागू, नंदू, गुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुकदेव पाटलाची आई यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तु भिकाजी, पळसखेडचा सुखदेवजी, शेगावचा मार्तन्ड गणपती, बालचंद्राचा रतनलाल, पंचगव्हाणचा दत्तुलाल, त्याच गांवीचा बिसनलाल, टाकळीचा अंबरसिंग, किसन बेलमंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापुरचा गंगाराम या दानशूरांनी  मोठमोठया रकमा देऊन समर्थांच्या भक्तीपोटी मठाची उभारणी केली. समाधीच्या चौफेर कोठ्या, कचेरी स्वैंपाकघरे, उत्तम प्रकारचे सोपे बांधले. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामात संपून गेल्या. पण पुष्कळ गोष्टी अजून बांधायच्या शिल्लक होत्या. म्हणून वर्गणी जमवण्यासाठी एक भली योजना केली ती अशी कि,  कोणावरही जोर न करता शेतसार्‍यावर समर्थांचा धार्मिक कर रुपयामागें एक आणा असा बसवला. तसंच बाजारपेठेत धान्य अथवा कापूस जे  विकायला येईल त्यावर गाडीमागे अर्धा आणा पट्टी बसवली. लोकही ती आनंदाने देत असत. कारण समर्थांच्या चरणावर सर्वांची निष्ठा होती. समाधीपुढे यज्ञयाग अपार झाले. त्यांतले चार मोठे होते. किसनलाल शेडजीनी शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्याकडून आदराने करून घेतले. शतचंडीचे अनुष्ठान करणे अतिशय अवघड असते. कारण काम्य अनुष्ठानात जगदंबे कालिकेला अधिक उणे मुळीच खपत नाही. किसनलालांचे वडील बंकटलाल समर्थांचे पहिल्यापासून एकनिष्ठ भक्त होते. पूर्णाहुतीच्या दिवशी बंकटलालांच्या शारीरिक व्याधि उफाळून आल्या आणि प्राणांताचा समय आला. लोक घाबरुन गेले. हे काय विघ्न आले असे त्यांना वाटले. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत का व्हावे? पण बंकटलाल मुलाला म्हणाले  भिऊ नकोस! माझे तारणहार पुण्यराशी श्री गजानन समाधीत बसले आहेत. ते सर्व ठीक करतील. असे बावरून जाऊ नका. पूर्णाहुतीचे सर्व काम सशास्त्र उरकून घ्या. माझे स्वामी गजानन कधीही विघ्न येऊन देणार नाहीत. भक्ताचे संरक्षण करण्यासाठीच ते तेथे बसलेले आहेत. बंकटलालाल म्हणाले तेच पुढे सत्य झाले. त्यांच्या व्याधीचे स्वरुप मावळले. एका बाईचे भूत या शतचंडीत नष्ट झाले. बनाजी तिडके सांगवीकर यांनी स्वाहाकार केला. कसुर्‍याची रहाणारी गुजाबाई, चापडगावीच्या शामरावांचा पुत्र वामन, यांनीही एक यज्ञ समाधीच्या पुढे केला. अशी कितीतरी धर्मकृत्ये समर्थांसमोर झाली. श्रीगजानन महाराज खरे खरेच साक्षात्‌कारी होते. जोपर्यंत लोक निष्ठावंत होते तोपर्यंत वर्‍हाड खूप सुखी होता. जसजशी निष्ठा कमी झाली तसतशी विपन्न दशा आली. अवदसेने वर्‍हाडाच्या कंठी माळ घातली. कपाशीचे विपुल पिक येणे बंद झाले. वऱ्हाडात नवे वारे वाहूं लागले. वर्‍हाडाची अशी दैना  महाराजांकडून पहिली जात नव्हती, म्हणून त्यांनी स्वतःला पाण्यात कोंडून घेतले. खरंतर तीस फुटांपासून  पाया भरुन आणला होता. तिथंच पाणी यावं हे एक आश्चर्यच! म्हणून असं वाटतं की, समर्थांना राग आला म्हणून त्यांनी सभोवती जल निर्माण केले. पहिल्यासारखा सुखसंपन्न वर्‍हाड व्हावा अशी चित्तांत इच्छा असलेल्या वर्‍हाडी लोकांनी  श्रीगजाननाच्या चरणी पूर्ववत् निष्ठा ठेवून सुखाचा अनुभव घ्यावा. असं जर केलं नाही तर याहीपेक्षा बिकट काळ वऱ्हाडाला येईल याचा विचार करावा. गजाननपदी निष्ठा ठेवा व सुखाचा सर्वदा अनुभव  घ्यावा. कुतर्काला मुळीच थारा देऊ नये. हे सत्य आहे की, या गजाननरुपी जमिनीत जे जे काही पेराल ते ते बहुत होऊन परत मिळेल. दाणे खडकावर टाकले तर त्यांची रोपे होत नाहीत याचा मनात सर्वकाळ विचार  करा. संतसेवेचा कंटाळा ज्या ज्या प्रांतात येतो त्या त्या प्रांतात दुष्काळाचा प्रादुर्भाव होतो. धर्मश्रद्धा ही वाघीण जर मनरुपी दरीतून निघून गेली तर दुर्वासनेचे कोल्हे तिथं येऊन बसतील. भक्ति शुचिर्भूत अंगना आहे तर अभक्ति ही वारांगना आहे. तिच्या नादी लागल्यास सर्वत्र विटंबनाच होते. सन्नीतीला सोडूं नका, धर्मवासना टाकूं नका, एकमेकांना शत्रु मानू नका तरच शक्ति वाढेल. तुम्ही असं वागल्यास वऱ्हाड प्रांतास चांगले दिवस येतील हे कधीही विसरुं नका. वर्षांतून एकदा तरी श्री गजाननाचें दर्शन घ्यावे. एकदां तरी गजाननचरित्र ग्रंथ “श्री गजानन विजय” ग्रंथाचे पारायण करावे. हा एकवीस अध्यायांचा एकवीस मोदकांचा “गजानन विजय” नांवाचा नैवेद्य  श्री गजाननासी अर्पण करा किंवा हे अध्याय एकवीस दुर्वांकुर रूपाने माना व पारायण रुपाने निरंतर गजानन चरणी वहा. मनुष्याच्या मनात जेव्हा सद्भावाने प्रेमरूपी चंद्राचा उदय होईल तोच दिवस त्याच्यासाठी चतुर्थीचा असेल. अशा प्रेमभावाचा उदय झाला की, मग या ग्रंथाचे अक्षर हे एकेक दुर्वांकुर समजा आणि शब्दाचा अर्थ ध्यानात घेऊन तो महाराजांना अर्पण करून पारायणरूपी पारणे साधून घ्या. आता अजिबात वेळ घालवू नका. हा ग्रंथ ही कादंबरी नसून श्री गजानन महाराजांची लीला आहे. येथे जो अविश्वास धरेल तो निःसंशय बुडेल. श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमानं वाचेल त्याचे मनोरथ श्री गजानन कृपेने पूर्ण होतील. हे गजानन चरित्र ही भागीरथी असून त्यातील कथा या  निश्चित त्यावरच्या लहरी आहेत हे समजा किंवा हे स्वामीचरित्र कल्पवृक्ष समजून  त्याच्या फांद्या म्हणजे हे अध्याय होत. ही पद्यरचना त्यावरील पालवी आहे. जो या ग्रंथावर भाव ठेवेल त्याला स्वामीराव श्री गजानन महाराज पावतील व त्याच्या  संकटकाळी त्याचे रक्षण करायला धाव घेतील. हा ग्रंथ केवळ चिंतामणी असून चिंतिलेले फळ देईल पण त्यासाठी मनात दृढतर विश्वास हवा हे मात्र विसरुं नका.

         जेथें श्री गजानन चरित्र ग्रंथाचा  नित्यपाठ होईल तेथे लक्ष्मीचा चिरकाल वास होईल. दरिद्री व्यक्तीला धन मिळेल. रोग्याला आरोग्य मिळेल. साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल. निपुत्रिकाला पुत्र होईल. निष्कपटी मित्र मिळेल. अणुमात्रही चिंता राहणार नाही. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाचेल त्याला श्री गजाननकृपेने अनुपम भाग्य येईल. गुरुपुष्य योगावर जो शुचिर्भूत होऊन, एका आसनावर बसून जो पारायण करेल त्याच्या सर्व मनोकामना खचित पूर्ण होतील. त्याच्या कसल्याही यातना निरसून जातील. जिथे हा ग्रंथ असेल तेथे कधी भूत येणार नाही. तसेच तेथे ब्रह्मसमंधाचा लाग कधीच लागणार नाही. याची भाविकाला निश्चित प्रचीती येईल. कुटिल दुष्टदुर्जनांना याचा अनुभव येणार नाही. कारण देवांची योजना ही राजहंसासाठी असते. तसंच संतसज्जनांसाठी हे स्वामी चरित्र मानस सरोवरासारखंच आहे. यापूर्वी ज्ञानेश्वर, मीरा मेहता कबीर, नामा, सांवता, चोखा महार, गोरा बोधला दामाजी, उंबरखेडी ऐनाथ, सखाराम अंमळनेरात, देव मामलेदार यशवंत, हुमणाबादी माणिकप्रभू होऊन गेले तसेच वर्‍हाडांत हे श्री गजानन स्वामी सद्‌गुरुनाथ आहेत. यात यत्किंचित फरक नाही. तुम्हा अवघ्या भाविकांप्रती आता हीच विनंती आहे की, श्रीगजाननांचे चरणी अत्यंत प्रीती असावी म्हणजे तुमची जन्ममृत्यूची येरझार येथून थांबून दुस्तर भवसागर पार व्हाल.

         आतां स्वामी दयाघना, माझी तुम्हाला करुणा येऊ द्या. तुमच्या कृपेने दासगणूच्या सर्व यातनांचे निवारण करा. मी तुमचा भाट झालो. मला नीट मार्ग दाखवा. मला दुर्वासनेचा वीट येऊ दे. आमरण वारी घडू दे. संत चरणी प्रेम जडो. गोदेच्या तीरावर अक्षय्य वास घडो. माझ्यावर कधी याचना करण्याचा प्रसंग येऊ देऊ नका. 

         समर्था या दासगणूचा आपण सदैव अभिमान वाहावा. मी सकल संतांचा चरण रज असून माझी लाज तुम्ही राखा हेच माझे आज पदर पसरून तुमच्याकडे मागणे आहे. गजानन महाराजा तुमचं चरित्र लिहिताना आपण जशी प्रेरणा दिलीत तसंच मी वदलो. शेगावचे मठात काही कागदपत्र होते ते रतनसाने मला आणून दाखविले. त्यांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला. माझ्या कल्पनेचा मी कोठेही उपयोग केला नाही. म्हणून अधिक न्यूनाला मी कारण राहाणार नाही. त्यातूनही काही अधिकऊणं झालं असल्यास त्याची गजानन महाराजांनी मला क्षमा करावी अशी विनंती आहे. शेगावात शके अठराशे एकसष्ट, प्रमाथिनाम संवत्सर, चैत्रमासी शुद्ध पक्षात, वर्षप्रतिपदेला हा ग्रंथ कळसास गेला. तो गजाननांनी प्रथम प्रहरी बुधवारी पूर्ण केला.

         इति स्वस्ति श्री संतकवी दासगणू विरचित हा “श्री गजानन विजय” नामें ग्रंथ भाविकांसाठी भवसिंधु तरावया नौका होऊन सुफळ संपूर्ण होत आहे. 

शुभं भवतु !

|| श्रीहरिहरार्पणमस्तु ||

|| पुंडलीक वरदा हरि विठ्ठल ||

|| सीताकांतस्मरण जयजय राम ||

||  पार्वतीपते हरहर महादेव  ||

- अनुवादक: श्री वामन रुपरावजी वानरे.

मो.09826685695

Leave a Reply