श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित चौदावा अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.

“श्री गजानन विजय ग्रंथ”

अध्याय चौदावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

चौदावा अध्याय प्रारंभ करण्यापूर्वी श्री दासगणू महाराज प्रभू श्रीरामचंद्रांची प्रार्थना करतात व म्हणतात कि, “हे कौसल्यात्मजा रामराया, हे रघुकुल भूषणा, करुणालया, सीतापते या अजाण लेकरावर आपण दया करा. तुम्ही दुष्ट त्राटिकेचा उद्धार केला व  अहिल्याचे शिळेला जीवदान दिलंस. शबरीची इच्छा पुरवली. आपल्या भक्तांना वाचविण्यासाठी आपला राज्यकारभार सोडला राजसिंहासन सोडले व  आपल्या कृपेने वानर बलवान केलेत. तुमच्या नावाने  समुद्रातील पाण्यात दगड तरंगलेत. तुमचा भक्त विभीषण ह्यास राजगादीवर बसवून त्यांचा योग्य तो सन्मान केला.

हे आनंदकंदा जे जे  तुम्हाला शरण आलेत त्यांचे दैन्य, दुःख व आपदा आपण दूर केल्यात. आता तुम्ही या दासगणूला शरण देऊन उद्धार करा. लहान बाळाने आईला सोडून कोठे जावे ? तुम्हीच माझी जननी, जनीता, आई, व सदगुरु आहात. तुम्हीच भक्तांचे कल्पतरू आहात. ह्या भावसागरातून तरुण   जाण्यासाठी तुम्हीच आमची नाव आहात. असो बंडूतात्या नांवाचे एक ब्राह्मण गृहस्थ मेहेकर तालुक्यातील खेर्डे गावातील रहिवासी होते. हा बंडूतात्या सदाचारसंपन्न व  उदार मनाचा होता.संसार प्रपंच चालविण्यासाठी जीवनात अनेक अडीअडचणी येतात.  प्रपंचांत अतोनात संकटे येतात असेच काही बंडूतात्याच्या जीवनात संकटे आलीत.  बंडूतात्यांच्या घरी वरचेवर पाहुणे येत होते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना तो सदाचारी ब्राम्हण त्या पाहुण्यांची मेहमान नवाजी करण्यात काही कसर ठेवीत नसे. तो त्यांचा आदरसत्कार करून त्यांना पाहुणचार सुद्धा करीत असे. असे करता करता त्यांनी जमवलेलं सर्व धन लयास गेलं व त्या गरीब   बिचाऱ्यावर सावकाराचं कर्ज काढायची पाळी आली. त्याने आपले घरदार गहाण ठेवलं व स्वतःवर एवढं कर्ज झालं की, त्याला लोकांना तोंड दाखवायची लाज वाटूं लागली. आता घरचं काही सामान विकायला सुद्धा काही  शिल्लक राहिलं नाही. घरातील  भांडीकुंडी सुद्धा विकल्या गेली. श्री बंडू तात्यावर एवढी परिस्थिती आली की गावातील सावकार व इतर लोक त्याच्या घरी जाऊन तगादा करू लागले. फारच वाईट परिस्थिती आली त्याचं वर्णन करणे सुद्धा अशक्य वाटते.सावकार त्यांच्या घरी शिपाई पाठवून तंग करू लागले. दोन वेळा जेवायची सुध्दा बंडू तात्यांची परिस्थिती राहिली नाही.  बायको पोर टाकून बोलू लागले व अपमान करू लागले. सगळी पत उडून गेली होती. आता गावातील लोकं त्याला उधार सुध्दा देण्यास सुद्धा टाळाटाळ करीत  होती.  अशी सगळीकडून वाईट वागणूक होत असल्याने बंडू तात्याला असे वाटले की असे जीवन जगण्यापेक्षा कोठेतरी जाऊन आपलं जीवनच समाप्त करावं.  पैसा धन द्रव्य संपल्यावर मनुष्याला  काहीच किंमत नसते.जी जागा अगोदर सुखाची होती तीच जागा आता दुःखाच घर झालं.  बंडूतात्या असा विचार  करी की, आता जीव तरी कोठे  देऊ? अफू खाऊन मरून जाऊ म्हंटलं तर ती अफू घ्यायला सुद्धा पैसा नाही. विहिरीवरी जाऊन जीव द्यावा म्हंटलं तर वेळेवर  कोणी येऊन मला विहिरीतून बाहेर काढेल त्यामुळे  जीव तर जाणार नाहीच उलट माझी फजिती होईल व मला आत्महत्यारा म्हणून सरकार शिक्षा देईल ती वेगळीच! यापेक्षा जीव द्यायला हिमालयात जावं. त्या ठिकाणी आत्महत्येचाही दोष लागणार नाही. हा विचार बंडू तात्याने  करून त्यांनी आपली ओळख मिटवण्यासाठी एक लंगोटी घातली. अंगाला राख  लावली व आपल्या संसार प्रपंचाला शेवटचा नमस्कार करून घराबाहेर पडले.अब्रुदाराला शेवटपर्यंत आपल्या जननिंदेचं मनात भय वाटत असते बंडू तात्यांच्या मनात असे अनेक  विचार घोळत होते ते आपल्या मनाशीस विचारत होते, “हे देवा,  दीनदयाळा चक्रपाणी तू  माझी अशी स्थिती का बर केलीस? हे अधोक्षजा तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास होता. तूं रंकाचा राजा करतोस असं पुराणात ऐकलं होतं पण आता ते सर्व खोटं वाटायला लागलं आहे.असे वाटते कि,  तुझं चरित्र  कवींनी व्यर्थ रंगवलं आहे. त्यामूळे माझ्यावर आता जीव देण्याची पाळी आली आहे. आता याचा काही तरी विचार कर व  माझ्या हत्येचं पाप तुझ्यावर येऊ देऊ नकोस. असा विचार करत करत बंडू तात्या  स्टेशनावर येऊन तिकीट घ्यायला लागले तेवढ्यात तेथे त्याना एक ब्राह्मण भेटला व म्हणू  लागला कि, “आतांच हरिद्वाराचे तिकीट घेऊ नकोस. अगोदर संत दर्शन घे व मग जा. तुला माहीत नाही का, कि आपल्या वर्‍हाड प्रातांत श्री गजानन महाराज एक महासंत म्हणून आले आहेत. त्यांच्या दर्शनाला तू जा. संतदर्शन आजवर कधीही व्यर्थ गेले नाही. उगीच स्वतःला त्रास घेवुन भलते सलते काही करूं घेवू नकोस. 

 त्या ब्राह्मणाचं बोलणं ऐकून तात्या गोंधळून गेला व  विचार करू लागला  की, हा मनुष्य कोण? मला अवचित भेटला किवा याने मला बंडूतात्या म्हणून कस काय ओळखलं?  त्याचा कांही तर्क चालत नव्हता. आता या सर्व गोष्टींचा काही विचारू तरी कसा करू?  काहीही असो,  आता एकदा शेगांवला जाऊनच पाहतो व श्री गजानन महाराजांना नमस्कार करून येतोच असं म्हणून ते शेगांवाला आले तेव्हा, ज्यावेळी त्यांनी महाराजांचे  दर्शन घेतले तेव्हा  महाराज हसून म्हणाले, “अरे बंडूतात्या हिमालयात जाऊन प्राण का देतोस रे? अरे आत्महत्या करू नये. हताश  कदापी होऊ नये.प्रयत्न करण्यास चुकू नये. प्रपंचाला त्रासून आता जरी प्राण दिलास तरी तू पुन्हा भोग भोगण्यासाठी परत जन्म घ्यायला येथे येशील. गंगेत जीव देण्यासाठी हिमालयात जायची आवश्यकता नाही.अरे वेड्या तू आता हिमालयात न जाता आता त्वरित आपल्या घरी परत जा. स्टेशनावर तिकीट घेताना तुला जो ब्राम्हण भेटला होता त्याला तू ओळ्खलस का ? तू येथे आता एक क्षणभरही न गमावता तुझ्या घरी जा. तुझ्या शेतातील मळ्यांत एक म्हसोबा आहे तेथे तू अर्ध्या रात्री जा. मळ्याच्या पूर्वेस जेथे बाभूळीचे झाड आहे तेथे जा व तेथे जमीन खोदून टाक.जमीन खोदायचं काम तू एकटाच कर. तेथे तुला तीन फुटांच्या खाली तुला धन मिळेल. त्यांतून थोडे कर्जदारांना देऊन तू ऋणमुक्त हो. उगीच बायका पोरांना सोडून उसने वैराग्य बाळगू नको. महाराजांचं बोलणं ऐकून तो बंडू त्यात्या ब्राम्हण खूप आनंदित झाला. त्याने आपल्या अंगाची राख पुसून टाकली व घरी परत आला. मध्यरात्री तो  मळ्यांत गेला व महाराजांनी सांगीतल्या प्रमाणे म्हसोबापाशी गेला व बाभळी खालची जमीन खोदू लागला. तेथे त्याला तीन फुटांवर  एक तांब्याची घागर मिळाली. त्या घागरीत चारशे सुवर्ण मोहरा होत्या. त्या पाहून बंडू तात्या खूप खुश झाला. त्याने ती घागर घेऊन तेथेच अत्यानंदाने  जय गजानन जय गजानन गुरुराया असे म्हणून नाचू लागला. बंडू तात्याला जे धन मिळालं त्या धनाचा वापर करून त्याने आपले  सर्व कर्ज फेडून टाकले. गहाण पडलेला मळाही सोडवून आणला. गजानन कृपेने पुन्हा बंडू तात्याच्या प्रपंचाची घडी पूर्ववत बसली. बंडूतात्या अती आनंद झाला.जसं मरण जवळ यावं व त्याच वेळी एकाच क्षणात अमृतकलश हातात यावा किवा सागरात  बुडत असताना नाव पुढे यावी अशी बंडू तात्यांची गत झाली. श्री गजानन महाराजांच्या कृपेने श्री बंडू तात्याच्या दुःखाचेे दिवस संपले. काही दिवसानंतर बंडू तात्या शेगावला आले व श्री गजानन महाराजांच्या चरणी त्यांच्या भक्तीत लीन झाले. तिथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला.महाराज त्यांना म्हणाले, “अरे आम्हाला का बरे वंदन करतोस? ज्यानं तुला इतकं मोठं धनद्रव्य दिलं त्याला वंदन कर. आता येथून जा व यानंतर बेताने खर्च कर.उगीच उधळे पण करण्यात काही अर्थ नाही. जनमानस सुखाचे सोबती असतात मात्र ते निर्माण करणारा श्रीपती आपल्या सुख दुःखात नेहमी असतो. म्हणून त्याची तू  सदैव भक्ती कर. तो कधीच तुझी उपेक्षा करणार नाही.”

बंडूतात्यांनी समर्थांचा उपदेश ऐकून घेतला व त्यांना वंदन करून ते आनंदाने आपल्या गावी परत वापस गेले. सोमवती अमावस्येच्या वेळी खूप उत्सव असतो व ते पर्व आता आलं होतं. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती म्हणतात.

सोमवती अमावस्येच महात्म्य पुराणात विदित केलेलं आहे. या दिवशी नर्मदा स्नान करण्याला महत्व आहे असं वर्णन पण पुराणात केलं आहे.  शेगावचे मार्तंड पाटील, बंकटलाल, मारुती, चंद्रभान, बजरंगलाल या सर्वांनी आपसात चर्चा करून ओंकारेश्वरी जाऊन नर्मदा स्नान करण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे शेंगावची ही मंडळी नर्मदा स्नान करण्यासाठी ओंकारेश्वराला निघाली. बंकटलाल सर्वांना म्हणाले,  “आपण महाराजांना बरोबर घेऊन जाऊ.” चौघे मठात येऊन समर्थांना विनंती करू लागले व ते म्हणाले, “गुरुमाऊली, तुम्ही आमच्याबरोबर ओंकारेश्वरला चला. तुम्ही जर आमच्या बरोबर आलात तर आम्हाला काळाचीही भीती राहणार नाही. तूम्ही आमच्याबरोबर  ओंकारेश्वराला चला व आम्हाला नर्मदेच्या स्नानाच पुण्य घडवून आणून द्या. हा अधिकार केवळ आपणास आहे, तुम्हीच आमची माता आहात. म्हणून आमची आपल्या चरणावर  विनंती आहे की, आम्हाला नर्मदेला घेऊन चला. तुम्ही आल्याशिवाय आम्ही येथून हालणार नाही. काहीही झालं तर बालहट्ट जननीच पुरवते.” 

महाराज त्यांना म्हणाले,नर्मदा माझ्याजवळच आहे. मग मी तिला उगीच त्रास  कशाला देवू? मी या मठांतच  बसून नर्मदेचे स्नान करीन. तुम्ही या सारे जाऊन! श्रीओंकारेश्वरला दिगंत कीर्ती देणारा भाग्यशाली, महाबली राजा मान्धाता होवून गेला. श्री शंकराचार्य गुरुवरांनी जगदोध्दार करण्यासाठी तेथेच परमहंस दीक्षा घेतली. तुम्ही त्या स्थळी जा व माझ्या नर्मदेला भेटा. मला मात्र आग्रह करून तेथे  नेऊ नका. मला आता त्या पर्वाचे प्रयोजन राहिलं नाही. हे ऐकल्यावर चौघांनीही महाराजांचे पाय घट्ट धरले व म्हणाले, “तुम्हाला गरज असो वा नसो तुम्हाला आमच्या बरोबर ओंकारेश्वरला चलावेच लागेल. आपण नर्मदेचे स्नान करून लगेच माघारी वापस येऊ.” महाराज म्हणाले, “ठिक आहे .तुम्ही दांभिक आहात. नर्मदेचे उदक जेथे आपुल्या विहिरीमध्ये आहे. तिला जर वगळून आपण जर तेथे स्नान करायला गेलो तर तिला फार राग येईल. म्हणून मी सांगतो की तुम्हीच जा. मला आग्रह करू नका. माझं वचन ऐका. यातच तुमचं कल्याण आहे.” यावर मारुती चंद्रभान म्हणू लागले की, “आम्ही तुम्हाला सोबत घेतल्याशिवाय येथून जाणार नाही.” श्री गजानन समर्थ म्हणाले, “मी जर तेथे आलो तर विपरीत होईल व संकट येईल मग मात्र आम्हाला तुम्ही दोष देऊ नका.

“मठात असं बोलणं झाल्यावर सर्वजण ओंकारेश्वराला आले.सोमवती पर्व उत्सवासाठी तेथे अपार जनसमुदाय जमला होता. नर्मदेचे सर्व घाट स्त्री पुरुषांनी भरून गेले होते. मुंगीलाही हराच्या मंदिरी जायला वाट नव्हती. कोणी स्नान करत होते, कोणी संकल्प करत होते, कोणी बेलफुले घेऊन मंदिरांत जात होते, तर कोणी बर्फी पेढे खवा घेऊन खात होते. भजनकऱ्यांचे थव्यामागून थवे चालले होते. पर्वकाळात अभिषेक करणाऱ्यांची मंदिरात एवढी गर्दी झाली होती की, कुणाचा शब्द कुणाला कळत नव्हता. अशा त्या रम्य ठिकाणी ओंकारी समर्थाची स्वारी पद्मासन घालून महानदी नर्मदेच्या काठावर बसली होती. बरोबरचे चौघे दर्शन घेऊन आले व “श्री” ना सांगू लागले की, रस्त्यावर फार गर्दी झाल्याने आपण सडकेनं न जाता नावेत बसून जाऊ. रस्त्यावर गर्दी फार असून वरचेवर  गाड्या मोडत आहेत. त्यातच आपल्या गाडीचे बैल बुजाट आहेत. गाडीवाल्या बरोबर खेडीघाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार करत असताना तो बैलांच्या गुणांबद्दल बोलला नव्हता. मात्र ते आता गाडीत बसल्यावर कळले. गाडीचे बैल द्वाड असल्याने परत जाताना गाडीत बसून जाणे निर्भय वाटत नाही. म्हणून नावेत बसून स्टेशनला जाऊ. रस्त्यावर गर्दी झाल्याने शांतपणे नदीतून जाऊ. कित्येकांनी असंच केलं आहे तुम्ही तिकडे बघा, त्या पहा नावा  कशा चालल्या आहेत? महाराज म्हणाले, “तुम्हांस वाटेल ते करा. आम्हाला काही विचारू नका. तुमच्या वचनांत मी गुंतलोय. तुम्ही म्हणाल तेथे येऊ.” असं म्हणून समर्थ त्यांच्या समवेत नावेत बसले आणि  खेडीघाट स्टेशनाला जाऊ लागले. तो नदीत मध्यावर आल्यावर ती नाव खडकावर आदळली व  तिच्या बुडाची फळी फुटून गेली. त्यामुळे त्या नावेला आरपार छिद्र पडले आणि त्यातून भराभरा पाणी आत येऊ लागले. नावाड्यानी त्वरित  नदीत उड्या टाकल्या. पण महाराज निर्धास्त होते. मुखानं “गण गण गणांत बोते ” असं भजन म्हणत होते. मार्तंड, बजरंग, मारुती  घाबरून गेले.  बंकटलालाची छाती धडधडा उडू लागली. चौघे समर्थांना म्हणाले, “आम्ही फार  मोठे अपराधी आहोत. दयाळा आम्ही तुमचे शेगावात ऐकले नाही. त्याचं फळ तुम्ही आता  तात्काळ  दिलंत. आम्हांला बुडवायला नर्मदाच काळ होवून आली आहे. गुरुराया या पुढं आपली वाणी आम्ही वेदतुल्य मानू पण तुम्ही आम्हाला या संकटातून वाचवा. शेगाव दृष्टीला पडू द्या.”

 असं बोलणं चालू असताना नाव जवळजवळ अर्ध्यावर बुडाली व पाण्यानं ढकलत ढकलत एक फर्लांग गेली. लोक म्हणू लागले, “ही पाच माणसे बहुतेक आता आपले प्राण गमावणार .आता यांचा काही भरवंसा सांगता येत नाही. कारण नर्मदेला अथांग पाणी आहे.”

तेवढ्यात गजानन महाराज म्हणाले, “हैराण होऊं नका. तुमच्या जीवाला नर्मदा अजिबात बिलकुल धक्का लावणार नाही. असे म्हणून त्यांनी नर्मदेचे स्तवन केले. हे चवघे हात जोडून नावेत बसले  होते.

 श्लोक ( अनुष्टुप छंद ) …

नर्मदे मंगले देवी । रेवे अशुभनाशिनी । 

मंतु क्षमा करी यांचा । दयाळू होऊनी मनी॥

हे स्तवन चाललं असतानाच नावेतील पाणी निघून गेले. नर्मदेने तिचा हात नावेला ज्या ठिकाणी छिद्र पडले तेथे लावला होता. त्यामुळे नाव पुन्हा पहिल्यासारखी  पाण्याच्या वर आली आणि नावेच्या बरोबर  प्रत्यक्ष नर्मदेने आपली हजेरी लावली होती. नर्मदा देवीला महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं.तिनं कोळीणीचा वेष धारण केला होता. डोक्यावर कुरळे केस होते. केस आणि वस्त्र कंबरेपर्यंत पाण्याने भिजले होते. नौका काठास लागलेली सगळ्यांनी पाहिली आणि नावेच्या तळाचं छिद्र पाहून लोक आश्चर्यचकित झाले. ह्या बाई होत्या म्हणून आमचे प्राण वाचले.  “बाई, आपण कोठील कोण? काही सांगा. भिजलेले वस्त्र बदला. आम्ही नवे देतो.”

तेव्हा ती नर्मदा म्हणाली, “मी ओंकार कोळ्याची कन्यका असून माझें नांव नर्मदा आहे. ओले वस्त्र नेसण्याचा आमचा परिपाठ आहे. मी निरंतर ओलीच असते. पाणी हे माझंच रूप आहे.” असं बोलून गजानन महाराजांना नमस्कार करून नर्मदा माता  निघून गेली ती क्षणात नाहीशी झाली. जशी आकाशात वीज चमकून ढगात नाहीशी होते तशी!

तो प्रकार पाहून चौघांना फार आनंद झाला. नर्मदा दर्शनाला आलेली पाहून महाराजांचा अधिकार कळला. बंकटलाल खोदून खोदून विचारीत होते कि, “महाराज ही स्त्री कोण होती? काहीही गुप्तता न ठेवता सर्व काही उलगडून सांगा.” तेव्हा महाराज म्हणाले, “तुम्ही जे विचारत आहात  ते सगळं तुम्हाला नर्मदेनं सांगितलेलं आहे.  ओंकार नावाचा कोळी म्हणजेच हा ओंकारेश्वर होय व नीर हे माझेच रूप आहे असे नर्मदा स्वतःच म्हणाली ना? अरे खरंच ती प्रत्यक्ष नर्मदा होती ना? त्याबद्दल मुळीच संशय घेऊ नका. तिच्या भक्तांना ती नेहमीच संकटात आपला हात देते. म्हणून तिचा मोठ्याने जयजयकार करा. जय जय नर्मदे , माते अंबे निरंतर कृपा कर.” हे सर्व ऐकून बंकटलाला सहित चवघे जण  समर्थांचे दिव्य चरण वारंवार  पकडू लागले. शेगावात सर्वजण परत आले तेव्हा आनंदाने ही सर्व हकीकत सांगू लागले.

सदाशिव रंगनाथ वानवळे हे एका गृहस्था बरोबर महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात आले. त्यांचे टोपण नांव तात्या होते. हे चित्रकूटच्या माधवनाथांचे विद्यार्थी होते. या माधवनाथाना पूर्ण योग् क्रिया अवगत होत्या. त्यांचा सर्व शिष्यगण माळव्यात आहे. सदाशिव जेव्हा “श्रीं” च्या दर्शनाला आले तेव्हा श्री गजानन महाराज मठात जेवण करण्यास बसले होते. सदाशिवाना पाहून त्यांना  माधवनाथांची आठवण झाली. जे काही संत असतात त्यांना संताना बरोबर ओळखत असतात. त्यामुळे वानवळे येताक्षणी महाराज मोठ्याने म्हणाले, “अरे, नाथांच्या शिष्याला माझ्यापुढे आणून बसवा. आत्ताच त्यांचे गुरु माधवनाथ माझ्याबरोबर येथे मठात जेवून गेले आणि एवढ्यातच हे दोघे आले.हे थोडे अगोदर आधी आले असते तर यांची पण त्यांच्या गुरूशी भेट झाली असती. त्यांचे गुरू आधीच गेल्यामुळे गाठ पडली नाही, पण यांचे गुरू विडा न घेता गेले. तो विडा आता यांच्याबरोबर देऊ. 

आपल्या भावाची मुलं म्हणून दयाघन महाराजांनी वानवळ्याना आलिंगन दिलं. संतप्रेम हे असं असतं. रीतिप्रमाणें सत्कार केला आणि जातांना सांगितले की, “तुम्ही असेच माधवनाथांकडे जा आणि त्यांचा राहिलेला विडा त्यांना द्या. 

पदरचे काहीही न घालता म्हणा कि, 

“साथे भोजन हुवा पर  विडा तुम्हारा याही रहा । तो आम्ही आणिला पाहा । नाथा तुम्हा द्यावयास. “

हे महाराजांचं सर्व बोलणं ऐकून आणि त्यांनी दिलेली विड्याची दोन पाने घेऊन सदाशिव माधवनाथांच्या कडे गेले आणि सर्व हकीकत त्याना सांगितली आणि विचारले, “महाराज तुम्ही पण  खरंच  शेगावात आला होता का?”

माधवनाथ म्हणाले, “श्री गजानन महाराज बोलले तसंच झालंय. जेवण्याचे वेळी त्यांनी माझे स्मरण केलं तीच आमची भेट! अशा तऱ्हेने एकमेकाना आम्ही नेहमीच भेटत असतो, यात अजिबात संशय नको. स्मरण म्हणजेच आमची भेट होय हे एक खोल गाऱ्हाणं आहे ते तुम्हाला कळायचं नाही. आमची शरीरे जरी भिन्न असली तरी त्यांचा माझा प्राण एक आहे, हे खोल ज्ञान आहे. तुम्हाला ते नंतर कळेल. बरे झाले, शेगावात राहिलेला आमचा विडा तुम्ही आणलात.” वानवळ्यांनी आणलेली पाने नाथांनी खलबत्त्यात कुटून खाल्ली व  त्यांनाही तो विड्याच्या पानांचा  प्रसाद दिला. संतभेट कशी होते ते चांगदेव पासष्टीत श्रीज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे ती पासष्टी मनी आणा म्हणजे तुम्हाला हे सर्व गूढ रहस्य कळेल. स्वानुभवाच्या ठायी तर्काला वाव नसतो. योगी वाटेल तिथून, एकाच ठिकाणी बसून कोठेही जाऊ शकतो व एकमेकांपासून कितीही दूर असले तरी  एकमेकांना भेटू शकतात व  हेच त्यांचं रहस्य आहे! शेख महंमद श्रीगोंद्यांत व तुकाराम महाराज  देहूत होते पण देहूत किर्तनाच्यावेळी मांडवाला आग लागल्याबरोबर श्री शेख महंमदांनी ती आग  श्रीगोंद्यात बसुन विझवली. ही बाब महिपतीनी भक्तिविजय ह्या ग्रंथात लिहून ठेवली आहे. हळी खेड्यात जाऊन विहिरीत बुडणाऱ्या पाटलांच्या मुलाला महाराज माणिकप्रभूंनी हात देऊन वाचवले. खरा योगी असल्याशिवाय असं कौतुक होत नाही. हे दांभिकांना साधत नाही त्यांनी नुसत्याच गप्पा माराव्यात. योग अवघ्यात बलवत्तर असून त्याची सर कुणाला येत नाही. म्हणून राष्ट्रोध्दार करण्यासाठी योगाचा अवलंब करा.

 श्री संत कवी दासगणूनी विशद केलेला हा चौदावा अध्याय भक्तिरसात परिपूर्ण झालेला आहे.श्री बंडू तात्यांची दरिद्री नष्ट करून त्याला महाराजानी जीवनदान दिलं व अनेक भक्तांचा उद्धार केला त्याचप्रमाणे हा चौदावा अध्याय एकनिष्ठा ठेवून वाचा व जीवनाचं मर्म समजून घ्या. ज्या प्रमाणे “श्री” नी बंडू तात्यांना कठीण परिस्थतीतून तारले व त्यांचा उद्धार केला त्याचप्रमाणे ह्या अध्यायाचे चिंतन, मनन, श्रवण केले तर महाराज तुम्हालाही ह्या संसाराच्या भवसागरातून  सहज उचलून नेतील व तुमचे कल्याण होईल.आता हा अध्याय येथेच सुफळ संपूर्ण होत आहे.

- अनुवादक: श्री वामन रुपरावजी वानरे.

मो.09826685695