संतकवि दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचा मराठी अनुवादित तिसरा अध्याय प्रस्तुत करताना मी श्री गजानन महाराज व संत कवि दासगणू महाराजांचे वंदन करतो.

“श्री गजानन विजय ग्रंथ”

अध्याय तिसरा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

सच्चिदानंद सदगुरू श्री हरि ची प्रार्थना करताना श्री दासगणु महाराज म्हणतात, “देवा माझ्यावर लवकर कृपा करा. जो तुमच्या जवळ आला  त्याच्याशी तुम्ही कधी कठोर वागत नाही. राघवा आपला महिमा वर्णन करताना संत सांगतात की, तुम्ही तर  करुणासागर आहात व  दीनांसाठी माहेर आहात. भक्तांसाठी आपण कल्पतरु व चिंतामणी आहात. तेव्हा या दासगणुला उशीर न करता लवकर आपल्या चरणी धरा अशी विनंती करतो.”

दिनदूबळ्यांचे कैवारी साक्षात्कारी संत  गजानन महाराज बंकटलालांचे घरी राहात होते  जिथे मध असतो तिथं माशा जमतात या उक्तीनुसार श्रीमहाराजांच्या दर्शनाला लांबलांबून भक्त येऊ लागले.

एकदा असेच सकाळच्या वेळेस श्री गजानन महाराज निजानंदात  रमलेले असताना  तेथे एक गोसावी त्यांच्या दर्शनाला आला. दिसायला तो फाटका तुटकाच होता.  एक भगवी चिंधी डोक्याला गुंडाळलेली , डाव्या खांद्यावर झोळी, कमरेला लंगोटी आणि मृगजीनाची पाठीवर गुंडाळी असा त्याचा अवतार होता. असा हा गोसावी एका कोपऱ्यात  दडून बसला होता. आधीच दर्शनाला फार गर्दी! त्यात या गोसाव्याला कोठून जागा मिळणार? येथे  काही आपला पाड लागणार नाही, समर्थांचे चरण दृष्टीस पडणे कठीणच दिसतंय असा विचार करत तो बसला होता, तिथूनच बिचारा त्यांचे चिंतन करू लागला. 

मनात म्हणाला, “समर्थांचा लौकिक मी जेव्हा काशीत ऐकला, तेव्हाच स्वामींना गांज्या अर्पण करण्याचा नवस केला. पण बहुतेक आता तो मनातच राहणार आहे अस वाटतंय, कारण येथे  तर फार मोठं मोठी मंडळी जमा झाली आहे व त्यात माझा काय पाड लागणार असा विचार त्या गोसाव्याच्या मनात येत होता. ते माझ्या नवसाला काय किंमत देणार? त्यात यांना जर कळलं की, मी गांजा अर्पण करायचा नवस केला आणि तो फेडायला  आलो हे जर त्यांना माहीत झालं, तर ही मंडळी मला लाथ मारून हाकलून देतील. बरं नवसाबद्दल कुणाशी काही बोललं तर या शांभवीचा इथं कुणीच प्रेमी दिसत नाही. मला गांजा फार आवडतो म्हणून तोच अर्पण करण्याचा मी नवस केला, साहाजिकच आहे, ज्याला जी वस्तू आवडते तिचाच नवस तो करणार ना?”

समर्थांच्या दर्शनासाठी तो आतुर झाला असतानाच, वर सांगितलेले  नाना प्रकारचे विचार त्याच्या मनात येत होते. त्याचं हे मनोगत समर्थांनी बरोबर जाणलं आणि ते म्हणाले, “आणा तो काशीचा गोसावी.” 

लोकांच्या अपार गर्दीत गोसावी कुठं बसलाय ते कुणाला कळेना , ते लक्षात घेऊन समर्थ त्याच्याकडं बोट करून म्हणाले, “तो पहा तिथं कोपऱ्यात तो दडून बसलाय!”

ते ऐकताच गोसाव्याला परमावधीचा आनंद झाला. त्याच्या मनात आलं, संत त्रिकालज्ञ असतात हेच खरे ! मी जे मनातल्या मनात बोललो ते यांनी बरोबर जाणलं. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे संताना  पृथ्वीतलावरच्याच नाही तर स्वर्गातल्या गोष्टीही समजतात. त्याचं येथे प्रत्यंतर आलं आहे. खरंच हे त्रिकालज्ञ साधू धन्य आहेत! मी केलेला नवसही यांनी मनोमन ओळखला असेलच. आता थोड्याच वेळात तेही कळेल!”

लोकांनी गोसाव्याला पुढे आणून उभे केले. त्याला पाहून महाराज म्हणाले, “अरे! झोळीतली पोटळी काढ आता! तीन महिने झाले तिला तू सांभाळून ठेवलीस ना? आता होऊ दे गा पारणे!”

ते ऐकून गोसावी गहिवरला आणि महाराजांचे पाय धरून लहान मुलासारखा गडाबडा लोळू लागला. महाराज म्हणाले, “आता पुरे झाले! उठून बैस व  झोळीतली पोटली  काढ! नवस करताना लाज नाही वाटली? आता उगीचच कशाला  नाटकं करतोस?”

समर्थांचं असं रागावणं गोसाव्याच्या लगेच लक्षात आलं. तसा तो महाधूर्त होता. लाडका भक्त या नात्यानं त्यानं अत्यंत प्रेमाने समर्थांना गळ घातली. हात जोडून अत्यंत नम्रतेनं पण भीत भीत तो म्हणाला, “मी बुटी काढतो आणि नवस फेडतो. पण माझी एक मागणी आहे ती मान्य करावी अशी माझी विनंती मान्य करा! ” 

महाराजांनी प्रश्नार्थक मुद्रेने गोसाव्याकडे पाहिले व त्यावर तो म्हणाला, “या माझ्या बुटीची आपणास नित्य आठवण राहावी अशी माझी इच्छा आहे, ती पूर्ण करावी. मला माहींत आहे की, तुम्हाला याची गरज नाही पण माझ्यासारख्या बालकाची आठवण म्हणून माझी विनंती मान्य करा. भक्त जी जी इच्छा करतात ती ती आपण  पुरवतात, असा दाखला आहे. हवं तर अंजनीचा वृतांत मनात आणून पहा. तिनं शंकराची आराधना करून त्याना प्रसन्न करून घेतलं आणि वर मागितला की, तुम्ही वानर होऊन माझ्या उदरी जन्म घ्या. आता अंजनी वानरी जरी असली तरी, शंकरांसाठी तिचे वानरपण आड आले नाही. तिने मागितलेला वर देण्यासाठी त्यांनी महारुद्र होऊन तिच्या पोटी जन्म घेतला. ही जी बुटी आहे ना, तिला शंकराने  ज्ञानवल्ली म्हंटले आहे. इतर कुणी याचे सेवन करत असेल तर त्याला ती त्यांना कमीपणा आणेल पण तुम्हाला मात्र ती भूषणावह ठरेल!”

हे सगळं ऐकून महाराज थोडे चलबिचल झाले पण अखेरीस होय म्हणाले. बालकाचा हट्ट कसाही असला तरी आई पुरवतेच ना? मग गोसाव्याने झोळीतली बुटी काढली. हातावर घेऊन धुतली आणि चिलमीत घालून महाराजांना सेवन करायला दिली. चिलमीची प्रथा का पडली यामागचा घटनाक्रम सगळ्यांनी ध्यानात घ्यावा व मनात काही शंका ठेऊ नका. केवळ आपल्या भक्ताचं मन राखायचं आणि त्याला दिलेला शब्द पाळायचा यासाठी श्रीमहाराजांनी चिलीम जवळ बाळगली. पण त्याचे त्यांना कधी व्यसन लागले नाही. पाण्यात राहून कमळाचे पान जसे पाण्यापासून अलिप्त असते तसेच श्री महाराज मोह, माया यापासून वेगळे होते. काही दिवस शेगावात राहून गोसावी रामेश्वरला रवाना झाला.

मनात आलं की श्रीमहाराज, वेदातील ऋचा उदात्त, अनुदात्त स्वरासहीत असखलीतपणे म्हणत असत. त्यांचे अत्यंत शुद्ध उच्चार ऐकून वैदिक लोक आश्चर्यचकित होत आणि हे नक्कीच वेदविद्यासंपन्न ब्राह्मण असावेत असं अनुमान करत. 

कधी कधी एखादा निष्णात गवई ताना घेऊन एकच पद निरनिराळ्या रागातून आळवून आळवून म्हणतो , तसं श्री महाराज गात असत. चंदन चावल बेलकी पतिया हे पद त्यांच्या फार आवडीचं होतं. ते पद ते आनंदाने वारंवार म्हणत असत. कधी “गण गण गणात बोते” या मंत्राचे भजन करावं, तर कधी मौन धरावं , कधी शय्येवर काहीही हालचाल न करता पडून रहावं  तर कधी वेड्यासारखे चाळे करावेत. कधी जंगलात भटकावं, तर कधी अचानक कुणाच्यातरी घरी हजेरी लावावी अशी महाराजांची उदात्त लीला होती. थोडक्यात काय तर महाराज केव्हा कसे वागतील याचं काहीच अनुमान लावता  येत नसे.

शेगावात जानराव देशमुख म्हणून एक विख्यात गृहस्थ होते. त्यांचा प्राणांत व्हायचा वेळ जवळ आला. आजार वाढत गेला आणि शरीर अत्यंत अशक्त झाले. वैद्य त्यांच्यापरीने शिकस्त करत होते पण यश यायची चिन्हे मुळीच दिसत नव्हती. शेवटी नाडी पाहून ते म्हणाले, “आम्ही फार प्रयत्न केले पण तिळभर सुद्धा फरक वाटत नाही. तुम्ही आता जवळच्या नातेवाइकांना बोलाऊन घ्या व  यांना घोंगड्यावर काढून ठेवा.”

हे ऐकून जमलेले नातेवाईक अत्यंत दुःखी झाले. त्यांच्यापैकीच एक म्हणाले, “जानरावा, आम्हाला सोडून जाऊ नको रे! तुला बरे वाटावे म्हणून आम्ही किती नवस केले, पण कोणीही पावले नाही. आता तर वैद्याने सुध्दा हात टेकले. तेव्हा आता शेवटचा प्रयत्न करून पाहू. बकंटलालांच्या घरी एक साक्षात्कारी पुरुष आहेत. त्यांच्या येथे राहण्याने शेगाव म्हणजे प्रति पंढरपूरच झाले आहे. त्यांनी जर मनात आणलं तर काय अशक्य आहे ? सच्चीदानंद बाबांना नाही का ज्ञानेश्वरांनी उठवलं ! तसंच इथं काही घडतंय का ते पाहू ! जा जा, कोणीतरी लवकर त्यांच्याकडं जा. जानरावाचा अंत्य समय जवळ आला आता  उगीच उशीर करू नका!”

ते ऐकून एकजण उठले आणि बंकटलालांच्या घरी येऊन सर्व हकीकत सांगून म्हणाले, “कृपा करून समर्थांच्या पायाचे तीर्थ मला आणून द्या. जानरावाला त्याची अत्यंत गरज आहे.  त्याच्यासाठी ते अमृत ठरेल !”

यावर बंकटलाल म्हणाले, “ही बाब माझ्या हातातली नाही. त्यासाठी तुम्ही माझ्या वडिलांना विनंती करा.” 

त्याप्रमाणे भवानीरामाना विनंती करण्यात आली. ते मुळातच सज्जन आणि दयाळू होते. दुसऱ्याचं दुःख त्यांना अजिबात सहन होत नसे. त्यांनी  लगेच संमत्ती दिली. एका भांड्यात पाणी घेऊन समर्थांच्या चरणांना लावलं आणि जानरावना तीर्थ म्हणून दिलं. समर्थांनीही होय म्हणून मान तुकवली. 

जानरावाना तीर्थ देताच त्यांच्या घशातली घरघर बंद झाली. हळूहळू त्यांचा हात हलू लागला, ते थोडे थोडे डोळे उघडू लागले. एकूण त्यांच्या दुखण्याला उतार पडण्याची लक्षणे दिसू लागली. ते पाहून जानरावांच्या घरच्यांनी श्री गजानन महाराजांच्या तीर्थावर पूर्ण विश्वास  ठेवला व सर्व औषधे बंद केली. हळूहळू जानरावना बरे वाटू लागले. आठ दिवसांत जानराव खडखडीत बरे होऊन स्वामींच्या दर्शनाला आले. केवळ स्वामींच्या अमृतरुपी चरणामृताने जानरावाना बरे वाटले. संत म्हणजे साक्षात देवच असतात.

आता सहाजिकच येथे एक अशी शंका येईल की, समर्थ शेगावात असताना खरं तर कोणालाच मरण यायला नको पण ही शंकाच चुकीची आहे. कारण संत मृत्यू टाळत नाहीत फक्त आलेल्या संकटाचे निवारण करतात. ते सुद्धा अचानक आलं तर! सच्चीदानंद बाबांना माउलींनी नेवाशाला जरी उठवलं असलं, तरी त्यांनी नंतर आळंदीत देह ठेवला होता हे सत्य आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर संत गंडांतर टाळतात आणि असं करणं त्यांना सहज शक्य असतं!

तसं बघायला गेलं तर अध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैवीक असे तीन प्रकारचे मृत्यू असतात. त्यातील अध्यात्मिक मृत्यू श्रेष्ठ म्हणता येईल. आधिभौतिक मृत्यू कुपथ्यानं येतो त्याआधी शरीरास अनेक व्याधी जडतात आणि त्यांनी जोर केल्यावर मृत्यू ओढवतो. जर वेळेवर जाणकार वैद्याकडून औषधपाणी झालं तरच असे आजार बरे होतात. आधिदैविक मृत्यू  नवसाने टाळता येतो, पण आध्यात्मिक मृत्यू मात्र अटळ असतो. अभिमन्यूचा मृत्यू आधिदैवीक असल्याने कृष्ण समोर असतानाही काहीही उपयोग झाला नाही. जानरावांचा ओढवणारा मृत्यू हा गंडांतर स्वरूपाचा होता. त्यामुळे तीर्थ देण्याने तो टळला आणि साधुजनांना हे सहज शक्य आहे पण साधू मात्र साक्षात्कारी हवा. काही मृत्यू हे श्रद्धेने केलेल्या नवसाने टळू शकतात कारण श्रद्धा ही मोठी अमोल औषधी आहे.

बरं वाटल्यावर देशमुखांनी बंकटलाल यांच्या घरी मोठं गावजेवण घातलं. तीर्थ व अंगाऱ्यामुळं देशमुख बरे झाले खरे, पण आता स्वामींना पेच पडला. कारण जो तो येऊन आपलं मागणं मांडू लागला व ते पूर्ण करा असा तगादा लाऊ लागला. आता कडकपणा धरल्याशिवाय यातून सुटका नाही हे महाराजांनी ओळखलं. पण ही सुद्धा एक गंमतच! कारण हा कडकपणा इतरांना जाणवत होता. जे खरे भक्त होते त्यांना महाराजांचे अंतःकरण लोण्याहून मऊ आहे हे माहीत होते. त्यामुळे त्यांना काहीच त्रास झाला नाही. नरसिह अवतार इतरांसाठी महा भयंकर होता पण कयाधूकुमार प्रल्हाद मुळीच घाबरला नाही. तसंच हे होतं!

केशराला लागून जी माती येते तिला सुध्दा चंदनाची किंमत येते. चंदनाच्या झाडाजवळ जे गवत उगवतनं त्याला सुध्दा थोडासा वास येत असतो पण म्हणून तो स्वतःला चंदन समजू लागला तर मात्र त्याची फजिती झाल्याशिवाय राहात नाही. जिथं साधू असतात ना तिथंच भोंदूही राहतात. हिरे आणि गारा जशा का एकत्र राहातात तसे. आता आणखी एक प्रसंग असा आहे.

गजानन महाराजांच्या बरोबर असाच एक भोंदू रहात होता. आपण संतसेवा करतो या गोष्टीचा त्याला अतिशय गर्व होता. पण खरी गोष्ट तर निराळीच होती. महाराजांच्या पुढं भक्तजन मिठाई पेढे वगैरे ठेवत असत. ते पाहून हा भोंदूबाबा अतिशय खुश होई आणि ती सर्व मिठाई हा खाऊन टाके. आल्यागेल्या समोर हा फुशारकी मारे की, “माझ्यावर समर्थांची अत्यंत कृपा आहे. माझ्याशिवाय त्यांचे पानही हालत नाही. मी त्यांचा अत्यंत आवडता आहे. त्यांची सर्व कामे मीच करतो. त्यांची चिलीम भरतो, खाण्यापिण्याची व्यवस्थाही मीच बघतो. मी त्यांचा अत्यंत लाडका आहे, अगदी मी त्यांच कल्याणच आहे म्हणाना! “असे तो सर्वांना सांगे. या अधम माणसाचे नाव होते माळी विठोबा घाटोळ!

इतरांना जरी त्याचे बोलणे खरे वाटत असले तरी महाराज अंतर्यामी होते. त्यांनी त्याची खोड मोडायची ठरवले आणि एक लीला केली. एकदा परगावातली काही मंडळी  स्वामींच्या दर्शनाला आली होती. पण त्यावेळी श्री गजानन महाराज निजलेले होते. आलेल्या मंडळींना परत जाण्याची घाई असली तरी  महाराजांना उठवायचे धाडस कोणच करेना ! त्यांनी ही गोष्ट विठोबाच्या कानावर घातली. म्हणाले, “अरे, तू त्यांचा एवढा आवडता शिष्य आहेस तर काहीतरी करून आम्हाला महाराजांचे दर्शन घडव!”

त्यांनी केलेल्या स्तुतीने विठोबा फुगून गेला. आत जाऊन त्याने महाराजांना उठवले. आलेल्या मंडळींचे दर्शनाचे काम झाले पण विठोबावर संकट ओढवलं.

समर्थांच्या हातात एक काठी होती. तीच त्याच्या पाठीत घातली. म्हणाले, “का रे तुला खूप मस्ती आली का? तू काय उघड उघड व्यापारच मांडला असे दिसते! तू केलेला अपराध नजरेआड करून तुझ्यावर जर मी कृपा केली तर मी देवाचा अपराधी होईन! विषाला कधी जवळ ठेवतात का? चोराला कधी गळ्यातला ताईत करतात का? असा विचार करून महाराजांनी घाटोळाला छडीने ठोकून काढला. मार खाऊन विठोबा जो पळाला, तो पुन्हा फिरकला नाही!

खरे संत चोराना दूर करतात. ढोंगी मात्र अशानाच जवळ करतात आणि इतरांना लुटून पैसा मिळवतात. पण यामुळे समाज रसातळाला जातो.

संत अशा लबाडांना खूप ओळखून असतात. त्यांना हेही माहीत असतं की, पूर्वकृत्यानुसार ते भूमीवर वावरतायत! म्हणून ते त्यांच्याकडं फारसं लक्ष देत नाहीत. जमिनीत निवडूंग नाही का उगवत, तसंच हे म्हणता येईल. मोगरा, निवडूंग आणि शेर तिन्हीही जमिनीवर उगवतात पण प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते. मोगऱ्याचं संरक्षण निवडूंग करतो तर, चिलटं पळवायला शेराचा वापर करतात. संत हे भूमीवरील सगळ्यांचं रक्षण करतात पण किमतीप्रमाणे भेदभाव करतात.

विठोबा घाटोळ हा एक दुर्दैवी जीव होता. जर सरळपणे राहिला असता तर काहीएक योग्यता प्राप्त करता झाला असता. पण त्यानं कल्पवृक्षाखाली बसून गारगोटी मिळावी अशी इच्छा केली. असं कृपया कुणी करू नका. संतांचं सानिध्य जर मिळालं तर अहर्निशी जागृत रहा!

दासगणू रचित गजानन विजय ग्रंथाचा तिसरा अध्याय सुफळ संपूर्ण होत आहे.श्री जानराव देशमुखांचे मृत्यूचे गंडांतर जसे महाराजांची कृपा होऊन टळले तसेच हा अध्याय वाचल्यानंतर आपल्यावर आलेले कोणतेही गंडांतर व संकट टळेल हीच या अध्यायाची प्रच्युती आहे.

श्री दासगणु विरचित श्रीगजानन विजय ग्रंथाचा अध्याय तिसरा येथे सुफळ संपूर्ण!

या अध्यायाचे वाचन, चिंतन व मनन केल्यास आपणांस सहजच “श्री” ची कृपा दृष्टी होईल.

- अनुवादक: श्री वामन रुपरावजी वानरे.

मो.09826685695