श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित तेरावा अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.

  “श्री गजानन विजय ग्रंथ”

अध्याय तेरावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

अध्याय सुरू करण्याअगोदर श्री दासगणू महाराज भगवान श्रीकृष्णांना नमन करतात त्यांची  स्तुती करतात व   म्हणतात कि, ” हे दयाधना परमेश्वरा तुम्ही नेहमी संताना आशीर्वाद देत असता तेव्हा हे श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोपगोपीप्रियकरा, तमालनीळा, हे हरि तू माझ्यावर प्रसन्न हो. तुझे  सत्व  पाहण्याकरीता ब्रह्मदेवांनी यमुनाकाठी असलेले गोकुळांतील गाई-वासरे चोरली. मग तुम्ही तेथे आपल्या लीलेने गाई वासरे होऊन ब्रह्मदेवाना आपले प्रभुत्व दाखवून दिले. गोप गोपिकाना निर्भय करण्यासाठी दुष्ट कालिया नागाला यमुनेतुन उठवून व तुडवून त्याला  रमणक द्वीपाला पाठविले. आता तुम्ही मला सुद्धा असेच  तुडवून या दासगणूला सर्व बाजूनी निर्भय करा. मी जरी तुमचा अजाण भक्त असलो तरी तुम्ही माझ्यावर असीम  कृपा करा. मला हे सर्व विदित  आहे की, माझी तशी पात्रता नाही व तुमची कृपा प्राप्त करण्यास मी सर्वथा अयोग्य आहे. हे जरी  खरं असलं तरी तुम्ही आता माझा अंत पाहू नका. माझ्यावर कृपादृष्टी ठेवून आता तुम्ही माझ्या चिंतेचं त्वरित समाधान करा.

 असो, अधिकाऱ्यानी जी जागा दिली होती त्या जागेत महाराजांचा मठ बांधण्यासाठी  बंकटलाल अग्रवाल, हरी पाटील, लक्ष्मण, विठू, जगदेव इत्यादी लोकांनी मिळून वर्गणी गोळा करणे चालू केले. जे भाविक होते त्यांनी वर्गणी दिली  मात्र कुत्सितांनी कुटाळपण केले व म्हणाले, “कि ह्या वर्गणीची तुमच्या संताना काय आवश्यकता आहे हो? तुमचे गजानन महाराज हे स्वतःच परिपूर्ण आहेत हे सर्व करायला, जे अशक्य आहे ते ही करतात मग असे असताना  कशाला त्यांच्या मठासाठी वर्गणी  मागता? कुबेर त्यांच्या अधिपत्याखाली असताना मग कशाला हो  दारोदारी वर्गणी मागणीसाठी फिरता हो? 

हे ऐकून जगदेव हसून म्हणाले, “अहो ही भिक्षा महाराजांसाठी नको आहे त्यांच्याजवळ खरोखरच रिद्धी सिद्धी नांदतात. त्यांना कशाला ह्या मठाची आवश्यकता आहे हो? हा सर्व खटाटोप तर तुमच्या कल्याणासाठी करावा लागत आहे.  स्वामी गजानन महाराजांसाठी तर त्रैलोक्य हाच त्यांचा मठ आहे. अवघी वन व हा बगीचा आणि मेदिनी त्यांचा पलंग आहे. अष्टसिद्धी त्यांच्या दासी आहेत. ते तर क्षणात कोणालाही धनपती करू शकतात.त्यांना तुमची पर्वा करण्याची काय गरज आहे? त्यांचे  वैभव आगळेवेगळे आहे, ते वर्म तुम्ही समजू शकत नाही हो! जो स्वतःच  सूर्य देव आहे त्याला दिवा दाखवायची आवश्यकताच काय? जे प्रत्यक्ष प्रकाशमय आहेत त्यांना दिव्याची काय गरज? जे आधीच सार्वभौम आहेत त्याना त्याचा गाजावाजा करायची गरजच काय? ऐहिक सुख समृद्धी साठी ह्या गरजा मनुष्याला असतात व त्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे सर्व ह्या पुण्य कृत्यामुळे पूर्ण होईल. शरीराचा रोग बरा करण्यासाठी औषधाची गरज असते ती गरज आत्म्यासाठी नसते हे लक्षात घ्या. रोगाची भीती ही शरीराला असते,  आत्म्याला नाही. तसेच आत्म्याला जन्म मरणही नाही. तेव्हा तुमच्या सुसंपन्नतेचं रक्षण करण्यासाठी हे पावन कार्य करण्याची ही औषधी मिळवणे भाग आहे. सुख, संपत्ती हे जर शरीर मानलं तर त्याचा होणारा नाश या पुण्यरुपी औषधीने थांबेल म्हणून मनात काहीही तर्क कुतर्क न करता पुण्यसंचय करण्याचं कार्य करा. पुण्य मेदिनीत आपल्या संपत्तीचा पेरा करा. खडकावर बीज पेरलं तर ते वायाच जाणार हे लक्षात असू द्या. अनाचार दुर्वासना हे जीवनातले खडकरुपी मेद आहेत त्यावर संपत्तीची पेरणी केलीत तर किडे पाखरे ती खाऊन टाकतील. संत सेवेसमान कोणतेही पुण्य नाही. सध्या संतांचे मुकुटमणी श्री संत गजानन महाराज तुमचे कल्याण करण्यासाठीच येथे आले आहेत हे ध्यानी धरा. संत कार्यास कांही दिलंत तर ते अगणित होऊन परत मिळते. जसा एक ज्वारीचा दाणा जमिनीत  पेरला तर त्याचं कणीस तयार होवून त्या  कणसाला अनेक दाणे येतात. तसंच ह्या संत कृपेरूपी पुण्याचं काम आहे हे बावहो विसरुं नका.”

 हे सर्व ऐकून ते सर्व कुटाळ निरुत्तर झाले. एक रूप तत्व जवळ आलं की मग इतर  तर्काची मात्रा चालत नाही. नेते वजनदार असले की, वर्गणीही तशीच जुळणार ना? असे क्षुल्लक लोक जर कार्यात मिळाले तर वर्गणीचं काम होणार नाही. मिळालेल्या जागेवर आता कोटाचं बांधकाम त्वरेने सुरू झाले. सर्व गावकरी मंडळी सहकार्यास धावून आली त्यामुळे मग कशाचीच कमतरता भासली नाही.  बांधकामासाठी दगड, चुना, रेती इत्यादी सामान गाड्यातून आणले जात होते. त्या वेळी श्री गजानन महाराज जुन्या मठात वास्तव्य करीत होते त्यांच्या मनात असा विचार आला की, आपण कामाच्या ठिकाणी गेल्या शिवाय कामाला गती येणार नाही. असा विचार त्यांच्या मनात आल्यावर एका वाळूच्या गाडीवर बसून समर्थ बांधकामाच्या ठिकाणी निघाले. महाराज ज्या  गाडीवर बसलेले होते ती गाडी त्या काळी अस्पृश्य समजलेला अस्पृश्य मनुष्य चालवित  होता म्हणून तो महाराजांच्या सन्मानार्थ गाडीतून खाली उतरला. त्यावर महाराज त्याला म्हणाले, “कां रे खालीं उतरलास? आम्हा परमहंसाना विटाळाची बाधा नसते.”

त्यावर गाडीवान बोलला, “महाराज मी तुमच्या शेजारी गाडीवर बसणं हे सर्वथा अयोग्य आहे. मारुती रामरुप झाला होता तरी तो श्रीरामाजवळ बसला नाही. ते मारुतीराय नेहमीच आपले हात रामापुढे जोडून उभे राहात असत.” 

त्यावर महाराज म्हणाले, “बरं बाबा तुझी मर्जी. माझी काही हरकत नाही. बैलांनो आता गाडीवाल्या मागून नीट चला.” त्यानुसार बैलगाडी अगदी तंतोतंत   गाडीवाल्या वाचून ठरलेल्या ठिकाणी येऊन उभी राहिली. श्री गजानन महाराज गाडीवरून जेथे येऊन बसले होते तेथेच नंतर त्यांच्या भव्य समाधीचे काम झाले. ही जागा  शेगावातील सातशे सर्व्हे नंबराच्या त्रेचाळीस / पंचेचाळीस  भागात आहे. महाराज ज्या ठिकाणी  बसले तीच मध्य जागा असावी असे लोकांनी ठरवले. म्हणून ही समाधी दोन सर्व्हे नंबरात आली. दोन्ही नंबरांतून  थोडी थोडी जागा घेऊन हुशार  कार्यकर्त्यांनी मध्य साधला. हुकूम तर एक एकराचा झाला होता. पण बांधकामाच्या वेळेला समाधी मध्य साधण्यासाठी जागा थोडी कमी पडली म्हणून अकरा गुंठे जास्त जमीन घेऊन बांधकाम सुरू केलेलं होतं.

गावच्या पुढारी लोकांना अस  वाटलं की, अधिकार्‍यांनी जे वचन दिलं होत की काम पाहून आणखी एक एकर जागा जास्त देऊ,  म्हणून मोठं  धाडस करून अकरा गुंठे जास्त जागा वापरली. पण  एका दुष्टाच्या बातमीमुळे प्रकरण विकोपाला गेले. यामुळे पुढारी थोडे घाबरले. हरी पाटील समर्थाना म्हणाले, “अकरा गुंठे जागेचा तपास करायला एक जोशी नांवाचा अधिकारी येणार आहे.” त्यावर  समर्थानी उत्तर दिले कि,  “जागेबद्दल तुम्हाला झालेला दंड माफ होईल.” त्या जोशी नावाच्या अधिकाऱ्यांना महाराजांनी स्फूर्ती दिली. त्याप्रमाणे त्यांनी चाललेल्या प्रकरणावर  शेरा मारला की, हा झालेला दंड विनाकारण आहे. म्हणून वसूल केलेली  दंडाची रक्कम गजानन महाराज संस्थेला परत द्यावी. मी शेगावला जाऊन चौकशी केली व  लक्षात आले की, झालेल्या प्रकाराबद्दल दंड करणे सर्वथा अयोग्य आहे. या जोशींच्या अहवालामुळे दंड माफ केल्याचा व हुकूम जारी झाला  तेव्हा हरी पाटलाना खूप आनंद झाला व  ते म्हणू लागले कि, “समर्थांचे वाक्य कधीच खोटे होणार नाही. माझ्यावर नुकतेच एक किटाळ येऊन गेले. त्या वेळी महाराजांनीं भिऊं नकोस तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही असे भाकीत केले होते व ते तसेच झाले.श्री गजानन महाराज जे वदले ते कधी खोट  झालं का?  असो, झालेल्या  प्रकाराने शेगांवाचे लोक महाराजांच्या नांदी लागले. आतां नव्या जागेवर श्री गजानन महाराजांनी काही लीला केल्यात.  मेहेकर जवळ असलेल्या सवडद गावचे श्री गंगाभारती गोसावी यांना महारोग झाला होता.त्यांचे  सर्व अंग कुजून गेले होते. दोन्ही पायांना भेगा पडल्या. सर्व शरीराची तीच गत होती. हातापायाची बोटे झडून गेली होती. सर्व अंग लालसर झालं होतं. कानाच्या पाळ्या सुजून त्याला खाज सुटली होती. ह्या रोगाने अत्यंत त्रासलेले गंगाभारती गोसावी महाराजांची  कीर्ति ऐकून शेगांवला आले. त्यांना श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस लागली होती पण शेगावतील लोक काही “श्री” पाशी  त्या गोसाव्याला जवळ जाऊ देत नव्हते. ते  म्हणाले, “तुला रक्तपिती आहे, तूं त्यांच्या दर्शनाला जाऊ नको. जर  तुला त्यांचे दर्शनच  घ्यायचे असेल तर दुरूनच  महाराज दिसतील अशा ठिकाणी उभा राहून दर्शन घे. त्यांचे पाय धरायला त्यांच्या जवळ कधीही जाऊ नकोस. हा एक  फार मोठा  स्पर्शजन्य रोग आहे असं वैद्य व  डाँक्‍टर सांगतात, याचा तू विचार कर गड्या. एवढं लोकांनी सांगितले तरी एके दिवशी गंगाभारती गोसावी एकदा सर्वांची नजर चुकवून धावत धावत जाऊन  श्री गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला गेलाच! जेव्हा गोसाव्याने महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं त्याचबरोबर समर्थांनी त्यांच्या डोक्यावर जोरानं थापड  मारली तेव्हा गंगाभारती उभा राहून महाराजाना एक टक पाहू  लागला. तेवढ्यात महाराजांनी त्याच्या थोबाडात व मुखांत चापट्या मारल्या व वरून एक लाथ सुद्धा मारली. नंतर महाराज खोकारले व  एक बेडका काढून त्यांच्या अंगावर थुंकले.  जो बेडका गंगाभारतीच्या अंगावर पडला तोच त्याने मलम मानला व आपल्या अवघ्या अंगास चोळला. त्याच वेळी तेथे  एक कुटाळ बसला होता   व तो हा सर्व प्रसंग पाहून  म्हणाला, कि  “बघ, तुझा आता घात झाला. आधीच तुझं शरीर नासल आहे त्यात अजून भर म्हणून त्यात यांनी तुझ्यावर  अमंगळ बेडका टाकला व तू सुद्धा तो हा प्रसाद मानून अवघ्या अंगाला चोळलास. जा  बाबा आता साबण लावून सर्व हे सर्व धुऊन टाक. हे असे वेडेपीर ह्या जगात वावरू लागले की, अंधश्रद्धेने विश्वास ठेवणारे लोक त्यांना साधू म्हणतात. त्यामुळे अशा अमंगल कृत्यांस ऊत येतो. समाज सहज रसातळाला जातो. आता तुझंच  उदाहरण घे, तूं औषध घेण्याचें सोडून या वेडयापिशापाशी धावत आला की नाही? “पण गोसावी हे सर्व ऐकून अजिबात संशयित झाला नाही. उलट तो हसून म्हणाला, “तुम्ही येथेच चुकता. साधूजवळ अमंगळ असे कांहीच रहात नसते, जसे कस्तुरीच्या जवळ दुर्गंधी राहात नाही तसाच तुम्हाला हा  बेडका दिसला खरा पण हा प्रत्यक्षात  मलम आहे. त्याला कस्तुरीसारखा सुवास येतो. तुम्हाला संशय असला तर  माझ्या अंगास हात लावून पहा  म्हणजे तुम्हाला कळेल. त्यात थुंक्याचें नाव नाही. ते  फक्त औषध आहे हे लक्षात घ्या. मी काही इतका वेडा नाही की, बेडक्याला मलम मानायला तयार होईन. तुमचा त्याच्याशी काही संबंध नव्हता  म्हणून तुम्हाला तो  बेडका दिसला. समर्थांची योग्यता तुम्ही मुळीच जाणली नाही. त्याचे प्रत्यंतर पहायचं असलं तर एक वेळ समर्थानी स्नान केलेल्या जागेवर आपण दोघेही जाऊ, दररोज महाराज जेथे स्नान करतात तेथील ओली माती मी माझ्या अंगाला लावतो.” असा दोघांचा संवाद संपल्यावर ते दोघेही महाराज जेथे स्नान करतात तेथे गेले. तेव्हा त्या कुटाळाला गोसाव्यांनी सांगितल्याप्रमाणे अनुभव आला. त्या ठिकाणची माती दोघानीही हातात घेतली. तेव्हा गोसाव्याचा हातातल्या मातीला कस्तुरीसारखा सुगंध होता व तेच औषधी आहे असं लक्षात आलं,  मात्र  कुटाळाच्या हातात दुर्गंध येणारी ओली माती होती. तो प्रकार पाहताक्षणी कुटाळ मनात घोटाळला व आपली कुत्सित भावना सोडून महाराजाना शरण गेला. गंगाभारतीचा पहाडी गोड मधुर आवाज होता पण  त्यांच्या आजारामुळं कोणी त्यांना जवळ बसूं देत नव्हते म्हणून ते दूर बसून गजानन स्वामी पुढे नित्य भजन करत असत. त्यांना गायनाचा अभ्यासही होता. असे पंधरा दिवस गेले. रोगाचे स्वरुप पालटले. अंगावरची लाली हळू हळू कमी होऊ लागली. चाफे पूर्ववत झाले. पदीच्या सर्व भेगा निमाल्या. दुर्गंधीचा आता कोठेही ठाव ठिकाणा राहिला नव्हता.

     गंगाभारती गोसाव्याचे भजन ऐकून महाराज अत्यंत संतुष्ट होत असे. गायन ही गोष्ट सर्वानाच आवडते. गंगाभारती बरे झाले आहेत हे समजल्यावर त्यांची पत्नी अनुसूया त्यांना घरी घेऊन जायला शेगांवला आली. तिच्याबरोबर त्यांचा मुलगा संतोषभारती होता. तिने येऊन पतीला हात जोडून गावास चलण्याची विनंती केली. 

 “तुमची व्याधी आता बरी झाले आहे व मी हे प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. महाराज साक्षात्‌ चंद्रमौळी आहेत हेंच खरे आहे!” मुलगाही म्हणाला की, “गजानन महाराजाना विचारा व तसच घरी चला. येथे राहणे आता पुरे झाले.” त्यावर गंगाभारती म्हणाले, “मला हात जोडू नका. आता मी तुमचा खचित राहिलो नाही. ही जी समोर अनाथाची माउली स्वामी गजानन बसली आहे ना, त्यानी चापट मारून माझी नशा उतरवली आहे ते  म्हणाले, अंगाला राख लावून गोसावी झालास व चित्त संसारांत ठेवतोस या भगव्या वस्त्राची अशी  किती विटंबना करशील? असा संकेत दिला आणि थापट्या मारुन जागे केले. आता माझे डोळे उघडले आहेत. या संसाराचा आता संबंध नको. संतोषभारती तूं येथे न राहता तुझ्या आईला घेऊन घरी सवदडला जा. हिचं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत हिची सेवा कर. आईला अंतर देऊ नकोस. मातेची जो सेवा  करतो तो ईश्वराला प्रिय होतो. वासुदेवा हे ध्यानात घेऊन  पुंडलिकाचा इतिहास तुझ्या डोळ्यापुढे ठेव. मला आता सवडदला यायचा तुम्ही आग्रह करू नका. कारण मी जर गावी आलो तर हा रोग पूर्ववत होईल. आतापर्यंत मी  तुमचा होतो, आता देवाकडे जातो. नरजन्माचा कांहीतरी उपयोग करून घेतो. जर हा नराचा जन्म सार्थकी लावला तर माझ्या चौर्‍यांशींच्या  फेरा चुकेल.श्री गजानन महाराजांच्या कृपेने मलाही उपरती झाली. या परमार्थ रुपात माझ्यावर  लोभाची माती टाकूं नका.” 

 गोसाव्यांनी कुटुंबाची समजूत घालून मुलासह सवडदला पाठवून दिले व  ते शेगावी राहिले. श्री गजानन महाराजांच्या लिलेची निरनिराळी पदे ते आवडीने म्हणत. रोज संध्याकाळी एकतारी घेऊन महाराजांच्या सानिध्यात बसून भजन करीत असत. त्याचे भजन ऐकून इतरांनाही आनंद होई. गायन ही बाब अशी आहे कि ते सर्वानाच आनंद देते.  गंगाभारती संपूर्ण बरे झाले. रोग समूळ नष्ट झाला. पुढे महाराजांच्या आज्ञेने ते मलकापुरला गेले. 

एकदां पौष महिन्यात झ्यामसिंग शेगांवला आले व म्हणाले, “महाराज आता तुम्ही माझ्या गावाला चला. मागे मी तुम्हाला माझ्या  भाच्याच्या घरी न्यायला आलो होतो तेव्हा तुम्ही अडगावी आले असताना माझ्या घरी यायची विनंती स्विकार केली होती. तेव्हा तुम्ही मला  म्हणाला होतात की, आता आग्रह करू नकोस. पुढं मागं केव्हातरी येईन. त्याला आता खूप दिवस झाले. मी आपला भक्त आहे, तेव्हा मुंडगांवांत येऊन माझी इच्छा पूर्ण करा. मुंडगावात माझ्या घरी काही दिवस राहा. मी अवघी तयारी करून आपल्याला न्यायला आलो आहे.” झ्यामसिंगाची विनंती ऐकून श्री गजानन महाराज मुंडगावी आले तेव्हा गावातले व आसपासच्या गावातील इतर खूप लोक दर्शनाला आले. महाराजांच्या दर्शनामूळे लोकांना झालेला आनंद अवर्णनीय होता.झ्यामसिंगानी मोठा भंडारा केला. मुंडगांव जणू गोदातीरीचे दुसरे पैठण झाले होते.जसे पैठणात  एकनाथ महाराज तसे मुंडगावात संत गजानन स्वामी झाले होतें. भजनासाठी खूप भजनी मंडळी दिंड्या घेऊन आल्या होत्या. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी आचारी स्वैपाकाला लागले.

 अर्धा स्वयंपाक झाला. तेवढ्यात झ्यामसिंगाना महाराज म्हणाले, अरे “झ्यामसिंगा, आज चतुर्दशी आहे व ही आज ह्या तारखेला   काही शुभ असं दिसत नाही. जेवणाच्या पंगती पौर्णिमेच्या मुहूर्तावर होऊ दे.” झ्यामसिंग त्यावर म्हणाला, “पण महाराज स्वयंपाक तयार झाला व प्रसादासाठी फार अन्न असून लोक पण जमले आहेत.” 

तेव्हा महाराज म्हणाले, “हे व्यवहारदृष्ट्या तुझं म्हणणं बरोबर आहे पण हे त्या जगदीश्वराला मान्य  दिसत नाही गड्या. मला असे वाटते की हे अन्न वाया जाणार असे दिसते  झ्यामसिंगा, तुम्हा प्रापंचिकांना नेहमी तुमच्या मना प्रमाणे व्हावे असेच नेहमी वाटत असते पण हे व्यवहारी जरी ठीक असले तरी काही गोष्टी त्या विधात्याच्या हाती असतात व   त्याला जे मंजूर असलं तेच घडतं.

महाराज व झ्यामसिंगा मध्ये जे बोलणं झालं ते तेवढ्यापुरतच अधुरं राहिलं. जेवण्याच्या पंगती वाढायची वेळ झाली. लोक जेवायला बसले तोच एकाएकी आकाश भरुन आले. मेघगर्जना होऊं लागली. डोक्यावर विजा चमकू लागल्या. वाऱ्याच्या झंझावाताने जंगलात झाडे कडकडा मोडू लागली. घटकेत पाणी पाणी झाले व  सर्व अन्न वाया गेले.

मग झ्यामसिंगाने महाराजांची विनवणी केली व म्हणाला, “महाराज आता निदान उद्या तरी आमचा पंगतीचा कार्यक्रम संपन्न होऊ द्या.  सर्व मंडळींचे चेहरे उतरून गेले आहे. महाराज आता उद्यातरी ह्या  पर्जन्याचं निवारण करा हो! हा काही पावसाळा नव्हे. आमचा नाश करायला हा एखाद्या अनोळखी आगुंतूसारखा आला व पर्जन्यवृष्टी केली? आता पाऊस पडला तर शेतीचे वाटोळे होईल. लोक म्हणतील झ्यामसिंगानं भंडारा घालून पुण्य मिळवलं पण ते आम्हांला मात्र चांगलंच भोवलं ? वा ही बरी रीत आहे तुझ्या पुण्याची?” तेव्हा महाराज म्हणाले, “झ्यामसिंगा !  असा साशंक का होतोस ? हा पाऊस उद्या दगा देणार नाही. आतांच मी त्याला सांगतो ते पाहा. 

“असं म्हणून महाराजांनी आकाशाकडे पहिलं तर लगेच आभाळ फाकल,  मेघ क्षणांत निघून गेले. सगळीकडे  ऊन पडले. हे सगळं एका क्षणात झालं. अशी संताची सत्ता अगाध असते. दुसरे दिवशी पौर्णिमेला पुन्हा मोठा भंडारा झाला. मुंडगावात अजूनही ती प्रथा चालू आहे. महाराजांच्या याच भेटीत झ्यामसिंगाने आपली सर्व इस्टेट महाराजांचे चरणी अर्पण केली. 

मुंडगावात समर्थांचे अनेक भक्त होते. त्यात एक पुंडलीक भोकरे म्हणून एक तरुण पोरगा होता. हा उकिरड्या नामक कुणब्याचा  एकुलता एक जवान मुलगा होता व महाराजांचा भक्त झाला. उकिरडा हे नाव वर्‍हाडांत  पोर वाचत नसेल तर नवस करून ठेवतात. तेलंगणात पेंटय्या, केर पुंजा महाराष्ट्रांत तसं उकीर्डा नाव वर्‍हाडांत ठेवतात.

जसे वारकरी वद्यपक्षात इंद्रायणीच्या तीरावर असलेल्या देहू आळंदीला जातात तसाच हा पुंडलिक परम भावभक्तीने श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी नियमितपणे शेगांवची वारी करत असे.

एकदां वर्‍हाडांत गाठीचा रोग  खूपच वाढला. यात ताप येऊन प्रथम थंडी वाजते अंग ज्वरानें तप्त होऊन डोळे लालभडक होतात. एवढं झाल्यावर कुठतरी सांध्यावर गाठ उठते. ती उठल्यावर वाताने माणूस तडफडू लागतो व  मग त्याला कशाचेही भान राहात नाही. अंगात एकाएकी अंगारे व वेदना होऊन तो क्षणोक्षणी बेशुद्ध होतो. पूर्वी युरोपात मोठ्या प्रमाणात असलेला हा विपरीत रोग भारतात आला व  गांवोगांव पसरला. त्याचा प्रतिकार करायचा म्हणून लोकांनी आपली घरेदारे सोडून दिली. अशा या दुर्धर रोगाची लागण मुंडगावावर आली. तरी सुद्धा पुंडलिक वारीसाठी शेगावला निघाला. वारी चुकायला नको म्हणून आपल्याला घरातच आलेली ही रोगाची व्यथा त्यानं कोणालाही सांगितली नाही व  वडिलांच्या बरोबर त्याने शेगावाची वाट धरली. पांच कोस अंतर चालून येताच त्याला कडाडून ताप आला. त्यामळे तो एक पाऊल सुद्धा पुढे टाकू शकत नव्हता. त्यातच त्याला बगलेत गाठ आली असल्याने तो फारच दुःखी झाला. वडिलांना हे काहीच माहीत नव्हते. त्यांनी असं का करतोस असं विचारलं. त्यावर पुंडलिक म्हणाला, “बाबा मला ताप आला. काखेत गोळा उठलाय. शक्ति क्षीण होत चालली आहे त्यामुळे मी आता चालू शकत नाही. दुर्दैवाने ही वारी आता अर्धवट होणार अशी चिन्हे दिसत आहेत.” असं म्हणून त्याने श्री गजानन महाराजांची  प्रार्थना केली व  म्हणाला, “हे स्वामी दयाघना ! वारीत खंड पडू देऊ नका. तुमचे दिव्य चरण मला दाखवा. हे भक्त वत्सला कृपानिधी , वारीची सांगता झाल्यावर  मग मला  खुशाल ताप येऊन मरण आलं तरी मला त्याची पर्वा नाही. ही वारी हा माझा पुण्य ठेवा आहे व त्यामुळे तुम्ही त्याचं रक्षण करा. ही साथ वारीचा नाश करायला सज्ज झाली आहे.जो पर्यंत  शरीरात ताकद आहे तो पर्यंतच परमार्थ घडतो.” 

मुलाची स्थिती पाहून बापही चिंतातुर झाला आणि रडू लागला. म्हणाला, “हा माझा  एकुलता एक पुत्र माझ्या वंशाचा दिवा आहे. त्याला नेऊ नकोस.” उकिर्डा पुत्राला विचारू लागले, “तुला बसायला गाडी घोडा आणू का?” त्यावर पुंडलीक म्हणाला, “नको आता वारी पायीच झाली पाहिजे. उठत बसत कसे तरी शेगावला जाऊ. मध्येच मृत्यु आल्यास माझं शव तरी शेगावला न्या.”  असं म्हणून बसत उठत कसंतरी करून पुंडलिक अति कष्टाने शेगावाला आला. स्वामी समर्थाना पाहून त्याने दंडवत घातला. तेवढ्यात महाराजांनी हातखंडी केली. एका हाताने त्यांनी त्यांचीच कांख  जोऱ्याने दाबून ठेवली व  पुंडलिकाला प्रेमळ आवाजात म्हणाले, “तुझे गंडांतर आता  टळले. आता त्याची तिळभरही चिंता करु नकोस.” 

महाराज असं म्हणताक्षणी पुंडलिकाची गांठ जागच्या जागी जिरून गेली. तापही उतरला. अशक्‍ततेने देह थोडासा कापत होता पण पुंडलिकाच्या मातेने आणलेल्या नैवेद्याचे दोन घास समर्थांनी घेतल्या घेतल्या पुंडलिकाच्या शरीराची कपकपी बंद झाली. थोडीशी अशक्तता जरूर वाटली पण  पुंडलिक पूर्ववत एकदम बरा झाला. हे गुरु भक्‍तीचे फळ पाहून अंधानी डोळे उघडावेत. गुरु योग्य असल्यावर सेवा वाया जात नाही. घरी कामधेनु असल्यावर इच्छा जरूर पूर्ण होतील. अशा तऱ्हेने यथासांग वारी करून पुंडलिक मुंडगांवाला गेला.

 अध्याय तेरा मध्ये दिलेले जो हे चरित्र व महाराजांच्या लीलांचं स्मरण करेल , त्याचे श्री गजानन गुरुस्वामी द्वारे  गंडांतर टळेल. संतचरित्र ही गोष्ट नाही, कथा नाही तर या चरित्ररूपी अध्यायात महाराजांचे आशीर्वाद आहेत.   संत कथेबद्दल कोणी व  कधीही अविश्वास ठेवू नये.

ह्या तेराव्या अध्यायात महाराजांनी भक्तांचे संकटे वारून भक्त पुंडलिकाचे गंडांतर टाळले अशाच प्रकारे जो हा अध्याय प्रेमपूर्वक व भक्तीभावणेने वाचेल त्याच्या संकटातून महाराज सहज मुक्त करतील व गंडांतर पण टाळेल.

असा हा संतकवी दासगणू विरचित १३ वा अध्याय सुफळ संपूर्ण झाला आहे.

- अनुवादक: श्री वामन रुपरावजी वानरे.

मो.09826685695