संतकवि दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचा मराठी अनुवादित सातवा अध्याय प्रस्तुत करताना मी श्री गजानन महाराज व संत कवि दासगणू महाराजांचे वंदन करतो.

“श्री गजानन विजय ग्रंथ”

अध्याय दुसरा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

श्री दासगणु महाराज ईश्वराची प्रार्थना करताना म्हणतात, “हे जयजय अजित सर्वेश्वरा, चंद्रभागेच्या तटावर विहार करणाऱ्या, पूर्णब्रह्म रुक्मिणीवरा, दिनबंधु माझ्याकडे पहा. तुमच्या वशील्यावाचून  सर्व काही व्यर्थ आहे. जर कुडीत प्राण नसतील तर मढ्याला कोण विचारणार ? पद्मनाभा, तलावातल्या पाण्यामुळे काठाची शोभा वाढते. आतला गाभा रसभरीत हवा, नुसत्या टरफलाला कोण विचारतंय? “बंकटलाल आणि दामोदरपंत यांनी “श्री” महाराजांचा महिमा ओळखला  व ते त्यांचे चरण धरायला महाराजांच्या पाठीमागे धावले. पण त्यांचा हा मनसुबा श्री महाराजांना काही आवडला नाही. त्यामुळे ते तेथून नाहीसे होऊन दिसेनासे झाले. पण घडल्या प्रसंगाने बंकटलालना मोठी हुरहूर लागून राहिली. अन्नपाणी गोड लागेना. महाराजांची मूर्ती काही त्यांच्या डोळ्यांपुढून हलायला तयार नव्हती. महाराजांच्या दर्शनाचा त्यांनी ध्यासच घेतला म्हणाना ! त्यांना जिकडे तिकडे श्री महाराजांचाच भास होऊ लागला. चुकलेलं वासरू जसं सतत आईला हुडकत असतं तशी बंकटलालांची अवस्था झाली. बरं कुणाशी बोलावं तरी पंचाईत , तसं जिवाभावाचं कुणीच नव्हतं ! वडिलांकडे बोलावं , तर छाती होत नव्हती ! मनात नुसते विचारांचे काहूर उठले होते. काय करावं ? कसं करावं ? काही कळत नव्हतं ! त्या नादातच अवघं शेगाव पालथं घातलं पण काहीच पत्ता लागला नाही. 

सगळं गाव फिरून ते घरी आले.  भवानी रामांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी विचारलं , ” अरे , असा चंचलपणे का वागतोयस ? तुझं तोंडही सुकल्यासारख दिसतंय , अंगात उत्साह कसा तो काही अजिबात दिसत नाही ! तुला बरं वाटत की नाही ? तुला एवढ्या कसल्या असह्य यातना होत आहेत  ? कशाचीही वाण नसलेला जवान मुलगा तू ! एवढं सगळं असून चिंतातुर का  बरं झालास ? तुला काही शारीरिक व्याधी झाली का ?  खरं काय ते सांग बघू ! अरे वडिलांच्यापासून का बरं लपवून ठेवतोस ?” वडिलांची कळकळ बंकटलालांच्या लक्षात आली. त्यांनी काहीतरी सांगून त्यांचे समाधान केले आणि पुन्हा श्री गजानन महाराजांच्या शोधासाठी गावभर फिरू लागले.

बंकटलालांच्या शेजारी एक सदाचारी जमीनदार रहात होते. त्यांना जमीनदारीचा अजिबात अभिमान नव्हता. त्यांचं नाव रामाजीपंत देशमुख असं होतं. वृद्ध रामाजीपंतांकडे बंकटलालांनी मन मोकळं करायचं ठरवलं आणि त्यांना सर्व हकीकत सविस्तर सांगितली. ती ऐकून ते म्हणाले , ” अरे तू सांगतोस त्यावरून ते कुणीतरी योगी असावेत असं मला वाटतंय ! कारण योग्यांशिवाय अशा क्रिया करणारा कोठेच पहायला मिळत नाही आणि पूर्वसुकृत असल्याशिवाय अशांचे दर्शन होत नाही. तुला त्यांचे दर्शन झाले तू धन्य झालास ! शक्य झाले तर मलाही त्यांचे दर्शन घडव.”

शोधाशोध करण्यात असेच चार दिवस निघून गेले बंकटलाल एक क्षणभरही महाराजांना विसरले नव्हते. तशातच गोविंदबुवा टाकळीकरांचे शेगावात आगमन झाले. ते  प्रसिद्ध कीर्तनकार होते. त्यांच्या किर्तनाने शारंगधरही आनंदित होत असे. त्यांची कीर्ती वऱ्हाडात सर्वदूर पसरली होती. शंकराच्या मंदिरात कीर्तनाची तयारी चालू होती. कीर्तन ऐकण्यासाठी गर्दी होऊ लागली. बंकटलालही कीर्तनाला जात होते. वाटेत त्यांना भोळा , भाविक असा पितांबर शिंपी भेटला. श्रीसमर्थांची हकीकत बंकटलालांनी त्याला  सांगितली. दोघेही कीर्तनाला निघाले असता अचानक त्यांना समर्थ दिसले. धनाचा हंडा बघून जसा कृपण हापापुन जातो , तसं कीर्तन वगैरे सगळं विसरून दोघेही तिकडेच धावले.  जवळ जाऊन त्यांनी महाराजांना विचारले , ” तुम्हाला काही खायला आणू का ?” त्यावर महाराज उत्तरले , ” तुझी इच्छा असेल तर आण माळीणीच्या घरातून चुन भाकरी !” महाराजांनी बोलायच्या आतच बंकटलालांनी धावत जाऊन अर्धी भाकरी आणि पिठले आणले आणि श्री महाराजांच्या हातावर ठेवले. पिठलं भाकरी खात खात श्रीमहाराज पितांबराला म्हणाले , ” जा, ओढ्यावर जाऊन पाण्याचा तुंबा भरून आण.” त्यावर पितांबर म्हणाला , ” तुम्ही पाणी भरून आण म्हणताय खरं पण ओढ्याला पाणी फारसं नसल्याने तुंबा भरला जाणार नाही. त्यातच आहे ते पाणी गुराढोरांनी गढूळ केलंय मग ते पिणार कसं ? तेव्हा दुसरीकडून पाणी आणू का ?” महाराज म्हणाले, ” नको नको ! दुसरीकडचं पाणी नको. नाल्याचंच घेऊन ये आणि हे बघ उगीच ओंजळीने तुंब्यात पाणी भरत बसू नको.” बरं , म्हणून पितांबर ओढ्यावर गेले.

तेथे पाहतात तो ओढ्याला पावलं भिजतील एवढही पाणी नव्हतं. मग तुंबा नुसता पात्रात ठेऊन कसा भरला जाणार ? पितांबराना काय करावं ते काहीच कळेना. महाराजांनी तर तुंब्यात ओंजळीने पाणी भरायचं नाही असं सांगितलंय. शेवटी त्यांनी धीर करून तुंबा पाण्यावर ठेवला, तो काय आश्चर्य ! जिथं जिथं तुंबा पाण्यावर ठेवला, तिथं तिथं खळगा पडून तुंबा भरला जात होता. आणखी एक आश्चर्य म्हणजे ओढ्यात जरी गढूळ पाणी असलं, तरी तुंब्यात भरले गेलेले पाणी स्फटिकासमान स्वच्छ होते. पितांबर ते पाहून आश्चर्याने थक्क झाले. म्हणाले,” हे सर्व असे घडवणे ही निश्चितच योगेश्वराची शक्ती होय! शंकाच नको. “असे म्हणून त्यांनी तो तुंबा जिथं योगेश्वर बसले होते तिथं त्यांच्याजवळ आणून ठेवला. चून भाकरी खाल्ल्यावर समर्थ त्यातले पाणी प्याले. नंतर ते बंकटलालना म्हणाले, “काय माळीणीच्या भाकरीवरच भागवतोस का? मला सुपारी दे, खिशातली सुपारी काढ आणि मला फोडून दे बरं !”

ते ऐकून बंकटलालना अतिशय आनंद झाला. त्यांनी महाराजांना सुपारी तर दिलीच आणि त्याचबरोबर तांब्याचे दोन पैसे त्यांच्या हातावर ठेवले. ते पाहून महाराज हसले. म्हणाले, “तू काय मला व्यापारी समजलास काय? अरे, तुमच्या या व्यवहारातल्या नाण्यांचा मला काय उपयोग? तुमच्या भावभक्तीवर मी संतुष्ट असतो रे! म्हणून तर तुला पुन्हा भेटलो, हे लक्षात घे. जा आता दोघं जाऊन कथा कीर्तन ऐका. मी ही या लिंबाच्या झाडापाशी बसून कथा ऐकतो.”

त्याप्रमाणे दोघे देवळात गेले. कीर्तनात गोविदबुवांचे निरूपण सुरू होते. निरुपणाला भागवतातल्या एकादश स्कंधातील हंसगीतेमधील श्लोक घेतला होता. बुवांनी पूर्वार्ध सांगितल्यावर महाराजांनी उत्तरार्ध कथन केला. ते ऐकून बुवा आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचार केला की, हा उत्तरार्ध सांगणारा मोठा अधिकारी पुरुष असला पाहिजे.

पुढल्या ओळीत बसलेल्या मंडळीना ते म्हणाले, “जा, कुणीतरी जाऊन त्यांना कीर्तन ऐकायला घेऊन या.” ते ऐकून बंकटलाल, पितांबर आदि मंडळी महाराजांना आणायला गेली. त्यांनी अत्यंत विनयानं महाराजांना कीर्तन ऐकायला येण्याची खूप विनवणी केली. पण महाराज काही जागचे हलले नाहीत. शेवटी गोविंदबुवा स्वतः येऊन विनवू लागले. म्हणाले,  “कृपा करून शंकराच्या मंदिरात कथा ऐकायला चला. आपण स्वतः शिवाचे अवतार आहात. त्यामुळे मालक नसल्याने शिवमंदिर सूनेसूने वाटते. माझं पूर्वजन्मीचं पुण्य म्हणूनच आज शिवाचे पाय दिसले. जणू माझ्या कीर्तनाची फलप्राप्तीच झाली असं वाटतं.”

गोविंदबुवांचं बोलणं ऐकून महाराज म्हणाले, “अरे गोविंदा, बोलण्यात काहीतरी एक वाक्यता ठेव! आत्ताच तू म्हणलास ना की, सर्व ईश्वर व्याप्त आहे म्हणून?  आत बाहेर असा काही फरक नाही असेही म्हणालास, मग माझ्या का मागं लागलास देवळात चला म्हणून? तू सांगतोस तसं तुझं आचरण हवं! उगीच शब्दच्छल करण्यात काय अर्थ आहे? भागवताचा श्लोक सांगतोस पण विरुद्ध आचरण करतोस! असं करू नकोस. पोटभऱ्या कथेकरी होऊ नकोस. जा, मी इथून ऐकतोय. तू देवळात जाऊन कीर्तन पूर्ण कर.”

बुवा देवळात परत आले आणि गर्जून सगळ्यांना म्हणाले, “तुमच्या शेगावात अमोल रत्न आलंय ते संभाळून ठेवा. साक्षात पांडुरंग इथं आलाय असं समजा. तुमच्या शेगावला आता पंढरपूर म्हणायला हरकत नाही. यांना काय हवं नको ते पहा, यांची सेवा करा, यांची आज्ञा म्हणजे वेदवाक्य समजून तिचं पालन करा. तुमचं नक्की कल्याण होईल. अनायासे हा ठेवा तुमच्या हाताला लागलाय तो दवडू नका!”

कीर्तन संपल्यावर बंकटलाल अत्यंत आनंदाने आपल्या घरी गेले. त्यांनी आपल्या वडिलांना अतिशय प्रेमाने सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाले,  “बाबा, गजानन महाराजांना आपल्या घरी आणू या”  ही हकीकत भवानीरामांनी प्रेमाने ऐकली आणि म्हणाले, “अरे मग तूच घरी घेऊन ये की त्यांना!” ते ऐकून बंकटलाल आनंदीत झाले. आता पुन्हा सद्गुरुनाथ कोठे भेटतील अशा विचारात ते सदोदित असत. असेच चार दिवस गेले आणि अचानक संध्याकाळच्या वेळेस माणिक चौकात श्रीमहाराज त्यांच्या दृष्टीला पडले. बंकटलाल त्यांना आदराने घरी घेऊन आले. श्रीमहाराजांची मूर्ती पाहताक्षणी भवानीरामाना अतिशय आनंद झाला. त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार करून आदराने पाटावर बसवले. पुढे त्यांनी महाराजांना विनंती केली की, काहीतरी भोजन करा. तुम्ही प्रदोषवेळी आला आहात. तुमच्या रूपाने पार्वतीकांतच आला आहे असे वाटते. स्कंद पुराणात सांगितल्या प्रमाणे, प्रदोषवेळी शिव आराधना करायला मिळणे फार भाग्याचे असते असं मी ऐकलं “

असं म्हणून त्यांनी एक बेलाचे पान आणून अत्यंत भावभक्तीने महाराजांच्या डोक्यावर ठेवले. मग त्यांच्या मनात आले की , इथं जेवा असं मी यांना म्हणालो खरं , पण स्वयंपाक व्हायला तर अजून वेळ आहे मग काय करावं ? बरं प्रदोष वेळी पार्वतीकांत न जेवताच घरातून निघून गेला तर काय करायचं ? यातून मार्ग कसा काढायचा ? ” काहीच सुचत नव्हतं. 

त्यात पुन्हा गावकऱ्यांनी “कोण आलंय? काय चाललंय?” हे पहायला एकच गर्दी केली होती. त्यांच्या समोरच आपली अब्रू जाणार असे त्यांना वाटलं. शेवटी त्यांनी विचार केला आणि ठरवलं की, दुपारच्या पुऱ्या घरी आहेत त्याच समर्थांना खायला देऊ. देव भावाचा भुकेला असतो. माझ्या मनात कपट नाही हे त्यांना माहीत आहेच. मी काही त्यांना मुद्दामहून शिळं अन्न खायला देत नाही. शिवाय पुऱ्या  तळलेल्या असल्याने त्या शिळ्या आहेत असंही म्हणता येत नाही. असा विचार करून एका तबकामध्ये पुऱ्या, केळी, मोसंबी,  मुळे, बदाम, खारका असं सगळं ठेवून ते तबक त्यांनी स्वामींच्या पुढं आणून ठेवलं. गळ्यात फुलांचा हार घालून कपाळावर बुक्का लावला. श्रीमहाराजांनी आनंदाने वाढलेले सर्व पदार्थ भराभर खाऊन टाकले. नंतर महाराजांनी रात्री तेथेच मुक्काम केला.

सकाळी बंकटलालनी महाराजांना अत्यंत आनंदाने अवर्णनीय थाटाचे मंगलस्नान घातले. खूप गर्दी जमली होती. सुमारे शंभर एक गरम पाण्याच्या घागरी लोकांनी आणल्या होत्या आणि लोक त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे महाराजांना स्नान घालत होते. कुणी शिकेकाई लावत होते, कुणी साबण लाऊन पाय घासत होते. चमेली, हिना , बेलिया अशी सुवासिक तेलं लाऊन अंग रगडून देत होते. एक ना अनेक! बंकटलालांच्या घरी कशाची कमी म्हणून नव्हती. अखेर स्नानविधी संपला. 

स्नानविधी संपल्यानंतर महाराजांना पितांबर नेसवून अत्यंत आदराने लोकांनी गादीवर आणून बसवले. कपाळावर केशरी गंध लावलं. गळ्यात नाना प्रकारचे हार घातले. कुणी तुळशीची पानं आणून महाराजांच्या डोक्यावर ठेवली. नाना परीचे नैवेद्य दाखवण्यात आले. या भाग्योदयामुळे बकंटलाल अगदी धन्य धन्य झाले. त्यांच्या घराला द्वारकेचे रूप आले. त्यात त्या दिवशी सोमवार होता !

महाराजांनी सर्वांचे मनोरथ पूर्ण केले, तरी पण बंकटलालांचे चुलत भाऊ इच्छाराम शेटजी मात्र मागे राहिले. हे अत्यंत भाविक असून शंकराचे भक्त होते. त्यांना असे वाटले की , आज अनायासेस सोमवार आहे, दारात शंकर भगवान आलेले आहेत. तेव्हा संध्याकाळी यांची यथासांग  पूजा करून उपासाचे पारणे करावे.

ते असा विचार करत असतानाच संध्याकाळ झाली. इच्छारामांनी प्रदोषवेळी स्नान केले. उत्तम पुजा साहित्य घेऊन त्यांनी श्रीमहाराजांची अत्यंत प्रेमाने पूजा केली. त्यानंतर आर्त स्वरात म्हणाले, ” महाराज दुपारी आपले भोजन जरी झाले असले , तरी आता काही खावे, असा माझा प्रेमाचा आग्रह आहे. आज माझा उपवास आहे आणि आपण काहीतरी खाल्ल्याशिवाय मी जेवणार नाही. तुम्ही इथं जमलेल्या सगळ्यांच्या मनासारखं केलंत. पण माझा हेतू मात्र मनातच राहतोय. तेव्हा विनंती अशी की माझीपण इच्छा पुरवा.”

इच्छारामांनी महाराजांना विनंती तर केली. आता पुढं काय होतंय हे जाणून घ्यायच्या इच्छेने लोक कुतूहलाने पाहू लागले. तेवढ्यात शेटजी परातीतून नैवेद्य घेऊन आले. अंबेमोहर तांदुळाचा दोन मुदी भात, जिलबी, राघवदास, मोतीचुर, करंज्या, अनारसे, घिवर, अशी अनेक प्रकारची पक्वान्ने, अनेक भाज्या, चटण्या, कोशिंबीरी, दह्याचा वाडगा, तुपाची वाटी असे जवळजवळ चार माणसांना पुरेल एवढे अन्न त्या नैवेद्यात होते.

नैवेद्यातील अन्नाचा ऐवज बघितल्यावर महाराज स्वतःशीच म्हणाले,  “अघोऱ्या खातो खातो म्हणतोस ना मग अन्नाचा अपमान न करता खा आता हे सगळं !” महाराज भोजनास बसले. पाहता पाहता त्यांनी तो सगळा नैवेद्य संपवला. अगदी मीठ, लिंबू सुद्धा शिल्लक ठेवले नाही ! ताट अगदी चाटून पुसून स्वच्छ केले. अतिआग्रह केला की काय होते ते दाखवायचा महाराजांचा उद्देश होता.

थोड्याच वेळात महाराजांना खाल्लेल्या सर्व अन्नाची भडभडून उलटी झाली. श्री समर्थांनी सुद्धा एकदा असेच केले होते. त्यांना खीर खाण्याची वासना झाली. ती खोड मोडण्यासाठी ते आकंठ खीर प्यायले होते. सहाजिकच अति खाण्याचा परिणाम होऊन त्यांना खणाणून उलटी झाली. पण समर्थांना वासनेची पुरतीच जिरवायचीच होती, म्हणून उलटून पडलेली खीर ते पुन्हा खाऊ लागले. तसाच काहीसा प्रकार श्रीमहाराजांनी केला. लोकांच्या आग्रहाला लगाम बसावा हाही उद्देश्य त्यात होताच.

उलटी झालेली जागा मग लोकांनी साफ केली. “श्री” ना पुन्हा आंघोळ घातली, नवीन वस्त्र नेसवले व त्यांच्या जागेवर नेऊन बसवले. गावातील स्त्रीपुरुष त्यांचे दर्शन घेऊ लागले. एवढ्यात तेथे दोन भजनी दिंड्या आल्या. त्यातील लोकांचा आवाज पहाडी व सुस्वर होता. त्यांनी आवडीआवडीने विठ्ठल नामाचा गजर सुरू केला. महाराज आसनावर बसूनच भजन करत होते.  त्या नादातच त्यांनी गण गण गणात बोते असे आनंदाने म्हणायला सुरवात केली. म्हणत असतानाच ते चुटक्याही वाजवत होते. भजन करताकरता रात्र सरली. पुढे हा प्रकार नेहमीचाच झाला. ते पाहून मग लोकांनी त्यांना गजानन म्हणायला सुरवात केली. खरं म्हणजे जे स्वतःच ब्रह्मरूप होते त्यांना नावाची आणि रूपाची काय गरज होती ? नावा रूपाचं कौतुक कुणाला, तर जो निसर्गाच्या आश्रयाने वाढतो त्याला. हे योगेश्वर तर अनुपमेय अशा निजानंदात निमग्न राहणारे ! 

श्रीमहाराजांची कीर्ती सर्व दूर पसरली. लांबलांबून लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. जशी हरिद्वारला कुंभमेळ्याला, किंवा पंढरपूरला आषाढीला गर्दी होते , तशीच गर्दी शेगावला होऊ लागली. त्यांचा पांडुरंग इथं निश्चयरुपी विटेवर उभा होता. त्यांच्या बोलण्याला गोदातीराची किंमत होती, तर त्यांचा आनंद हरिद्वार सारखा पवित्र होता. बंकटलालांचे घर म्हणजे देऊळ झाले. त्यात महाराज ब्रह्मपदाला पोचले होते, त्यामुळे त्यांना सर्व जातीपातीचे लोक सारखेच होते. जसं सूर्य प्रकाश देताना इकडं जास्त तिकडं कमी असं कधी करत नाही. सगळीकडं त्याचा प्रकाश सारखाच पडतो. तसं श्रीमहाराजांची सर्वांवर सारखीच कृपा होती. नित्य नवनवे लोक बहुसंख्येने येत. एखादी यात्रा असावी असेच वाटे. रोज जेवणावळी चालत. या सगळ्याचं वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. श्रीमहाराज स्वतः माझ्याकडून हे सर्व लिहून घेत आहेत. त्यांचे चरित्र खरोखरच अगाध आहे मी पामर त्याचे काय वर्णन करणार?

आता त्यांच्या दिनचर्येचे थोडक्यात वर्णन करतो. श्री महाराज मनाचे राजे होते. त्यामुळे ते कधी मंगल स्नान करत तर कधी ओहोळातील गढूळ पाणी पीत. त्यांच्या वागण्याचा अमुक एक नियम असा नव्हता आणि असलाच तर तो कळणार कसा? वायूची गती किती असावी हे कोण ठरवू शकेल का? तसंच काहीसं ! चिलमीवर मात्र फार प्रेम ! ती त्यांना वरचेवर लागत असे पण त्याची सुद्धा त्यांना आसक्ती अशी नव्हती.

 

श्री दासगणु विरचित श्रीगजानन विजय ग्रंथाचा दुसरा अध्याय येथे सुफळ संपूर्ण !

या अध्यायाचे वाचन, चिंतन व मनन केल्यास आपणांस सहजच “श्री” ची कृपा दृष्टी होईल.

- अनुवादक: श्री वामन रुपरावजी वानरे.

मो.09826685695