श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित सतरावा अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.
“श्री गजानन विजय ग्रंथ”
अध्याय सतरावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥
श्री संत कवी दासगणू महाराज १७ वा अध्यायाचा श्री गणेश सुरू करण्यापूर्वी श्री नृसिंह भगवान यांची स्तुती करतात. श्रीदासगणु महाराज म्हणतात,
“हे महामंगला, भक्तपाला, तमालनीला, पतितपावना नरहरे तुझा विजय असो. सज्जनाचा शत्रू व अत्यंत क्रूर असा हिरण्यकश्यप होता, त्याचे पोट फाडून तू त्याचा वध केलास. प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी तू स्तंभापोटी प्रकट झालास. तुझ्या मानेवर सिंहाच्या गळ्याला असणाऱ्या केसांच्या रुळा निर्माण करून अनुपम असे स्वरूप धारण केलेस. भयंकर दात आणि दाढा, मानेवर रुळणारी आयाळ, ब्रह्मांड जाळूं पहाणारे लालभडक निखाऱ्यासारखे डोळे! त्या भयंकर रुपाची प्रल्हादाला भीति सुद्धा वाटली नाही. कारण वाघिणीच्या पिल्लांना त्या वाघिणीची कसली भीती? ती तर तिच्या अंगावर खेळतात. देवराया, तुम्हाला पाहून लक्ष्मीही पुढं यायला आपलं धाडस करणार नाही. अशाही परिस्थितीत भक्त प्रल्हादाने तुमचे पाय धरले. तूं भक्तवत्सल लक्ष्मीकांत आहेस अशी संतांची वाणी आहे. तुम्ही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करता. त्या तुमच्या ब्रीदाला हृषीकेशी आता जागवा. दासगणू तुमच्या चरणाशी आपलं मस्तक ठेवतो आता त्याला अभय द्या.”
अकोल्यांत गजानन महाराजांचे काही परमभक्त राहात होते. त्यांच्या घरी श्री गजानन महाराज नेहमी येत असत. त्यामध्ये चापडगांवचा बापुकृष्ण, खटाऊ शेटचे कुटुंब, गोडूलालाचा नंदन बच्चुलाल, जीजीबाई पंडित अशी कितीक नावे म्हणून तुम्हाला सांगावीत?
एकदा अकोला येथे श्री गजानन महाराज आले असताना खटाऊच्या गिरणीत त्यांचा मुक्काम होता. श्री गजानन महाराजांचा विष्णुसा नावाचा एक भक्त मलकापुरात रहात होता. त्याच्या मनात श्री गजानन महाराजाना मलकापुरात आणावे असे फार दिवसापासून चालू होते. या गोष्टीसाठी त्याने भास्करांचा आसरा घेतला व महाराजाना येण्यासाठी आमंत्रणाचा वशिला लाविला होता, कारण सर्व कारभार तेच बघत होते. त्यांचेच बळ विष्णूसाला होते.भास्कर महाराजांना म्हणाले, “महाराज मलकापुरला विष्णुसाच्या घरी लवकर चला. तो बोलवायला आला आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक भक्तांचे मनोरथ पुरवले आता मलकापुरचे लोक वाट पहात आहेत.”
त्यावर, समर्थ गजानन महाराज भास्करांना म्हणाले, “भास्करा, सध्या मी मलकापुरला येणार नाही. तू आग्रह करु नको. फार आग्रह करशील तर फजीती पावशील. याचा विचार कर. मी काही बोलत नाही पण दोरीला जर फार ताण दिला तर ती मध्येच तुटते एवढे लक्षात ठेव म्हणजे झाले ! मी आता जेथे आहे तेथेच आता मला राहू दे.आता मी येथून उठणार नाही. तेव्हा तू काही या फंदात पडू नकोस.” त्यावर भास्कर म्हणाले, “काही असो, गुरुराया, मलकापुरला विष्णुसाच्या घरी चला ही माझी विनंती आहे. मी तुमचा लाडका शिष्य आहे. मला धक्का देऊ नका. तुम्हाला घेऊन येण्याचा मी त्याला भरवसा दिलेला आहे. तेव्हा माझी प्रतिज्ञा तुम्ही आज पूर्ण करा. चला बरं आता स्टेशनवर जाऊ म्हणजे गाडीत बसता येईल.” असा आग्रह करुन विष्णुसाच्या घरी जाण्यासाठी भास्कर महाराजांसह स्टेशनवर आले. भास्करांनी स्टेशनमास्तराना विनवणी करून बारा जणांचा डबा खाली करून घेतला पण महाराज काही न बोलता, गाडी सुटेपर्यन्त प्लॅटफॉर्मवरच बसले. गाडी सुटण्याची वेळ झाली तेव्हा महाराजांनी लीला केली. जो डबा मोकळा केला होता तो त्यांनी सोडून दिला आणि सर्वांचा डोळा चुकवून योगीराज बायकांच्या डब्यामध्ये जाऊन बसले. आधीच दिगंबर मूर्ति! त्यामुळे स्त्रिया फार घाबरल्या असतील त्यामुळे त्यांनी पोलिसात वर्दी दिली. त्याबरोबर पोलिस अधिकारी तेथे आला आणि महाराजाना हाताला धरुन खाली ओढू लागला. ओढता ओढता तो बडबडत होता की, “अरे वेडया नंग्या पीरा तुला जराशी सुध्दा अक्कल कशी नाही? बायकांच्या डब्यांत कसा बसलास? तुला थोडीशी सुद्धा भीती कशी वाटली नाही?”
असे विचारून तो अधिकारी स्टेशन मास्तरकडे गेला आणि म्हणाला, बायकांच्या डब्यापाशी चला. दोघे डब्याजवळ आले तेव्हा स्टेशन मास्तरांनी पाहिले तर योगीराज बायकांच्या डब्यांत बसले होते.स्टेशन मास्तर पोलिस अधिकार्याना म्हणाले, “तुम्ही यांना याच डब्यांत बसून जाऊ द्यावे. हे थोर संत आहेत. चालते बोलते ईश्वर आहेत. यांच्या हातून कधीही गुन्हा होणार नाही.”
ते ऐकून अधिकारी म्हणाला, “मी आता याविषयी वरिष्ठांना तार दिली आहे. त्यामुळे आता माझ्या हातांत यत्किंचितही काही राहिले नाही. मी तर आता सूचना दिली आहे. तुम्हाला वाटेल ते करा.”
स्टेशनमास्तरांनी त्यांची टोपी काढून अत्यंत नम्रपणे महाराजाना विनंती केली कि, “महाराज ! तुम्ही खाली उतरा. माझं एवढं ऐका. कायद्याचा विचार करा. महाराज खाली उतरले. पुढे सरकारने त्यांच्यावर कायद्याप्रमाणे खटला भरला. जठार साहेबानी फिर्याद नोंदवून घेतली व त्याच्या चौकशीची शेगावात तारीख निश्चित केली.बापुसाहेब जठार शेगांवाच्या डाक बंगल्यांत खटल्याची चौकशी करण्यासाठी आले. त्याचवेळी अकोल्याचे व्यकंटराव देसाई काही कामानिमित्त तेथे आले होते. महाराजांच्यावर खटला झाल्याची बातमी सगळ्या गावात पसरली म्हणून शेगांवाची खूप माणसं बंगल्यावर आली होती.”
देसाई जठाराना म्हणाले, “आज येथे खूप लोक जमले आहेत. असा कोणता विशेष खटला तुम्हापुढे आहे?”
जठार म्हणाले, “तुम्हाला माहित नाही याचंच मला आश्चर्य वाटते. अहो हे तुमचे स्वामी श्री गजानन महाराज नंगे फिरतात म्हणून पोलिसांनी हा खटला भरून त्याची चौकशी माझ्याकडे ठेवली आहे. त्या खटल्याची आज चौकशी होणार आहे. म्हणून हे लोक जमा झाले असावेत.”
हे बोलणे ऐकून व्यंकटराव दुःखी झाले व ते म्हणाले, “हा खटला नका चालवू हो? कारण श्री संत गजानन महाराजांची योग्यता थोर आहे. ते प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती आहेत. ते विदेही पुरुष असून त्यांना कशाचेच बंधन नाही. तो योग्यांचा योगीराणा असून सर्वांना वंदनीय आहे. खटला भरला हीच पोलिसांनी मोठी चूक केली. ती आपण दुरुस्त केली पाहिजे.”
त्यावर जठार वकिलाना म्हणाले, “तुम्हाला कायदा माहीत आहे. खटला भरायचा की नाही याचा विचार पोलिसांनीच अगोदर करायला हवा होता.” असं म्हणून त्यांनी कारकुनाला सांगितले की, “गजाननाना बोलावणे पाठवा.” ते ऐकून त्याने एक जवान पोलिस त्यासाठी पाठविला. तो येऊन महाराजाना म्हणाला,
“अधिकाऱ्यांनी तुम्हाला बोलावण्यासाठी मला पाठविले आहे. आतां तुम्ही बऱ्या बोलाने कचेरीत चला. नाहीतर आता तुमची फजिती होईल. कारण मला तुम्हाला तुमच्या हाताला पकडून न्यावे लागेल.”
त्याला गजानन महाराज म्हणाले, “अरे आता आम्ही येथून अजिबात उठणार नाही. ये बरं माझ्याजवळ मी बघतो तुझे शिपाईपण! धरून पहा बरं माझा हात? असं म्हणून त्यांनी शिपायाचा हात पकडला.पण तो हात त्या शिपायाकडून काही केल्याही सोडवता येईना! त्याच्या हातावर श्री गजानन महाराजांच्या हाताचा दाब एवढा वाढला होता की त्या शिपायाचा रक्तप्रवाह बंद झाला. हाताला कळ लागून त्याचा जीव व्याकुळ झाला. शिपाई तिथंच तळमळू लागला. शिपायाला वेळ झाला म्हणून जठारांनी व्यंकटराव देसाई वकिलांना विनंती केली की, तुम्ही जाऊन श्री गजानन समर्थाना आणा. ते निघणार एवढ्यात श्री गजानन महाराजांनी पोलिसाचा हात धरून त्याला एका जागी घट्ट बसवून ठेवण्याची बातमी आली.
ते ऐकून देसाई उठले व श्री श्री गजानन महाराज होते त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या भक्ताना म्हणाले, “यावेळी महाराजांना धोतर नेसविले पाहिजे. त्यांच्या सल्ल्यानुसार भक्तांनी महाराजांना धोतर नेसवले पण ते धोतर त्यांनी रस्त्यात सोडून टाकले व तसेच भास्कराला बरोबर घेऊन नागवेच कचेरीत गेले. जठारांनी महाराज आलेले पाहून त्यांना बसायला खुर्ची दिली.
म्हणाले, “या महाराज बसा, तुम्ही सदैव नागवे गांवांत फिरता हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हा कायद्याने गुन्हा आहे. म्हणून आपणास विनंती आहे की, हे नंगेपण सोडून द्या हो.”
हे जठारांचें भाषण स्वामींनी ऐकून घेतले आणि हसत मुखाने म्हणाले, “तुला काय करायचं आहे यात? उगीच चरचर करू नको! चल, चिलीम भर लवकर, उगीच नसत्या गोष्टीला निरर्थक महत्त्व देऊ नको.” ते बोलणे ऐकून जठार विरघळून गेले. त्यांनी विचार केला की, जनरितीचे यांना मुळीच भान नाही. हा भागवतातील वृषभदेव किंवा शुकाचार्य वा वामदेवाचा दुसरा अवतार असावा. हा कायम निजानंदी राहणारा जीवनन्मुक्त आहे. तेव्हा यांच्यावर कधीही गुन्हा दाखल करता येणार नाही. कारण अग्नीचा अग्नीपणा अग्नि कधी सोडत नसतो म्हणून अग्निहोत्र्यांना त्याला अग्निदेव म्हणून कुंडांत ठेवणे भाग असते. जर कुंडाशिवाय ठेवला तर तो घर जाळून टाकतो. पण ह्याचा दोष त्याला लागत नाही. तैसे याचे नागवेपण अग्निसमान आहे. म्हणून याचा शिष्यगण याबाबत अपराधी आहे. वस्त्ररुपी कुंडात जर ह्यांना ठेवलं असतं तर हरकत नव्हती आणि सर्वाना ते सुखद झाले असते. असा विचार करून जठरांनी पुढीलप्रमाणे हुकूम जारी केला.
श्री गजानन महाराज हे मूळचेच जीवनमुक्त आहेत. त्याना व्यवस्थित ठेवणे हे भास्करांचे काम होते पण ते त्यांनी केले नाही म्हणून मी भास्कराला पांच रुपये दंड ठोठावत आहे याप्रमाणे खटल्याचा निकाल झाला. महाराज भास्कराना म्हणाले, “पुन्हा तुझी स्वतःची अशी फजिती करून घायला मला असा आग्रह करशील का सांग?” यावर भास्कर काय बोलणार? ते आपले गप्प बसले. मात्र लोकांनी यानंतर पक्कं ठरवलं की, येथून पुढे महाराजांना कधी आगगाडीत बसवायचं नाही. विनाकारण कटकट होते. ते कांही बरं नाही. हा क्रम कित्येक दिवस चालला. भक्त महाराजांना बैलगाडीत बसवू लागले.
असेच एकदा बैलगाडीतून जाऊन पुण्यराशी अकोल्याला बापुरावांच्या घरी येऊन उतरले होते. यवन जातीच्या महताबशा नावाच्या मूर्तिजापुराच्या जवळ असलेल्या कुरुम गावच्या साधूने बापुरावाना सांगितलें होते की, जेव्हा गजानन महाराज अकोल्याला येतील तेव्हा आम्हाला कळवावे. म्हणून अकोल्यात श्री गजानन महाराज आल्यावर बापुरावानी लगेच कुरुम गावाला मनुष्य धाडला. पण त्याआधीच महातबशा श्री गजानन महाराजांना भेटण्यासाठी अकोल्याला येवू लागले. वाटेत त्यांना बापुरावानी बोलावण्यासाठी पाठवलेला मनुष्य भेटला. तो दिसल्याबरोबर गोड आवाजात ते त्याला म्हणाले, “तू आता कुरुमला जाऊ नकोस. अरे, मीच तर महताबशा आहे. तू आमच्या गाडीत बस. आपण स्टेशनला जाऊ. यावरून लक्षात येते की, श्री गजानन महाराज त्रिकालज्ञ होते. संत आल्याचे वर्तमान संताना कोणाला न सांगता आपोआप कळते. महताबशांच्या बरोबर दोन चार यवन होते. ते सर्व बापुरावांच्या घरी येऊन उतरले. दुसरे दिवशी सकाळी महताबशा जिथं बसले होते तिथं आपणहून येऊन महाराजांनी महताबशांचे केस धरून त्यांना मारले. त्याचा उद्देश असा होता की, त्यांचे यवन असल्याने आलेले अडदांडपण अजून गेले नव्हते. समर्थ त्यांना म्हणाले, “तुझ्या या आडदांडपणामुळे तत्त्वघात होईल हे लक्षात घे. तुझे महताब नांव आहे, त्याची आठवण ठेव. दोषरुपी अंधाराला वाव देऊ नकोस. हा द्वेषरुपी अंधार वरचेवर वाढत चाललाय याची तुला जाणीव नाही म्हणून तुला मारले.” श्री गजानन महाराजांनी दिलेला इशारा महताबशांच्या लक्षात आला आणि महाराजांनी योग्य तेच सांगितलं हे समजून त्यांना बरं वाटलं. साधूच साधूचं अंतर जाणतात हेच खरं! महताबशांनी ते जाणलं होतं पण त्यांच्याबरोबरचे यवन हा प्रकार लक्षात न आल्याने कावरे बावरे झाले. महताबशा त्यांना म्हणाले, “तुम्ही येथे न राहता कुरुमला जावं हेच उत्तम.”
ते ऐकून शेख, कडू शिवाय इतर चौघे निघून गेले. तेवढ्यात आमंत्रण द्यायला बच्चुलाल आले. ते आमंत्रण देताना म्हणाले, “दयाघना, उद्या तुम्ही माझ्या घरी जेवणास या अशी विनंती आहे.
“श्री गजानन महाराजांनी बच्चूलालांचं आमंत्रण स्विकारलं. त्यानुसार दुसरे दिवशी महाराजांना समर्थांना टांग्यांत बसवून मोठया थाटात मिरवत मिरवत बच्चूलालनी त्यांच्या घराच्या दारापर्यंत आणले. पण समर्थ टांग्याखाली उतरायला तयार झाले नाहीत. ते खाली का उतरत नाही हे कुणाला काहीच कळत नव्हते. महाराजांनी टांगा तसाच बापुरावांच्या घरापर्यंत नेला. लोक गोंधळून गेले. म्हणू लागले, “काल आमंत्रण घेतलं पण आज टांग्याखाली उतरले नाहीत याला कारण काय असावं? “त्यांच्यात एक धूर्त होता. तो म्हणाला, “मला याचं इंगित समजलं. महताबशाला आमंत्रण दिलं नाही म्हणून महाराज खाली उतरले नाहीत. आता एका टांग्यात दोघांना बसवून आणा म्हणजे महाराज नक्की येतील व त्याप्रमाणे तसेच झाले. दोघांनाही मिरवत नेले. महताबशांना मंदिराजवळील थेटरात उतरवले आणि श्रीरामाच्या मंदिरात श्री गजानन महाराज उतरले. पण शेवटी तेही उठून थेटरात गेले. सगळ्यांची जेवणे झाली. मग महताबशा लोकांना म्हणाले, “मला तुम्ही पंजाबचे तिकिट काढून द्या.” तेव्हा शेख कडू म्हणाले, “तुम्ही कुरुमच्या मशीदीच्या कामाला अर्धवट टाकून कसे जाता? ती मशीद बांधून मग आपण पंजाबला जावे. काम अर्धे टाकून जाणे उचित नाही.” महताब शेख कडूना प्रेमाने म्हणाले, “मला निरर्थक आग्रह करु नका. गजानन महाराजांनी मला पंजाबांत जाण्याचा हुकूम दिला आहे. तेव्हा एक क्षणही मी येथे राहू शकत नाही. समर्थाच्या कृपेनं मशिदीचं काम पूर्ण होईल. हे माझे वचन तुम्ही सत्य माना. संताठाईं धर्माविषयी द्वैत नसते. ते सर्व धर्माना समसमान मानतात. देऊळ व मशीद अशी वेगवेगळे मतांतरे तुम्ही वाढवू नका. ती वाढली तर दोघांची हानि होईल. देऊळ मशिदीचे सामान एकच असते. फक्त आकार वेगळे म्हणून भांडू नका. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदु काय भूताचा असतो?
याचा मोठेपणाने मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करा. तरच हिंदु व मुसलमान ह्या दोन्ही धर्मातील मानवाचं यांचं कल्याण होईल. कारण हे दोघेही एकाच देवापासून निर्माण झाले आहेत. धर्म जो ज्याचा आहे बापा त्याचा त्यांनी आपल्या धर्माचा जीवापेक्षाही आदर करावा परंतु परी विधर्म्यांच्या ठिकाणी सुद्धा अलोट प्रेम करावे. हे जो पर्यंत होत नाही तोपर्यंत सुख तुमच्या सानिध्यात राहाणार नाही हे लक्षात ठेवा. जा आता श्री गजाननाच्या कृपेने मशीद पूर्ण होईल.” महताबशा तेथून निघून गेले ते परत इकडे आले नाहीत. या सर्व गोष्टीचे हिंदुयवनांनी चिंतन व मनन केले पाहिजे. महताबशाना जरी महाराजांनी मारले असले तरी त्यांच्याबद्दल महाराजांच्या मनात द्वेष नव्हता, या उलट अलोट प्रेम होते. शहा यांना घेतल्याविना योगीराज श्री गजानन महाराज जेवण करण्यास गेले नाहीत हे लक्षात घ्यावे. बापुरावांच्या कांतेला भानामतीची बाधा होती. क्षणात मळवट भरला जायचा, घटकेत गळ्याला फास लागायचा, घटकेत वस्त्रांना आग लागे, पाठीवर बिब्याच्या अपरंपार फुल्या यायच्या, कधी दांडीवरील वाळत घातलेला कपडा भानामतीच्या त्रासाने अकस्मात जळून जायचा. या त्रासाने बापुरावांची कामिनी क्षीण होऊन गेली. तिलाअन्नपाणी गोड लागेना. बापुरावांनी अनेक जाणत्या लोकांना भानामती काढण्यासाठी बोलावले , खर्च ही खूप केला पण त्याचा अखेर उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी श्रीगजानन स्वामीना हात जोडले व म्हणाले, “महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला आहे. अनेक उपाय केले पण काही फायदा झाला नाही. आतां मात्र मी थकलो तेव्हा तुमची पावले माझ्या घराला लागली असताना तेथे भानामतीस आसरा का बरे मिळावा? ज्या दरीत सिह येऊन बसला आहे तेथे कोल्ह्यानी ओरडून दिमाख का चालवावा? जेथे कस्तुरीचा वास दरवळतोय तेथे गुरुराया ही दुर्गंधी का बरे रहावी?”
ही विनंती ऐकून गजाननांनी बापुरावांच्या कांतेचे कृपावंत होऊन अवलोकन केले. त्यामुळे तिची भानामती निमून गेली. सिंहापुढे माकडाची काय किंमत?
असो एकदां फिरत फिरत श्री गजानन स्वामी समर्थ महाराज आपल्या भावाला म्हणजे नरसिंगजीना भेटण्यासाठी अकोटात आले. त्यांच्या मठाशेजारी एक विहीर होती. त्या विहिरीवर जाऊन पाय आत सोडून श्री गजानन महाराज बसले व आतील पाण्याकडे डोकावून पाहू लागले. त्यांची ही कृती पाहून लोक साशंक झाले. नरसिंग महाराजांनी विचारले, “अरे हे काय करतोस !” त्यावर महाराज म्हणाले, “गोदा यमुना भागीरथी तुमच्या साठी येथे आहेत. आणखी किती तीर्थें आहेत हे डोकावून पहातोय. तुला त्यांचे स्नान घडते मग मी तसाच का राहू? या तीर्थांनी मला आज येऊन स्नान घालावे. त्यांनी स्नान घातल्या शिवाय मी येथून हलणार नाही.” हे ऐकून कित्येक लोकं म्हणाले की, “हां खरोखरच वेडा आहे. शेगांव याच्या नादी कसा लागला हेच समजत नाही.पण महाराजांची थोरवी काय वर्णावी? आश्चर्य! जरा थांबा सर्वजण हा वेडा येथे बसून पुढं हा काय करतो तेच पाहू. “असं बोलणं होत ना होत तोच त्या विहिरीतल्या पाण्याला एका क्षणात अगणित उकळ्या फुटल्या व विहीर पाण्याने काठोकाठ भरून गेली. त्यातून हजारो कारंजे एकदम सुरू झाल्याप्रमाणे गजानन महाराजांच्या अंगावर पाणी बरसू लागले. महाराज लोकाना म्हणाले, “या रे या आता आंघोळ करायला. आता विहिरीत उतरण्याचे काहीच कारण उरले नाही. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती ह्या सर्वजणी वर येऊन माझे स्नान घालीत आहेत. तेव्हा या पुण्य सरितांचे स्नान करून घ्या.” भाविकांनी स्नान केले. निंदकांनी आपल्या माना खाली टाकल्यात. संत जे जे मनात आणतात ते ते चक्रपाणी त्यांच्या मनोकामना पुरवतो. त्यांची वाणी कधी असत्य होत नाही. स्नान झाल्यावर समर्थ उठले. पाणी परत विहिरीच्या तळाला गेले. नरसिंगजीना भेटून दयाघन स्वामी आपल्या वायू वेगाने शेगावला निघून गेले.
हा श्री संत कवी दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचा १७ वा अध्याय श्री गजानन महाराजांच्या सर्व भक्तांना आल्हाददायक ठरो व त्यांचे मनोरथ पूर्ण करो ही प्रार्थना करून आता हा सत्रावा अध्याय सुफळ संपूर्ण करतो !
शुभं भवतु !
श्रीहरिहरार्पणमस्तु !