श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित सातवा अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.
“श्री गजानन विजय ग्रंथ”
अध्याय सातवा
॥ श्रीगणेशाय नमः ॥
श्री दासगणू महाराज ७ व्या अध्यायाची सुरुवात करताना म्हणतात, “हे मेघश्यामा, सितापती, साधूसंत जन, दशरथ पुत्र श्रीराम यांचा जयजयकार असो. तुमच्या कृपेने वानर बलिष्ठ झालेत व श्री लंकेत रावणाचा पराभव झाला तुमची कृपा ज्यांच्यावर होईल तो नेहमी विजयी होतो व ते ज्या ज्या मनोकामना करतात त्या पूर्ण होतात. दिवाण कितीही बदमाश असला, तरी त्याचा ज्या भूपतीकडे वशीला असतो त्याला तो वंदनच करत असतो. अशी अमोघ कृपा व्हायला मी पात्र आहे का? याचा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की, माझ्याकडं ज्ञानाची कमी आहे व भक्ती पण साजेशी नसल्याने माझी स्थिती अत्यंत गंभीर आहे. मन सदा आशाळभूत असल्याने अस्थिर आहे, मनात वरचेवर तुझ्या कृपेविषयी शंका येतात. मग अशा पातक्याला तुझा वशिला कसा मिळेल ते तूच सांग, पण हे झालं व्यवहारीक बोलणं. तस पाहिलं तर हे दिनबंधो तुला पातक्याची मनापासून आवड आहे असं आम्ही जेव्हा पुराणात वाचतो तेव्हा हे लक्षात येतं. दुसरी गोष्ट अशी कि, पुण्यवान मनुष्याला तारण करण्यात काय विशेष आहे? जो पापी लोकांचा उद्धार करेल तोच या जगात मोठा आहे. या जगात तुझ्याहून मोठा कुणीही नाही. तेव्हा देवा, माझ्या पापाकडे न बसता आपण मोठ्या अंतकरणाने मला सांभाळून घ्या. हा दासगणू आता तुमच्या चरणाशी शरण आलेला आहे. तेव्हा त्याची उपेक्षा करू नका. सगळा गाव मारुतीचा उत्सव करण्यात दंग होता. गणेश कुळीचा खंडेराव पाटील या उत्सवाचा पुढारी होता. हे पाटील घराणे फार मोठे जुने होते व भरपूर पैसा, सोनं नाणं आणि शेतीचा मोठा पसारा त्यांच्याकडे होता ते पूर्वीपासून मालगुजार होते व त्यांच्या घरी संत सेवा ही होती व त्यातल्या त्यात नशिबानं जमीनदारी वाट्याला आलेली होती. महादजी पाटलाना दोन मुलगे होते थोरल्या मुलाचे नांव कुकाजी तर धाकट्याचे नाव कडताजी होते व यांच्या घराण्याला पंढरीभक्त गोमाजी महाराजांचा आशीर्वाद होता. कडताजी पाटलांना सहा मुलगे होते. कुकाजीना मात्र मुलबाळ नव्हते. कडताजी मरण पावल्यावर त्याच्या सहाही मुलांचं संगोपन जन्मदात्या वडिलांप्रमाणे कुकाजीनं केलं. त्याच्या अमदानीत खूप भरभराट झाली. घरात अष्टसिद्धि नांदत होत्या. कुकाजी नंतर खंडूचा कारभार सुरू झाला त्यांच्यासमोर कोणाचं काही चालत नसे.
या खंडू पाटलाला पाच भाऊ होते. त्याची नावे गणपती, नारायण, मारुती, हरी व कृष्णाजी अशी होती. ही पाटील मंडळी जमीनदार होती, त्यातल्या त्यात हातात सत्ता होती त्यामुळे घरात सुख संपत्ती नांदत होती. पैशाचा धूर निघत असे. सगळे बंधू तालीम करायचे, दांड पट्टे खेळायचे. हरी पाटलांना तर कुस्तीचा भयंकर शौक होता. मारुतीचा उत्सव म्हणायचा पण जयजयकार पाटलाचाच व्हायचा. ते म्हणतील तो शब्द रयतेला भोगावी लागत असे. त्यात नेहमीच चालणाऱ्या कटकटी मारामार्या मुळं पाटील मंडळी सगळ्यांनाच एका मापानं मोजायची. अमुक एक सज्जन आहे साधु संत आहे असा विचार त्यांच्या मनात कधीही येत नसे. वाटेल तस वागायचं, बोलायचं त्यात त्यांना काही खंत नसायची व ते कधी कोणाच्या मनाला काय वाटेल हा विचार सुद्धा करीत नसे. अशा या पाटील मंडळींनी देवळात येऊन महाराजांची हेटाळणी करायला सुरुवात केली. त्यांच्या बोलण्याला काही बंधन नव्हते.कोणी म्हणावे पिश्या गण्या, खातोस का ताककण्या? अशा चुकीच्या पद्धतीने ते महाराजांशी बोलत असत. कोणी म्हणावे चल आमच्याबरोबर कुस्ती खेळ बरं? तुला लोकं योगयोगेश्वर म्हणतात ना, त्याचे प्रत्यंतर आम्हाला दाखव नाहीतर मार खाशील हे लक्षात ठेव, एवढं सगळं ऐकून समर्थाना राग येणं तर दूरच त्यावर काहीही उत्तर न देता ते सगळं हसण्यावर नेत होते. असा सगळा उर्मट प्रकार देवळात नेहमी चालत असे. ते पाहून भास्कर पाटील समर्थांना म्हणाले, “महाराज, ही पाटलाची पोरं फारच माजलीेत तेव्हा यांचा संबंध येथे राहायला नको. येथे न राहता आपण अकोली गावात रहायला जाऊ.
ही मंडळी आपल्या मस्तीने अतिरेक करीत असून पैशाच्या धुंदीत आहेत. सत्तेपुढं शहाणपण चालत नाही हेच खरं ! त्यातल्या त्यात येथे यांची पाटीलकी आहे मग काही बघायलाच नको.” महाराज म्हणाले, “भास्करा थोडा दम धर. अरे, ही सारी पाटील मंडळी माझे परम भक्त आहेत. पण यांना नम्रपणा कसा असतो ते माहीत नाही. तू यांचं अंतरंग शोधून पाहिलंस तर तुला कळेल की ही पाटलाची पोरं माझी लेकरं आहेत. यांच्या कुळावर संतांची कृपा आहे. अरे, जमीनदाराला अंमल गाजवायच्या दृष्टीनं उर्मटपणा हेच भूषण असतं. वाघ जर गाईसारखा गरीब बनून हिंडायला लागला तर त्याला कोणी मानेल का? आता तूच सांग, मऊ तलवार किंवा थंड अग्नी काय कामाचा रे? पावसाळ्यात आपण पाहतो की नदीचं पाणी गढूळ होतं पण काही वेळ गेला की, गढुळलेलं पाणी जसं निवळतं तसा हळूहळू हा उर्मटपणा जाईल बघ.”
एके दिवशीं हरि पाटील मारुतीच्या देवळात आले आणि महाराजांचा हात धरून म्हणाले, “चल माझ्याबरोबर कुस्ती खेळ. आपण तालमीत जाऊ. तिथं तुला कुस्तीत चीत करून टाकतो. उगीच इथं” गण गण गणांत बोते ” असा जप करत बसू नको. तुझं प्रस्थ फारच माजलय बरं? आज काय ते खरंखोट होऊनच जाऊ दे ! मला जर कुस्तीत चित केलंस तर तुला मोठं बक्षीस देईन.”
समर्थाना तर हेच हवं होतं. दोघे तालमीत गेले. समर्थांनी एक चमत्कार केला. श्री गजानन महाराज खाली बसले व हरि पाटलांना म्हणाले, “जर खरा पैलवान असशील तर मला उठवून दाखव.” हरी पाटलांनी त्यांना उठवण्याचा बराच प्रयत्न केला पण ते सगळं काही वाया गेलं. ते समर्थांना उठवू तर शकले नाही पण जागेवरून हलवू सुद्धा शकले नाहीत. ते घामाने ओले झाले. सर्वशक्तीनिशी प्रयत्न केला पण समर्थांशी झुंजताना सगळे डावपेच वाया गेले.हरीच्या मनात आले की, “केवढा हा मजबूत व सशक्त ! एखादा पर्वत सुद्धा याच्यापुढे उणा पडेल. दिसायला किडकिडीत दिसतोय पण हत्तीसारखी शक्ति आहे याच्या अंगात. आमच्या नाना खोड्या आजवर याने न रागावता सहन केल्या कारण हा हत्तीसारखा असून आम्ही कोल्ह्यासारखे आहोत. कुत्र्याच्या भुंकण्याला वाघ किंमत देत नसतो तसं कोल्ह्याची चेष्टा हत्ती मनावर घेत नसतो. कांहीही असो आतां याच्या पाया पडणं आवश्यक झालं. मी जीवनात आजपर्यंत कुणालाही नमस्कार केलेला नाही. “समर्थ हरी पाटलांना म्हणाले, “आता मला बक्षिस दे नाहीतर कुस्तीत चीत कर ! कुस्ती हा मर्दानी शौक असून सर्वश्रेष्ठ आहे. कृष्ण बलराम बालपणी अशाच कुस्त्या करायचे. मुष्टिक आणि चाणूर हे कंसाचे देहरक्षक होते. त्यांचा वध परमेश्वराने मल्लविद्येनंच केला. अरे पहिली संपत्ती शरीर , मग घरदार आणि नंतर क्रमांक धनाचा लागतो. तुझ्यासारखाच तो पूतनारी यमुनातीरीच्या गोकुळचा पाटील होता. गोकुळातली सारी पोरे त्यानं सशक्त केली. तू तसंच कर. शरीरबळ वाढव नाहीतर ही पाटीलकी सोडून दे. हे बक्षीस मला दे नाहीतर मग माझ्याशी कुस्ती खेळ. काय करतो ते बघ. अशा रितीने समर्थांनी हरीचा माज उतरवला. हरी म्हणाले, “आपली कृपा असेल तर शेगावच्या लेकरांना सशक्त करता येईल.” असं हुशारीने बोलून हरी पाटलांनी त्याची सुटका करून घेतली. त्या दिवसापासून हरीनी समर्थांशी वेडंवाकडं बोलणं सोडून दिलं. हे पाहून त्याचे बाकीचे भाऊ त्याला म्हणाले, “अरे, तू त्या साधूला काय भितो ? आपण पाटलाची मुलं आहोत जमीनदार आहोत. मग असं असताना तू त्या नागव्याच्या पायावर डोकं कसा काय ठेवतो ? आधीच त्या वेड्याचं थोतांड गावात उदंड माजलय ! तेव्हा गावातल्या लोकांना सावध करण्यासाठी त्याला धडा शिकवायला पाहिजे. हे जर आपण केलं नाही तर सगळे लोक याच्या नादी लागून खुळे होतील आणि गावाला सावध करणे हे तर आपलं काम आहे. हे भोंदू साधुचा वेष घेऊन वेडीवाकडी कामं करतात, बाय बापड्यांना भुलवतात, याचाही जरा विचार कर. सोन्याला कस लावल्याशिवाय त्याची शुद्धता कळून येत नाही. तुकारामांचा शांतपणा त्यांना उसाने मारल्यावर कळून आला. ज्ञानेश्वर महाराजांचं साधुत्व रेडा बोलल्यावरच लोकांना कळलं. चल आपण त्याची परीक्षा घेऊ. असं म्हणून सर्वजण उसाची मोळी घेऊन मंदिरात आले. हरी काहीच बोलला नाही. इतरांनी महाराजांना विचारले, “अरे वेड्या तुला ऊस खायचा आहे का ? जर खायचा असेल तर आमची एक अट मान्य कर. आम्ही तुला उसाने बडवून काढू. पण अंगावर एकही वळ उठला नाही पाहिजे. असं जर झालं तरच तुला योगी मानू.” महाराजांनी सगळं ऐकलं पण ते काहीच बोलले नाहीत. लहान मुलाच्या खोड्या सुज्ञ कधी मनावर घेतात का ? महाराज काहीच बोलले नाहीत हे पाहून मारुती म्हणाला, “अरे हा घाबरला. ऊंसाचा मार खायला हा कांहीं तयार नाही.
“मग गणपती म्हणाला, “अरे मौन ही संमतीच आहे असं समजा आता वाट कशाची पाहताय ?” ते दोघा तिघांना पसंत पडले. लगेच हातात ऊस घेऊन ते महाराजांना मारायला धावले. ते बघून देवळातले स्त्री पुरुष घाबरून इकडे तिकडे पळालीत.भास्कर तेवढे जवळ थांबले. ते मुलांना म्हणाले, “समर्थाना उसाने मारू नका. तुम्ही पाटील कुळातले लोक, तुमचं अंतःकरण दीना विषयी दयाभूत असायला हवं. हे जर तुम्हाला महासाधु वाटत नसतील तर यांना हीन दीन लेखून सोडून दिलेलं बरं. अरे, शूर शिकारीे वाघावर चालून जातात. उगीच हातात बंदूक घेऊन नाकतोड्याला मारत नाहीत. मारुतीने सुद्धा उगीच दुबळ्यांच्या झोपड्यावर हल्ला न करता रावणाची लंका जाळली.” यावर पोरे म्हणाली, “तुमचं भाषण आम्ही ऐकलं. पण गावकरी याला आदरानं योग योगेश्वर म्हणतात, म्हणून याचा योग पहायला आम्ही आलो. यात तुम्ही पडू नका. नुसती लांबून मौज पहा.”
असं म्हणून त्या सर्वांनी ऊंस हातांत घेऊन जसं शेतकरी ओंब्याना झोडतात तसं महाराजांना उसाने बडवायला सुरवात केली. पण महाराजांच्या अंगावर कुठंही वळ उमटले नाहीत. उलट बिलकुल न डगमगता ते मुलांकडे पाहून हसत होते. हे पाहून मुलं मात्र घाबरली व त्यांच्या पाया पडली. मनात म्हणाली, “अरे, हा खराच बलवान योगयोगेश्वर दिसतोय.”
तेवढ्यात महाराज त्यांना म्हणाले, “मुलांनो! मला मारण्याने तुमच्या हातांना फार त्रास झाला असेल. तेव्हा तुमचे कष्ट वाया जायला नको. ते दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून प्यायला देतो. या बसा इथं. असं म्हणून समर्थानी एक ऊंस हातानेच पिळून त्याचा रस एका भांड्यात काढला. असं करत करत ऊंसांची सगळी मोळी समर्थांनीं पिळून काढली आणि उसाचा ताजा ताजा रस मुलांना प्यायला दिला. चरकावांचून पुण्यपुरुष समर्थांनी ऊसाचा रस काढलेला पाहून मुलांना अतिशय आनंद झाला.
लोक म्हणाले, “योगशक्ती ही दंतकथा नव्हे. योगामुळं मिळालेली शक्ती कधीच नष्ट होत नाही. पौष्टिक पदार्थांनी शक्ति येते पण अशी कायम टिकत नाही. आपल्या राष्ट्राला सशक्त करायचं असेल तर योग शिकायला हवा. ” जणू हेंच सुचविण्यासाठी महाराजांनी त्या मुलांना रस काढून दिला असावा.
असो, समर्थांना वंदन करून पोरं घरी गेली आणि त्यांनी खंडू पाटलांना सर्व वृतांत कथन केला. म्हणाले, “दादा, आपल्या गावात गजानन नावाचा साक्षात ईश्वर आलेला आहे. याचा आम्हाला आज प्रत्यय आला. सगळी कथा ऐकून खंडू पाटील चकित झाले. मग तेही समर्थाच्या दर्शनाला जाऊ लागले. पण बोलणं कठोर होतं. गण्या, गजा असं म्हणायचे. अरे तुरेचं बोलणं दोन ठिकाणी असतं. जिथं आत्यंतिक प्रेम असतं तिथं जसं आई आणि मूल हा एक प्रकार आणि दुसऱ्या प्रकारात नोकर चाकर, हीन दीन यांच्याबरोबर बोलताना संभावित लोक अरेतुरेची भाषा करतात.
गावकऱ्यांना अरे तुरे म्हणण्याची पाटील मंडळींना सवय असते कारण ते त्यांना त्यांची लेकरे समजतात. याच आपुलकीच्या भावनेने खंडू पाटील श्रीमहाराजांना गण्या म्हणत असत. गण्या गण्या म्हणायचा खरे, पण महाराजांच्यावर त्यांचे अत्यंत प्रेम होते. जसं नारळाच्या करवंटीच्या आत खोबरं असतं तसेच ! कुकाजी पाटील वृद्ध झाल्याने आता खंडूच सर्व कारभार बघत असत.
एके दिवशी कुकाजी खंडूला म्हणाले, “तू रोज त्या महाराजांच्या दर्शनाला जातोस, साक्षात्कारी आहेत म्हणतोस, मग त्यांच्या पुढे गप्प का बसतोस? तुला काही मुलबाळ नाही, मीही आता थकलो आहे तेव्हा मला नातवंडाचे बोल ऐकायचे आहे. त्याचे खेळ डोळ्याने बघायचे तेव्हा आज त्यांना विनंती कर की , स्वामी समर्थ गजानना, माझ्यावर दया करून मला एखादे मूल तर द्या हो !
तो खरा साधु असल्यास तुझे मनोरथ पुरतील आणि माझाही हेतू तडीस जाईल. साधुपुरुषाना या जगात काहीच अशक्य नसतं. तेव्हा संत लाभाचा आपल्याला काही उपयोग करून घे.”
खंडू पाटलांनाही हे पटलं. म्हणून एके दिवशी मारुतीच्या मंदिरात तो समर्थाना म्हणाले, “अरे गण्या, माझा चुलता आता थकला. त्याच्या मनात नातवंड पहायची इच्छा झाली आहे. तुला लोक साधु म्हणतात तुझं दर्शन घेतल्यावर मनातली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. मग आता उशीर न करता लोक तुझ्याबद्दल काय काय म्हणतात त्याचं प्रत्यन्तर मला दाखव बरं. जो तुझ्या पायावर डोकं ठेवतोय तोच निपुत्रिक रहावा का?”
त्यांचे सगळं भाषण महाराजांनी ऐकलं आणि म्हणाले , “आज तू आमच्याकडं याचना केलीस हे छान झालं बघ. तसं म्हंटलं तर सत्ता आणि धन तुझ्याच हातात आहे , तू प्रयत्नही करीत आहेस मग आम्हाला विनंती का करतोस काही कळत नाही. तूच म्हणतोस की धन आणि बलापुढे सगळं काही मोठं असतं म्हणून. मग धन आणि बलाच्या सहाय्याने हे का घडत नाही सांग बरे ? तुझी एवढी भव्य शेती आहे , गिरण्या दुकाने पेढ्या आहेत. तुझा शब्द संपूर्ण व्हराडात कुणी मोडत नाही असं सांगतोस. एवढं जर आहे , तर त्या ब्रह्मदेवाला तुला पुत्र देण्याची आज्ञा का करत नाही , हेच मला समजत नाही.
त्यावर खंडू म्हणाले , ” ही गोष्ट काय , प्रयत्नाधीन आहे का ? पिके जरी पाण्यापासून येत असली तरी पाऊस पाडणं काय माणसाच्या हातात आहे का ? दुष्काळांत जमिनी ओसान पडतात हे सगळ्यांना माहीत आहे. मात्र पाऊस पडल्यावर मनुष्य आपली कामे करतो हाही तसाच प्रकार आहे. येथे मानवाचं काही चालत नाही.”
खंडू पाटलांचं बोलणं ऐकून महाराजांना हसू आलं व महाराज म्हणाले कि ” काही का असेना , तू आमच्याकडं मुलासाठी याचना केलीस हे खरं ! अरे याचना म्हणजे भीक मागितल्यासारखंच आहे आणि तेच तू आज केलंस. तुला जे मूल होईल त्याचं नाव भिक्या ठेव. पुत्र देणं हे सर्वस्वी माझ्या हातात नसलं तरी तुझ्यासाठी ईश्वराकडे मी विनंती करील. तो माझी विनवणी ऐकेल. त्याला काही हे फारसं कठीण नाही. तुला मुलगा होईल हे वचन मी तुला देतो. तू घरचा श्रीमंत आहेस , तेव्हा ब्राम्हणांना दरवर्षी आमरसाचे जेवण मात्र घाल.”
खंडु पाटलांनं हे सगळं ऐकलं आणि घरी येऊन , देवळात काय काय घडलं ते कुकाजीना सांगितलं. ते ऐकून कुकाजीना फार आनंद झाला. काही दिवस लोटल्यावर समर्थांचे वचन खरे झाले. खंडूची पत्नी गंगाबाई गर्भवती झाली. नऊ महिने झाल्यावर प्रसूती होऊन तिला मुलगा झाला. खंडूला पाटलाला खूप आनंद झाला. कुकाजीच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्यानी खूप दानधर्म केला. गरिबांना गुळ गहू दिले. गावातल्या मुलांना पेढे बर्फीचा खाऊ वाटला. थाटात बारसं करून भिकू नाव ठेवलं. हळूहळू बाळ मोठं होऊन ओसरीवर रांगु लागलं. ब्राह्मणांना अमरसाचं जेवण दिलं. शेगावात ती परंपरा अजूनही चालू आहे.
पाटलाचा असा बोल बाला झालेला देशमुखाना आवडला नाही. गावात एक फळी देशमुखांची , एक फळी पाटलांची. दोघांचीही अंतःकरणे एकमेकांबद्दल कलुषित होती. एकमेकांबद्दल अजिबात प्रेम नसल्याने दुसऱ्यावर वैर भावना करून त्याचा घात कसा करता येईल हाच विषय दोघांच्याही डोक्यात सदैव येत असे. बरोबरच आहे दोन शास्त्री , दोन मंत्री , दोन तंत्री एकमेकांसमोर आले की कुत्र्या प्रमाणे गुरगुर सुरू होते. शेगावात पाटील आणि देशमुखांत एकदा जो छत्तिसाचा आंकडा झाला तो कधी बदलून त्रेसष्ठाचा कधी झाला नाही.
पुढं नातवाचं मुख पाहून कुकाजी पंढरीत स्वर्गवासी झाले. त्यामुळे खंडू उद्विग्न झाला. मनात म्हणाला , ” आज माझे छत ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावर मी निर्भय होऊन उड्या मारत होतो त्यालाच श्रीहरीने असे का करावे ? ”
जमीनदारी ही आधीच द्वेषाची खाण. त्यात खंडूची पाटलांची अशी मनस्थिती ! त्यातच पाटलावर काहीतरी उद्वेग आणायची एक चांगली संधी देशमुख मंडळींना मिळाली. तो सगळा वृतांत आपण आठव्या अध्यायात पाहू.
अशा प्रमाणे श्री संतकवी दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचा हा सातवा अध्याय सुफळ संपूर्ण होत असून ह्या अध्यायाच्या श्रवणाने आपणास “श्री” च्या कृपेने शक्ती, बळ व सामर्थ्य प्राप्त होईल, आपल्या आशा, आकांक्षा पूर्ण होतील व तद्वतच श्री गजानन महाराजांची कृपा होईल यात काही शंका नसावी.