You are currently viewing श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला ??

श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला ??

          श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे. परंतु गजानन महाराज माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले . त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे,

“कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे। साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥”

देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात असताना तरुण वयातील महाराज.
Ghumakkar
Shree Gajanan Maharaj – Shegaon – Ghumakkar – Inspiring travel experiences

          जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे,-

दंड गर्दन पिळदार । भव्य छाती दृष्टी स्थिर ।

          भृकुटी ठायी झाली असे ॥”जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या* अवस्थेत होते. (तुर्या* अवस्था: जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणगे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात).

          महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास, ह्या उक्तीप्रमाणे,

“बंकटलालाचे घर। झाले असे पंढरपूर । लांबलांबूनीया दर्शनास येती नारी-नर ।

लोक ते पावती समाधान ॥”

         बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले तरीदेखिल सच्च्या परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराजदेखिल उपाधिपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात. शेगांवात राहून महाराजांनी अनेक लीला करून लोकांचे कल्याण केले व त्यांना भक्तीमार्गाला लावले.

          सद्‌गुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्‌गुरू होते. या संदर्भात असे सांगितले जाते की ज्या दिवशी तरूण वयातील गजानन महाराज श्री स्वामींना भेटण्यास अक्कलकोटला येणार होते त्यादिवशी श्री स्वामी अतिशय आनंदात होते. तसेच दुरून गजानन महाराजांना (१७-१८ वर्षे वयाचे) येताना पाहून ते अतिशय आनंदाने उद्गारले, “गणपती आला रे!” त्यावर त्यांनी गजानन महाराजांना स्वतःच्या मांडीवर बसवून घेऊन त्यांचे प्रेमाने स्वागत केले. असे सांगितले जाते की केवळ एकच महिना गजानन महाराजांना स्वतःजवळ ठेऊन घेतल्यानंतर श्री स्वामींनी तारुण्यावस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखविण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरूष देव मामलेदार यांच्याकडे पाठवले. देव मामलेदारांनी महाराजांची अध्यात्मविषयक जाणीव समृद्ध केली आणि पुढील कार्याची दिशा व स्वरूप स्पष्ट करून सांगितले. त्यांच्याच सूचनेनुसार महाराजांनी पुढे आपले कार्यक्षेत्र शेगांव येथे निश्चित केले.  

          देह त्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले, “मी गेलो ऐसे मानू नका। भक्तित अंतर करू नका। कदा मजलागी विसरु नका। मी आहे येथेच॥” “दु:ख न करावे यत्किंचित। आम्ही आहोत येथेच। तुम्हा सांभाळण्यापरी सत्य। तुमचा विसर पडणे नसे॥.” त्यामुळेच जरी गजानन महाराजांनी समाधी घेतली तरी आजही त्यांच्या भक्तांना त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.

॥ गण गण गणांत बोते ॥
॥ जय गजानन ॥

Rohit

संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118

This Post Has One Comment

  1. D. R. Mane

    Nice post…
    Informative.

Leave a Reply