एक श्रीमंत बाई असते.
सगळे वैभव असूनही तिचे मन अस्वस्थ असते. थोडक्यात काय, तर तिच्या मनाला अक्षय आनंदाची आस होती! आणि नेमका तोच तिला मिळत नव्हता…!!
तिने पुष्कळ डॉक्टरांचा सल्ला घेतला. अखेर मानसोपचार तज्ज्ञाला भेटून तिने आपली व्यथा सांगितली.
“तुम्हाला काय वाटते? तुमचे सुख कशात आहे?? ” तज्ज्ञाने विचारले.
ती म्हणाली. ‘‘हे मला समजत असते तर मी तुमच्याकडे आले असते काय?’’
तज्ज्ञाने तिला पुढल्या आठवड्यात बोलावले.
‘आज मी अशा एका बाईची ओळख करून देणार आहे, जी अत्यंत समाधानी आहे. ती माझ्या ऑफिस मध्ये रोज झाडू मारते. मी तिला कधीही दु:खी बघितले नाही. ती सतत गात असते. तिच्या या आनंदी स्वभावामुळे ऑफिसमध्ये येणारी माणसेही आनंदी होतात.’’
श्रीमंत बाई आश्चर्याने म्हणाली, ‘‘ही बाई मला आनंदाचा मंत्र देणार? तिची आणि माझी काय बरोबरी? तुम्ही निदान आमच्या दोघींत केवढा फरक आहे याचा तरी विचार करायचा.’’
तज्ज्ञ किंचित हसला आणि म्हणाला, ‘‘तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. माझ्या झाडूवालीची आणि तुमची बरोबरी होऊच शकणार नाही. परंतु तुम्ही तिची गोष्ट ऐका. तुम्हाला पटली आणि तुमचा आनंद तुम्हाला मिळाला, तर मला समाधान वाटेल. तिचे बोलणे निरर्थक वाटले तर सोडून द्या.’’
तज्ज्ञाने झाडूवालीला बोलाविले. विनम्रपणे ती थोड्या अंतरावर बसली. प्रणाम केला आणि ती बोलू लागली.
‘‘बाई, तुमच्यासारखे माझे जग मोठे नाही. माझ्या छोट्या आयुष्यात मी सुखी होते. नवरा चांगला होता. छान मुलगा होता. अचानक नवऱ्याला ताप आला. त्याला हिवताप झाल्याचे उशिरा कळले. औषधे बदलूनही उपयोग झाला नाही. थोड्यात दिवसांनी माझा नवरा आम्हाला सोडून गेला. ते दु:ख पचवायला मला फार वेळ लागला. नशिबाने माझ्यावर पुन्हा एकदा अन्याय केला. आमचा तरणाताठा मुलगा अपघातात वारला. त्याच्या बाईकला कोणीतरी धडक दिली. या आघाताने मला कशातच आनंद वाटेना.’’
‘‘एक दिवस मी निराश अवस्थेत कामावरून परतत होते. रात्र झाली होती. थंडी वाढली होती. दार उघडत असताना मांजराचे एक पिल्लू घराच्या पायरीवर दिसले. ते थंडीने कुडकुडत होते. बहुधा उपाशीही असावे. त्याची दया येऊन मी त्याला घरात आणले, दूध पाजले…’’
तासाभरात ते पिल्लू तरतरीत झाले. आनंदाने माझ्याभोवती बागडू लागले. त्याचा आनंद पाहून मलाही आनंद झाला…!!!
अचानक माझ्या लक्षात आले, की एका छोट्या कृतीने मी एका पिल्लाला एवढा आनंद देऊ शकले. असाच आनंद मी आजूबाजूच्या लोकांना दिला, तर माझ्याही जीवनात केवढा आनंद निर्माण होईल! तेव्हापासून मी ठरविले, की इतरांना आनंद देत राहायचे…!!!’
दुसऱ्या दिवशी मी ताजी बिस्किटे बनविली आणि आजारी शेजाऱ्याला नेऊन दिली. त्याला ‘लवकर बरा हो’ म्हटले. मला वाटले नव्हते, की माझ्या जाण्याने आणि एवढ्याशा भेटवस्तूने त्याला एवढा आनंद होईल. त्यानंतर मी ठरविले, की रोज कोणा एकाला तरी आनंद द्यायचा…!!!
माझे हे व्रत अनेक वर्षे अव्याहत चालू आहे. मला वाटते माझ्याएवढे समाधानी आणि आनंदी कोणीच नसेल. मी रोज शांत झोपते आणि सकाळी आनंदाचा विचार करतच उठते.’’…!!!
तिची कथा ऐकत असताना श्रीमंत बाईच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
आपण श्रीमंतीत जगलो, पण पैशाने न मिळणारा आनंद आपल्याला कधीच मिळाला नाही. सापडलाही नाही, असे वाटून ती बाई मनोमन शरमली.
झाडूवाली म्हणाली, ‘‘तुम्ही किती आनंदी आहात, सुखी आहात यात जीवनाचे सौंदर्य नाही. तुम्ही इतरांना किती आनंदी केले, यातून तुमच्या जीवनाचे सौंदर्य मोजता येते. आयुष्याचे ध्येय आनंद मिळविणे हे नसून, आनंदाचा प्रवास करणे हे आहे. आनंद उद्या मिळेल म्हणून वाट पाहायची नसते. तो आजच मिळवायचा असतो. आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून नाही. आनंदी राहणे हा आपला निर्णय असतो.
तुमच्याजवळ काय आहे, त्यामुळे आनंदी आहात की नाही… हे ठरत नाही. तुम्ही काय आहात आणि दुसऱ्यांसाठी किती आनंद देऊ शकता यावरच आनंदाचे गणित सोडविता येते.
श्रीमंत बाई भारावून जाऊन झाडूवालीचे शब्द मनात साठवत होती.
तज्ज्ञाने तिच्याकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले.
श्रीमंत बाई म्हणाली, ‘‘आज मला आयुष्याचे जे गुपित कळले आहे, त्यासाठी मी माझी सर्व दौलत द्यायला तयार आहे. मला वाटले होते एक झाडूवाली मला काय ज्ञान देणार? परंतु तिने जे सोपे करून सांगितले, त्याला तोड नाही. आजपासून मीही आनंदात राहणार आणि माझा आनंद इतरांना वाटत राहणार.’’ आनंदाची ही सोपीशी व्याख्या आपणही शिकूया…!!
ह्या कथे चा अर्थ म्हणजे स्वानंद.
होय ना??